आचरटपणाचा कळस

आपल्या भारत देशाएवढा ढोंगीपणा जगात दुसऱ्या कुठल्या देशात नसेल. आपण गप्पा तर मोठ्या मारतो आणि आपल्या दैदिप्यमान भूतकाळाबद्दल गुणगान गाताना आम्ही थकत नाही. परंतु प्रत्यक्षात काय दिसते? 

 

 
आपण लाच आणि भ्रष्टाचार याच्याबद्दल पोटतिडीकेने फक्त बोलतो कारण वाहतुकीचा कायदा मोडताना पकडल्यास लाच द्यायला पहिले तयार. तसेच लाच घेण्याची संधी मिळून देखील नाही म्हणणारा माणूस वेडा ठरवला जाईल. स्त्रियांना त्रास द्यायला तर आम्हाला एक टक्का सुद्धा लाज वाटत नाही. देतो. पूर्वी नवऱ्याच्या धडधडत्या चितेत त्याच्या जित्याजागत्या बायकोला फेकलं जायचं आणि मग ‘सती म्हणून तिचे स्तोम माजवायचे ही भारतीयांची खासियत. सगळी पापे उजळ माथ्याने करायची आणि मग दान पेटीत लाखो रुपये दान करून आपली पापं धुवून टाकण्याची आशा करायची; आम्ही देवाला देखील सोडत नाही. 
 
गेले काही वर्षे फिल्म सेन्सॉर बोर्डने सिनेमाच्या पडद्यावर धुम्रपान करण्यास बंदी घातली आहे आणि त्यामागील कारण म्हणजे ते मुलांमध्ये धूम्रपान करण्यास प्रवृत्त करते. जर एखाद्या नायकाने सिगारेट ओढल्यामुळे मुले धूम्रपान करण्यास प्रवृत्त होत असतील तर मग चोरी, अपहरण, खून किंवा बलात्कार करणार्‍या नटापासून प्रेरणा घेऊन अत्याचारी गुन्हे करण्यास तरुण प्रवृत्त होणार नाहीत याची काय हमी? सगळा ढोंगीपणा; दुसरं काय? 
 

इंग्रजीसह जगातल्या अनेक भाषांत मद्यावर कथा, कविता, नाटक असे ललित साहित्य सापडते. दारू पिणे हे काही फार मर्दुमकीचे किंवा फुशारकी मारण्याचे काम नक्कीच होऊ शकत नाही, पण त्याचबरोबर जगातला एक फार मोठा वर्ग मद्यपान करतो, हेही विसरता येणार नाही. परंतु भारतीय समाजात दांभिकता ठासून भरली आहे. त्याचाच परिपाक म्हणजे पूर्वी मराठी कविता म्हटली की लगेच समाज प्रबोधन, सामाजिक बांधिलकी किंवा फार तर फार प्रणय हाच दृष्टिकोन ठेवला जायचा. या पलीकडे देखील मराठी कविता भावनांचे अनेक तरंग दाखवू शकते हे साठीच्या दशकात बहुदा माहीतच नव्हते. 

आता तुम्हाला एक आचरटपणाचा कळस असलेली गोष्ट सांगतो. गदिमांसारखा प्रतिभावंत कवी आणि गीतकार मराठी भाषा समृद्ध करायलाच देवाने पाठवला असावा आणि त्यांच्या गीतांना सुधीर फडके यांचे स्वर आणि संगीत असा दुग्धशर्करा योग जुळून येऊन सुद्धा एखाद्या गीताची कशी पार वाट लागते ते बघा. 

 

धुंद येथ मी, स्वैर झोकितो मद्याचे प्याले |
याच वेळी तू असशील तेथे बाळा पाजविले ||

गदिमा रचित आणि सुधीर फडके यांनी गायलेले हे एक अतिशय सुमधुर आणि भावपूर्ण गीत आहे. मद्य घेतानाची तरल अवस्था आणि धुंदावस्थेत असूनही घरात असलेल्या बाळाची आणि त्याच्या आईची काळजी, असे दुहेरी पातळीवरील वर्णन आहे. मद्य सेवन करणारा "मी" धुंद होत असताना सुद्धा शुद्धीवर आहे. एकाच वेळी मद्याचा आस्वाद चालू आहे पण त्याचबरोबर कुटुंबाची काळजी आहे. मद्याच्या नशेत एका मद्यप्याने केलेले हे प्रकट चिंतन आहे. ही क्षणिक उपरती आहे की त्याला झालेला साक्षात्कार, कोण जाणे! पण दारू चढली की निदान तेवढा वेळ तरी माणसे बहुधा खोटे बोलत नाहीत, असे पाहण्यात आले आहे. म्हणूनच ‘In vino veritas’ (in wine, there is truth) असे प्लिनी द एल्डर याने इसवी सन 77 मध्येच लिहून ठेवले होते. दारूच्या नशेत लोक काय वाटेल ते बरळतात, रडतात, पश्चात्ताप व्यक्त करतात, भांडतात, हसतात, आणि मनात दडलेली गुपिते बाहेर काढतात.

 

सुधीर फडके यांचा हा तळीराम या अशा मद्यजन्य पश्चात्तापाच्या मूडमध्ये असताना हे हृदयस्पर्शी शब्द उद्गारतो. ते ऐकून दारूबंदीचे कट्टर पुरस्कर्ते किंवा अन्य कर्मठ गांधीवादीसुद्धा खरं म्हणजे हेलावून जायला हवे होते, पण आपल्या देशात तसे होत नाही. तत्कालीन सनदी अधिकाऱ्यांच्या नोकरशाहीने ‘धुंद येथ मी, स्वैर झोकितो’ या गाण्याला आकाशवाणीवर वाजविण्यास बंदी घातली.  

 

आजची काय परिस्थिती आहे, हे मला माहीत नाही, पण एके काळी हे गाणे कोणत्याही आकाशवाणी केंद्रावरून वाजवले जाऊ नये, असा हुकूम जारी झाला होता. ज्या ग्रामोफोन तबकडीवर एका बाजूला हे गाणे होते, तिच्या विरुद्ध बाजूला असलेले गाणे (बहुतेक ‘तोच चंद्रमा नभात’ होते, नक्की आठवत नाही!) हमखास वाजायचे, पण हे गाणे असलेल्या तबकडीच्या बाजूला मोठ्ठ्या लाल अक्षरात ‘NOT TO BE BROADCAST’ असे लिहिले असलेली चिठ्ठी चिकटवलेली असायची. सरकारी नोकरांच्या अरसिकतेचे याहून चांगले उदाहरण शोधून सापडणार नाही. 
 
 
हे गाणे ऐकून बघा कुठे आक्षेपार्ह शब्द वाटतात का? अशक्य आहे. 

https://youtu.be/RhTTf06NV2U
 
 
पण आम्ही असेच राहणार. हम नही सुधरेंगे! 
 
 
@ यशवंत मराठे 
yeshwant.marathe@gmail.com

Leave a comment



दीपक वैद्य

3 years ago

खरे आहे. साधारण भारतीय माणुस मद्याचा आस्वाद घेत नाही तर धुंद होण्यासाठी पीतो. परंतु मध्यम वर्गिय माणुस हा मद्याचा आनंद घ्यायला शिकलेला आहे. २ पेग नंतर तो मना करतो तेवढी इच्छाशक्ति जागृत असते. मी एकदाच प्यालो पण हे आपल्याला सांभाळता येणारे खटलं नाही हे एका क्षणात शिकलो. नंतर आज ३५ वर्षं झाली कधीही घेतली नाही. परदेशातही.नाही.

Bhagyashree C. PAWAR

3 years ago

यशवंत, तू अगदी मोजक्याच शब्दात तुझे मत व्यक्त करतोस. अनेक शुभेच्छा.🙏👌👍

Rajan Hate

3 years ago

ह्या गाण्यातील एकापाठोपाठ च्या ओळीतील विरोधाभास म्हणजे दोन विरुद्ध गीते लिहून ती ओळीआड जोडण्याचे महाकठीण काम आहे. असंवेदनशील सरकारी नोकरांना ह्यातील सृजनता काय कळणार? आरक्षण, पे कमिशन, GR, सर्कुलर, नोटिफिकेशन असे ठराविकच शब्द त्यांना समजतात.

Vidya apte

3 years ago

How true

nitin nadkarni

3 years ago

Absolutely agree. It is a really great song. Apparently there was a stupid Broadcasting Minister called KeskR who made such idiotic rules. For e.g. not to play any song which had harmonium music ! No Hindi film music! This allowed Radio Ceylon to flourish and cost the IIndian exchequer lakhs of rupees!
Nitin

संजय सोमण

3 years ago

विरोधाभास कवितेत असावा पण त्याची मर्यादा फक्त भावपूर्ण योग्य आशयपुर्ती साठीच असावी. ह्या भावगीता बद्दल लिहील्यानंतर हे महान गीतकार, गायक, संगीतकार ह्या सारख्यांच्या कल्ला महिफली कश्या जमायच्या हे सर्वश्रूत आहेच. आणि मनाचा स्वैर (कि स्वैर भैर?) अविष्कार बंदिस्त कौटूंबिक वातावर्णात अनुभवता येत नाही , हे सत्य आपणही जाणतोच् की! परंतु हा ‘मत्तपणा ‘ ह्या भावगीतात गरजेपेक्षा जरा ज्यादा झाला आहे , ते शब्द कोरडे वास्तव दाखवतात भार्याप्रेम वैगरे नाही! पण हे सर्व दिग्गज, त्यात कहर म्हणजे ..आपला मराठी बाणा !
यशवंत ..अचूक भेद!!

Subscribe

Thank you for subscribing.

Something went wrong.

Contact Form

subscribe

Thank you for subscribing.

Something went wrong.

Contact Info

  • yeshwant.marathe@gmail.com

Follow Me

My Other Blogs: historycafe.in

Copyright © 2020 Sarmisal.

Made with ♡ by iTGS