वसंतालय

दादरचे वास्तुवैभव : 3 
 
मराठी वाचक कमी होतोय, सरकारी अनुदाने असलेली वाचनालये बंद पडताना दिसतात आणि त्याच वेळी शिवाजी पार्क येथे गेली सुमारे सात दशके एक वाचनालय "वाचक तो देव जाणावा" हे ब्रीद बाळगून अजून ठामपणे तग धरून आहे असे ऐकले की थक्क व्हायला होते. चला तर मग जरा 'वसंत वाचनालय' इथे फेरफटका मारूया.
 
रायगड जिल्ह्यातील 'पाभरे' या गावाचे सावरकर कुटुंब. त्यांना सगळे पाभऱ्याचे सावरकर म्हणूनच ओळखतात. या कुटुंबातील वसंत शिवराम हे अकरावी एसएससी तर झाले परंतु थोरले बंधू बाबाराव हे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे स्वीय सचिव त्यामुळे सरकारी नोकरी मिळण्याची शक्यता शून्य. त्यामुळे मग वयाच्या १७ व्या वर्षी, १९५७ ला मुंबईस कूच करणे याशिवाय दुसरा पर्याय नाही. आणि अपेक्षा काय तर मिळेल ती नोकरी करून पोटाची खळगी भरणे. वर्षभर एका बुक स्टोअरमध्ये नोकरी केल्यावर १९५८ साली आजच्या सेना भवनाच्या समोरच्या बाजूला एक प्रकारे फुटपाथवर गाईड लायब्ररी. बरं पैसे किती तर - रु. १ प्रवेश फी, रु. १ डिपॉझिट, रु. १ मासिक फी.
 

त्यात भागणे अशक्यच त्यामुळे शक्य होतील तेवढे जोडधंदे - ब्लेडला धार लावणे, ग्रीटिंग विकणे, लॉटरी तिकीट विक्री, इलेक्ट्रिक तोरणे विकणे आणि अजून देखील काही असतील.

 

'ज्ञानदानाचा घेतलेला वसा टाकायचा नाही' ही ठाम धारणा असल्यामुळे सुमारे १० ते २० वर्षे सायकलस्वारी करून पुस्तकांची होम डिलिव्हरी. व्यवसाय स्थिरस्थावर होताच स्वतःची जागा घेऊन १९७४ मध्ये 'वसंत वाचनालय' याची मुहूर्तमेढ ठेवली. आज इतकी दशके ती सेवा चालू ठेवणे हे येऱ्यागबाळ्याचे काम नोहे. त्याचे मुख्य कारण त्यांचा प्रामाणिकपणा आणि व्यवसायावरची अतूट निष्ठा. आणि म्हणूनच वाचनालयाला चोखंदळ वाचकवर्ग लाभला. दादरमधून दूर गेलेले वाचक आजही आवर्जून सावरकरांना येऊन सांगतात की तुमच्यासारखी सेवा आणि साहित्य दुसरीकडे नाही. या पेक्षा मोठी पावती काय असेल?

 

२००५ साली लहान मुलांच्या खेळण्याची लायब्ररी हे त्यांच्या कल्पकतेचे पुढचे पाऊल. आज वयाच्या ८६ व्या तब्येत साथ देत नसली तरी त्यांचे मन वाचनालयातच असणार यात शंकाच नाही. या त्यांच्या प्रवासात त्यांच्या अर्धांगिनी सौ. सुखदाताई यांच्या अपार कष्टाची देखील जोड आणि साथ आहे.

 

 

उतले नाहीत, मातले नाहीत, आणि घेतलेला वसा टाकला नाही अशा वसंतरावांचे उर्वरित आयुष्य निरामय जावो हीच त्यांच्या सर्व सुहृदांची, सभासदांची ईश्वरचरणी प्रार्थना.

 
@ यशवंत मराठे
yeshwant.marathe@gmail.com

Leave a comment



Subscribe

Thank you for subscribing.

Something went wrong.

Contact Form

subscribe

Thank you for subscribing.

Something went wrong.

Contact Info

  • yeshwant.marathe@gmail.com

Follow Me

My Other Blogs: historycafe.in

Copyright © 2020 Sarmisal.

Made with ♡ by iTGS