एकादशी दुप्पट खाशी

दादरचे वास्तुवैभव : 6 
 
जोगळेकर हे हेदवी गावातील पुजारी कुटुंब. आता ८० वर्षांपूर्वी देवळाच्या पुजाऱ्याचे उत्पन्न ते काय असणार? दिवसाला काही पैसे पण त्यात कुटुंबाचे पोट कसे भरायचे हा यक्षप्रश्न. त्यामुळे १९४५ साली शिवराम जोगळेकर मुंबईत येऊन थडकले. अंगावर पडेल ते काम करायची तयारी असल्याने दूध टाकणे, ड्रायव्हरची नोकरी (आश्चर्य म्हणजे तेव्हा त्यांना गाडी चालवता येत होती) आणि बरेच काही.
 
 
 
 
सुदैवाने त्यांच्या हातात पाककला होती त्याच्या जोरावर गिरगावात व्ही पी रोडवर एक खाद्यपदार्थाची टपरी सुरु केली. तिथल्या एका बिल्डिंगचे मालक डॉ. भालेराव या तरुणाचे निरीक्षण करत असत. त्याचा मेहनती स्वभाव आणि सचोटी बघून, काही काळानंतर त्यांनी तिथेच एका बोळात स्वतःच्या बिल्डिंगमध्ये थोडेसे बांधकाम करून हॉटेल चालू करण्यास प्रोत्साहन दिलं. अशा प्रकारे १९४७/४८ साली प्रकाश उपहार गृह सुरु झाले. आपल्या उपहार गृहाचे नामकरण 'प्रकाश' करण्याचे कारण त्यांचा सर्वात मोठा मुलगा प्रकाश लहानपणीच वारला. एक अभूतपूर्व गोष्ट म्हणजे १९५० मध्ये, जेव्हा केटरिंग हा शब्द देखील लोकांना फारसा माहित नव्हता तेव्हा देखील त्यांचा कॅटरिंगचा व्यवसाय होता.
 
 
पुढच्या काही वर्षात पैसे कमवून पहिली गोष्ट केली म्हणजे १९५६ साली हेदवी येथील गणपती मंदिराचा जीर्णोद्धार. व्यवसाय वाढत होता त्यामुळे मग १९७१ साली गोखले रोड दादर येथे प्रकाश सुरु झाले. परंतु त्यांना त्यांचे गाव कायम खुणावत असे त्यामुळे मग १९७३ साली आपला मुलगा परशुराम उर्फ राजाभाऊ, मानसपुत्र विजय जोगळेकर तसेच इतर पुत्र अनिल आणि अशोक यांच्या हाती सर्व सूत्रे देऊन त्यांनी कायमची मुंबई सोडली. १९९३ साली शिवरामभाऊंचे निधन झाले परंतु आज देखील वापरले जाणारे सर्व मसाले हे त्यांच्या रेसिपीनुसार जोगळेकर स्वतः बनवतात.
 
 

आज तिसऱ्या पिढीतील निलेश, आशुतोष आणि अमेय हे कॅटरिंग सर्व्हिस आणि दादर व गिरगावातील उपहार गृहे चालवतात. बऱ्याच जणांना माहित नसेल पण सेना भवनच्या गल्लीतील नवरे मंगल कार्यालय जोगळेकरांचेच होते. संकष्टी, एकादशी असे उपास असले की प्रकाशमध्ये जरा जास्तीच गर्दी असते. आणि मग साबुदाणा वडा, खिचडी व पियुष वगैरे चोपून खाल्ले की लक्षात येते की उपवास असून आपण दुप्पट खाल्ले पण त्या पदार्थांची चवच 'लई भारी' आणि म्हणून मग पडजीभ सारखी मागत राहते.  दादरच्या प्रकाशमध्ये येणाऱ्या लोकांमध्ये 'Who's Who' अशी अनेक celebrity मंडळी आहेत. क्रिकेटियर स्टीव्ह स्मिथ, स्टुअर्ट ब्रॉड पासून सचिन तेंडुलकर, राज ठाकरे ते अर्चना पूरण सिंग, कुणाल विजयकर पर्यंत.

 

 

गेली अनेक वर्षे त्यांची मूळ जागा redevelopment मध्ये असल्यामुळे आणि ते काम लांबल्यामुळे त्यांची खूप अडचण होते आहे. आपण अशी सदिच्छा देऊया की लवकरात लवकर ते दिमाखात परत आपल्या जागी जातील.

 
@ यशवंत मराठे
yeshwant.marathe@gmail.com

Leave a comment



Subscribe

Thank you for subscribing.

Something went wrong.

Contact Form

subscribe

Thank you for subscribing.

Something went wrong.

Contact Info

  • yeshwant.marathe@gmail.com

Follow Me

My Other Blogs: historycafe.in

Copyright © 2020 Sarmisal.

Made with ♡ by iTGS