परंपरेचा वारसा

एखाद्या कुटुंबात काही कारणांमुळे देवपूजा किंवा रूढी सुरु होतात. आमच्या मराठे कुटुंबात गेली जवळजवळ 70 वर्षे चालू असलेल्या एका परंपरा तुमच्याशी शेअर करावीशी वाटले म्हणून हा लेख.

 

माझे आजोबा, कै. अप्पासाहेब हे 1948 साली फाळणीच्या फटक्याने हातात एक मोठ्ठा भोपळा घेऊन कराचीहून मुंबईला आले. तिथे असलेले अनेक व्यवसाय सोडून देऊन नेसत्या कपड्यानिशी त्यांना पळ काढावा लागला. आता काहीतरी पोटापाण्यासाठी करायला तर हवेच म्हणून मग हार्डवेअर पासून जमेल त्या गोष्टीचे ट्रेडिंग सुरु करायचे ठरवले. जागा भाड्याने घेणे पण जमणारे नव्हते तेव्हा फोर्ट मधील एका बिल्डिंगच्या जिन्याखाली बसायला एक टेबल मिळाले. असा चालू झाला सचिन अँड कंपनीचा व्यवसाय. तिथेच मागच्या गाळ्यात व्यवसाय असलेल्या श्री. सावंत आणि श्री. भट यांच्याशी मैत्री झाली. कर्मधर्मसंयोगाने हे दोघेही शिर्डीच्या साईबाबा संस्थांचे ट्रस्टी होते. त्यावेळचे साईबाबा मंदिर म्हणजे शिर्डीतील एक छोटे देऊळ. ते दोघे ट्रस्टी असल्यामुळे ते दर महिन्याला मंदिराच्या दानपेटीत किती पैसे आले ते मोजायला जात असत.

 

 

आता त्यांच्यामुळे असेल कदाचित पण अप्पासाहेब अधूनमधून शिर्डीला जाऊ लागले. इकडे त्यांच्या व्यवसायाचे बस्तान नीट बसले आणि त्यांनी मागचा पूर्ण गाळाच भाड्याने घेतला. आज 2021 साली सुद्धा सचिन अँड कंपनीचा व्यवसाय त्याच जागेतून (25, बँक स्ट्रीट, फोर्ट) अजून देखील सुरु आहे. हो पण, तो व्यवसाय मराठे कुटुंब सांभाळत नाही.

 

अप्पासाहेब मनात आले की शिर्डीला जायला निघायचे. त्यांच्या अनेक ट्रिप पैकी एका शिर्डीच्या वारीत त्यांना आलेला अभूतपूर्व अनुभव म्हणजे ते संध्याकाळी जरा उशीरा शिर्डीच्या आसपास पोहोचले आणि अंधारात रस्ता चुकले. आजूबाजूला कोणीच दिसत नव्हते; काय करायचे ते कळेना. तेवढ्यात समोरून एक म्हातारबुवा हातात कंदील घेऊन येत होते. त्यांना विचारता म्हातारबुवा म्हणाले, अहो रस्ता चुकला की तुम्ही, शिर्डीचा फाटा मागेच गेला. अप्पासाहेबांनी गाडी उलटी फिरवली आणि लगेचच त्यांना वाटलं की या म्हातारबुवांना विचारावे की त्यांना कुठे जायचे आहे. मागे वळून बघितले तर तिथे कोणीच नव्हते. Absolutely nobody in sight; फक्त गडद अंधार. त्यांची अशी खात्री पटली की साईबाबांनीच त्यांना मार्ग दाखवला.

 

त्यांनी मग आमच्या आजच्या राहत्या घरात 1952 च्या सुमारास दर गुरुवारी आरती करण्याचे ठरवले. त्यांचे मेव्हणे अण्णा गोगटे, मित्र अण्णा विद्वांस आणि नरहरी गोगटे हे आरतीला न चुकता यायचे. 1959 साली माझ्या वडिलांचे लग्न झाले तेव्हा आमचे सिध्दीविनायक देवळाला लागून असलेल्या एका गाळ्यात ऑटो पार्टसचा व्यवसाय होता. ते गुरुवारी घरी येताना दोन पेढ्यांच्या पुड्या विकत घ्यायचे. एक शेजारी देवळात ठेवायची आणि दुसरी घरच्या आरतीसाठी. त्यावेळी सिध्दीविनायक म्हणजे एक छोटे कौलारू मंदिर.

 

 

त्याच सुमारास अप्पासाहेबांना कोणातरी उजव्या तोंडेचा शंख दिला आणि सांगितले की असा शंख सगळ्यांना लाभत नाही. तुम्ही ठेऊन बघा; तुम्हाला लाभेल असे वाटते. त्यामुळे मग देवघरात तो ठेवण्यात आला आणि जो आजपर्यंत आहे. आता थोडा बाहेरून खराब झाला आहे पण अजून व्यवस्थित आहे.

आता ही आरती म्हणजे असे काही खास नव्हते. सुरुवात गणपती, दत्त महाराज, मग नंतर एक पाच ते सहा साईबाबांच्या कवने व आरत्या आणि शेवटी घालीन लोटांगण व मंत्र पुष्पांजली. घड्याळ लावून साधारण 20 ते 22 मिनिटे चालते. खास नैवेद्य अथवा जेवण असे काही नाही. ही आरती सुमारे 1964 पर्यंत आमच्या माहीमच्या घरी होत असे. नंतर ती मराठे उद्योग भवनमध्ये सुरु झाली कारण अप्पासाहेब तिथे वास्तव्य करू लागले. तसे ते देवभोळे वगैरे अजिबात नव्हते. सकाळी कामाला सुरुवात करताना एक नमस्कार आणि गुरुवारची आरती हे सोडून त्यांनी कधीही देव-देव केले नाही.

 

गुरुवार, दिनांक 28 ऑगस्ट 1969 या दिवसाचा विचार केला की मला आजही अवाक व्हायला होतं. वय फक्त 58 असून देखील अत्यंत शांत मनाने अप्पासाहेब मृत्यूला सामोरे गेले. काय प्रचंड मानसिक धैर्य पाहिजे या गोष्टीला. आणि ज्या माणसाने कधीही देव देव केलं नाही, तो शेवटच्या क्षणी राम राम म्हणत हे जग सोडून गेला. आता असे वाटते की साईबाबांनीच त्यांना ते बळ दिले असावे.

 

त्यानंतर ती आरती परत आमच्या माहीमच्या घरी सुरु झाली. आमच्याकडे गुरुवारी आरतीला कोण कोण येऊन गेले याची गणतीच नाही; पुट्टपारथीचे सत्य साईबाबा, श्री न्याय शर्मा, श्री मधुकर भट अशी काही वानगीदाखल नावे. अनुराधा पौडवालचे मामा आमच्या शेजारी राहायचे त्यामुळे ती देखील बऱ्याच वेळा येऊन गेली. आमच्या सोसायटीतील रहिवासी तर अधूनमधून यायचेच पण त्यावेळी आमच्या आवारात कोकणातील बरीच गडी माणसे राहायची आणि ते सर्व खिडकीशी उभे राहून आरती ऐकायचे. ते आणि आमची मित्र मंडळी प्रसादाच्या पेढ्याची आतुरतेने वाट बघायची. त्यामुळे बाबा सुरुवातीला जे 200 ग्रॅम पेढे आणायचे ते दर वेळेला थोडे थोडे वाढतच जात होते. तसेच माझ्या आत्याचे कुटुंब (केळकर), मामा-मावश्या (गोखले, दांडेकर, कोकणे, वर्तक) आणि आमची मामे-मावस भावंडे पण अधूनमधून असायची. त्यामुळे एक प्रकारे छोटा उत्सवच व्हायचा. या सर्व गोष्टींमुळे आम्हा तिघा भावंडांचा आरतीशी एक भावनिक बंध तयार होत गेला.

 

परंतु आमच्याच प्रमाणे इतरही काही लोकांचा तसा बंध तयार होत होता. त्याचे एक मुख्य उदाहरण म्हणजे आमच्या शेजारी जहागीरदार कुटुंब राहत असे. त्यांची एक मुलगी, शशीताई गेले पन्नास वर्षे अमेरिकत स्थायिक आहे परंतु कधीही मुंबईत आली तरी किमान एका गुरुवारी तरी नक्की येऊन जातेच जाते.

 

आता लहानपणापासून म्हणत असल्याने सगळ्या आरत्या पाठ होणे स्वाभाविकच होते. मी 11-12 वर्षांचा असताना एक गंमत झाली. सोसायटीमध्ये ज्यांच्याकडे गणपती असेल तिथे जाऊन जोरजोरात आरत्या म्हणणे हा आम्हां मुलांचा लाडका छंद. एका घरी गेलो असता, मी आरत्या संपल्यावर सवयीने आपोआप मंत्र पुष्पांजली म्हणायला सुरुवात केली. आणि गंमत अशी की त्यांच्या घरात असलेल्या कोणालाच ती पूर्ण पाठ नव्हती. माझा आवाज पहिलेपासून खणखणीत (देव घश्यात सायलेन्सर लावायला बहुदा विसरला आहे) त्यामुळे माझ्या एकट्याचाच आवाज. ते सर्वजण चकित झाले आणि नंतर मला एकदम रॉयल ट्रीटमेंट. मग मला पण आमच्या घरी कशी आरती असते हे सांगताना काय अभिमान वाटत होता म्हणू सांगू!! 

 

माझ्या वडिलांनी सिध्दीविनायकचा नेम मात्र चालू ठेवला होता. दुसरी एक गंमत म्हणजे देवळाच्या दरवाजात एक आंधळा माणूस लॉटरीची तिकिटे विकायला बसत असे. बाबा त्याच्याकडून दहा रुपयाची तिकिटे विकत घेत असत. वर्षोनुवर्षे घेऊन कधी पाच रुपयाचे सुद्धा बक्षीस लागले नाही. एकदाच कधीतरी शंभर रुपयांचे बक्षीस लागले तर बाबा ते तिकीट त्याच माणसाला देऊन आले.

 

माझा भाऊ वसंत आणि बहीण स्मिता मुंबईत राहत नसल्याने आई-बाबा आणि माझी फॅमिली (माझी बायको अदिती आणि मुले – अमेय, प्रणव) असे आम्ही मनोभावे आरती करायचो. 2000 साली बाबा गेले आणि मग माझ्या आईने सिध्दीविनायक देवळात जायला सुरुवात केली पण त्या देवळातील गर्दी वाढत चालली होती. म्हणून मी आईला सांगायचो की आता हे बस्स. परंतु तिला ते पटत नव्हते. पुढे 2010 साली अमेय अमेरिकेला गेला आणि पुढे कालांतराने प्रणव देखील आधी दिल्ली आणि मग सिडनी येथे गेला. त्यामुळे आता आई आणि आम्ही दोघेच. आमच्याकडे आरतीच्या वेळी प्रत्येकाची झांज वाजविण्याची एक खासियत होती. माझ्या मते माझे वडील, धाकटा भाऊ वसंत आणि माझा मुलगा अमेय यांना ती लय छान जमली होती. पण आता बाबा नाहीत आणि वसंत व अमेय मुंबईत नाहीत त्यामुळे आजही चुकल्याचुकल्या सारखे होते. मी आणि आई यथातथाच वाजवतो आणि ती मजा येत नाही. पण काय करणार? कालाय तस्मै नमः !! 

 

2006 साली एक अभूतपूर्व गोष्ट घडली. आमचे एक स्नेही, सचिन परांजपे काही कारणानिमित्त माझ्या ऑफिसमध्ये आले होते. आमचे काहीतरी बोलणे चालू असताना ते म्हणाले, अहो जरा थांबा. मग काही काळ शांततेत गेल्यावर ते म्हणाले की मला इथे साईबाबांच्या आरतीची स्पंदने जाणवत आहेत. मी थक्कच झालो. 1964 ते 1969 एवढी पाचच वर्षे त्या वास्तूत आरती झाली होती तरी देखील 37 वर्षानंतर त्यांना कशी काय स्पंदने जाणवली असतील? काहीच कळेना; पुढे म्हणाले, तुम्ही साईबाबांचे स्थान उद्योग भवनच्या वास्तूतून का हलविलेत? मी सांगतो तश्याच पोज मधील साईबाबांचा फोटो तुमच्या केबिनमध्ये ठेवा. आणि आश्चर्य म्हणजे तसाच फोटो अप्पासाहेब तिथे राहत असताना त्या वास्तूत होता. देवाची अगाध लीला !!

 

 

जेव्हा आई मुंबईत नसे किंवा तिला शक्य नसे, तेव्हा मी मात्र सिध्दीविनायक ऐवजी उद्यान गणेश देवळात जायचो. चार पाच वर्षांपूर्वी आईचे मणक्याचे ऑपरेशन झाले आणि ती जबाबदारी माझ्यावर आली. हे देवळात जाणे मी खूप वेळा थांबवायचा प्रयत्न केला पण आईला ते काही पटत नव्हते. पण जे मला जमले नाही ते कोरोनाने मात्र करून दाखविले. देवळेच बंद झाली मग जाणार कुठे? आणि माझ्या नशिबाने आईला ते अखेरीस पटले.

 

आज माझी मुले परदेशी असली त्यांच्या मनातून अजून तरी गुरुवार पुसला गेला नाहीये. अशा प्रकारे गेली सुमारे 70 वर्षे ही आरती आज अव्याहत चालू आहे. अजून हे किती वर्षे चालू राहील हे साईबाबाच जाणोत. आमच्याकडून जितकी सेवा त्यांना अजून करून घ्यायची असेल तेवढे काळ ते चालू राहील.

 

बऱ्याच लोकांचे म्हणणे असते की देव नाहीच. मला त्यावर एकच वाटते की वारा तर वातावरणात असतोच, पण ती झुळुक अनुभवण्यासाठी सावलीत बसावे लागते.. तसंच आहे हे.. जे सावलीचे महत्त्व तेच श्रद्धेचे. माझ्या आजोबांनी याची सुरुवात श्रद्धेने केली आणि आजपर्यंत आम्ही देखील भक्तिभावाने करत आलो आहोत. परंतु खूप वेळा घडते काय की अशा गोष्टींची सुरुवात श्रद्धेपोटी होते परंतु कालांतराने पुढच्या पिढीत त्या एक उपचार म्हणून घडत राहतात किंवा देवाचा कोप होईल या भीतीने त्या चालू राहतात. मला सांगा, देव कशाला रागावेल? सगळा मामला हा आपल्या श्रद्धेचा आहे. असे कुलाचार अथवा रूढी जरी बंद झाल्या तरी देवाला सगळं कळतं आहेच की.

 

तुम्हाला वाटेल की मी हे काय गुऱ्हाळ लावून बसलोय? मला एवढेच सांगायचे आहे की जिथे भाव तिथे देव. एखाद्या झोपडीत अथवा खोपटीत देवाची मूर्ती नसली तरी सुद्धा त्याचे अस्तित्व जाणवेल परंतु बऱ्याच वेळा संगमरवरी मंदिरात नुसतीच श्रीमंती दिसते पण देवाचे अस्तित्व मात्र अजिबात जाणवत नाही. अंधश्रद्धा निर्मूलन समिती म्हणते की देवावर डोळस श्रद्धा असावी; अंध नसावी. पण मला सांगा, जो दिसत नाही पण तरी देखील या चराचरात भरून राहिला आहे त्यावर डोळस श्रद्धा कशी ठेवायची? मला तर असे वाटते की देवावर श्रद्धा ही अंधच राहणार. त्यावर इलाज एकच – भीतीपोटी काहीही करू नका कारण जुलमाच्या रामरामाला काहीही अर्थ नाही. आणि मनापासून आवड आणि प्रेम असेल तर देव आपल्या हृदयात ठाण मांडून बसला आहे; त्याला कुठे शोधायला जायची गरजच नाही.

सणवार, व्रतवैकल्ये हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न असायला हवा. जर कर्मकांडाचे उदात्तीकरण, प्रचार आणि सक्ती करून तीच आपली संस्कृती आहे हे पटवायला सुरुवात झाली तर ते चुकीचे असेल. जे काही करायचे ते स्वतः करावे; दुसऱ्याने म्हणजे अगदी आपल्या पुढच्या पिढीने ते करावं याचा देखील अट्टाहास धरू नये. त्यांना पटले आणि आवड शिल्लक राहिली तर ते चालू ठेवतील. 

 

| श्री स्वामी समर्थ |

 

@ यशवंत मराठे

yeshwant.marathe@gmail.com

Leave a commentParineeta Tonseker

1 month ago

खूप छान लिहिले आहे.आरतीचे वर्णन इतके हुबेहूब की, प्रत्यक्ष डोळ्यासमोर घडत असल्याचा भास झाला.
🙏🏼🙏🏼

Hemant Marathe

1 month ago

खूप छान. 🙏

Parag Dandekar

1 month ago

All your weekly articles are highly readable. I do read most of them. The article about Sai Baba is also well written. As you have stated , devotion is essential but should not be forced upon your relations and friends.

Dilip Sule

1 month ago

Beautiful write-up, with practical approach.

Prafulla Agnihotri

1 month ago

Couldn’t agree more.

SHIVDATT ATMARAM SAWANT

1 month ago

खूप छान

Suresh G Vaidya

1 month ago

अत्यंत समर्पक शब्दात मूलभूत विचार मांडला आहे

Sudheer joglekar

3 weeks ago

मीही त्या आरत्यांमध्ये,सहभागी झालो आहे.. सिटीझनमधल्याही आणि उद्योग भवनमधल्याही.. आमच्या घरी डोंबिवलीत आजतागायत आरती होते ती तिथे मिळालेल्या प्रेरणेतूनच..

Contact Form

subscribe

Thank you for subscribing.

Something went wrong.

Contact Info

  • yeshwant.marathe@gmail.com

Follow Me

My Other Blogs: historycafe.in

Copyright © 2020 Sarmisal.

Made with ♡ by iTGS