दादरचे वास्तुवैभव : 7
जेव्हा हिरे माहित नव्हते तेव्हा मोती हे उंची रत्न मानले जायचे. आपल्या इतिहासातील राण्या आणि राजकुमारी यांचे दागिने आठवा म्हणजे लक्षात येईल की मी काय म्हणतोय.
परंतु मोती बनतो कसा? काही लोकांना माहित असेल की काही नैसर्गिक कारणांनी समुद्रातील एखाद्या शिंपल्यामध्ये बाह्य पदार्थ (कण) प्रवेश करतो आणि आतील कालवाला बोचू लागतो. आणि म्हणून तो त्याच्या शरीरातील रसाचे आवरण त्याभोवती तयार करतो. अशा रीतीने शिंपल्यात मोती तयार होतो परंतु बहुतांशी तो ओबडधोबड असतो. यावर मात करण्यासाठी 'मिकीमोटो' या जपानी माणसाने १८९३ साली पहिल्यांदा कल्चर्ड मोती तयार करण्याचे तंत्रज्ञान विकसित केले. म्हणजेच एक प्रकारे मोत्याची शेती. या प्रकारात शिंपले पाळायचे, त्यांची पैदास वाढवायची आणि एका विशिष्ठ आकाराचे झाले की त्यांचे लहानसे ऑपरेशन करून मोती शेल वापरून बनवलेल्या गोळीचा त्यांच्यात शिरकाव करायचा. कालव त्याच्या सवयीनुसार त्याच्यावर थर रचू लागतो आणि मग आपल्याला मिळतो गोलाकार मोती.

आता कल्चर्ड मोती तर बनला पण तो लोकांच्या पचनी तर पडायला हवा. त्यामुळे मग मिकीमोटोने आपली माणसं अनेक देशांमध्ये पाठवली. आता कोणाचे तरी भारतात येणे स्वाभाविकच होते. अशी एक व्यक्ती निरनिराळ्या शहरांना भेट देत फिरू लागली. एकदा धनबादला जाताना त्याला एक गृहस्थ भेटले जे Mining Engineer होते आणि कोळशाच्या खाणीत काम करत होते परंतु व्यावसायिकाची उर्मी अंगी असल्याने पुण्यात त्याची कोळशाची वखार पण होती. दोघांच्या गप्पा रंगल्या आणि त्या भारतीयाला हा मोती व्यवसाय खुणावू लागला.

हे भारतीय गृहस्थ म्हणजे सीताराम त्रिंबक उर्फ बापूसाहेब लागू ज्यांनी १९३४ साली पुण्यात "लागू बंधू मोतीवाले" याची मुहूर्तमेढ केली. पुढे व्यवसाय वाढला म्हणून १९३६ साली मुंबईत प्रवेश करते झाले. दादरमधील एका चाळीतील दोन जागा (चार खोल्या); त्यात पुढच्या खोलीत (१० फूट X १२ फूट) दुकान आणि उरलेल्या तीन खोल्यात कुटुंबाचे वास्तव्य. आणि हे १९९६ पर्यंत म्हणजे पुढील ६० वर्षे हे असेच होते.

त्यावेळचा हा फोटो बघा. रस्त्याचे नाव न.चिं. केळकर रोड नसून लेडी जमशेदजी रोड होते आणि परिसराचे नाव काय तर 'जव्हेरी बाजार' कारण आहे जिथे आज दादर एम्पोरियम, रूप संगम, रूप मिलन अशी साड्यांची दुकाने आहेत तिथे पूर्वी ज्वेलरीची दुकाने होती आणि सगळ्यात मोठे दुकान हरी महादेव वैद्य यांचे होते. १९९६ साली लागूंचे दुकान दोन खोल्यांचं आणि उरलेल्या दोन खोल्या ऑफिस असे झाले. आणि कालांतराने २००३ साली चारही खोल्यांचे दुकान झाले.

सुरुवातीच्या काळात बापूसाहेब लागूंना त्यांचे मेव्हणे श्री. राम सोमण यांचे सहाय्य मिळाले. पुढे दुकानाची धुरा त्यांचे दुसरे सुपुत्र श्रीकांत लागू उर्फ दाजीकाका यांनी यशस्वीपणे सांभाळली. कालांतराने सोमण मामा आणि श्रीकांत लागू यांना बापूसाहेबांचे थोरले चिरंजीव माधव लागू म्हणजेच दिलीप लागू याचे वडील यांची साथ मिळाली.

१९९७ साली जगातील सर्वांत मोठी हिरे उत्खनन व विक्री कंपनी De Beers ने भारतात मोठ्या प्रमाणात प्रवेश केला. त्यावेळी त्यांच्या जाहिरातीसाठी जो दागिना त्यांनी वापरला तो लागू बंधू यांनीच बनवून दिला. त्यामुळे साहजिकच लागूंनी मोत्यांबरोबर हिऱ्यांच्या दागिन्यांवरही लक्ष केंद्रित केले आणि त्याचा त्यांना मोठा फायदा झाला.
जेव्हा 'मोतीवाले' या नावामुळे व्यवसायावर मर्यादा येते याची जाणीव झाल्यावर नावात फक्त "लागू बंधू" एवढेच ठेवले.
बापूसाहेबांचे सर्वात धाकटे चिरंजीव प्रकाश लागू यांनी नोकरी सोडून या व्यवसायात प्रवेश केला आणि पुण्यामध्ये शाखा सुरू केली. आता त्यांचे चिरंजीव सारंग लागू आणि त्याची फॅमिली पुण्यातील दोन्ही शाखा चालवत आहेत. बापूसाहेबांचा नातू दिलीप लागू यांनी व्यवसायात व्यावसायिकता आणली आणि शाखा वाढवत नेल्या आणि जोडीने नोकर वर्गही वाढत गेला. आज २०२६ मध्ये दिलीप लागू आणि त्यांचे दोन सुपुत्र पराग (Software Engg) व कुणाल (CA) हे या व्यवसायाची घोडदौड चालू ठेवत आहेत. आज त्यांच्या ६/७ शाखा आहेत आणि सुमारे २०० लोक कामाला आहेत.
सध्या लॅब-ग्रोन डायमंड्सनी बाजारपेठेवर कब्जा केल्यामुळे हिऱ्याच्या दागिन्यांची मोहिनी कमी होऊ लागली आहे. परंतु लागूंनी मोत्यांच्या दागिन्यांवरील आपली पकड कधीच ढिली पडू न दिल्यामुळे त्यांच्या व्यवसायावर विपरीत परिणाम झाला नाही. त्याच बरोबरीने ते आता ब्रँडेड चांदीचे दागिनेही बनवतात.
मी जेव्हा दिलीप लागूंना भेटलो तेव्हा कळलं की जरी लागू हे कोकणातील केळशी गावचे असले तरी तिथे आता एकही लागू शिल्लक नाही. काही पिढ्यांपूर्वीच ते त्यांचे गाव सुटले.
दिलीप लागूंच्या मते भारतामध्ये ज्वेलरी व्यवसायाला मरण नाही. आणि जरी स्पर्धा दिवसेंदिवस वाढत असली तरी सचोटीने व्यवसाय केल्यास ग्राहक तुमच्याकडे वारंवार येतो याच्यावर त्यांचा ठाम विश्वास आहे. दिलीपजी जरी व्यवसायात आले तरी त्यांचे पहिले प्रेम गिर्यारोहणावर आहे. १९८८ साली भारतातील सर्वोच्च आणि जगातील तिसरा क्रमांक असलेल्या कांचनगंगा अष्टहजारी शिखरावर 'गिरीविहार' या मुंबईतील संस्थेतर्फे पहिली नागरी मोहीम आखली गेली. त्यात दिलीप लागू हे उपनेता होते. आणि पंचवीस हजार फुटापर्यंत चढाई करण्यात ते यशस्वी झाले. शिखरावरचा प्रयत्न करणाऱ्या चारुहास जोशी आणि उदय कोलवणकर यांना Frostbite झाल्यामुळे पाचशे मीटर शिल्लक राहिले असताना प्रयत्न सोडून द्यावा लागला.
त्यांनी मला दुसरी एक चित्तथरारक कथा सांगितली.
१९९८ साली महाराष्ट्रातून माऊंट एव्हरेस्टवर जी मोहीम गेली (दिलीपजी त्यात स्वतः नव्हते परंतु सपोर्ट सिस्टीमचा ते महत्वाचा हिस्सा होते) तेव्हा सुरेंद्र चव्हाण हे एव्हरेस्ट सर करणारे पहिले मराठी गिर्यारोहक होते. सुरेंद्रने त्याच्या वॉकी टॉकी वरून बेस कॅम्पला कॉन्टॅक्ट केला. तिथून सॅटेलाईट फोनवरून दिलीपजींशी संपर्क करण्यात आला आणि मग त्यांनी सुरेंद्र चव्हाण याचा तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी तसेच शरद पवार आणि प्रमोद महाजन यांच्याशी थेट संपर्क साधून दिला आणि एव्हरेस्ट शिखरावरून सुरेंद्रने या दिग्गजांशी संवाद साधला.
अनेकांना माहित नसेल पण लागू घराण्यातील अनेक लोकं नाट्य आणि सिनेमा क्षेत्रात कार्यरत होती आणि आहेत. त्यातील प्रमुख म्हणजे डॉ श्रीराम लागू, उदय लागू, विवेक लागू, रिमा लागू.
येत्या १६ डिसेंबरला लागू बंधू यांच्या मुंबईतील प्रवासाला ९० वर्षे पूर्ण होत आहे. मोत्यासारखीच त्यांची चमक वर्षानुवर्षे वाढत राहो, ही आपल्या सर्व मराठी माणसांची सदिच्छा.
@ यशवंत मराठे
yeshwant.marathe@gmail.com
