कुटुंबाची फॅमिली 

दादरचे वास्तुवैभव : 2 
 
'Reinventing' हा शब्द तुम्हाला माहित असेलच. त्याचा शब्दशः अर्थ म्हणजे जुने सोडून नवीन आणि अधिक चांगल्या रूपात समोर येणे. परंतु आज ज्यांची मी ओळख करून देणार आहे ते व्यावसायिक जुने न सोडता त्यात नवनवीन गोष्टींची भर घालून एका वेगळ्या उमेदीने ग्राहकाला आपल्याशी जोडून ठेवतात.
 
सर्वसाधारणपणे मराठी आणि त्यातून ब्राह्मण दुकानदार म्हणजे तुसडाच असणार या संकल्पनेला छेद देणारे हे दुकान म्हणजे जोश्यांचे फॅमिली स्टोअर्स. 
 
 
 
 
रत्नागिरी जिल्यातील जैतापूर जवळील कुवेशी या लहानश्या खेड्यात भिक्षुकी करणारे जोशी कुटुंब. सहा भाऊ आणि पाच बहिणी अशा गोतावळ्यातील शिवराम विश्वनाथ उर्फ अप्पा जोशी हे नशीब अजमावायला १९४४ साली मुंबईत येऊन पोहोचतात. गिरगावातील एका चाळीतील जिन्याखालच्या ३' X ४', म्हणजे १२ स्क्वे. फुटाच्या एका टपरीतून धंद्याची सुरुवात. कष्टमय जीवन, प्रापंचिक जबाबदाऱ्या, पैसे व अनुभव यांचे जराही पाठबळ नसताना चिकाटी आणि सचोटी या गुणांच्या जोरावर वाढवलेला धंदा. एप्रिल १९४६ मध्ये दादरमधील शेवडे यांचे फॅमिली स्टोअर्स हे दुकान विकत घेण्याची धडाडी. पण नशिबाचे भोग काही सुटत नव्हते. गांधी वधानंतर झालेली दुकानाची नासधूस, अनेक दुर्धर आजार यांना तोड देत बाजारातील आपली पत टिकवून ठेवणे येरागबाळ्याचे काम नव्हे. 
 

अप्पांनी किती मराठी लोकांना रोजगार मिळवून दिला याची गणतीच करता येणार नाही. अशा या सर्व लोकांकडून चिकवडी, मिरगुंडे, बटाटा कीस, कुरडई, सुपारी, श्रीखंड-आंबा-आलेपाक-खारीक वडी, पापड, मसाले, सांडगे, मेथीकुट, कुळथाचे पीठ, राजगिरा-डिंक-रवा-तीळ लाडू, चिवडा, उपवासाची भाजणी, फराळ असे पारंपरिक महाराष्ट्रीय पदार्थ तर त्यांच्याकडे मिळतातच परंतु त्याच बरोबरीने गणेशोत्सवात गणपती मूर्ती, होमाच्या समिधा, पंधरा प्रकारच्या वाती, रुखवताचे सामान, पूजेचे पाकीट, संक्रांतीला हलव्याचे दागिने, सीझनमध्ये आंबे, सणासुदीला उकडीचे मोदक हे त्या जोडीला आहेतच. गिऱ्हाईकांची गरज ओळखून उपनगरात गणपती मूर्तींची अथवा कोरोना काळात खाद्य पदार्थांची होम डिलिव्हरी असो, जोशी कुटुंबाने कधीच आखडता हात ठेवला नाही. 

 

सत्तरच्या दशकात बाजूचे दुकान विकत घेऊन तिथे स्टेशनरी आणि आर्ट मटेरियलचा व्यवसाय सुद्धा त्यांनी यशस्वी केला. याचे मुख्य कारण म्हणजे लिमलेटच्या गोळीपासून गणपतीच्या मूर्तीपर्यंत येणारी गिऱ्हाईके हीच जोश्यांची दैवते आहेत. एक आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे कै अप्पांच्या अर्धांगिनी आज वयाच्या नव्वदीत दुकानात काही तास येऊन कॅश काउंटर सांभाळतात. 

 

दुसऱ्या पिढीतील शेखर, त्यांच्या पत्नी सौ. कलाताई आणि अभिजित व योगेश ही तिसरी पिढी आज अनेक नाविन्यपूर्ण कल्पना राबवतात. स्वतःची कुरियर कंपनी (जी त्यांच्या अमेरिकेतील गिऱ्हाईकांची गरज पूर्ण करते), घोलवड होम स्टे, स्वतःचा मुखवास ब्रॅन्ड आणि अजून बरंच काही. स्वतःची वेबसाईट बनविण्याचे काम जोरात सुरु आहे. कालानुरूप बदल हेच त्यांच्या यशाचे गमक आहे आणि म्हणूनच ते आज ८० वर्षांनंतर देखील यशस्वी व्यावसायिक म्हणून मानाने उभे आहेत. 

 

मराठी तरुणांनी अशा उदाहरणातून व्यावसायिक होण्याची प्रेरणा घ्यायला हवी. 

 

@यशवंत मराठे

yeshwant.marathe@gmail.com

Leave a comment



Subscribe

Thank you for subscribing.

Something went wrong.

Contact Form

subscribe

Thank you for subscribing.

Something went wrong.

Contact Info

  • yeshwant.marathe@gmail.com

Follow Me

My Other Blogs: historycafe.in

Copyright © 2020 Sarmisal.

Made with ♡ by iTGS