दादरचे वास्तुवैभव : 4
अनेक वर्षांपूर्वी माझी बायको म्हणाली की तिला साडी घेण्यासाठी गिरगाव पंचे डेपो मध्ये जायचे आहे तेव्हा मी पटकन म्हटले की अगं, ते तर पंचे विकणारे दुकान आहे, तिथे साडी कशी मिळेल? दुकानाच्या नावावरून कधी कधी असे गैरसमज होतात म्हणून विचार केला की त्यांचा इतिहास जाणून घ्यावा.

सावंतवाडीहून महादेव यशवंत उर्फ दाजी कुलकर्णी वयाच्या १६-१७ वर्षी मुंबईत येतात आणि महात्मा गांधींच्या प्रेरणेने पंच्यांचे दुकान थाटायचे ठरवतात आणि १९२६ साली गिरगावातून व्यवसायाची सुरुवात म्हणून गिरगाव पंचे डेपो. पुढे दोन वर्षांनी दादरला येतात पण आपल्या व्यवसायाचे नाव न बदलण्याचा निर्णय घेतात. या वर्षीच्या ऑगस्ट महिन्यात या व्यवसायाला शंभर वर्षे होतील. आश्चर्य वाटेल पण आज चौथी पिढी देखील अभिमानाने त्याच नावाने व्यवसाय करतात.
कै. दाजींनंतर त्यांचे सुपुत्र अरविंद यांनी हा व्यवसाय अजून वाढवला. ग्राहकांच्या मागणीनुसार नवनवीन गोष्टी दुकानात वाढू लागल्या. लुंग्या, सदरे, झब्बे, धोतर जोडी, टॉवेल, सोलापुरी चादरी, बेडशीट, शाली, उपरणे, साड्या, टोपी, शेले, मुंज व लग्न सामान, देवाच्या पूजेची वस्त्रे आणि अजून बरेच काही. तिसऱ्या पिढीतील रमाकांत स्वतः इंजिनियर असून याच व्यवसायात आले. ते अभिमानाने असे सांगतात की आमचे दुकान हे सामान्य माणसाचे दुकान जरी असले तरी अगदी हातरुमालापासून ते पैठणी साड्यांपर्यंत आमच्याकडे सर्व उपलब्ध आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार काही उत्पादनात त्यांची virtual monopoly आहे, त्याचे एक मुख्य उदाहरण म्हणजे पामरी (देवाचे उपरणे).
आज रमाकांत यांच्या पत्नी सौ. अर्चनाताई, त्यांच्या खांद्याला खांदा लावून दुकानाचा भार ताकदीने पेलतात. त्यांच्या दुकानाचे वैशिष्ठ्य म्हणजे पारंपरिक गोष्टी आणि सर्व माल हॅन्डलूमचा. आता तर चौथी पिढी त्यांच्या व्यवसायात आली आहे. मुलगी सदिच्छा आणि मुलगा स्वराज हे पूर्णपणे मार्केटिंग सांभाळतात. आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात फेसबुक आणि इंस्टाग्राम या सोशल मीडियाद्वारे नवीन ग्राहकांपर्यंत यशस्वीरीत्या पोहोचतात.
याचा एक दृश्य परिणाम म्हणजे अनेक मुली त्यांच्या दुकानात आवर्जून साडी विकत घ्यायला येतात. आज जसे बरेच जण शहरातून परत कोकणात जात आहेत त्याचप्रमाणे तरुणी परत आपल्या पारंपरिक साड्या नेसायला तयार होत आहेत. याला Reverse Migration असे संबोधता येईल.
कुलकर्णी कुटुंबाचे शंभरी पार करण्याबद्दल अभिनंदन करताना असे म्हणूया की जरी उद्या त्यांनी बोरिवली अथवा ठाणे येथे दुकान थाटले तरी नाव 'गिरगाव पंचे डेपो'च असेल.
@ यशवंत मराठे
yeshwant.marathe@gmail.com
