दादरचे वास्तूवैभव : 1
मला पुलंचे अथवा वपुंचे पुस्तक हवे आहे असे म्हटले की समोरचा माणूस लगेच सांगतो, अरे, आयडियल मध्ये जा!!
असा नावलौकिक दोन-चार दिवसात कमावता येत नाही, त्यासाठी अनेक वर्षे आत्यंतिक तळमळीने ते व्रत अंगी बाणवावे लागते. नेरुरकर कुटुंब गेली नऊ दशके तो वसा जतन करत आहेत. चला, नेरुरकरांच्या या 'आयडियल' प्रवासाचा मागोवा घेऊया.

कै. नारायण (नाना) नेरुरकर यांनी सुमारे ९० वर्षांपूर्वी दादर रेल्वे स्थानकाच्या जवळ हे दुकान सुरू केले. कोण होते हे नाना? कोकणातील नेरूर नावाच्या लहानश्या गावातील एक सामान्य तरुण मुलगा, जो प्रचंड श्रम करण्याची मानसिकता ठेऊन पोटापाण्यासाठी मुंबईत आला. गिरगावातील समर्थ बुक डेपो येथे नोकरी करून पुस्तकांच्या जगात प्रवेश केला. दुकान उघडणे, झाडणे, पुस्तकांचे गठ्ठे खांद्यावरून आणणे ही त्यांची प्रमुख कामे. कालांतराने आपणच काहीतरी करावे या उर्मीने सुपारीबाग, परळ येथे 'आयडियल बुक डेपो' या नावाने व्यवसायाची मुहूर्तमेढ केली. नंतर १९३६ साली छबिलदासच्या गल्लीत दुकान सुरु केले. या सर्वात महत्वाची होती ती कामावरची निष्ठा आणि सचोटी.
त्यांची चारही मुले त्यांच्या व्यवसायात आली परंतु बाबाशेठ आणि आनंदशेठ कायम पडद्यामागेच राहिले. लोकांची मुख्यत्वे ओळख वामनराव उर्फ कांताशेठ आणि शंकरराव उर्फ छोटूशेठ यांच्याशीच राहिली. कांताशेठ यांनी पुस्तक विक्री तर छोटूशेठ यांनी स्टेशनरी विभागाची सूत्रे समर्थपणे सांभाळली.

आयडियल म्हणजे अगदी शिशुवर्गापासून उच्च शिक्षणार्थी आणि सर्व मराठी वाचकांसाठी एक अभिमानाचा आणि जिव्हाळ्याचा विषय आहे. एकदा कोणीतरी कांताशेठ यांना विचारले की तुमच्या दुकानात कायम एवढी गर्दी कशी असते? त्यावर त्यांनी अभिमानाने सांगितलं की आमच्या ग्राहकांना विश्वास वाटतो की म्हणाल ते पुस्तक आयडियल मध्ये हमखास मिळणारच. आज त्यांच्या दुकानामध्ये कादंबरी, ललित, चरित्र, आरोग्य, ज्योतिष, पाककला, बालसंवर्धन आणि धर्म अशा विविध विषयांवरील लाखाहून अधिक मराठी पुस्तकांचा संग्रह उपलब्ध आहे.
मराठी भाषा आणि आयडियल यांचे अतूट नाते आहे आणि तो एक प्रकारे शैक्षणिक केंद्रबिंदू आहे. जेव्हा BMM Convention च्या पुस्तक प्रदर्शनात 'आयडियल' सहभागी होते, तेव्हा अनेक जण आपल्या मुलांना तिथे घेऊन जातात आणि सांगतात की माझे पहिल्या इयत्तेचे पुस्तक मी यांच्याकडून घेतले होते. अमेरिकेत स्थायिक होऊन देखील त्यांची आयडियलशी नाळ जोडलेली आहे. यापेक्षा दुसरा मोठा सन्मान काय असेल, नाही का?
आज सर्वत्र बोंब आहे की मराठी वाचक कमी होतोय परंतु मंदार नेरुरकरांचे त्यावर मत वेगळं आहे. मराठी वाचक कमी झाले हे जरी खरं असलं तरी ते प्रामुख्याने कादंबरी या वाङ्मयाशी निगडित आहे, कारण कादंबऱ्या फक्त मनोरंजन करतात. वाचकांची भूक आता नुसती मनोरंजन अशी राहिली नसून जीवनात काहीतरी शिकण्याची आहे. त्यामुळेच त्यांच्या दुकानात येणाऱ्या लोकांमध्ये तरुणाई कमी असली तरी ती येतच नाही असे नाही. दुसरा मराठी वाचकांना भेडसावणारा प्रश्न म्हणजे मराठीला भविष्यात काही भवितव्य असेल का? नेरुरकरांशी बोलल्यावर असे जाणवले की लेखकाचा मुख्य उद्देश जर फक्त पैसा कमावणे हा असेल तर ते फार काळ टिकणार नाही. परंतु आपल्या भाषेचा आदर ठेऊन समृद्धीचा विचार केला तर 'मराठी संपणार नाही'.
आज नेरुरकर कुटुंबाची तिसरी पिढी आयडियल चालवते आहे. आपण सर्व मराठी भाषिक एकच सदिच्छा व्यक्त करू शकतो की मराठी कधीही संपू नये आणि आयडियल असा आयडियल प्रवास असाच चालू राहू दे.
@ यशवंत मराठे
