स्थलांतरित मजूर

बिहार, उत्तर प्रदेश, बंगाल, ओरिसा, तेलंगणा या राज्यातून तेथील नागरिक स्थानिक सुरक्षा व्यवस्था आणि बेरोजगारी याला कंटाळून त्या राज्यातून पलायन करतात. आज मुंबई, दिल्ली सारख्या महानगरात रोजगाराच्या संधी या लोकांना तिथे आकर्षित करतात. मुंबई तर भारताचे व्यावसायिक उर्जास्थान आहे. परंतु लोंढ्यांचा या शहरांच्या पायाभूत सुविधांवर प्रचंड दबाव येऊन ही शहरे लोकांच्या ओझ्याखाली गुदमरू लागल्या आहेत. पण अशा लोकांना थांबविणार कसे?

जर एवढा रोजगार अन्य प्रदेशात असेल, तर तो त्यांच्या राज्यात का नाही? आपण महाराष्ट्रात नेहमीच मराठी तरुणांना दोष देतो की त्यांची मेहनत करायची तयारी नसते. मला असलेल्या माहितीनुसार हे परप्रांतीय त्यांच्या स्वतःच्या राज्यात जेवढी बाहेर करतात तेवढी तिथे करत नाहीत. याचाच अर्थ स्थानिक मनुष्य काम करायची टंगळमंगळ करतो पण बाहेरच्या लोकांनी येऊन तीच कामे केली की आमच्या पोटावर गदा आणली असे बोंबलत फिरतो. आणि गंमत म्हणजे ही परिस्थिती जगभर आहे. आज आपले भारतीय, अगदी आपल्या बऱ्याच जणांच्या मुलांसकट, हे परदेशातील भय्येच आहेत. तेच चित्र युरोपमध्ये. पण याचा परिपाक म्हणजे आम्हाला बाहेरचे लोकं नकोत. अरे पण ती कामे कोण करणार?

मी मुंबईत राहतो म्हणून आपण आता मुंबईचेच उदाहरण घेऊ. बहुतांश सुतार, गवंडी, भाजीवाले, पान ठेले, इलेक्ट्रिशियन, इस्त्रीवाला, किराणा मालाची दुकाने, ब्रेडवाला, हजाम (न्हावी), दूधवाला, टॅक्सीवाले, मासे विकणारे, शहाळं विकणारे, भेळपुरीवाले आणि असे अनेक फक्त आणि फक्त परप्रांतीयच का दिसतात? मग आपली बेरोजगार मुलं अथवा माणसं का मिळवत नाहीत हा रोजगार? मराठी बेरोजगार तरुणांना हे धंदे खुणावत नाहीत कारण त्यांची "मेहनतीची तयारीच" नाही.

मग “मराठी तरूण काय करतो?” मराठी तरुण चळवळी, संघटना, आणि युनियन, क्रांती मोर्चा, ब्रिगेड बांधण्यात व्यस्त असतो. सार्वजनिक दहीहंडी आणि गणपती अशा अति महत्वाच्या कामात व्यग्र असतो. मिरवणुका काढणे, राजकारण्यांच्या हाताखाली कार्यकर्ते म्हणून नाचणे, शिवाजी राजे - टिळक - आंबेडकर याबद्दलचे वाद असे जीवन मरणाचे प्रश्न असताना "मी कुठला धंदा करु" याचा विचार करायला वेळच नाही. पण मग परप्रांतियांच्या नावाने खडे फोडू नये.

गेल्या काही महिन्यांमधील कोरोना संक्रमणामुळे स्थलांतरित मजूर म्हणजे परप्रांतीय कामगार यांचा प्रश्न सगळ्या देशात ऐरणीवर आला आहे. लॉकडाऊनमुळे या लोकांचे रोजगार अचानक ठप्प झाले. टाळेबंदी आणि खीळ बसलेल्या अर्थव्यवस्थेमुळे स्थलांतरित मजुरांची पार दैना झाली आहे; इकडे आड तिकडे विहीर अशी झाली आहे.

हे एक मानवतेवरचं प्रचंड मोठं संकट आहे, मोठ्या प्रमाणावर निघून जाणारे लोंढे ही एक सुरुवात आहे. त्याचे दुष्परिणाम हे अधिक भयावह आहेत कारण प्रचंड मोठ्या प्रमाणावर होणार्‍या स्थलांतरामुळे विषाणूचा प्रादुर्भाव आतापर्यंत संसर्गापासून दूर असणार्‍या व सक्षम आरोग्यव्यवस्था नसलेल्या गावागावातूनही होऊन त्याची परिणती अधिक मृत्यू, बेकारी, दुर्दशा, अशांतता, गोंधळ, अराजक ह्यात होऊ शकते.

वस्तुस्थिती अशी आहे की टाळेबंदी सुरू झाल्यापासून उपासमारीमुळे एकही मृत्यू झालेला नाही, यावरून स्पष्ट होते की कोणीही उपाशीपोटी राहिले नाही. ह्याचे सारे श्रेय स्वयंसेवक, परोपकारी व्यक्ती, विविध सामाजिक संस्था, राजकीय संघटना आणि अर्थातच सरकारला जाते. समस्या खूप मोठी असल्याने जरी काही प्रमाणात व्यवस्था अपुरी पडली असली तरी, प्रचंड मोठ्या जनसमुदायासाठी अन्न आणि निवारा ह्याची काळजी घेण्यात आली. सर्वांचे योगदान आपल्यासाठी अभिमानास्पद आहे.

रोजीरोटी पुन्हा मिळण्याची धूसर शक्यता, घरमालकाचा भाड्यासाठी तगादा वा घराबाहेर काढणे, मालकांनी त्यांना पगार किमान पोटापुरता भत्ता देखील न देणे, प्रदीर्घ काळासाठी असलेली अनिश्चितता आणि कोरोना संकटामुळे असलेले मृत्यूचे भय निराशेला कारणीभूत ठरले आहे. हे समजण्याजोगे असून, ते टाळता किंवा कमी करता येण्यासारखे होते. जे मजूर जगण्यासाठी संघर्ष करत इथेच राहिले आणि ज्यांनी कोणतेही अराजक न माजवता, स्वतःहून प्रवास करण्याचे धैर्य दाखवले त्यांचे खरंच कौतुक.

टाळेबंदीच्या काळातील ह्या समस्येचे आकलन करून घेण्यात आणि सामाजिक समन्वयाने स्थलांतरित बेरोजगारांच्या व्यवस्थापनासाठी कृती करण्यात, केंद्र सरकारसह राज्य सरकार देखील कमी पडले हे सुद्धा ह्या संकटामागचे कारण आहे. जरी काही योजना आखली गेली असती तर परत जाणारे लोंढे जरी थोपवता आले नसते तरी त्यांचे हाल नक्की कमी करता आले असते.

याशिवाय सध्याच्या संकटाला हातभार लावणारे दोन प्रमुख घटक आहेत आणि ते म्हणजे स्थलांतरितांची मानसिकता आणि आपल्या देशात सर्वत्र रुजलेली झुंडशाही.

स्थलांतरितांची मानसिकता

सर्वसाधारणपणे, स्थलांतरित माणसे जोखीम स्वीकारणारी असतात, चांगले आयुष्य जगता यावे म्हणून प्रसंगी घरदार सोडून लांब जातात त्यामुळे साहजिकच त्यांचा दृष्टीकोन व्यावहारिक असून त्यात फार दूरगामी विचार नसतो. सुरक्षा आणि स्वच्छतेकडे ते फारसे लक्ष देत नाहीत असे दिसून येते. त्याचप्रमाणे इतर भारतीय समाजात असलेले दोष म्हणजे जबाबदारीच्या भावनेचा अभाव, संधीसाधूपणा, स्वार्थापोटी असलेल्या निष्ठा, दुसर्‍यांचा विचार न करणे हे त्यांच्यात असले तर नवल वाटायला नको.

झुंडशाही

वेगवेगळे राजकारणी, त्यांचे पक्ष, अनेक सामाजिक कार्यकर्ते, धार्मिक संघटना, आरक्षणवादी, कामगार नेते, प्रादेशिक राजकारणात पाय रोवू पाहणारे, भाषिक-कट्टरता वादी संघटना, फुटीरतावादी, नक्षलवादी आणि इतर अनेकांनी प्रदीर्घ काळ झुंडशाहीचा वापर हा त्यांचे इरादे साध्य करून घेण्यासाठी केला आहे. ते ह्या गोरगरीब, अशिक्षित, बेरोजगार जनतेचे शोषण करून, त्यांना आपल्या कह्यात ठेवून स्वत:चा स्वार्थ साधून घेण्यासाठी एकत्रित आणून, अराजकता, दहशत, हिंसा पसरवण्यासाठी त्यांना बऱ्याच वेळा भाग पाडतात आणि मग त्यांना वार्‍यावर सोडून देतात. स्थलांतरित श्रमिक त्यांच्यासाठी सुलभ हत्यार बनले आहे.

सध्याचा स्थलांतरितांचा प्रश्न हा प्रामुख्याने राजकीय पक्ष आणि त्यांच्या व्होट बँकेतील टोळक्यांनी, मजुरांसमोर उभ्या असलेल्या पेच प्रसंगाचा नेमका फायदा उठवून अफवा पसरवणे, गोंधळ निर्माण करणे, गदारोळ अधिक भडकवून देऊन त्याचे खापर एकमेकांवर फोडणे, द्वेष भाव पसरवणे आणि आपआपसातील जुने हिशेब चुकते करणे हे केल्यामुळे, निर्माण झाला आहे. आपल्यासाठी ही शरमेची गोष्ट आहे व आपत्तीजनक ही आहे. कारण त्यांचे जगणं धोक्यात आलं आहे आणि विषाणूचा प्रसार वाढला तर आपण सर्वांनी केलेला त्याग व्यर्थ जाईल. आपण ह्यात ओलीस धरले गेलेले आहोत.

आपण लोकशाहीची निवड केली कारण ती मानवी प्रतिष्ठेचे मूल्य जाणते, नागरिकांच्या महत्वाकांक्षेचा आदर करते, आर्थिक विषमता कमी करते, समाजाच्या न्याय आणि आदर्श विकासासाठी विविध योजना आणि कार्यक्रम यांच्या मार्फत कायदा आणि सामाजिक सुव्यवस्था ह्याची प्रभावी अमंल बजावणी करते. मात्र, ह्या स्वार्थी संकुचित दृष्टीच्या भ्रष्टाचार्‍यांनी सत्ता काबीज करण्यासाठी ह्या व्होट बँकांची निर्मिती केली आणि त्या बदल्यात आपल्याला मिळाली घातक आणि हिंस्त्रक झुंडशाही. आणि अशी ‘झुंडशाही’ निव्वळ लोकशाहीलाच नव्हे तर राजकारण्यांनाही मारक ठरेल.

बघा, अजूनही वेळ गेलेली नाही. आता तरी जागे व्हा.

उघडा डोळे आणि बघा नीट.

यशवंत मराठे

yeshwant.marathe@gmail.com

(Thanks for the inputs from Satish Shitut)

हा माझा लेख नागपूरहून प्रकाशित होणाऱ्या आजचा सुधारक या त्रैमासिकात प्रसिद्ध झाला. त्याची लिंक:

https://www.sudharak.in/%e0%a4%b2%e0%a5%87%e0%a4%96-%e0%a4%b8%e0%a5%82%e0%a4%9a%e0%a5%80/

तसेच वेंगुर्ल्याहून प्रकाशित होणाऱ्या किरात या साप्ताहिकात देखील प्रसिद्ध झाला.

#स्थलांतर #मजूर #Migration #Labour

Leave a comment



Ajit S Gokhale

4 years ago

खरं आहे...अर्थचक्राला खीळ बसते आहे पण या संकटामुळे जे परत जात आहेत ते त्यांच्या मुलामाणसांमधे जात आहेत. वैयक्तिक, कौटुंबिक व सामाजिक दृष्टीने हे चांगलेच आहे.

एका लेखात वाचायला मिळाले की या वर्षी जवळजवळ दुप्पट जमिनींवर खरिपाची लागवड झाली आहे. हा सुद्धा लोक परत गेल्याचा परिणाम आहे. ही लागवड अन्न धान्य व तेलबियांची असेल तर नजिकच्या भविष्यात ही उपासमारी होणार नाही.

Subscribe

Thank you for subscribing.

Something went wrong.

Contact Form

subscribe

Thank you for subscribing.

Something went wrong.

Contact Info

  • yeshwant.marathe@gmail.com

Follow Me

My Other Blogs: historycafe.in

Copyright © 2020 Sarmisal.

Made with ♡ by iTGS