“आई”- नाबाद ८०

अलिबाग जवळच्या आवास गावातील गोखल्यांच्या घरातील शेंडेफळ म्हणजे सुधा गोखले (म्हणजेच आमची आई सुलभा मराठे). तिच्यापेक्षा मोठ्या तीन बहिणी आणि दोन भाऊ. गोखले कुटुंब जरी त्यावेळी श्रीमंत नसले तरी खाऊनपिऊन सुखी होते. तिचे वडील म्हणजे एकदम लाल गोरे आणि त्यामुळे त्यांना गावातील लोक रंगीत गोखले म्हणून ओळखायचे (आज एखाद्याला रंगीत म्हटले तर त्यातून भलतेच अर्थ निघू शकतील, असो).

 

परंतु नियतीच्या मनात काही वेगळेच होते. नव्हते. आई फक्त दोन वर्षांची असताना दुर्दैवाने तिच्या वडिलांचे अकाली निधन झालं आणि नशीबाचे फेरे चालू झाले. आजोबांचे वयाच्या 44 व्या वर्षी अचानक निधन झाले तेव्हा आजीचे वय होते फक्त 32 आणि पदरी सहा लहान मुले. सगळ्यात मोठ्या मुलीचे पंधरा दिवसापूर्वी लग्न (वय वर्षे 16) झाले होते आणि इतर मुले अकरा, नऊ, सात, पाच आणि दोन वर्षाची. घरचा कर्ता सवरता पुरुष अचानक गेल्याने आभाळच कोसळले. मुलांना गरिबीचे चटके बसू नयेत म्हणून ती कंबर कसून ती बाप म्हणून देखील ठामपणे उभी राहिली. बारीकसा शेतीचा तुकडा; त्यातून उत्पन्न ते काय असणार? पण तरी देखील ती स्वतः शेतकामाला लागली. आजी खंबीर आणि खमकी असल्यामुळे राहते घर शिल्लक राहिले पण बाकी काही फारसे हाती लागले नाही आणि सांपत्तिक स्थिती पार खालावून गेली. शेतीचा छोटा तुकडा आणि घराच्या मागची वाडी यातून मिळणारे उत्पन्न तुटपुंजे असले तरी तिने सर्व मुलांना मॅट्रिक पर्यंत शिक्षण देण्याची जबाबदारी नेटाने पार पाडली.

 

शेंडेफळ असल्यामुळे असेल कदाचित, आई आमच्या आजीची सगळ्यात लाडकी. पण त्याचबरोबर आजीचा आईवर पगडा देखील खूप होता. आई अभ्यासात हुशार असली तरी मॅट्रिक नंतर शिक्षण शक्यच नव्हतं त्यामुळे मग वयाच्या अठराव्या वर्षी मराठ्यांच्या घरात लग्न. माझ्या वडिलांची आई आजारी असल्यामुळे घरात कोणीतरी बाई माणूस हवं म्हणून त्यांच्या वडिलांनी (अप्पासाहेब) बाबांच्या एकविसाव्या वर्षी लग्नाचा घाट घातला. लग्न झाले तेव्हा आई अठरा आणि माझे वडील तिच्यापेक्षा ३ वर्षांनी मोठे, म्हणजे २१ वर्षांचे; बालविवाहचं म्हणायला हवा. 

 

आईच्या मोठ्या भावाला, मधुमामाला तिच्या लग्नासाठी रु. २५०० पेक्षा जास्त खर्च करणे शक्य नव्हते. पण अप्पासाहेबांनी त्याला सांगितले की माझा मुलगा मी विकायला काढलेला नाही त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. लग्नाचा खर्च किती झाला माहीत नाही पण उरलेला खर्च अप्पासाहेबांनी केला आणि अशा पद्धतीने २६ डिसेंबर १९५९ साली कु. सुधा गोखले ही सौ. सुलभा मराठे झाली आणि आयुष्याच्या नवीन अध्यायाला सुरुवात झाली.

 

 

लग्नाच्या पहिल्या ५ वर्षात आमच्या तिघांचा जन्म म्हणजे आई तेवीस वर्षांची असताना ती तीन मुलांची आई होती. आपल्यापैकी आज कोणी नुसता विचार तरी करू शकतो का? त्यात माझी मराठे आजी (माई) कायम आजारी त्यामुळे घरची सगळी जबाबदारी पण तिच्यावरच होती आणि तिने ती समर्थपणे सांभाळली. अप्पासाहेबांना एकदा कोणीतरी विचारलं होतं की तुम्ही लवकर गेलात तर तुम्हाला माईंची काळजी वाटत नाही का? तेव्हा ते म्हणाले की सुलभा संस्कारी मुलगी आहे आणि ती माईची आबाळ करणार नाही. ही आईला मिळालेली खूप मोठी पावती होती आणि खरंच अप्पासाहेब गेल्यानंतर आईने माईंची जी सेवा केली त्याला तोड नाही. 

 

आई म्हणजे फक्त मराठे कुटुंबालाच नाही तर तिच्या आणि बाबांच्या सगळ्या सख्ख्या आणि इतर भावंडांना त्यांच्या पुढील पिढीसहित जोडणारा एक मोठा दुवा आहे. एक प्रकारचा ग्लू असे म्हटलं तरी वावगं होणार नाही. आणि त्याच्यासाठी कितीही झीज सोसायची आणि कष्ट करायची हिची तयारी असते. माझ्या मते एका गोष्टीवर तिचा ठाम विश्वास असावा आणि तो म्हणजे प्रत्येकाच्या हृदयात शिरायचा मार्ग तोंडावाटेच जातो. त्यामुळे आलेल्या प्रत्येक व्यक्तीला खायला करून घालणे हा मनापासूनचा आवडता छंद. त्यामुळे लहानपणापासून आमच्या घरात मावश्या, मामा, आत्या, काका यांचा कायम गोतावळा असे. प्रत्येक माणसाने काहीतरी खाल्याशिवाय जायचे नाही असा खाक्या असल्यामुळे घरात काहीतरी चमचमीत खायला असायचे.

 

मी आधी म्हटल्याप्रमाणे आई मुळात हुशार आणि त्यात प्रचंड पाठांतर त्यामुळे तिला किती स्तोत्र, श्लोक, पुराण कथा माहीत आहेत याची गणतीच करता येणार. सगळे पाढे पण डोक्यात घट्ट त्यामुळे तोंडी गणिते अशी फटाफट करते की विचारता सोय नाही.

 

सन २००० साली बाबा फक्त ६१ वर्षांचे असताना गेले परंतु लग्न लवकर झाल्यामुळे तेव्हा या दोघांच्या लग्नाला ४० वर्षे पूर्ण होऊन गेली होती. माझ्या आठवणीत माझ्या आई बाबांचे एकही भांडण झाले नाही. काय छान आणि उत्तम ट्युनिंग होते दोघांचे! आज जेव्हा जेव्हा माझे बायकोशी भांडण होते (तसे ते बऱ्याच वेळेला होते) तेव्हा असं वाटते की आई बाबांना चाळीस वर्षे न भांडता कशी काय जमली असतील?

 

पण गंमत म्हणजे लग्नानंतर बऱ्याच वर्षांनी असं लक्षात आलं की लग्न ठरवताना आईची जी पत्रिका बघितली होती ती संपूर्णपणे चुकीची होती. याचे कारण तिची खरी जन्मतारीख २१ नसून ११ ऑक्टोबर होती. म्हणजे तिचा आणि अमिताभ बच्चनचा वाढदिवस एकाच दिवशी आणि त्याच्याच प्रमाणे ती देखील तिच्या गोतावळ्यात अत्यंत प्रिय व्यक्ती. पण आम्ही मात्र तिचा वाढदिवस २१ ऑक्टोबर असाच धरून साजरा करत राहिलो.

 

परंतु बाबांनी एक कुतूहल किंवा उत्सुकता म्हणून त्यांनी नवीन पत्रिका बनवून ज्योतिष्याला दाखवली तेव्हा त्याचे म्हणणे पडले की तुमचे या बाईशी पटणे शक्यच नाही कारण खडाष्टक योग आहे. आमच्या सगळ्यांची हसून हसून पुरेवाट झाली. तेव्हा मनात आलं की लग्न ठरवताना जर ही तथाकथित योग्य पत्रिका दाखवली असती तर त्या दोघांचे लग्न झालेच नसते. परंतु लग्नाच्या गाठी स्वर्गात जुळलेल्या असतात म्हणे; त्यामुळे विधात्याची जर हे लग्न व्हावं अशी इच्छा असेल, तर त्याच्यात बदल कसा होणार?

 

आधी म्हटल्याप्रमाणे नवनवीन पदार्थ करून लोकांना खायला घालणे हा तिचा आवडता छंद. जर कोणी तिला सांगितलं की तुमचा हा पदार्थ मला खूप आवडला तर ते लगेच तिच्या डोक्यात घट्ट बसतं. नंतर तो माणूस परत आला की त्याला तो पदार्थ मिळणारच. आणि हो, जे काही बनवायचं ते सर्व घाऊक मापात; मग तो चिवडा असो, घारगे असोत किंवा आणखीन काही. तिला लहान माप बहुदा कोणी शिकवलंच नाही. मला कल्पना आहे की लोकांमध्ये वाटण्यासाठीच हा तिचा खटाटोप असतो मग त्यासाठी शरीराला कितीही तोशीश पडली तरी तिला पर्वा नसते.

 

लोकांना वाटण्यावरून एक गंमत आठवली. आमचा फॅमिली डॉक्टर दीपक यादव याला आईने त्याच्या वाढदिवसासाठी म्हणून डबाभर चिवडा पाठवला. आता तिने आमच्या सुनील ड्रायव्हरला नक्की काय सांगितले किंवा त्याने काय ऐकले मला माहित नाही पण त्याने तो डबा आमचा डेंटिस्ट दीपक नागनूर याच्या घरी तो नेऊन दिला. दुसऱ्या दिवशी मला दीपक नागनूरचा फोन आला आणि म्हणाला अरे, आईने मला का चिवडा पाठवला आहे? पण आईला सांग, चिवडा मस्त आहे; थँक्स. आता हा निरोप मी आईला सांगायला दोन दिवस विसरलो. नंतर आई मला एकदा म्हणाली अरे, मी यादवांकडे डबा पाठवला पण त्यांचा काही फोन आला नाही; माझी हसूनहसून पुरेवाट. तेव्हा मग मी तिला झालेला घोळ सांगितला. 

 

अंगारकीला किती मोदक करावे पण किती याला काही मर्यादा नको का? किमान शंभर मोदक आई बनवते. त्यातले काही देवळामध्ये प्रसाद आणि बाकी सर्व मित्रमंडळींकडे. ते सर्व खूष आणि ते खूष की आईचा आनंद गगनाला भिडतो.

 

हे खाणं वाटप तर झालेच पण लोकांना मदत करण्याची तिची दानत वाखाणण्याजोगी आहे. हा तिचा गुण आमच्या तिघांपैकी स्मिताने पुरेपूर उचलला आहे.

 

आईची दुसरी आवडती गोष्ट म्हणजे देवपूजा करणे आणि देवळात जाणे. त्यात ती कितीही तास खर्च करू शकते. एका गोष्टीचं मात्र खूप कौतुक वाटतं की आपण करतो ते तिच्या पुढच्या पिढीने, म्हणजे आम्ही, तसेच करावे अशी तिची अजिबात अपेक्षा नसते. हे आमचे तसे सुदैवच म्हणायला हवे कारण तिच्या एक शतांश देखील आम्ही करू शकणार नाही. 

 

अमेय, प्रणव, ओम, सिया, मंदार आणि पूनम ही सर्व नातवंडे म्हणजे अगदी जीव की प्राण. पण तरी देखील काही अंशी अमेय पहिला नातू असल्यामुळे जरा जास्तच लाडका. 

 

आतापर्यंत जरा जास्तच कौतुक झाले की काय? मिट्ट गोड झाले तर अपचन किंवा डायबिटीस होण्याची भीती त्यामुळे थोडया कोपरखळ्या मारल्या की थोडंतरी ऍडजस्ट होईल, नाही का? 

 

आज आईला ऐंशी वर्षे पूर्ण झाली पण तिच्या शारीरिक आणि मानसिक वयात जमीन अस्मानाचा फरक आहे. पूर्वी ज्या गोष्टी आपल्याला सहज जमत होत्या त्या आता झेपत नाहीत हे ती accept करायला तयारच नसते. कोणाचेही आणि कुठचेही आमंत्रण आले की तिला तिथे जायचेच असते; जमत नसेल तर अस्वस्थ. आता तिच्या मणक्याचे आणि गुडघ्याचे ऑपरेशन झाले आहे त्यामुळे ते कधीतरी डोकं वर काढतातच. सहनशक्ती जरी भरपूर असली तरी शेवट शरीर त्रास देतेच की नाही?

 

प्रत्येक बारीक गोष्टीत बारीक लक्ष. सगळ्यांशी प्रचंड attachment आणि involvement आणि त्याच बरोबरीने अत्यंत तीक्ष्ण निरीक्षण. नजरेतून कुठलीही गोष्ट सुटूच शकत नाही.

 

तिला ज्या गोष्टींमध्ये आनंद मिळतो त्या सर्व गोष्टी निभावून नेण्याचे पाठबळ देवदयेने तिच्याकडे आहे. तिने तिचे उर्वरीत आयुष्य तिला हवे तसे मनसोक्त जगावे. आणि हो, या तिच्या खटकणाऱ्या गोष्टी इतरांच्या नजरेतून मामुली आहेत. आम्हाला मुलं म्हणून काळजी वाटते इतकंच. तसेच सर्वगुणसंपन्न या जगात कोण असतं? प्रत्येकात काहीतरी बारीकसारीक खामी असतातचं की!!

 

 

तिच्या अत्यंत प्रेमळ स्वभावामुळे सगळ्या भावंडांची लाडकी सुधा, भाचवंडांची अतिप्रिय सुधा मावशी - मामी - आत्या ही आमची आई आहे याचा मला, वसंतला आणि स्मिताला सार्थ अभिमान आहे. आम्ही भाग्यवान आहोत अशी आई मिळायला!! 

 

तिला ठणठणीत दीर्घायुष्य लाभावे हीच भगवंताकडे तिच्या ऐंशीव्या वाढदिवशी प्रार्थना.

 

@ यशवंत मराठे 

yeshwant.marathe@gmail.com

Leave a comment



Sudhir Nerurkar

2 years ago

खूप खहोप शुभेच्छा आणि अनेक नमस्कार. प्रेम आणि आदर तर प्रचंड होता, आता तुझा लेख वाचून प्रचंड कौतुक वाटलं. जीवेत शरद शतं

Madhav Athavale

2 years ago

यशवंत,
खूपच, खूपच छान व्यक्ती चित्र लिहिले आहेस.

अगदी परवा म्हणजे मंगळवार 19 तारखेलाच तिची प्रत्यक्ष भेट झाल्यामुळे खूप छान वाटलं.

नेहमी ती माझा उल्लेख आमचे लाडके मेहुणे असाच करते. तू लिहिलेले अगदी तंतोतंत खरच आहे. तिच्या अडचणी असून सुद्धा तिच्या उत्साहाला सीमाच नाही.

एक गंमत म्हणून - पार्ले करा ना तिला जेवण देण्याची इच्छा तिने म्हणून दाखवली ; नुसती दाखवली असंच नाही तर, कॅलेंडर आणायला लावून कोणता दिवस सोयीस्कर वगैरेही ठरवून टाकले.

तिला उत्तम निरोगी आणि स्वास्थ्यपूर्ण आयुष्य लाभो याच हीच परमेश्वर चरणी प्रार्थना ! ! 🙏🏻🙏🏻💐💐

आज सुद्धा, मला वाटतं ती मोठ्या उत्साहाने आवास ला जाण्याच्या कार्यक्रमात आहेच.

तिला माझा नमस्कार व सदिच्छा !

माझा निरोप जरूर, जरूर सांग.

- माधव आठवले ,विलेपार्ले

Madhuri gawande

2 years ago

प्रत्येक घरात अशी आई हवीचचचचचचच!!!!! 🙏💕🥰

Prafulla Agnihotri

2 years ago

तुझ्या मातोश्रीं ना उत्तम आरोग्य, भरपूर आयुष्य, सुख, समाधान आणि मुलाबाळांच उदंड प्रेम लाभो ही विधात्याचा चरणी प्रार्थना

Seemantini बिवलकर

2 years ago

खूप छान लिहिलं आहेत.
आईंना नमस्कार आणि वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
🙏🙏🌹

मी पण माहेरची गोखले आहे

Dilip Sule

2 years ago

ह्या लेखामुळे आईंचा आत्तापर्यंतचा जीवन प्रवास कळला, कठीण परिस्थितीत देखील ,खंबीरपणे कस उभं रहावं ह्याच उत्तम उदाहरण, असो.
आईंना, ८० व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा . आणि पुढील आयुष्य सुखाचं आणि आरोग्यदायक जाओ ही इश्वर चरणी प्रार्थना,

Nilima Gothe

2 years ago

खूप छान आणि हृदयापासून आलेले शब्द!
तुमच्या आजीचां जीवन वृत्तान्त वाचून मन भरून आले.त्याही वेळी स्त्रिया किती धडाडीच्या आणि कर्तृत्ववान होत्या.नाती जपत होत्या आणि तोच आधार घेऊन पुढे जात होत्या.त्यांच्याकडून खूप शिकण्यासारखे आहे.माझे यजमान या एप्रिलमध्ये अचानक covidne गेले.आजींचा जीवनप्रवास वाचून मला एक आश्वासन मिळाले.
असेच लिहित रहा🙏

देविदास कुळकर्णी

2 years ago

यशवंत, तुझ्या ह्या उत्तम लिखाणाच्या कलेमुळे मला तुझ्या प्रिय आईची थोडीशी ओळख नक्कीच झाली, धन्यवाद.
आमच्या सर्वातरफे तुझ्या आईला मनःपूर्वक नमस्कार.
जिवेत शरदं शतं!

Subscribe

Thank you for subscribing.

Something went wrong.

Contact Form

subscribe

Thank you for subscribing.

Something went wrong.

Contact Info

  • yeshwant.marathe@gmail.com

Follow Me

My Other Blogs: historycafe.in

Copyright © 2020 Sarmisal.

Made with ♡ by iTGS