चारकोपमधल्या एका छोट्याशा घरातून रोज पोळ्यांचा खमंग वास दरवळतो. दिवसाला अडीच हजार पोळ्या. त्या लाटणाऱ्या, भाजणाऱ्या बायकांच्या चेहऱ्यावर एक वेगळीच ऐट असते, स्वतःच्या पायावर उभं राहिल्याची. परंतु या स्वयंपाकघरामागे एक माणूस आहे जो स्वतः दोन्ही पायांवर उभा राहू शकत नाही.
त्याचं नाव राजेश रामनाथ चेंबूरकर.
शिक्षण घेत असतानाच परिस्थितीमुळे मोठ्या भावाने पूर्वी सुरू केलेले वर्कशॉप राजेशने १९८८ वर्षी परत सुरू केले.. कारण भावाचे व्यसन पराकोटीला गेले होते व घरात कमावती व्यक्ती नव्हती. वयाच्या १९ व्या वर्षीच राजेशवर घरची जबाबदारी आली. त्याच्या मामाची पॉवर लूमची मोठी फॅक्टरी होती.. त्या पॉवर लूमचे काही भाग त्याच्या वर्कशॉपमध्ये बनू लागले. दरम्यान मामांच्या सांगण्यावरून त्यांच्याही मोठ्या फॅक्टरीमध्ये लक्ष घालू लागला.. दोघांच्या प्रयत्नांनी फॅक्टरी फोफावू लागली.. प्रॉडक्शन वाढले.. परंतु भारतात पॉवर लूमचे भवितव्य ठीक दिसत नव्हते.. म्हणून निर्यात सुरू केली.. त्यात बरेच यश मिळू लागले.. आयुष्य रुळावर धावण्यासाठी तयार होते पण दोनदा प्रेमभंग झाला, एकदा एकवीसव्या आणि एकदा तेविसाव्या वर्षी. त्याच वर्षी वडील गेले. तो खचला, पण सावरला. आता फक्त काम, काम आणि काम, असं त्याने ठरवलं.
नियतीने मात्र वेगळाच डाव मांडला होता.
१३ एप्रिल १९९३. खंडाळ्याच्या घाटातली ती रात्र.
राजेश गाडीच्या मागच्या सीटवर झोपला होता. चूक त्याची नव्हती, दुसऱ्याचा हलगर्जीपणा नडला. गाडी दरीत कोसळली. झोपेत असलेल्या राजेशला सावरायला क्षणभरही मिळाला नाही. डोकं जोरात आपटलं आणि मणक्यातल्या L1 व L2 यांचा चुराडा झाला. त्याचं वय होतं तेवीस. खालापूरला प्रथमोपचार झाले आणि त्याला नानावटी रुग्णालयात आणलं गेलं. तिथून सुरू झाला एक न संपणाऱ्या वेदनेचा प्रवास.
एका शस्त्रक्रियेत दोन रॉड लावून मणका जोडला गेला. पण डॉक्टरांनी त्याला खुर्चीत बसवायला कदाचित थोडी घाई केली. रॉड निखळले. दुसरी शस्त्रक्रिया झाली. त्यात दिलेलं डेकाड्रॉन इंजेक्शन त्याच्या शरीराला मानवलं नाही आणि पाठीत पू झाला. तो साफ करण्यासाठी पुन्हा एक ऑपरेशन. डॉक्टरांनी स्वतः लिहून ठेवलं होतं, "हे इंजेक्शन देऊ नका." तरीही चुकून ते पुन्हा दिलं गेलं. पुन्हा पू, पुन्हा शस्त्रक्रिया.
एक मानवी चूक आणि एक चुकीचा निर्णय. त्यापायी दीड वर्ष रुग्णालय हेच त्याचं घर झालं. सुमारे वीस ते पंचवीस शस्त्रक्रिया झाल्या. तसाही कंबरेखालचा भाग पूर्णपणे बधिर होताच, ना हालचाल, ना संवेदना.
अशा वेळी माणसाच्या मनात काय येईल? राजेशच्या मनात पहिला विचार आला: "बरं झालं, माझे प्रेमभंग झाले. नाहीतर त्या मुलींनी हे सगळं कसं निभावलं असतं?"
मणक्याच्या दुखापतीमुळे मूत्राशय ८० ml इतके लहान झाले होते. त्यात लघवी थांबू शकत नव्हती.. सतत बाहेर येत असे. तेव्हा परत एकदा ऑपरेशन. कै. डॉक्टर शरद सागडे ह्यांनी पोटातील आतडे काढून मूत्राशयाला लावून ते मोठ केलं की त्यात थोडी तरी लघवी थांबू शकेल. नैसर्गिक जागा बंद करून पोटात अपेंडिक्सला जोडून आतड्याचा व्हॉल्व बनवला व पोटात एक बारीक छिद्र बनवलं गेले.. तिथून मग जाणवेल तसे नळी घालून लघवी बाहेर येऊ शकेल.. जगण्याची शक्यता अगदी कमी होती. पण तो बचावला. आपल्याला विचार करूनच कसेसेच होते की एवढे हाल!!
त्याच वर्षी एका मानसोपचारतज्ज्ञांनी भाकीत केलं: "हा मुलगा फार तर दोन-तीन वर्षे टिकेल. मग असह्य होऊन स्वतःचं बरंवाईट करून घेईल." राजेशने मनाशी पक्कं केलं की हे भाकीत खोटं ठरवायचं.
पायाला कॅलिपर लावून तो थोडाफार चालू लागला. त्याने स्वतःचं वर्कशॉप सुरू केलं आणि व्हीलचेअरवर बसून लेथ आणि ड्रिलिंग मशीन चालवू लागला.

१९९८ साली आयुष्यात एक मुलगी आली आणि लग्न पण झालं.

लग्नाच्या वेळेचा फोटो
पण दुर्दैवाची सावली पाठ सोडत नव्हती. पत्नीला मानसिक आजाराने गाठलं आणि ते नातंही टिकलं नाही. मोठा भाऊ अत्यंत बुद्धिमान, पण व्यसनात अडकून त्याने सगळं गमावलं. राजेशकडे आता आधार म्हणून उरले फक्त आई आणि मावशी. १९९४ ते १९९९ पर्यंत धाकटा मामा कै. श्री शशिकांत पुरव व धाकटी मावशी कु. कामिनी ह्यांनी आसरा दिला.. खूप चांगल्या पद्धतीने राजेश, त्याची आई व सोबत असलेली दुसरी मावशी जिला राजेश आईचं मानतो ह्यांची देखभाल केली. आज देखील राजेश त्याच्या ह्या मामा आणि मावशी यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करतो.

आई आणि मावशी
२००२ मध्ये फिजिओथेरपी सुरू असताना त्याच्या मांडीचं हाड पूर्ण तुटलं. ऊस पिळून तोडावा तसा पाय तुटून हातात आला. त्यावेळी ऑपरेशन करून जॉईन करताना रॉड लावला.. गुडघा ते मांडी.. तेव्हा ओ.टी. इन्फेक्शन झाल्याची शक्यता असावी कारण पुढील तीन-चार वर्षांतच पुन्हा रुग्णालयात जावं लागलं. सीटी स्कॅनमध्ये दिसलं की त्या भागात पू साचला आहे. हिंदुजा रुग्णालयातील डॉ. आगाशे यांनी पाय वाचवण्यासाठी अनेक शस्त्रक्रिया केल्या, पण यश आलं नाही. व्यवस्थापनाच्या कृपेने त्या शस्त्रक्रिया मोफत झाल्या, हीच काय ती दैवी कृपा. शेवटी उजवा पाय पूर्ण कापावा लागला.
२००४ साली Rays Marketing Company छोट्या प्रमाणात सुरू केली.. १ जुलै २००५ रोजी मोठ्या प्रमाणात.. तेव्हा ABN Amro Bank होती.. त्यांचं क्रेडिट कार्ड विकण्यासाठी DSA (Direct Selling Agent) सुरू केली.. ४० मुली.. २० मूले.. ४ मॅनेजर.. डायरेक्टर.. स्वतः राजेश मॅनेजिंग डायरेक्टर असा घाट घातला गेला.. पण पुन्हा एकदा नियतीचा जोरदार फटका.. २६ जुलै २००५ रोजी मुंबईत ढगफुटी झाली आणि सगळं वाहून गेलं. विमा काढण्याचा विचार करायलाही वेळ मिळाला नाही. तो अक्षरशः रस्त्यावर आला. नंतर आणखी एक-दोन प्रयत्न केले, पण त्याच्या शारीरिक अवस्थेचा गैरफायदा घेत भागीदारांनी फसवलं.
२००७ मध्ये दुसऱ्या मानसोपचारतज्ज्ञांनीही तेच भाकीत केलं: "फार तर दोन-तीन वर्षे." राजेश पुन्हा तेच ठरवून मोकळा झाला.
राजेश उत्तम ग्लास पेंटिंग करतो आणि त्याने एक दोन प्रदर्शने देखील भरवली आहेत पण शारीरिक कमकुवतपणामुळे त्याला ते चालू ठेवणे फार कठीण जाते.


पुढे जानेवारी २०१८ मध्ये डाव्या पायात संसर्ग झाला. पूर्ण पाय कापावा लागणार होता, पण डॉक्टर आगाशे यांनी आपलं सारं कौशल्य पणाला लावून मांडीचा थोडासा भाग वाचवला. त्या आधारावर तो आजही बसू शकतो. त्यामुळे आजारी आईची व अल्झायमर असलेल्या छोटी आई म्हणजे मावशीची सेवा करू शकला.. आजूबाजूचे लोक सांगतात की धडधाकट लोकांना जमणार नाही अशी दोघांची सेवा स्वतः अपंग असून राजेशनी केली.. ह्याचं श्रेय राजेश डॉ. आगाशेंना देतो. नियतीने त्याच्या शरीराचा चौरंग केला, पण त्याचा आशावाद ती मोडू शकली नाही. आजवर तीन वेळा त्याचं हृदय बंद पडलं आणि प्रत्येक वेळी तो परत आला.

कोरोनाचा काळ. घरात पडून आईच्या मांडीचं हाड मोडलं आणि ती अंथरुणाला खिळली. मावशीला डिमेन्शिया आणि अल्झायमरने गाठलं. चोवीस तास सोबतीला कोणी नाही, विश्रांती नाही, धड झोप नाही. जवळचे नातेवाईक नव्हते आणि जे थोडेफार होते ते ठरवून दूर गेले. ते दिवस त्या तिघांनी कसे काढले, हे फक्त परमेश्वराला ठाऊक. २०२३-२४ मध्ये आई आणि मावशी गेल्या. राजेश आता पूर्ण एकटा पडला. त्याच्यावर अंदाजे ३०-३५ शस्त्रक्रिया झाल्या आहेत आणि नंतर पण २०२५ पर्यंत काहीना काही बिघाड होऊन हॉस्पिटलमध्ये ऍडमिट व्हावं लागत होते.
त्याच्या घरासमोर राहणाऱ्या मनीषा सावंत त्याच काळात संकटात होत्या. त्यांचं पोळी-भाजी केंद्र कोरोनात बंद पडलं होतं आणि दोन वेळच्या जेवणाची भ्रांत होती. राजेशने मित्रांच्या मदतीने त्यांना पोळ्या बनवण्याची कल्पना सुचवली. आज त्या छोट्या कल्पनेतून अडीच हजार पोळ्यांचा व्यवसाय उभा आहे. मनीषाताईंसह आणखी १०-१५ महिलांना रोजगार मिळाला आहे आणि त्या स्वाभिमानाने उभ्या आहेत. मनीषाताईंना बहीण म्हणावं की मैत्रीण, असा प्रश्न पडावा इतकं नातं घट्ट झालं. त्या, त्यांचे यजमान आणि त्यांच्या मुली हेच आज राजेशचं कुटुंब आहे.

गेली ३३ वर्षे राजेश वेदना सोसतो आहे. १९९३ मध्ये पायात सुरू झालेल्या कळा आजही थांबलेल्या नाहीत. त्यात दिवसातून अनेकदा Phantom Limb Pain, म्हणजे जो अवयव आता नाही, तोच पिळवटतोय, दाबला जातोय, जळतोय असं जाणवत राहणं.
तरीही आज त्याच्या सोसायटीत तो एक आधारस्तंभ आहे. लोक त्याच्याकडे समुपदेशनासाठी येतात, समाजाने दूर लोटलेल्या स्त्रियाही. अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमधले लोकही फोनवर त्याच्याशी बोलतात. त्याच्या शब्दांनी किमान ४-५ जणांनी आत्महत्येचा विचार सोडून जगायचं ठरवलं. ज्याला दोन मानसोपचारतज्ज्ञांनी "फार तर दोन-तीन वर्षे" म्हटलं होतं, तो आज इतरांना जगण्याचं कारण देतो आहे.

Screenshot
कोणी विचारलं की राजेश हसून सांगतो, "माझं शरीर म्हणजे एक गाडी आहे. ती विकता येत नाही, चालवावी तर लागणारच म्हणून मग जशी बिघडेल तशी दुरुस्त करून चालवत राहायचं. एवढंच आपल्या हातात आहे." हे सर्व होत असताना आयुष्यात चांगलं काही घडलं का असं विचारल्यावर तो लगेच म्हणतो की सागडे, भोजराज आणि आगाशे यांच्यासारखे देवदूत डॉक्टर, हिंदुजा हॉस्पिटल मॅनेजमेंट मधील कर्नल विज, सौ. प्रज्ञा पराडकर आणि त्यांच्या संपर्कातील सौ. अदिती यांच्यासारखी माणसं व तेथील ट्रीटमेंट, मला हवी तेव्हा तेव्हा आजूबाजूची माणसं मदतीला उभी असणं ही त्या देवाचीच कृपा नाही का?
डॉ. आगाशे माझ्यावर आपल्या मुलासारखं आणि डॉ भोजराज लहान भावासारखं प्रेम करतात, काळजी घेतात.. भाग्य भाग्य ते वेगळे काय असते? श्री. हेमंत व डॉक्टर सौ. पारुल शहा हे दापत्य आणि श्री अनंत पुरव हे देखील वेळोवेळी सोबत असतात. मी नशिबवान की असे स्वामीनिष्ठ माझ्या सोबत आहेत. स्वामी समर्थ सर्वांच्या माध्यमातून माझी काळजी घेत आहेत अशी माझी श्रद्धा आहे.
हे ऐकल्यावर मी खरंच स्तब्ध झालो. कारण आपल्या प्रत्येकाला आपल्या जीवनात आलेल्या अडचणी खूप मोठ्या वाटत असतात आणि मी काय असा गुन्हा केलाय अशी धारणा असते आणि त्यांचा देवाला एकच प्रश्न असतो की Why Me?
सर्वसाधारणपणे परदुःख शीतल असतं पण राजेशने त्याच्या आयुष्यात आलेल्या पराकोटीच्या अडचणी, प्रॉब्लेम आणि दुःख नुसतीच पचवली नाहीत तर हसत हसत देखील झेलली देखील आहेत. आयुष्यात अशी सकारात्मकता निदान माझ्या पाहण्यात तरी नाही. मग प्रश्न पडतो, हे सगळं तो कसं निभावतो? एवढ्या आघातांनंतर श्रद्धा कशी टिकते?
राजेशचा विश्वास आहे की परमेश्वर कधीच कोणाचं वाईट करत नाही. प्रारब्धामुळे येणारा त्रास तो उलट कमी करतो. तो प्रत्यक्ष दिसत नाही, पण कोणाच्या ना कोणाच्या रूपाने मदतीला येतो. आपल्याला तेच दिसत नाही, म्हणून आपण चांगल्या गोष्टींना किंमत न देता वाईट प्रसंगांसाठी त्यालाच दोष देतो. त्याच्यासाठी संतांवरची श्रद्धा वाळवंटातलं मृगजळ नाही, ती हिरवळ आहे. राजेशला असे ठामपणे वाटते की त्याचे विचार जे आईच्या संस्कारांमुळे आलेत.. लहानपणापासून मनाचे श्लोक, दासबोध आणि इतर संत साहित्य वाचायला दिलं.. त्याची गोडी निर्माण झाली.. त्यातून आजचे विचार निर्माण झाले..
शेवटी त्याने मला त्याच्या जीवनाचे तत्वज्ञान सांगितले :- आनंद बाहेरच्या परिस्थितीत शोधायचा नसतो. तो मनात उगवू शकतो. मन आनंदाने भरलं की जीवनाकडे पाहण्याची दृष्टीच बदलते.
मला तुकाराम महाराजांच्या खालील वचनाची आठवण झाली :
आनंदाचे डोही आनंद तरंग ।
आनंदचि अंग आनंदाचे ॥
राजेशला माझा त्रिवार नव्हे, शतशः सलाम. त्याचं उर्वरित आयुष्य असंच आनंदाच्या डोहात न्हाऊन निघो, हीच त्या जगन्नियंत्याच्या चरणी प्रार्थना.
॥ श्री स्वामी समर्थ ॥
@ यशवंत मराठे
(यातील काही जुने फोटो AI वापरून modify करावे लागले)
