बाप से बेटा सवाई

दादरचे वास्तुवैभव : 5
 
बेटा सवाई म्हटले म्हणजे काही बापाला कमी लेखणे अजिबातच नाही. उलट आपल्यापेक्षा मुलगा सवाई असेल तर बापाचा ऊर अभिमानाने भरून येतो. आपली आजची कथा थोडी तशीच आहे.
 
 
 
 
 
लाटवण या महाड जवळील एका लहानश्या खेड्यातील फडके कुटुंब. त्यातील हरिपंत फडके हे थोरले माधवराव पेशव्यांचे सरसेनापती. त्यांचे वंशज कै. मोरेश्वर हे पुण्यातील सदाशिव पेठेत फॅमिली डॉक्टर. त्यांचे सुपुत्र अच्युत हे मुंबईच्या नायर हॉस्पिटलमधून डॉक्टर झाले आणि डॉ. फडके लॅब्सची सुरुवात त्यांनी १९६३ मध्ये केली. मुंबईमध्ये हे पहिले अँड्रोलॉजी सेंटर सुरू झाले. अँड्रोलॉजी ही वैद्यकीय शाखा पुरुष वंध्यत्वाशी संबंधित आहे, जी त्यावेळी अत्यंत दुर्लक्षित होती.
 
त्यांचे ब्रीद स्पष्ट होते की पॅथॉलॉजी हा धंदा नसून एक वैद्यकीय व्यवसाय आहे. कारण लॅबच्या टेस्ट रिपोर्ट्स वरून रुग्णांची ट्रीटमेंट ठरवली जाते त्यामुळे आपले रिपोर्ट्स थेट रुग्णांच्या जीवनावर परिणाम करतात. यानंतर त्यांचे सुपुत्र डॉ. अविनाश (MD पॅथॉलॉजी मधील गोल्ड मेडलिस्ट) आणि सून डॉ. वंदना यांनी १९८० मध्ये विस्तार करून सर्वसमावेशक पॅथॉलॉजी लॅब नेटवर्क उभारले आणि त्यातून “डॉ. अविनाश फडके पॅथॉलॉजी लॅब्स” ची स्थापना झाली. कालांतराने हिस्टोपॅथॉलॉजी, मायक्रोबायोलॉजी, इम्युनोअ‍ॅसे यांसारखे विभाग सुरू केले. तसेच विद्यमान चाचण्यांमध्ये ऑटोमेशन आणून तपासणी व निदान प्रक्रियेतील तांत्रिक प्राविण्य अधिक वाढवले. फडके लॅब ही खासगी क्षेत्रातील प्रतिष्ठित NABL मानांकन मिळवणारी पहिली लॅब होती.
 
 
 
 
पुढे २००१ मध्ये निकोलस पिरामल आणि २०११ मध्ये रॅनबॅक्सी यांच्या सहकार्याने लॅबचा प्रचंड विस्तार केला. १९८० मध्ये फक्त बारा लोक काम करत असलेली एकमेव लॅब २०११ मध्ये ३५ लॅब्स आणि ७०० लोक आणि आज ७५०० स्टाफ आणि ६०० डॉक्टर्सच्या मदतीने भारतभरातील ४८५ लॅब्स यशस्वीपणे पुढे नेत आहेत. २००४ मध्ये डॉ अनिता बोर्जेस यांच्या मदतीने कँन्सर रिसर्च करणारे Centre of Excellence in Pathology हा त्यांचा दृष्टीने एक मानाचा शिरपेच आहे.
 
 
कोव्हीड महामारीच्या काळात त्यांनी केलेली अपार मेहनत याला काही तोडच नाही. त्यांनी त्या वेळी सुमारे २५ लाख टेस्ट केल्या (एका दिवसाला अंदाजे १२०००). त्याच सुमारास तिसऱ्या पिढीतील डॉ अजय याने मॉलिक्युलर डायग्नोसिस आणि जेनेटिक्स टेस्टिंग सारख्या अनेक नवीन टेक्नॉलॉजी अंमलात आणल्या. त्यामुळे काय घडले? आज फक्त मुंबईतील ३५ लॅब्स मध्ये ते दहा हजार पेशंट्सच्या सुमारे पन्नास हजार टेस्ट्स प्रत्येक दिवशी करतात. तसेच प्रत्येक दिवशी अंदाजे एक हजार होम व्हिसीट्स केल्या जातात. आश्चर्याने तोंडात बोटं घालायची वेळ येते.
 
 
 

डॉ अच्युतरावांना डॉ अविनाशबद्दल जेवढा अभिमान वाटला असेल तेवढाच अभिमान 'डॉ अजय' "बाप से बेटा सवाई" होण्याच्या मार्गावर चालत असल्याने डॉ अविनाशला असेल.

 
@ यशवंत मराठे
yeshwant.marathe@gmail.com

Leave a comment



Subscribe

Thank you for subscribing.

Something went wrong.

Contact Form

subscribe

Thank you for subscribing.

Something went wrong.

Contact Info

  • yeshwant.marathe@gmail.com

Follow Me

My Other Blogs: historycafe.in

Copyright © 2020 Sarmisal.

Made with ♡ by iTGS