मराठ्यांचे महायुद्ध 

सत्तावीस वर्षांचे महायुद्ध

 

भारतात शाळकरी मुले, भारत देशाचा अत्यंत साचेबद्ध इतिहास शिकतात. शालेय अभ्यासक्रमात शिकवल्या जाणार्‍या ह्या पाठ्यपुस्तकातून भारताचा अभिमानास्पद आणि जाज्वल्य इतिहास वगळण्यात येतो. तो प्रामुख्याने भारताच्या ब्रिटिश साम्राज्याबरोबरच्या लढ्यावर केंद्रित असतो. म्हणूनच भारतीय उपखंडाचा चेहमोहरा लक्षणीयरित्या बदलणार्‍या या महायुद्धाबद्दल आपण अनभिज्ञ आहोत यात काही आश्चर्य नाही. भारतातील सर्व युद्धांची जननी म्हणून त्याचे वर्णन केले जाऊ शकते. त्यावेळेस सरासरी आयुर्मान अंदाजे 30 वर्षे होते हे लक्षात घेता, 27 वर्षांचे हे युद्ध जवळजवळ एका संपूर्ण पिढीपर्यंत चालले. एकूण शेकडो लढाया लढल्या गेल्या. विस्तृत भौगोलिक प्रदेश या युद्धाने व्यापला, ज्यात आधुनिक भारतातील चार सर्वात मोठ्या राज्यांचा – महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश आणि कर्नाटक यांचा समावेश होतो. तीन वेगवेगळ्या टप्प्यांत हे युद्ध झाले. लढला गेलेला काळ, त्याचा विस्तार, मनुष्यबळ, आणि साधन सामग्रीचा खर्च ह्याची तुलना करता, त्यासारखं दुसरं उदाहरण भारतीय इतिहासात सापडत नाही.

 

1680 मध्ये शिवाजी महाराजांच्या मृत्यूच्या वेळी मराठा साम्राज्याने सध्याच्या महाराष्ट्रापेक्षा जास्त प्रदेश व्यापला होता आणि त्याची पाळेमुळे घट्ट रूजली होती. मात्र, शत्रूचा विळखा सर्व बाजूंनी पडलेला होता. उत्तरी किनारपट्टी आणि गोव्यातील पोर्तुगीज, मुंबईतील ब्रिटीश, कोकणातील सिद्दी आणि कर्नाटकातील दक्खन सल्तनत या प्रत्येकांनी काही प्रमाणात आव्हाने उभी केली होती, परंतु त्यापैकी कोणाही एकात मराठ्यांना पराभूत करण्याची क्षमता नव्हती.

 

औरंगजेब सत्तास्थानी असणारं मुघल साम्राज्य सर्वात खतरनाक शत्रू होता. उत्तरेच्या आघाडीवर अनेक राजपूत राजांनी मोगलांचे मांडलिकत्व स्वीकारले होते. आपल्या भावांची क्रूरपणे हत्या करून आणि वडिलांना तुरूंगात टाकून औरंगजेब गादीवर बसला होता. राजपूतांचा विरोध ओसरला होता आणि दक्षिणेकडील सल्तनती कमजोर झाल्या होत्या, त्यामुळे मराठ्यांना लक्ष्य केलं जाणं हे अपेक्षितच होतं.

 

Aurangzeb

 

औरंगजेब धर्मांध होता. हिंदूंविरोधातील असहिष्णु धोरणांमुळे शीख व राजपूत त्याच्यापासून दूर झाले होते. गादीवर बसताच त्याने आपल्या राज्यातील हिंदूंना जिवंतपणे नरक यातना भोगायला लावल्या. हिंदूंवर जिझियासारखे जाचक कर लादले गेले. कोणीही हिंदू पालखीत बसू शकत नव्हता. हिंदूची देवळे उध्वस्त केली गेली आणि मोठ्या प्रमाणात बळजबरीने धर्मांतरे केली गेली. औरगजेबाने इस्लामिक कायदा, शरीयत, लादण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. यामुळे शीख व राजपूतांचा भ्रमनिरास होऊन त्याची परिणीती दक्षिणेच्या मोहिमेत औरंगजेबाला विशेष प्रतिसाद न देण्यात झाली.

 

पहिले पर्व

पहिल्या पर्वाची सुरुवात 1681 च्या सप्टेंबरमध्ये मुघल सम्राट औरंगजेबाने मराठा साम्राज्यावर केलेल्या आक्रमणाने झाली. मराठ्यांची चहुबाजुने कोंडी करून, त्यांच्यासाठी मृत्यूचा भयानक सापळा रचण्यासाठी पोर्तुगीज, ब्रिटीश, सिद्दी, गोवळकोंडा आणि विजापूर सल्तनत ह्यांच्यासमवेत त्याने हातमिळवणी केली. एखाद्या त्रयस्थाला अशा प्रचंड मोठ्या एकतर्फी युद्धाचे फलित काय असेल ह्याचा फारसा विचार करण्याची गरज भासणार नाही. जणू एक निरंतर वादळ मराठा साम्राज्याच्या दिशेने घोंघावत सुटले होते. पण शेवटी जे घडले ते सर्व कल्पना आणि प्रत्येक तर्क चुकीचे असल्याचे सिद्ध करणारे होते. सर्व आघाड्यांवर पुरेशी साधनसामग्री नसूनही मराठेच विजयी झाले आणि सर्व खजिना, सैन्य, शक्ती आणि स्वत:चे आयुष्य खर्ची घालून आक्रमण कर्ता सम्राट औरंगझेब सपशेल पराभूत झाला. या दीर्घकालीन लढ्यातून तो, स्वत:च्या स्वातंत्र्यासाठी लढण्याच्या लोकांच्या इर्षेला कधीही कमी लेखू नये, असा एक अत्यंत मोलाचा धडा शिकला.

 

कोणताही मोठा आघात करण्याचे सुरूवातीचे प्रयत्न करणे अयशस्वी ठरले. परंतु डिसेंबर 1688 मध्ये त्याचे भाग्य फळफळले. संभाजी महाराज यांना संगमेश्वर येथे कैद केले गेले. काही अंशी विश्वासघात व त्यांचा स्वतःचा निष्काळजीपणा त्यांना भोवला. औरंगजेबाने त्यांना इस्लाम धर्म स्वीकारण्याचा पर्याय दिला, परंतु त्यांनी नकार दिला. विजयाच्या उन्मादाने आंधळा झालेल्या औरंगजेबाने संभाजी महाराजांना, कोणालाही कधी दिली गेली नसेल अशी, अत्यंत क्रूर पाशवी वागणूक दिली. त्यांची गाढवावरून धिंड काढली. त्यांची जीभ छाटली, डोळे फोडले आणि त्यांच्या शरीराचे तुकडे करून कुत्र्यांना खाऊ घातले. संभाजी महाराजांबद्दल राग असणारे आणि त्यामुळे मोगलांबद्दल सहानुभूती बाळगणारे असे बरेच लोक स्वराज्यात होते. पण या क्रूर वागणुकीमुळे प्रत्येक जण क्रोधित झाला. मराठा सेनापती रायगडवर जमले. एकमताने निर्णय झाला. सर्व शांततेचे प्रस्ताव मागे घेण्यात येणार होते. काय वाटेल ते झाले तरी मोगलांना हुसकावून लावायचेच होते. राजारामराजे गादीवर बसले. अत्यंत ओजस्वी भाषणातून त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात रायगडवरून केली. सर्व मराठा सेनापती व दरबारी नव्या राजाच्या ध्वजाखाली एकत्र आले आणि अशा प्रकारे महायुद्धाच्या दुसर्‍या पर्वाला सुरुवात झाली.

 

दुसरे पर्व

 

Rajaram Maharaj

औरंगजेबाची, 1689 च्या अखेरीस अशी समजूत झाली होती की जवळजवळ सर्व मराठे नेस्तनाबूत झाले. परंतु ती बहुधा एक जीवघेणी चूक ठरणार होती. रामचंद्रपंत अमात्य (हुकूमपनाह), शंकराजी नारायण सचिव, संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव या चौघांनी मराठी सैन्याची पुनर्बांधणी केली. मार्च 1690 मध्ये, सेनानी संताजी घोरपडे यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी मुघल छावणीवर सर्वात धाडसी हल्ला चढविला. त्यांनी केवळ छावणीवर हल्ला केला नाही तर औरंगजेब झोपत असलेल्या तंबूवरही सापासप घाव घातले. सुदैवाने औरंगजेब इतरत्र होता पण त्याची खासगी फौज आणि त्याचे बरेच अंगरक्षक मारले गेले.

 

परंतु सततच्या हल्ल्यामुळे आणि दबावामुळे राजाराम महाराजांना प्रतापगड, विशालगड मार्गे दक्षिणेतील जिंजी (तामिळनाडू) येथे माघार घेणे भाग पडले. खंडो बल्लाळ आणि त्यांच्या साथीदारांसह राजाराम महाराजांनी दक्षिणेकडे कूच केले. केलाडी (आजचे सागर, कर्नाटक) येथील राणी, केलाडी चेन्नम्मा यांनी त्यांना रसद पुरवली व आपल्या राज्यातून सुखरूप बाहेर पडण्याचा मार्ग मोकळा करून दिला. हरजी महाडिकची तुकडी त्यांना जिंजीजवळ भेटली आणि त्यांना किल्ल्यापर्यन्त नेऊन सोडले. पुढील सात वर्षे तेथूनच त्यांनी राज्यकारभार सांभाळला आणि ते त्याचे घर बनले. औरंगजेब राजाराम महाराजांच्या यशस्वी सुटकेमुळे निराश झाला. त्याची पुढची चाल अशी होती की बहुतेक सैन्य त्याने महाराष्ट्रातच ठेवायचे आणि राजाराम महाराजांना ताब्यात घेण्यासाठी छोटी फौज जिंजीला पाठवायची.

 

Santaji & Dhanaji

 

पण संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव हे दोन मराठा सेनापती त्यांच्याहुन अधिक बलशाली ठरणारे होते. ते पूर्व आघाडीवर मोगल सैन्यावर त्वरेने हल्ले चढवत राहिले. हे औरंगजेबाला काहीसे आश्चर्यचकित करणारे होते. एक राजा गमावला आणि दुसरा राजा लांब दूरवर अडकलेला असला तरी मराठे डगमगले तर नाहीतच पण जास्तच आक्रमक झाले.

 

आतापर्यंत औरंगजेबाला दाहक जाणीव झाली होती की त्याने सुरू केलेले युद्ध त्याला वाटले होते त्यापेक्षा ते अधिक गंभीर स्वरूपाचे होते. परंतु तोपर्यंत मोगल सैन्याची पूर्वीपेक्षा भीतीही कमी झाली होती. औरंगजेबाने आपल्या अनेक अनुभवी सेनापतींच्या सल्ल्याविरूद्ध युद्ध चालूच ठेवले.

 

तिसरे पर्व

Rani Tarabai

मार्च 1700 मध्ये, मराठ्यांसाठी आणखी एक वाईट बातमी आली की राजाराम महाराज यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांची राणी ताराबाई, जी मराठा सेनापती हंबीरराव मोहिते यांची कन्या होती, त्यांनी मराठा सैन्याचा कार्यभार स्वीकारला आणि तितक्याच जोमाने संघर्ष चालू ठेवला. अशा प्रकारे ताराबाईंच्या नेतृत्वाखाली मराठ्यांच्या साथीने, प्रदीर्घ लढाईचे तिसरे पर्व सुरू झाले.

 

संपूर्ण युद्धाच्या काळात मराठ्यांनी त्यांचे हल्ले चालूच ठेवले. याने दोन उद्देश सफल झाले. मुघलांचे सैन्यबळ जरी मोठे असले तरी मराठा सैन्य मुघल भूमीत आक्रमक हल्ले करीत होते, ही वस्तुस्थिती त्यांची मानसिकता मुघलांच्या बरोबरीची होण्यात झाली. यामुळे मुघलांच्या मनोधैर्यावर नकारात्मक प्रभाव पडला आणि मराठ्यांचे मनोबल उंचावले. दुसरे म्हणजे, शत्रूवर अचानक चाल करून जात असल्यामुळे, त्यांची रसद बंद होऊन त्याचा मुघल सैन्यावर विपरीत परिणाम झाला. किल्ले मराठा संरक्षणाचा कणा बनले होते. शिवाजी महाराजांच्या कृपेने, प्रत्येक किल्ल्यावर ताज्या पाण्याची सोय होती. किल्ल्यांची एकूण संख्या जवळजवळ 300 होती आणि एवढ्या मोठ्या संख्येने असलेले किल्ले औरंगजेबासाठी मोठी डोकेदुखी ठरली होती.

 

1701च्या उत्तरार्धात मुगल छावणीत चिंतेचे वातावरण पसरू लागले होते. या मोहिमेने सुरुवातीला योजेलेल्या पेक्षाही फार मोठा परिणाम मुघल साम्राज्यावर झाला होता. जिंकले न जाऊ शकणार्‍या एका युद्धात, दोनशे वर्ष जुने मुघल साम्राज्य ढासळत असल्याची चिन्हे दिसू लागली होती. मोघलांचा खजिना मोठ्या प्रमाणात रिता होऊ लागला होता. पण औरंगजेबाने युद्ध चालूच ठेवले. त्याला हळूहळू जाणवू लागले होते की 24 वर्षे सतत लढा देऊनही तो सुरूवातीला होता त्याच जागी होता व मराठ्यांना पराभूत करण्याच्या जवळपासही पोहचू शकला नव्हता. औरंगजेब निराश झाला. या युद्धात त्याने आपल्याकडे असलेले सर्व काही पणाला लावले आणि त्याने ते सर्व गमावले. शेवटी त्याची तक्षशिलेच्या सीमेवर असलेल्या अलेक्झांडर सारखी अवस्था झाली  होती. त्याच्या शेवटच्या दिवसात त्याला आपल्या मुलांमधील वैर पहावे लागले. एकटा, पराजित, निराश, सर्वस्व गमावलेला, घरापासून दूर असा तो 3 मार्च 1707 रोजी मृत्युला सामोरा गेला. “मला आशा आहे की मी केलेल्या घोर पातकांसाठी परमेश्वर मला एक दिवस क्षमा करील”, हे त्याचे शेवटचे शब्द होते.

 

“भारतीय इतिहासातील मुस्लिम कालखंड असा ज्याचा उल्लेख काही करतात, ते म्हणजे सत्ताधीश आणि विरोधक यांच्यातील सततचा संघर्ष होता आणि ज्यात शेवटी अठराव्या शतकातील मुस्लिम सत्ताधीशांचा पराभव झाला”. डॉ कोएनराड अल्स्ट.

प्रख्यात इतिहासकार जदुनाथ सरकार यांचे एक मनोवेधक निरीक्षण निरीक्षण आहे. ते म्हणतात, “औरंगजेबाने लढाया मागून लढाया जिंकल्या, पण अखेरीस तो युद्ध हरला. युद्ध जसजसे लांबत गेले तसतसे ते केवळ शस्त्रास्त्रांचे युद्ध न राहता ते ज्या तडफेने लढले जाऊ लागले, ती मराठ्यांची अस्मिता औरंगजेब कधीच मोडू शकला नाही.” मराठ्यांनी जे केले ते दोन तुल्यबळ नसणार्‍या शक्तींमधील असममित बचावात्मक युद्धतंत्राचे उत्कृष्ट उदाहरण होते.

प्राचीन भारतीय इतिहासातील एक सर्वात प्रसिद्ध योद्धा वरील निष्कर्षाशी सहमत असल्याचे दिसते. महाभारताच्या “भीष्म-पर्वा” मध्ये, पितामह भीष्म यांनी कुरुक्षेत्रावरील युद्ध सुरू होण्याच्या वेळेस युधिष्ठिराला सल्ला देत असतानाचे उल्लेख केलेले प्रसिद्ध वाक्य आहे. ते म्हणतात, “सैन्याचे बळ हे त्याच्या संख्येवर अवलंबून नसते

 

अशा प्रकारे भारताच्या इतिहासातील प्रदीर्घ आणि खडतर काळ संपला. मोगल राज्य लवकरच खिळखिळे होऊन लयाला गेले आणि दक्खन प्रांताने मराठा साम्राज्य उदयाला येताना पाहिले.

 

शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर 27 वर्षे आणि संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर 17 वर्षे मराठ्यांनी औरंगजेबाला रोखून धरले आणि राजाराम दूर जिंजीत 7 वर्षे अडकून पडले होते. राजा किंवा सेनापती नसतानाही सैन्याने इतक्या प्रदीर्घ काळ लढाई कशी काय चालू ठेवली? जागतिक इतिहासाच्या नोंदीतील हे एक अनोखे उदाहरण असू शकते.

 

शिवाजी महाराजांचा वारसा इथे फार महत्वाची भूमिका बजावतो. त्यांनी आपल्या रयतेमध्ये समर्पण आणि भक्तीची भावना इतकी रुजवली होती की, त्यांच्या निधनानंतरही “हिंदवी स्वराज्य” च्या संरक्षणासाठी ते स्वत:चे रक्त सांडायला किंवा आयुष्य वेचायला तयार होते. आणि ही भक्ती सुमारे १२० वर्षांहून अधिक काळ टिकली कारण मराठ्यांनी त्यांच्या राजाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांना जे जे काही शक्य होते ते सर्व काही केले. शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर 80 वर्षांनंतर रघुनाथराव पेशवे यांनी 28 एप्रिल 1757 रोजी पेशावर जवळील सिंधू नदीच्या काठावरील अटकेचा किल्ला ताब्यात घेतला. मराठ्यांनी 14 जानेवारी 1761 रोजी पानिपत येथे भारतीय इतिहासातील सर्वात रक्तरंजीत लढाई, स्वत:साठी नव्हे तर परकीय आक्रमणकर्त्यांपासून आपल्या मातृभूमीचे रक्षण करण्यासाठी लढली.

शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीचा किती दूरगामी परिणाम होऊ शकतो याचे उत्तम उदाहरण 2015 साली घडलेली ही घटना आहे. 

माझा मित्र जयंत साठे जोधपूरला गेला असता स्थानिक गाईडशी गप्पा मारत होता. जेव्हा गाईडला समजले की जयंत मराठी आहे, तेव्हा त्याचा चेहरा चमकला. तो म्हणाला, ‘शिवाजी महाराजांकरिता देवाचे आभार माना’. जयंतने त्याला सांगितले की तुझ्या भावना मी समजू शकतो पण मला त्या गोष्टी ऐकायच्या आहेत ज्यामुळे तुला असे वाटते? त्याचे उत्तर असे होते की, ‘जर ते शिवाजी नसते तर तुम्ही आणि मी दोघेही आज मुस्लिम असतो.’ जयंत त्याला म्हणाला की तुमचे राजपूत राजे सुद्धा मुसलमानांशी लढत होतेच की. त्यावर गाईडची टिप्पणी अशी होती की ‘त्या सर्वांनी आपला जीव वाचविण्यासाठी आपल्या मुली व बहिणींना मोगलांना दिले. त्यांना मोगलांशी युद्ध करायचं नव्हतं. शिवाजींनीच हिंदूंना आणि हिंदु राजांना वाचवले, दुसऱ्या कोणीही नाही.’ त्या दिवशी जयंतला खूप अभिमान वाटला आणि अभिमान वाटावा अशीच ही घटना आहे. 

शिवाजी महाराजांसारख्या थोर पुरूषांना देवत्व बहाल करण्याकडे आपला कल असतो. त्यांना देवत्व बहाल करण्यात मोठा धोका समाजाला आहे कारण मग आपण त्यांच्यासारखे कधीच बनू शकणार नाही अशी आपली धारणा होते. आपण स्वतःलाच बजावले पाहिजे की ते आपल्यासारखेच माणूस होते, कदाचित त्यांच्यातले सामर्थ्य सामान्यजनांपेक्षा खूप वरच्या पातळीवरचे  होते, परंतु त्यांचे अनुकरण करण्यासाठी आपण प्रयत्न केलेच पाहिजेत.

 

हीच शिवाजी महाराजांना खरी श्रद्धांजली ठरेल.

 

© यशवंत मराठे

yeshwant.marathe@gmail.com

Leave a commentअशोक प्रभू

8 months ago

अप्रतिम लेख !….

Sanjay Kamat

8 months ago

It is proud to be Maratha, अप्रतिम लेख

Sameer Chitnis

8 months ago

Feeling very proud of Maratha History, Maharashtra history

Manorama Parandekar

8 months ago

हा इतिहास इतरत्र वाचून समजला , शाळेत अगदी त्रोटक माहिती शिकवली गेली होती .आता तर तितकी पण शिकवली जात आहे की नाही , माहित नाही .तुमचा हा अभ्यासपूर्ण लेख आजच्या पिढीने जरूर वाचलाच पाहिजे.

Contact Form

subscribe

Thank you for subscribing.

Something went wrong.

Contact Info

  • yeshwant.marathe@gmail.com

Follow Me

My Other Blogs: historycafe.in

Copyright © 2020 Sarmisal.

Made with ♡ by iTGS