बरखा रानी जरा "थम" के बरसो

वैशाख मासी प्रतिवर्षी येती | आकाशमार्गी नव मेघपंक्ती |नेमेंचि येतो मग पावसाळा | हे सृष्टीचे कौतुक जाण बाळा ||

४०-५० वर्षांपूर्वी मनोरंजनाची साधने खूपच कमी होती. त्यावेळी रात्री कुटुंबातील सर्वजण एकत्र बसून भेंड्या, उखाणे, कूटप्रश्न व गप्पागोष्टी करून एकमेकांचे मनोरंजन आणि ज्ञानवर्धन करीत असत. या खेळातील एक कूटप्रश्न असायचा की २७ उणे ९ किती? गंमत म्हणजे एक दंतकथा अशीही आहे की एकदा बादशहा अकबराने बिरबलाला हाच प्रश्न विचारला होता. या कूटप्रश्नाचे उत्तर होते शून्य आणि त्याचे स्पष्टीकरण असे की वर्षातील २७ नक्षत्रातील पावसाची ९ नक्षत्रे काढून टाकली, म्हणजे पाऊस पडला नाही, तर काय उरणार? शून्य. ह्यावर्षीचा दुपटीने पडलेला पाऊस पाहता एक नवीन कूटप्रश्न तयार करता येईल; २७ + ९ + ९ म्हणजे किती? पण आलेला पूर आणि झालेले नुकसान पाहता त्याचेही उत्तर शून्यच येईल, असो.

भारतीय लोकांना पावसाचे महत्व किती आहे हे वरील उदाहरणावरून लक्षात येईल. जगाच्या पाठीवर पाकिस्तान पासून सुरु होणारा दक्षिण आशिया हा एकमेव असा प्रदेश आहे की जिथे जून ते सप्टेंबर या चार महिन्यातच पाऊस पडतो. जगातील बाकीच्या सर्व भागात वर्षभर कमी अधिक प्रमाणात पाऊस पडू शकतो किंवा पडतो. या लेखात पावसासंबंधी ज्या गोष्टी सर्वसाधारणपणे माहित नाहीत त्याची ओळख करून देण्याचा प्रयत्न आहे.

माझ्या लहानपणी आम्ही सर्वच जण आतुरतेने पावसाची वाट बघत असू. कवींची प्रतिभा पावसाच्या आगमनाबरोबर फुलून येत असे. सिनेमातील पावसाची गाणी रेडियोवर जरी सतत लागली तरी कधी कंटाळा यायचा नाही. पण गेले काही वर्षे सर्वसामान्यांना पावसाची भीतीच वाटू लागली आहे. ग्रामीण भागात ओल्या किंवा सुक्या दुष्काळाची भीती तर शहरात कमी पाणीपुरवठा किंवा पाणी तुंबण्याची भीती. एकूण काय तर पाऊस गरजेचा म्हणून हवा नाहीतर नकोच.

या वर्षी पाऊस सरासरीपेक्षा कमी पडेल असा वेधशाळेने अंदाज नोंदवला होता पण झालं काय तर बऱ्याच ठिकाणी सरासरीच्या जवळजवळ ३० ते ४०% पाऊस जास्त पडला आहे. त्यामुळे आपले हवामान खाते आणि त्यांचा पावसाचा अंदाज किंवा भाकीत यांचा ताळमेळ जमणे हा एक दुर्मिळ अथवा दुग्धशर्करा योग समजला जातो. त्यांच्यात कायमच लपंडाव चालू आहे असे वाटते; परंतु एक लक्षात घ्यायला हवे की मान्सून ही अत्यंत गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. त्यात अनेक अनित्य / चल (variable) घटक आहेत. आणि गमंत अशी आहे की जगातील सर्व शास्त्रज्ञांचे असे एकमत आहे की जेवढी जास्त माहिती गोळा होते तेवढी गुंतागुंत वाढत जाते. तेव्हा आपल्या हवामानखात्याची खिल्ली उडविण्याआधी ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे.

प्राचीन भारतातील पर्जन्य विचार:

वेदकाळात निसर्गात घडणाऱ्या घटनांना देवतेचे स्वरूप दिले गेले. त्याकाळात पाऊस ही पर्जन्य देवता होती. ऋग्वेदात पर्जन्यसूक्त देखील आहे परंतु पावसाचा लहरीपणा लक्षात आल्यावर देवता अशी कशी वागू शकते? या संभ्रमामुळे पावसाला वरुण ही देवता नियंत्रित करते आणि इंद्र वरुण देवतेच्या सूचनेनुसार ९ प्रकारच्या ढगांच्या मदतीने पृथ्वीवरती पाऊस पाडतो असे समजले जाऊ लागले. या नऊ प्रकारच्या ढगांची नावे पुढीलप्रमाणे - १. बारिवाह (जलयुक्त ढग ) २. अभ्रमेघ (बिनपाण्याचे पांढरे ढग) ३. स्तननिन्तुन (गर्जना करत मार्गक्रमण करणारे काळे ढग) ४. धाराधर (सतत जलवृष्टी करण्याची क्षमता असलेले ढग) ५. बलहक (संथ संचार करणारे ढग) ६. ताडित्वान (विद्युतभारी ढग) ७. अंबभृत (शुद्ध उदकांनी भरलेले ढग) ८. घननीमुत (गर्द काळ्या रंगाचे ढग) ९. धुमयोजन (धुके निर्माण करणारे ढग). याशिवाय इंद्राकडे प्रलय निर्माण करणारे (अतिवृष्टी) चार प्रकारचे महामेघ आहेत अशी कल्पना केली आहे. १. सुदेषण २. प्रलयंकार (ढगफुटी?) ३. उग्रधुमी ४. विद्युतगर्भ

आजच्या आधुनिक शास्त्रात सुद्धा ढगांची विभागणी ११ प्रकारात केली जाते.

१५०० वर्षांपूर्वी वराहमिहीर सारखा प्रकांड गणिती भारतात होऊन गेला. त्याच्या बृहत् संहितेत पावसाचा अंदाज कसा करावा याविषयी माहिती दिली आहे. संहितेतील पहिल्या १३ अध्यायात सूर्य, चंद्र व ग्रहांच्या भ्रमण गती आणि त्याचे पावसावर होणारे परिणाम मांडले गेले आहे. १४ व्या कुर्माध्याय या अध्यायात भारताचे ९ भाग करून प्रत्येक भागात येणारे प्रदेश, त्यावर असलेल्या वेगवेगळ्या नक्षत्रांचे अधिपत्य, युत्या आणि व्यूह यांची माहिती देऊन त्याचे पावसावर काय परिणाम होतात ते सांगितले आहे. पावसाच्या अंदाजासंबंधी या संहितेतील ग्रहशृंगारक हे प्रकरण खूप महत्वाचे आहे. त्यात पावसाच्या ९ नक्षत्रांत (मृग, आर्द्रा, पुनर्वसू, पुष्य, आश्लेषा, मघा, पूर्वा, उत्तरा आणि हस्त) कसा पाऊस पडेल याचा अंदाज वर्तवण्याची शास्त्रशुद्ध पद्धत दिलेली आहे. प्रत्येक नक्षत्राच्या प्रत्येक चरणात (प्रत्येक नक्षत्र चार भागात विभागलेले असते त्या पाव भागाला चरण म्हणतात) पडणाऱ्या पावसाचे स्वरूप कसे असेल ह्याचे सुद्धा वर्णन आहे. पावसाचे हे स्वरूप सहजपणे सामान्य माणसाच्या लक्षात यावे आणि रहावे याकरिता प्रत्येक चरणात पडणाऱ्या पावसाला अत्यंत चपखल नावे दिली आहेत. उदा. १. सशपाद २. व्याघ्रपाद ३. श्येनपाद ४. वृकपाद. सशपाद - मृग नक्षत्राच्या पहिल्या चरणात पडणारा पाऊस इतका हलके शिंपण केल्यासारखा असतो की असा पाऊस पडलेल्या जमिनीवर सश्यासारख्या छोट्या प्राण्याची पदचिन्हे सुद्धा उमटतील. व्याघ्रपाद - चिखल करणारा पाऊस की ज्याच्यात वाघासारख्या वजनदार प्राण्याची पाऊले उमटतील. श्येनपाद - जोरदार मोठी सर येऊन थांबणारा पाऊस. श्येन म्हणजे ससाणा की जो झपकन येऊन सावज पकडतो तसा पाऊस कोसळतो. वृकपाद - वृक म्हणजे लांडगा की जो कळपाने सावज हेरून त्यांना योग्य संधी मिळाली की हल्ला करतात त्याचप्रमाणे दुपारपासून ढग जमायला सुरुवात होऊन संध्याकाळी मुसळधार वृष्टी. ही वर्णने त्यावेळच्या ग्रह नक्षत्रांच्या स्थिती लक्षात घेऊन बरोबर होती. आज पृथ्वीच्या परांचन गतीमुळे (पृथ्वीच्या अक्षाचे आंदोलन) स्थिती बदलेल्या आहेत.

वराहमिहिराने पाऊस कसा मोजावा हे देखील सांगितले आहे, ती पद्धत अशी - मोकळ्या सपाट जागेत, भूमीपेक्षा बारा अंगुळे उंच असलेली विटांची वेदी तयार करून काशाचा द्रोण न कलंडेल असा त्याच्या मध्यभागी ठेवावा. दर प्रहरानी (१ प्रहर = ३ तास) द्रोणात पडलेले पर्जन्यजल मोजावे (१ द्रोण = १.२५ इंच). ही पद्धत आज वापरात येणाऱ्या पद्धतीशी मिळतीजुळती आहे.

वराहमिहीराने आकाशात चमकणाऱ्या विजेचे १० प्रकार दिले आहेत, त्यांची नावे पुढीलप्रमाणे:- १. सौदामिनी २. विद्युलता ३. तडीत् ४. शंपा ५. शतप्रदा ६. क्षीणप्रभा ७. चंचला ८. व्रजनिघोश ९. मेघज्योती १०. चपला आणि या प्रत्येक प्रकारच्या विजेचे विस्तृत वर्णन केले आहे.

यावरून एक गोष्ट लक्षात येईल की आपल्या भारतीयांना पावसाचे किती जास्त आहे आणि गेल्या २००० वर्षांपासून शास्त्रशुद्ध पद्धतीने पावसाचा अभ्यास केला जात होता.

ब्रिटिश राजवटीतील भारतातील पर्जन्य विचार:

भारतीय अर्थव्यवस्था मान्सून (मौसम या अरबी शब्दाचा अपभ्रंश) वरती अवलंबून असल्याने इंग्रजांनी १८७५ साली भारतीय हवामान खात्याची स्थापना केली (इंग्रज कोणतीही गोष्ट उगाच करत नसत याचे हे उत्तम उदाहरण) आणि या खात्याचा प्रमुख म्हणून एच.एफ. ब्लाॅन्फोर्ड याची नियुक्ती केली. त्याने १८८९ मध्ये "The Climate & Weather of India" असा अहवाल सरकारला सादर केला. ब्लाॅन्फोर्डने मान्सूनचा पद्धतशीर अभ्यास केला. अचूक माहिती मिळविण्यासाठी त्याने हवामान शास्त्र विषयक केंद्रांचे जाळे निर्माण केले. या केंद्रांतून दररोज हवामान विषयक माहिती तारेच्या द्वारे मुख्य कार्यालयाला मिळत असे. भारत आणि म्यानमारच्या कानाकोपऱ्यातून ही माहिती गोळा केली जात असे. उत्कृष्ठ व्यवस्था कशी असावी याचे हे जिवंत उदाहरण आहे. ब्लाॅन्फोर्ड नंतर प्रमुखपदी आलेल्या इलियट यांनी प्रथम मान्सूनचा अंदाज प्रकाशित करायला सुरुवात केली. त्यानंतर १९०४ साली सर वॉकर हे गणिती भौतिकशास्त्रज्ञ प्रमुख झाले. ते अत्यंत चौकस आणि हुशार होते. त्यांनी भारतातील मान्सूनचा पाऊस आणि सुदूर ठिकाणच्या नाईल नदीचा पूर यांचा परस्पर संबंध शोधून काढला म्हणून त्यांना Giant of Meteorological Dept असे म्हटले जाते.

याच पार्श्वभूमीवर आपण डॉ. गोवारीकरांच्या पावसाचे भाकीत करणाऱ्या सूत्रांचा विचार करूया. ही सूत्रे सोळा असून ती मुख्यत्वे खालीलप्रमाणे:-

१. भारत आणि जगातील निरनिराळ्या प्रदेशातील तपमान याची चार सूत्रे.

२. युरोपियन हिम आच्छादन आणि हिमालयीन आच्छादन याची दोन सूत्रे.

३. जगातील गोलार्ध आणि महासागरातील हवेच्या दाबाची पाच सूत्रे.

४. हवेचा विशिष्ट दाब (500 hPa, 50 hPa, 10 hPa) ज्या उंचीवर असतो त्या उंचीवर वाहणारे वारे याची तीन सूत्रे. (hPa = Hectopascal)

५. अल् निनो - दक्षिण अमेरिकेतील पेरू देशाच्या सागरात डिसेंबर महिन्यात उत्पन्न होणारा उष्ण पाण्याचा प्रवाह आणि त्याचा आपल्या पावसाळ्यावर होणारा विपरीत परिणाम.

६. अल् निना - आधीच्या वर्षी पूर्व मध्य पॅसिफिक महासागरात निर्माण होणारा थंड पाण्याचा प्रवाह ज्यामुळे सागराच्या पाण्याचे तापमान ३ ते ५ अंशांनी कमी होते परंतु त्याच्यामुळे आपल्या मान्सूनला फायदा होतो.

ह्या १६ निकषांपैकी १० निकष पूर्ण होतात त्यावेळी मान्सून सरासरीचा (नॉर्मल) असतो.

मान्सून आणि पाऊस:

सर्वसाधारणपणे मान्सून आणि पाऊस या संज्ञा एकच समजल्या जातात. परंतु ते तेवढे बरोबर नाही. हवामान खाते मान्सून केरळमध्ये दाखल असे जेव्हा घोषित करते त्यावेळी प्रत्यक्ष पाऊस पडतोच असे नाही. मान्सून ही एक बाष्पाने ओतप्रोत भरलेली हवाप्रणाली आहे आणि त्याचे काही निकष आहेत. केरळ आणि आसपासच्या प्रदेशात १४ ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. या १४ पैकी ८ ठिकाणी (६०%) सलग दोन दिवस २.५ मिमी पावसाची नोंद व्हावी लागते आणि त्या ठिकाणच्या वाऱ्याचा वेग ताशी ३५ ते ४५ किमी असावा लागतो. हे वारे ६ किमी उंचीपर्यंत पश्चिम दिशेने वहाणे आवश्यक आहे. याच बरोबर ढगांची पण स्थिती बघावी लागते. हे सर्व निकष पूर्ण झाले तरच मान्सून आल्याचे जाहीर केले जाते. प्रत्यक्ष पाऊस पडणे ही एक वेगळी प्रक्रिया आहे आणि त्याला स्थानिक घटक कारणीभूत असतात.

चेरापुंजीला सर्वात जास्त पाऊस का पडतो?

चेरापुंजी खासी पर्वतराजीतील दक्षिणोत्तर दरीच्या टोकावर आणि समुद्रसपाटीपासून ५००० फुटांवर आहे. बंगालच्या उपसागरावरून भरपूर बाष्प घेऊन येणारे मान्सूनचे वारे बांगलादेशचा मैदानी प्रदेश ओलांडून मेघालयात या दरीत शिरतात. खासी पर्वतराजीमुळे त्यांना अडवले गेल्यामुळे ते वर आकाशात सरकतात. परंतु उंचीमुळे तापमान कमी होते आणि ढगांमधील प्रचंड बाष्पाचे पाण्यात रूपांतर होते आणि चेरापुंजीला जोरदार पाऊस पडतो. महाराष्ट्रातील महाबळेश्वरला सुद्धा असेच होते परंतु सह्याद्री हा खासी पर्वतराजींपेक्षा कमी उंच असल्याने तसेच चेरापुंजी, महाबळेश्वरच्या उत्तरेला असल्याने चेरापुंजीचे तपमान महाबळेश्वरापेक्षा जास्त थंड असते त्यामुळे जास्त बाष्पाचे रूपांतर पाण्यात होते. चेरापुंजीत दरवर्षी सरासरी ४२७ इंच (सुमारे ११००० मिमी) पाऊस पडतो. १४ जून १८७६ रोजी एका दिवसात ४०.८ इंच पाऊस पडल्याची नोंद आहे. परंतु हल्ली चेरापुंजीपासून काही किमी अंतरावर "मौसिनराम" ह्या ठिकाणी ४५० इंच पावसाची नोंद झाल्याने या गावाने चेरापुंजीचा विक्रम मोडला आहे.

हवामान शास्त्रज्ञ डॉ. रंजन केळकर यांनी चेरापुंजीच्या पावसाचा प्रत्यक्ष अनुभव घेऊन जे वर्णन केले ते वाचण्यासारखे आहे. ते म्हणतात - मी खासी पर्वतांच्या कड्यावर उभा होतो. समोरचे दृष्य जितके विलोभनीय होते तितकेच ते भयावह होते. खाली बांगलादेशातील हिरवी शेतं आणि समोरून बंगालच्या उपसागरावरून आलेले मान्सूनचे ढग, जणू जंगली हत्तींची प्रचंड सेना माझ्या दिशेने स्वारी करून येत होती. भारतीय मान्सून किती प्रचंड आहे हे तिथे माझ्या डोळ्यांनी पाहिले.

परंतु दुर्दैवाची गोष्ट अशी की भौगोलिक स्थानामुळे चेरापुंजीला सर्वात जास्त पाऊस पडतो पण तो डोंगर दऱ्यांमुळे सगळा वाहून जातो आणि उन्हाळ्यात चेरापुंजीला पाणी टंचाई भेडसावते हे विचित्र सत्य आपल्याला मान्य करावे लागते.

ढगफुटी म्हणजे काय?

एखाद्या ठिकाणी हवामानात अचानक बदल होऊन तेथील तापमान वाढते आणि हवेचा दाब कमी होतो. हा दाब कायमस्वरूपी बराच काळ, म्हणजे काही तास, राहिल्यास वाऱ्याने डोंगराप्रमाणे ढगावर ढग रचले जातात. नंतर बाष्पाचे रूपांतर पाण्यात होऊन कमी दाबाच्या छोट्या क्षेत्रात प्रचंड पाऊस कोसळतो त्याला ढगफुटी म्हणतात. साधारणपणे ढगफुटीच्या घटना पर्वतीय अथवा वाळवंटी प्रदेशात घडतात. भारतात हिमाचल प्रदेश, उत्तरांचल हे भाग आणि थर वाळवंटाच्या सीमारेषेवरील प्रदेश हे ढगफुटी प्रवण आहेत.

पावसाची नक्षत्रे आणि वाहन:

दिनदर्शिकेवर जून ते ऑक्टोबर महिने पाहिल्यास काही तारखांना सूर्याचा नक्षत्र प्रवेश आणि त्याच्या वाहनाचे नाव लिहिलेले आढळते. वाहन काढण्याची पद्धत: सूर्य ज्या नक्षत्रात प्रवेश करेल त्या नक्षत्रापासून प्रवेशकालीन चंद्रनक्षत्रापर्यंत नक्षत्रसंख्या मोजावी आणि येणाऱ्या संख्येस ९ ने भागावे. जी बाकी उरेल त्यानुसार प्रत्येक अंकास एक एक प्राणी वाहन म्हणून दिला आहे.

० - हत्ती, १ - घोडा, २ - कोल्हा, ३ - बेडूक, ४ - मेंढा, ५ - मोर, ६ - उंदीर, ७ - म्हैस, ८ - गाढव

यातील हत्ती, बेडुक आणि म्हैस या वाहनांना भरपूर पाऊस तर उंदीर, गाढव, मेंढा यांना कमी पाऊस अपेक्षित असतो तर मोर, कोल्हा आणि घोडा आल्यास मध्यम पाऊस पडेल असे मानले जाते. या वर्षी ८ जून ते २१ जून मृग नक्षत्र होते आणि त्याचे वाहन उंदीर आहे. २२ जून ते ५ जुलै या काळात आर्द्रा नक्षत्र असून याचे वाहन हत्ती आहे. जुलै महिन्यात ६ ते १९ या कालावधीत पुनर्वसू नक्षत्र असून याचे वाहन मेंढा आहे. त्यानंतर २० जुलै ते २ ऑगस्ट या काळात पुष्य नक्षत्र असून याचे वाहन गाढव आहे. ३ ते १६ ऑगस्ट दरम्यान आश्लेषा नक्षत्र आहे. याचे वाहन बेडूक आहे. तर १७ ते ३० ऑगस्ट या काळात मघा नक्षत्र आहे. याचे वाहन उंदीर आहे. ३१ ऑगस्ट ते १२ सप्टेंबर या काळात पूर्वा फाल्गुनी नक्षत्र असून घोडा त्याचे वाहन आहे, तर त्यानंतर १३ ते २६ सप्टेंबर या कालावधीमध्ये उत्तरा फाल्गुनी नक्षत्राचे वाहन मोर आहे. २७ सप्टेंबर ते १० ऑक्टोबर या काळात हस्त नक्षत्राचे वाहन गाढव आहे. ऑक्टोबर महिन्यात चित्रा आणि स्वाती नक्षत्रे असून यांची वाहने बेडूक आणि उंदीर आहेत.

२१ व्या शतकात हवामान खात्याकडे अत्याधुनिक यंत्रणा, प्रत्यक्ष ढगांचे छायाचित्र देणारे उपग्रह उपलब्ध असताना अशा पारंपारिक पद्धतीवर किती विश्वास ठेवायचा हा प्रश्न निर्माण होऊ शकतो. पण हवामान खात्याचे अनुमान पाहता दिसून येते की ते विशिष्ट घटकांवर अवलंबून असते ज्याच्या आधारे हवामानखाते किती टक्के पाऊस पडेल याचा अंदाज फक्त त्या वर्षापुरता जाहीर करते. तसेच पावसाळा सुरू झाल्यावर येणारे अनुमान हे पुढील काही दिवसांसाठीच असते. पण या पद्धतीत पुढील अनेक वर्षांचे अनुमान करता येऊ शकते.

आपल्याकडे पावसाची म्हणून जी काही नक्षत्रे आहेत, त्यापैकी काही विशिष्ट नक्षत्रात पडणाऱ्या पावसाला शेतकऱ्यांनी ही विविध गमतीशीर नावे ठेवली आहेत. पारंपरिक अंदाजानुसार त्या नक्षत्रात ज्या प्रकारे पाऊस पडतो त्यानुसार ही नावे ठेवण्यात आली आहेत. याविषयी अधिक माहिती देताना ज्येष्ठ पंचांगकर्ते व खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण म्हणतात, पुनर्वसू नक्षत्रात पडणाऱ्या पावसाला ‘तरणा’ पाऊस तर पुष्य नक्षत्रात पडणाऱ्या पावसाला ‘म्हातारा’ पाऊस असे म्हणतात. आश्लेषा नक्षत्रातील पावसाला ‘आसलकाचा पाऊस’, मघा नक्षत्रातील पावसाला ‘सासू’चा पाऊस, पूर्वा नक्षत्रातील पावसाला ‘सूनां’चा पाऊस, उत्तरा फाल्गुनी नक्षत्रात पडणाऱ्या पावसाला ‘रग्बीचा’ पाऊस तर हस्त नक्षत्रात पडणाऱ्या पावसाला ‘हत्ती’चा पाऊस अशी नावे आहेत. पर्जन्य नक्षत्रात पडणाऱ्या पावसाला ठेवण्यात आलेल्या या नावांना शास्त्रीय आधार नाही. परंपरेने व पूर्वापार चालत आलेली ही नावे आहेत.

पावसाचे भाकीत करण्याच्या पूर्वीच्या पद्धती आणि निसर्ग संकेत:

१. होळी पेटविण्याच्या मुहूर्ताच्या अर्धा तास आधी आणि अर्धा तास नंतर वारा कोणत्या दिशेकडून वाहतो यावरून किती पाऊस पडेल याचा अंदाज करण्यात येऊ शकतो.

२. अक्षय तृतीयेच्या दिवशी पहाटे ३ ते ६ या तीन तासात वाहणाऱ्या वाऱ्याच्या दिशेवरून पाऊस किती पडेल याचे कोष्टक बघता येऊ शकते.

३. पौष महिन्याचे ३० दिवस X २४ तास म्हणून एकूण ७२० तास. पौष महिन्यातील प्रत्येक दोन तासाची निरीक्षणे करून वर्षातील (३६५ दिवस) प्रत्येक दिवसाच्या हवामानाचा अंदाज करता येतो. उदा. पौष महिन्याच्या शुक्ल पक्षात जेव्हा शततारका नक्षत्र असेल आणि तेव्हा जर आकाश ढगाळ आणि विजा चमकत असतील तर आषाढ महिन्याच्या पंचमीपासून पुढे पाच दिवस सतत पाऊस पडेल असा अंदाज केला जातो. या पद्धतीने पूर्वी पूर्ण पावसाळ्याचा तक्ता मांडला जायचा.

४. कावळा कोणत्या झाडावर, किती उंचीवर आणि केव्हां घरटे बांधण्यास सुरुवात करतो त्यावरून पावसाचा अंदाज येऊ शकतो. कावळ्याने जर उंच झाडावर घर बांधले आणि चार अंडी घातली तर पाऊस चांगला पडेल असा अंदाज केला जायचा. हे निरीक्षण मारुती चित्तमपल्ली यांनी २०१३ च्या एका लेखात मांडले होते आणि आश्चर्य म्हणजे पुढील काही महिन्यातच श्री. धनंजय साळगावकर यांनी ते निरीक्षण कसे बरोबर निघाले असा लेख लिहिला.

५. तसेच डोंगळ्या एवढ्या मोठ्या असणाऱ्या लाल मुंग्या पाने चिकटवून पावसाळ्याच्या आधी घर बनवितात. ते घर केवढे मोठे, कोणत्या दिशेला, किती उंचीवर करतात त्यावरून पाऊस कसा पडेल याचे कोष्टकच मांडलेले आहे.

६. टिटवी हा पक्षी तळ्याकाठी, जमिनीवर घरटे करून अंडी घालतो. त्याने जर चारापेक्षा कमी अंडी घातली त्तर पाऊस कमी पडेल असे लक्षात आले आहे.

७. शेताच्या आसपास असलेल्या बोरीच्या झाडाला पालवी फुटली की दोन ते तीन दिवसात नक्की पाऊस पडणार.

८. घोरपडी बिळाबाहेर तोंड काढून सकाळच्या वेळी बसलेल्या दिसल्या तर पाऊस एक दिवसावर आला आहे असे समजतात.

९. श्री. प्रकाश आमटे यांचे एक निरीक्षण अगदी नोंदण्यासारखे आहे की मगरींची पिल्ले अंड्यातून बाहेर आल्यापासून २४ तासाच्या आत मुसळधार पाऊस कोसळतोच.

वन शास्त्रज्ञ श्री. मारुती चित्तंपल्ली यांनी प्राण्यांच्या निरीक्षणातून पावसाचा अंदाज कसा अचूकपणे घेता येतो याचे अनेक किस्से दिले आहेत. त्यातील एक निरीक्षण - पाऊस पडणार नसेल तर मेळघाटातील हरिणी विणीच्या काळात सुद्धा पिल्लांना जन्म देत नाहीत. त्याच मेळघाटात एका गर्भवती वाघिणीने डायसकोरियाचे कंद खाऊन गर्भपात करून घेतला (आदिवासी महिला असेच करतात) आणि त्यावर्षी अभूतपूर्व दुष्काळ पडला.

निसर्ग अनेक गोष्टींतून पावसाचे संकेत देत असतो परंतु आपल्याला ते वाचता यायला हवेत. प्राणी निसर्ग नियमांना धरून चालतात पण मानव मात्र निसर्गाशी सारखा भांडतो आणि पायावर धोंडा पाडून घेतो.

मान्सूनचा अंदाज आणि त्याचा अभ्यास हे खूप गुंतागुंतीचे शास्त्र आहे, त्यामुळे तांत्रिक ज्ञान व भूगोलाचे सखोल ज्ञान असल्याशिवाय ते कळत नाही. या लेखात कमीत कमी तांत्रिकता ठेऊन जास्तीत जास्त रंजकता येईल असे करण्याचा प्रयत्न केला आहे.

यशवंत मराठे

सुधीर दांडेकर

yeshwant.marathe@gmail.com

#Monsoon #Rains #पावसाळा #पाऊस #निसर्ग #पूर

Below is the audio format of the above Blogpost.

Leave a comment



aroundindiaghansham

5 years ago

उत्तम माहिती

Hemant Marathe

5 years ago

Excellent article full of knowledge. With so much knowledge I can easily get job in meteorological dept. 😊

Vishakha Bhagvat

5 years ago

An excellent article. I knew certain aspects of monsoon but by reading this article my knowledge has certainly increased. Thanks!

मन शब्द शब्द होतांना..

5 years ago

बरखा रानी उत्तम माहितीपर लेख

अजित सुरेश गोखले

5 years ago

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏😊😁😁😁😁एवढा छान लेख या विषयावर चा आजपर्यंत कधीही वाचला नव्हता. तुम्हा दोघांना हार्दिक धन्यवाद व शिर-साष्टांग नमस्कार.

Subscribe

Thank you for subscribing.

Something went wrong.

Contact Form

subscribe

Thank you for subscribing.

Something went wrong.

Contact Info

  • yeshwant.marathe@gmail.com

Follow Me

My Other Blogs: historycafe.in

Copyright © 2020 Sarmisal.

Made with ♡ by iTGS