अजरामर विराणी 

 
कुठल्याही मोठ्या व्यक्तीच्या अथवा कलाकाराच्या जीवनावर सिनेमा बघायचे म्हणजे मला टेन्शनच येते. महेश मांजरेकर यांनी ज्या प्रकारे पुल देशपांडे यांच्यावरील भाई या सिनेमाची विल्हेवाट लावली त्यामुळे तर नकोच वाटते. त्यामुळे मित्रांच्या आग्रहामुळे ‘मी वसंतराव‘ सिनेमा बघण्याचा योग आला त्यावेळी साशंकच होतो. त्यात परत सिनेमाची लांबी पूर्ण तीन तास हे बघून तर थरकापच उडाला. म्हटलं बापरे, कसे होणार आपले? 
 
परंतु जसजसा सिनेमा पुढे सरकत होता तसतसा आश्चर्याचा धक्का बसत होता. सिनेमाची लांबी तीन तासाची असली आणि त्यात तीन वेगवेगळे काळ दाखवले असले तरी चित्रपट कुठेही कंटाळवाणा होणार नाही याची जबाबदारी लीलया पेललेली आहे. अतिशय गुंतागुंत न ठेवता साधी सरळ गोष्ट पण त्यावर “क्या बात है!” अशी दाद सहजगत्या तोंडून निसटेल असे संवाद. ही कलाकृती म्हणजे श्रद्धा आहे. एका साधकाची खडतर तपश्चर्या आहे. एका गंधर्वाची विराणी आहे
 
मला सर्वात भावलेली गोष्ट म्हणजे, हा चित्रपट पाहताना आपल्या आजूबाजूला किंवा आपल्या घरात राहणाऱ्या माणसाची कथा पाहतोय असा प्रत्यय येत होता. आणि मला खात्री आहे की असा अनुभव चित्रपट पाहिलेल्या प्रत्येकाला आल्याशिवाय राहणार नाही. 
 
वसंतराव म्हणजे ‘बगळ्यांची माळ फुले’, ‘दाटून कंठ येतो’, ‘घेई छंद मकरंद’ किंवा ‘तेजोनिधी लोहगोल’ एवढेच बऱ्याच जणांना माहीती असेल पण त्यामागची त्यांची खडतर वाटचाल मात्र कधी कोणालाच माहित नसेल. परंतु सिनेमाचा जास्त भाग हा त्यांच्या संघर्षाबद्दल, अपयशांबद्दल आहे असं वाटतं आणि त्याच्या प्रमाणात त्यांनी बघितलेलं यश, भले ते उशिरा का असेना, आणि त्यांना मिळालेली प्रसिद्धी, वैभव कमी प्रमाणात दाखवलं गेलंय असं वाटलं. कितीही अपयश आलं तरी प्रयत्न आणि तत्व सोडायची नाहीत हे साधं वाटणारं जीवनाचं तत्वज्ञान वसंतरावांनी अगदी हलाखीची परिस्थिती आली तरी सोडलं नाही, हेही शिकण्यासारखं आहे.
 
वरवर पाहता ‘मी वसंतराव’ ही आयुष्यात उशीरा यश मिळालेल्या एका कलावंताची गोष्ट आहे. पण पैसा, अनिश्चितता, वाट रोखणारे शत्रू, कलेवरची निष्ठा आणि अशा अनेक बाबी आहेत ज्या आपन सर्वच जण जगात असतो आणि आहोत. त्यामुळे असे कायम वाटत राहते की हे तर आपल्याच सारखे होते. धडपड करणारे… उशीरा संधी मिळालेले… उशीरा फुललेले… तसंच वसंतरावांची आई त्यांना “मला एक कबुली द्यायचीय. तुझ्यावर मी सतत कुटुंबाचा विचार करायचे संस्कार केले. पण आता तुझ्या गाण्यावर अन्याय होऊ देऊ नकोस.” “आता चाळिशी ओलांडलीस, आता मीच सांगते म्हणून तुझ्या आवडीवर अर्थात् गायनावर लक्ष केंद्रित कर” हे सांगते तो प्रसंग खरतर त्यांच्या आयुष्याचा टर्निंग पॉइंट ठरतो. आपल्यातल्या प्रत्येकाला तो एक महत्वाचा संदेश आहे.
 
थोडक्यात सांगायचं तर हा सिनेमा त्यांच्या गाण्याच्या वेडाबद्दल, मग ते एक गायक म्हणून असो किंवा एक रसिक म्हणून असो, त्यांच्या ज्ञानाबद्दल किंवा कौशल्याबद्दल आणि त्यांनी केलेल्या प्रचंड संघर्षाबद्दल आहे. जगण्याची धडपड करणाऱ्यांना हा दिशा देणारा ठरेल तर यशाच्या शिखरावर असणाऱ्यांना हा चित्रपट पाय जमिनीवर घट्ट रोवायला शिकवेल. कला क्षेत्रामध्ये मुशाफिरी करणाऱ्या प्रत्येकाला हा चित्रपट नक्कीच पाहायला हवा. 
 
ही कलाकृती निव्वळ शास्त्रीय संगीतावर प्रेम करणाऱ्यांसाठीच नव्हे तर एकूणच कला विषयावर भरभरून प्रेम करणाऱ्या रसिक वर्गासाठी आहे. भक्तीगीत, भावगीतापासून.. मारव्यापर्यंत आणि लावणीपर्यंत शब्द सुरांनी नटलेली अस्सल कलाकृती आहे… आणि या सगळ्या सोबत मनाचा कोपरा हळवा करणारं, हेलावून सोडणारं एका कलावंतांच जगणं आहे जे काही क्षणी तुमच्या डोळ्याच्या कडा ओल्या करेल पण दुसऱ्याच क्षणी त्यांच्या निर्धाराला दाद देईल…
 
ज्या ज्या गुरूंचे त्यांना मार्गदर्शन लाभले, त्या सर्वांनी हेच सांगितले की नक्कल करू नकोस, स्वतःचं असं काहीतरी निर्माण कर! आणि ते वसंतरावांनी आयुष्यभर पाळलं. संगीताला एका विशिष्ट चौकटीत न बसवता, स्वतःला आनंद आणि स्फूर्ती देणारं, त्याचबरोबर समोरच्या माणसाच्या हृदयाचा ठाव घेणारं गाणं वसंतरावांनी गायलं. त्यांना बऱ्याच प्रसंगी अपमानाला सामोरं जावं लागलं पण तरीही ते कचरले नाहीत, गात राहीले, अगदी मनोसक्त! 
 
मास्टर दीनानाथ मंगेशकर गाणं गायला मिळावं म्हणून तळमळणाऱ्या  वसंताला सांगतात की “अरे, आपल्याला गायच असणं पण कुणाला ते ऐकायचं नसणं… हे सगळ्यात मोठं दारिद्र्य आहे..” तेव्हा आजवर गायकांच्या मैफिलीतल्या फर्माईशी आठवल्या आणि वाटलं की त्यावेळी त्यांना सांगायला हवं होतं की “तुम्हाला आता या क्षणी जे स्फूरतंय, जे गावंस वाटतंय ते गा.!’ आणि हेच वसंतरावांच्याही वाटेला यावं हे फार वाईट. गाणाऱ्या गायकाला एवढीच अपेक्षा असते की श्रोते तल्लीन व्हावेत. त्यांची दाद मिळणं हे भाग्य; तीच खरी बिदागी. 
 
आपल्याला काही नाट्यपदांतून माहित असणारे मास्तर दीनानाथ मंगेशकर जणु प्रत्यक्ष भेटले. ‘गाण्यातली मस्ती वागण्यात उतरते की जात्याच वागण्यात असलेली मस्ती आपल्या गाण्यात उतरते‘ हे कठीण कोडं टाकणारे वरवर आढ्यताखोर तरी परिस्थितीला शरणागत झालेले मास्टर दीनानाथ विलक्षणच. सूर गुलाम नसतात तर ते खऱ्या गायकासाठी दैवत असतात. “पहिला शुद्ध ‘सा’ लागला की ते दैवत आपल्यासमोर उभं राहतं” अशी अदभूत शिकवण जेव्हा युवा वसंतला देणारे मास्टर दीनानाथ बघितल्यानंतर डोळ्यातून अश्रूंच्या धारा न लागणारा रसिक विरळाच. 
 
कुमुद मिश्रा यांनी चितारलेला उस्ताद असद अली खॉ साहेब विलक्षण सुंदर. तरूण वसंताला राग मारवा उलगडून सांगताहेत असा एक प्रसंग यात आहे. मला वाटलं हा चित्रपटही तेच करतो. प्रकाश आहे नि नाही अशी संध्याकाळची वेळ.. अंधारेल की दिसेल सारं असा संभ्रम.. अशावेळी व्यक्त होणारे सूर म्हणजे मारवा! हा चित्रपट मारवा गातो.. आणि आपल्याला अंतर्बाह्य उजळवून टाकतो.       
वसंतरावांचे गुरू मारवा राग गाऊन दाखवतात, त्याचा अर्थ समजावतात आणि तो गाताना समजून उमजून कसा गायचा हे सांगतात आणि तसेच अक्का लावणी गातात तेव्हा वसंतराव “एवढा चांगला कलाकार उपेक्षित असूनही त्याला त्याची खंत नाही, तर आपण कोण?” असे भाव व्यक्त करतात, हे दोन्ही प्रसंग कधीही अविस्मरणीय ठरले आहेत यात शंका नाही.
 
भक्तीगीत, शास्त्रीय संगीत, नाट्यसंगीत, गझल, लावणी अशा संगीताच्या विविध पैलूंचे गुणदर्शन घडवणारी ही शब्दसुरांची गाथा रसिकांना पूर्णवेळ खिळवून ठेवते. तब्बल २२ गाणी. पण जराही नजर न हलवता, वारंवार डोळे पाणावत पाहीलेला अतिशय सुंदर सिनेमा.
 
सिनेमामध्ये मास्टर दिनानाथ मंगेशकर ह्याच्या तोंडी एक संवाद आहे – वसंता, गाणे संपल्यावर प्रेक्षागृहामध्ये निःशब्ध शांतता पसरायला हवी, लोक आपले शब्द विसरायला हवेत, आपले भान विसरायला हवेत, हीच एका कलाकाराला मिळालेली खरी दाद आहे. आयुष्यात अशी दाद एकदा तरी मिळवता यायला हवी. माझ्या आठवणींमध्ये सिनेमा संपल्यावर म्हणजे अगदी क्रेडिट्स होऊन गेल्यावर सुद्धा प्रेक्षकांना सीट वरून उठायचे भान राहिले नाही असे पहिल्यांदाच पाहत होतो, प्रत्यक्ष अनुभवत होतो… आणि हीच खरी ह्या कलाकृतीला प्रेक्षकांनी दिलेली दाद आहे. 
 
आणि आपल्याला शेवटच्या क्षणापर्यंत खुर्चीत खिळवून ठेवणारे आणि शेवटी निःशब्द करणारे कैवल्यगान..
 
कंठात आर्त ओळी डोळ्यांत प्राण आले
आता समेवरी हे, कैवल्यगान आले… 
 
कैवल्यगान ऐकताना हुंदका आवरतच नाही. कधी त्या सूरानी कंठ दाटून येतो तर कधी आपण त्या स्वर्गीय सूरांवर स्वार होऊन देहभान विसरतो. शेवटी उरते नीरव शांतता त्या सांगीतिक मैफिलीने निःशब्द झालेल्या रसिक प्रेक्षकांची… ही भैरवी (निर्गुणी भजन) संपेपर्यंत प्रेक्षक चित्रपटगृह काय खुर्चीपण सोडत नाहीत. ही ‘मी वसंतराव’ या अप्रतिम कलाकृतीला रसिक प्रेक्षकांनी मनापासून दिलेली दाद आणि स्व. वसंत‌राव देशपांडे यांच्या स्वर्गीय सुरांना वाहिलेली आदरांजली आहे असं मला वाटतं. श्वास कोंडतो… दाद द्यायला ना टाळ्यांसाठी हात जोडले जातात ना शब्द सुचतात. 
 
वसंतरावांचा हा जीवनपट उलगडत पाहताना त्याची प्रत्येक फ्रेम खिळवून ठेवते. दिग्दर्शन, अभिनय, संवाद इतर तांत्रिक बाजू सगळं काही इतकं उत्तम की तुम्हाला स्थळ-काळाचा विसर पडतो. प्रत्येक कलाकार मग भूमिकेची लांबी – रुंदी काहीही असो ती भूमिका अक्षरशः जगाला आहे. राहुल देशपांडे तर आजोबांना आदरांजली वाहत नाहीत ते अक्षरशः आजोबांचे जीवन जगले आहेत. राहुलचा लावणी नजाकती सादर करतानाचा अभिनय तर कमाल आहे. ह्याचे सर्व श्रेय निपुण धर्माधिकारी या अवलियाला तर जातेच पण त्याच बरोबर या सिनेमातील प्रत्येक कलाकारालाही जाते. 
 
काही समीक्षक काही चुका काढतीलही. अहो, पण डाग कोणात नाहीत? अगदी चंद्रावर सुद्धा डाग आहेतच की… 
 
सिनेमात एक वाक्य आहे, “एवढं सगळं मनापासनं जीव ओतून करतो मी, पण बघायला कुणीच का येत नाही.” मराठी प्रेक्षकांना नम्र विनंती हा कलाविष्कार बघायला सिनेमागृहात मोठ्या संख्येने जा. हा कलेचा इतिहास सर्वांना कळू देत… हे अदभूत रसायन म्हणा अथवा चित्रकृती म्हणा, ती अनुभवण्याची गोष्ट आहे. 
 
 
Mee Vasantrao
 
तेव्हा हा सिनेमा जरूर बघा. 
 
@ यशवंत मराठे 
yeshwant.marathe@gmail.com
 

Leave a commentHemant Marathe

6 months ago

👌👍फार छान परिक्षण.

Rajendra Phadke

6 months ago

व्वा – तू दिलेली ‘दाद’ही लाजवाब !

Janhavi Bhagwat

6 months ago

अप्रतिम .. वंसतराव म्हणजे मारवा आणि मारवा म्हणजे वंसतराव..

पुष्कराज चव्हाण

6 months ago

यशवंता तुला खरंच नमस्कार करतो रे मी. काय सुंदर लिहिलंयस? खूप छान. अगदी मनाला भावलं.

Dilip Sule

6 months ago

वा, क्याबाय है , एखाद्या समीक्षकांपेक्षा पण फार सूंदर लिहिलंय, अगदी चित्रपट डोळ्यासमोर उभा राहतो, अजून सिनेमा बघितला नाही पण साधारण कल्पना येते, असच लिहीत रहा

Ajit S. Gokhale

6 months ago

एवढं छान लिहिलंय की या आठवड्यातच हा सिनेमा निश्र्चित पहायचा हे ठरवून टाकलं …

गिरीश सुळे

6 months ago

अतीशय सुंदर शब्दात परीक्षण लिहीलय. आता असं झालय की केव्हां एकदा हा कलाविष्कार बघतोय..

Suresh G. Vaidya

6 months ago

रसिकतेने लिहिलेले उत्तम परीक्षण! धन्यवाद व शुभेच्छा!

Contact Form

subscribe

Thank you for subscribing.

Something went wrong.

Contact Info

  • yeshwant.marathe@gmail.com

Follow Me

My Other Blogs: historycafe.in

Copyright © 2020 Sarmisal.

Made with ♡ by iTGS