Nationalism - Fascism

This was a TED Talk delivered by Yuval Harari in Vancouver, Canada. However you will be surprised to know that Harari was actually in Tel Aviv and his holographic image addressed the audience in Vancouver. The link of his talk is given at the bottom of this translation. (Those who don't understand Marathi, can directly jump to the talk)

सर्वप्रथम एक प्रश्न विचारतो की आज प्रेक्षकांमध्ये किती जण फॅसिस्ट आहेत? काहीसं कठिण आहे उत्तर देणं कारण फॅसिझम म्हणजे काय याचाच आपल्याला विसर पडलेला आहे. लोकं “फॅसिस्ट” ह्या संज्ञेचा वापर एक तर नालस्ती करण्यासाठी म्हणजेच अपशब्द म्हणून करतात किंवा ते फॅसिझम आणि राष्ट्रवाद ह्यात गल्लत करतात.

आपण फॅसिझम म्हणजे नेमकं काय आणि राष्ट्रवादापेक्षा तो वेगळा कसा हे पाहू. मवाळ राष्ट्रवाद हा मानवाने लोकहितासाठी निर्माण केलेल्या अनेक गोष्टींपैकी एक आहे. राष्ट्रे म्हणजे एकमेकांशी परिचित नसलेल्या लक्षावधी लोकांचे समूह. उदा. माझ्यासारखे इज्रायली नागरिकत्व असलेल्या 8 दशलक्ष माणसांना मी ओळखत नाही. पण, राष्ट्रवादाच्या संकल्पनेमुळे आम्ही एकमेकांची काळजी घेऊन परस्पर सहकार्याने वागू शकतो. ही खरंच खूप चांगली गोष्ट आहे .

जॉन लेनन सारखी काही माणसे अशी कल्पना करतात की राष्ट्रवादाविना, जग हे शांत नंदनवन असतं. परंतु माझ्या मते जर राष्ट्रवाद नसता तर आपण एका सामूहिक अनागोंदी मध्ये राहिलो असतो. जर आपण आज स्वीडन, स्वित्झर्लंड आणि जपान सारख्या जगातील सर्वात संपन्न आणि शांततापूर्ण देशांकडे पाहिले असता आपल्याला दिसून येईल की त्यांच्यात प्रबळ राष्ट्रवादाची भावना आहे. याउलट काँगो, सोमालिया आणि अफगाणिस्तानसारखे राष्ट्रवादाची प्रबळ भावना नसलेले देश हिंसक व गरीब असल्याचे दिसून येते .

फॅसिझम

तर फॅसिझम म्हणजे काय आणि राष्ट्रवादापेक्षा तो कसा वेगळा आहे? राष्ट्रवाद मला शिकवतो की माझे राष्ट्र सर्वांपेक्षा वेगळे आहे आणि माझ्या राष्ट्राप्रती माझ्या जबाबदार्‍या आहेत. याउलट, फॅसिझम मला सांगतो की माझे राष्ट्र सर्वश्रेष्ठ आहे आणि त्याच्याप्रती माझ्या खास आणि विशेष जबाबदार्‍या आहेत. मला माझे राष्ट्र सोडून इतर कोणाचीही अथवा कशाचीही चिंता करायचं कारण नाही. सर्वसाधारणपणे या आयुष्यात जगताना लोकांना विविध मुखवटे घालावे लागतात आणि त्यांच्या विभिन्न समुहाप्रती निष्ठा असतात उदा. मी माझ्या देशाशी एकनिष्ठ असणारा चांगला देशभक्त असू शकतो त्याचवेळी मी, माझे कुटुंब, माझे शेजारी, माझा व्यवसाय, अखिल मानवजात, सत्य आणि सौंदर्य ह्यांच्याशीही एकनिष्ठ राहू शकतो.

अर्थातच जर मला विविध मुखवटे आणि विभिन्न निष्ठा असतील तर त्यातून संघर्ष आणि गुंतागुंत निर्माण होऊ शकते. पण कोण म्हणतंय की आयुष्य इतके सोपे आहे? आयुष्य गुंतागुंतीचे आहे त्याचा सामना करा. फॅसिझम जेव्हा जन्माला येतो तेव्हा माणसे आयुष्यातील गुंतागुंतीकडे दुर्लक्ष करून आयुष्य सरळ सोपे जगू पाहतात. फॅसिझमला राष्ट्रीय अस्मितेशिवाय इतर कोणतीही ओळख मान्य नाही आणि माझे कर्तव्य फक्त माझ्या देशाप्रतीच असावे याबाबतीत आग्रह असतो.

जर माझ्या राष्ट्राला मी माझ्या कुटुंबाचा त्याग करावा अशी अपेक्षा असेल तर मी तो करेन. जर माझे राष्ट्र मी लक्षावधी लोकांना ठार करावे अशी मागणी करीत असेल तर मी लाखो लोकांना ठार करेन. जर माझे राष्ट्र मी सत्य आणि सौंदर्याशी प्रतारणा करावी अशी मागणी करत असेल, तर मी सत्य आणि सौंदर्याशी प्रतारणा करेन. उदा. एखादा फॅसिस्ट कलेचे मूल्यमापन कसे करेल? एखादा चित्रपट चांगला किंवा वाईट हे एखादा फॅसिस्ट कसा ठरवतो? ते तर अगदी सरळ सोप्पं आहे. त्याला एकच मापदंड आहे की चित्रपट राष्ट्रहित जपणारा असेल तर तो चांगला चित्रपट; जर राष्ट्रहित जपणारा नसेल तर तो वाईट. बस्स इतकंच.

फॅसिझमचे दुष्कर्म

त्याचप्रमाणे, एक फॅसिस्ट मुलांना शाळेत काय शिकवावे ह्याचा निर्णय कसा घेतो? तेही फार सोपे आहे. फक्त एक मापदंड, राष्ट्रहिताचे जे आहे ते मुलांना शिकवा. सत्याशी काही देणं घेणं नाही. दुसरे जागतिक महायुद्ध आणि होलोकॉस्टची भयानकता या अशा विचारसरणीच्या महाभयंकर दुष्परिणामांची आठवण करून देते.

परंतु आपण सामान्यत: जेव्हा फॅसिझमच्या दुष्कर्मांविषयी बोलतो तेव्हा आपण ते परिणामकारकरित्या करत नाही कारण आपण फॅसिझमचे चित्र एक घृणास्पद दैत्य म्हणून रंगवतो, त्याबद्दलच्या आकर्षक वाटणार्‍या गोष्टी काय आहेत हे स्पष्ट करत नाही. हे काहीसे हॉलिवूड चित्रपटांसारखेच आहे जे व्हिलनच्या व्यक्तीरेखा नेहमी कुरूप, स्वार्थी आणि क्रूर म्हणून रंगवतात आणि ते त्यांच्या समर्थकांनाही क्रूर वाटतात. मी जेव्हा हे चित्रपट पाहतो, तेव्हा मला कळत नाही की त्या व्हिलनसारख्या तिरस्कारणीय आणि वाईट चालीच्या माणसाचे अनुसरण करण्याचा मोह कोणाला आणि कशासाठी होईल? पाप या संकल्पनेची एक अडचण अशी आहे की खर्‍या आयुष्यात पाप हे नेहेमीच कुरुप दिसत नाही. ते खूप सुंदर दिसू शकते. ख्रिस्ती धर्माला हे खूप चांगले ठाऊक होते, म्हणून, ख्रिश्चन कलाकृतीत सैतान नेहेमीच एक ताकदवान राजबिंडा दाखविला जातो, हॉलीवुड चित्रपटांत दाखवतात त्यापेक्षा कितीतरी वेगळा.

फॅसिझम लोकांना ते जगातील सर्वात सुंदर आणि सर्वात महत्वाच्या राष्ट्राचे पाईक आहोत या समजुतीने स्वतःकडे पहाण्यास भाग पाडते. आणि मग लोकांना वाटते, “आम्हाला शिकवलं जाते की फॅसिझम कुरुप आहे. पण जेव्हा मी आरशात पहातो तेव्हा मला तर सुंदरच दिसते, म्हणून मी फॅसिस्ट असू शकत नाही. हीच खरी फॅसिझमची समस्या आहे.

जेव्हा आपण फॅसिस्ट आरशातून पाहतो तेव्हा आपण स्वत: आहोत त्यापेक्षा कितीतरी सुंदर दिसतो. 1930 च्या दशकात जेव्हा जर्मन लोक फॅसिस्ट आरशातून पहात होते तेव्हा त्यांना जर्मनी ही जगातील सर्वात सुंदर गोष्ट दिसली. जर आज रशियन लोक फॅसिस्ट आरशातून पाहतील तर त्यांना रशिया जगातील सर्वात सुंदर वस्तू दिसेल. आणि जर इस्त्रायलींनी फॅसिस्ट आरशातून पाहिले तर त्यांना इस्राईल जगातील सर्वात सुंदर वस्तू म्हणून दिसेल. परंतु याचा अर्थ असा अजिबात नाही की आपण आता 1930 चे पुनर्प्रक्षेपण पहातोय.

फॅसिझम आणि हुकूमशाही

फॅसिझम आणि हुकूमशाही परत येतील, मात्र ते एका नव्या स्वरूपात परत येतील, एक असे स्वरूप जे 21 व्या शतकाच्या नवीन तंत्रज्ञानाच्या वास्तवाशी जास्त संबंधित असेल. पुरातन काळी, भूभाग/ जमीन ही जगातील सर्वात महत्त्वाची मालमत्ता होती. म्हणूनच तेव्हाचे राजकारण हे भूभागाच्या/जमिनीच्या नियंत्रणासाठी चालू असलेला एक संघर्ष होते. आणि हुकुमशाहीचा अर्थ तेव्हा असा होता की सर्व भूभाग एकाच सार्वभौम शासकाच्या ताब्यात असणे.

आणि आधुनिक युगात, भूभागापेक्षा/ जमिनी पेक्षा यंत्रे जास्त महत्त्वाची ठरली. यंत्रांवर नियंत्रण मिळवण्यासाठी संघर्ष करणे हे आधुनिक राजकरणाचे स्वरूप झाले. आणि हुकुमशाहीचा अर्थ असा झाला की यंत्रे मोठ्या प्रमाणात सरकारच्या किंवा अगदी खास लोकांच्या पण छोट्या वर्गाच्या हातात गेली. आता सर्वात महत्त्वाची मालमत्ता म्हणून भूभाग/ जमीन आणि यंत्रे यांची जागा डेटा (माहिती) घेऊ पाहत आहे. राजकारण हे आता डेटाच्या (माहितीच्या) देवाणघेवाणीवर नियंत्रण मिळवण्याचा संघर्ष बनले आहे.

आणि हुकुमशाहीचा सध्याचा अर्थ असा आहे की खूप सारी माहिती मोठ्या प्रमाणात सरकारच्या किंवा मूठभर उच्चभ्रू लोकांच्या हातात एकवटली गेली पाहिजे. उदारमतवादी लोकशाहीला आता असलेला सर्वात मोठा धोका म्हणजे माहिती तंत्रज्ञानातील क्रांती ही हुकूमशाहीला लोकशाहीपेक्षा अधिक कार्यक्षम बनवते हा आहे. 20 व्या शतकात, लोकशाही आणि भांडवलशाही यांनी फॅसिझम व साम्यवादाचा पराभव केला कारण लोकशाहीमध्ये माहितीवर प्रक्रिया करणे व निर्णय घेणे अधिक सोपे होते. 21 व्या शतकातले तंत्रज्ञान पाहता, एकाच ठिकाणी खूप जास्त माहिती व खूप जास्त सत्ता एकवटणे हे फलदायी नाही.

कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence) व यांत्रिकी शिक्षण (Machine Learning) उदयाला येत असण्याच्या काळात, एकाच ठिकाणी प्रचंड माहिती गोळा करून प्रक्रिया करुन त्यावर निर्णय घेणॆ अधिक कार्यक्षम होईल. आणि मग 20 व्या शतकातील सर्व हुकूमशाही शासनांचा मोठा अडसर - सर्व माहिती एकाच ठिकाणी संग्रहित करणे - हा त्यांचा सर्वात मोठा फायदा बनून जाईल.

लोकशाहीच्या भविष्याला असलेला आणखी एक तांत्रिक धोका म्हणजे, माहिती तंत्रज्ञानाचे जैवतंत्रज्ञानाशी होणारे विलीनीकरण ज्यामुळे असे अल्गोरिदम्स तयार होऊ शकतात ज्यांना माझ्याबद्दल मला स्वतःला माझ्याबद्दल जितकी माहिती आहे त्यापेक्षाही अधिक माहिती असेल. आणि एकदा का असे अल्गोरिदम्स तयार झाले की एखादी बाह्यशक्ति उदा. सरकार, माझ्या निर्णयाबद्दल अंदाज बांधू शकते एवढेच नाही तर माझ्या भावना व विचार यांचे नियमन करु शकते. एखादा हुकूमशाहा कदाचित मला चांगली आरोग्य सुविधा उपलब्ध करुन देऊ शकत नसेल परंतु तो मला त्याच्यावर प्रेम करायला व त्याच्या विरोधकांचा तिरस्कार करायला भाग पाडू शकतो.

लोकशाहीला अशा परिस्थितीमध्ये तग धरणे कठिण होईल कारण शेवटी, लोकशाही ही मानवी तर्कशक्तीवर आधारित नसून मानवी भावनांवर आधारित आहे. निवडणूका व सार्वमताच्या वेळी तुम्हाला असे विचारले जात नाही की "तुम्हाला काय वाटते?". तुम्हाला विचारले जाते "तुम्हाला कसं वाटतयं?" आणि जर कोणी तुमच्या भावना कौशल्याने नियंत्रित करु शकत असेल, तर लोकशाही हा एक भावनिक कठपुतळ्यांचा खेळ बनून जाईल.

आपण फॅसिझम आणि नव्या हुकूमशाहीचे परतणे कसे रोखू शकतो?

आपल्यासमोर असलेला सर्वात महत्वाचा प्रश्न: माहिती कोणाच्या नियंत्रणात आहे? आपण जर अभियंता असाल तर असे काही तोडगे शोधा ज्यामुळे या प्रचंड माहितीचा साठा काही मूठभर लोकांच्या हाती एकवटणार नाही. आणि वितरित केलेल्या माहितीवर प्रक्रिया करणे हे केंद्रीकृत माहितीवर प्रक्रिया करण्याइतकेच कार्यक्षम असेल याचे खात्रीलायक मार्ग शोधा. लोकशाहीसाठी हे सर्वोत्तम सुरक्षा-कवच असेल.

आपल्यापैकी जे अभियंते नाहीत, त्यांच्यासमोरील प्रश्न म्हणजे: माहितीवर नियंत्रण असणार्‍यांपासून आपल्याला नियंत्रित होण्यापासून कसे वाचवावे? लोकशाहीच्या शत्रूंची एक कार्यपद्धती असते. ते आपल्या भावना हॅक करतात. आपले इमेल्स नव्हे, आपली बँक खाती नव्हे – ते आपल्या भीती, द्वेष आणि वृथाभिमान हॅक करतात, आणि ते या भावनांचा वापर लोकशाहीचे ध्रुवीकरण करुन तिला समूळ नष्ट करण्यासाठी करतात. सिलिकॉन व्हॅलीने त्यांची उत्पादने आपल्याला विकण्यासाठी सर्वप्रथम या पद्धतीचा वापर केला.

परंतु आता, लोकशाहीचे शत्रू हेच तंत्र वापरुन भय, द्वेष आणि वृथाभिमान आपल्या गळी उतरवतात. ते या भावना शून्यातून निर्माण करू शकत नाहीत. म्हणून ते आपल्यात अगोदर पासून विद्यमान असलेल्या कमजोरींची माहिती करून घेतात. आणि नंतर त्याचा वापर आपल्याच विरुद्ध करतात. आणि म्हणूनच आपल्या उणीवा जाणून घेऊन त्या लोकशाहीच्या शत्रूंच्या हातातील शस्त्र बनणार नाहीत याची खबरदारी घेणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे.

आपल्या उणीवांची माहिती जर आपणास असेल तर फॅसिस्ट आरशात अडकण्यापासून आपण स्वतःला वाचवू शकू. आधी सांगितल्याप्रमाणे, फॅसिझम आपल्या वृथाभिमानाचा दुरुपयोग करते. आपण आहोत त्यापेक्षा अधिक सुंदर असल्याचे ते आपल्याला भासवते. हेच त्यांचे भुलवणे आहे. परंतु जर आपण स्वतःला ओळखत असाल तर आपण या अशा खुशामतीला बळी पडणार नाही.

जर कोणी तुमच्या डोळ्यासमोर एखादा आरसा ठेवला जो तुमचे कुरूपपण लपवून तुम्ही आहात त्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक सुंदर आणि महान असल्याचे दर्शवत असेल, तर तो आरसा तोडून टाका. धन्यवाद.

युवाल हरारी

The link of the original TED Talk.

https://youtu.be/xHHb7R3kx40

यशवंत मराठे

yeshwant.marathe@gmail.com

# Nationalism #Fascism #Fascist #हुकूमशाही

Leave a comment



nitin nadkarni

4 years ago

So if 4G Internet is denied to Kashmiris, because terrorists can take advantage of it, is it fascism?

Yeshwant Marathe

4 years ago

We have to look at the overall picture. As one episode can’t be said to be fascist, it can’t be termed as democratic as well.

Bharat Mohoni

4 years ago

अनुवाद छान झाला आहे.हरारीने राष्ट्रवाद आणि फॅसिझम मधील फरक नेमका पकडला आहे.
आपण सगळे राष्ट्रवाद जोपासता जोपासता किती बेमालूमपणे फॅसिझमच्या विळख्यात अडकतो हे खालील दोन गाण्यांच्या आधाराने लक्षांत येऊ शकेल.
1) बहु असोत सुंदर संपन्न कीं महां,
प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा।

2) सारे जहां से अच्छा,
हिंदोसतां हमारा।

rajivnaik

4 years ago

उत्तम अनुवाद. यामुळे स्वतःच्या मतांच्या echo chamber मध्ये अडकलेल्या मंडळींचे काहीतरी प्रबोधन व्हावे ही प्रार्थना.

Subscribe

Thank you for subscribing.

Something went wrong.

Contact Form

subscribe

Thank you for subscribing.

Something went wrong.

Contact Info

  • yeshwant.marathe@gmail.com

Follow Me

My Other Blogs: historycafe.in

Copyright © 2020 Sarmisal.

Made with ♡ by iTGS