चंद्रमोहन जैन या सर्वसाधारण भासणाऱ्या नावावरून काही अंदाज येत नाही. पण आचार्य रजनीश उर्फ ओशो असं म्हटलं की, वाचणारा-ऐकणारा सावध होतो. भेदक डोळे, चेहऱ्यावर प्रसन्न भाव, साधुपुरुषासारखी घोळदार दाढी, आवाजात कमालीचे मार्दव आणि ऐहिक जगण्यातून शांतीचा मार्ग सांगणारे सरळसोपे तत्त्वज्ञान ही ओळख असलेल्या ओशोंचेच हे मूळ नाव.
आजच्या पिढीला आचार्य रजनीश किंवा ओशो यांच्याबद्दल फारशी माहिती नाही पण पन्नाशीच्या पुढच्या पिढीसाठी ओशो रजनीश हे विचार आणि भावना व्यापून असलेलं निरंतर गूढ आहे. भारतात आजवर जितके अाध्यात्मिक गुरू वा तत्त्वचिंतक होऊन गेले, त्यात ओशोंभोवती असलेले वलय इतरांच्या तुलनेत काकणभर अधिकच उजळ आहे. त्यांचे प्रभावी व्यक्तिमत्त्व, धाडसी विचार, त्यांची अचंबित करणारी जीवनशैली, अलौकिकत्वाचा स्पर्श असलेली त्यांची कथनशैली ह्या साऱ्या गोष्टी मन:शांतीच्या शोधात असलेल्यांवर मोहिनी घालणारे होते.
स्वातंत्र्य, मुक्ती हे ओशोंच्या चिंतनाचे आणि भाषणाचे कायमच विषय होते. समाजवादी विचारसरणी, महात्मा गांधींच्या विचारांच्या आणि तसेच धर्माच्या नावावर कठोर बंधनं लादणाऱ्या प्रतिगामी समाजाच्या विरोधात त्यांनी कायमच विरोधी भूमिका घेतली.
ओशो त्यांच्या संदर्भात तीन प्रकारचे संबंध असू शकतात - एक तर त्यांना मानणारे; त्यांचे भक्त किंवा शिष्य आणि दुसरे ते खोटे आहेत; ते कसे चुकीचे होते हे सांगणारे त्यांचे विरोधक. तिसरा वर्ग म्हणजे माझ्यासारखे की ज्यांना त्यांचे क्रांतिकारी विचार पटतात पण त्यांच्या वैयक्तिक जीवनाशी समरस नाही होता येत.
ओशोंना काय म्हणून संबोधता येईल? धर्मगुरु, संत, आचार्य, अवतारी, भगवान, मसीहा, प्रवचनकार, धर्म विरोधी की मग सेक्स गुरु? ज्यांना ओशो माहित नाहीत किंवा ज्यांना ते थोडेफार ऐकून माहित आहेत त्यांच्या दृष्टीने ओशो वरील पैकी काहीही असू शकतात.
आपल्या प्रखर क्रांतीकारक विचारांनी संपूर्ण जगातील तमाम ढुढ्ढाचार्यांना ओशोंनी हादरवून टाकले. जेव्हा एखादी व्यक्ती ओशोंची पुस्तके वाचायचे ठरवते तेव्हा त्याला बरेच जण सांगणारे भेटतात की जरूर वाच पण त्यांच्या उपदेशाचे पालन करू नको. ही म्हणजे गमंत आहे. दुसरे काही जण भेटतात आणि सांगतात की ओशो म्हणजे तुम्ही आजपर्यंत मान्य केलेल्या अध्यात्मिक आणि सामाजिक बाबींच्या पार चिंधड्या करतात. He is like a short circuit.
असं वाटतं की कदाचित अजून सुद्धा राज्यकर्ते त्यांच्या विचारांना घाबरतात. हे असे विचार कोणते याचा एक अभ्यासपूर्ण प्रयत्न.
१. गांधी विरोध : ओशोंनी आपल्या बहुतेक प्रवचनांमधून गांधींच्या विचारसरणीचा कडाडून विरोध केला आहे. त्यांचे असे म्हणणे होते की विचारसरणी मनुष्याची पीछेहाट करेल कारण ती आत्मघाती आहे. त्यांचे म्हणणे होते की गांधी गीतेला मातेसमान मानतात पण तिला अंगिकारू शकत नाहीत कारण त्यांच्या अहिंसेच्या कोशात युद्धाच्या शक्यतेचा विचार पण होऊ शकत नाही म्हणून मग गांधींनी मार्ग काय काढला की त्यांनी असे मत मांडले की जे महाभारतातील युद्ध आहे ते रूपकात्मक आहे, आणि जे कधी घडलेच नाही.
२. नव संन्यास : ओशोंनी एका अभिनव संन्यासाची व्याख्या केली की ज्यात संसारात राहून हसत खेळत संन्यास घेता येऊ शकतो. अशा संन्यस्त अवस्थेत कुठलाही त्याग अथवा पलायन नाही. परंतु ध्यानाद्वारे स्व परिवर्तन करून आयुष्य सुंदर आणि सृजनात्मक बनविणे म्हणजे हा नव संन्यास. तसेच संसारात राहून अलिप्त राहणे, कमळाप्रती जगणे, भूतकाळातील आठवणी आणि भविष्यातील कल्पनांपासून निर्भय होऊन प्रत्येक क्षण जागृतावस्थेत जगणे याला ओशो संन्यास म्हणतात. या संन्यासात कुठलीही भगवी वस्त्रे परिधान करायची गरज नाही, कुठलेही बंधनकारक नियम नाहीत, जपजाप्य नाही, पूजा नाही की प्रार्थना नाही. फक्त दररोज ध्यान करणे अपेक्षित आहे. ओशोंच्या नजरेतून जो आपल्या कुटुंबाबरोबर राहून पारंपरिक आणि सामाजिक जबाबदाऱ्या पार पडताना ध्यान व सत्संगाचे जीवन जगतो तोच खरा संन्यासी. त्यांच्या दृष्टीने आपल्या देशात हा असाच संन्यास हजारो वर्षे प्रचलित होता. घरदार सोडणे, भगवी वस्त्रे घालून सर्वसंगपरित्याग करणे हा पलायनवाद आहे, पळपुटेपणा आहे.
३. झोरबा ते बुद्ध : ओशो म्हणतात की 'झोरबा' म्हणजे भोग विलासात पूर्णपणे बुडालेली व्यक्ती आणि 'बुद्ध' म्हणजे मोक्ष प्राप्त साक्षात्कारी. परंतु त्यांचे म्हणणे की झोरबा ही केवळ सुरुवात आहे आणि जोपर्यंत तुम्ही तुमच्यातील झोरबाला पूर्णपणे अभिव्यक्त होऊ द्याल तेव्हाच काहीतरी महान किंवा उच्च विचारांची सुरुवात होईल. नुसते वैचारिक मंथन आणि चिंतन करून काही होणार नाही. त्यांच्या दृष्टीने गौतम सिद्धार्थ स्वतः बुद्ध का होऊ शकले तर ते आपल्या वयाची पहिली २९ वर्षे झोरबाचे आयुष्य पुरेपूर जगले होते.
४. कुटुंबसंस्थेची गरज नाही : ओशोंचा सगळ्यात वादग्रस्त विचार म्हणजे कुटुंबसंस्थेला रद्दबादल करून समुदाय संकल्पनेची विचारधारा मांडणे. ओशोंच्या मते कुटुंबसंस्थाच नसेल तर विवाहालाच दुय्यम स्थान प्राप्त होईल. आज आपल्या संपूर्ण सामाजिक संस्थेचे केंद्रस्थान विवाहाला देण्यात आले आहे जे खरे म्हणजे प्रेमाला द्यायला हवे. पण आपण असे गृहीत धरले आहे विवाह झाल्यावर दोन भिन्न व्यक्ती प्रेमाच्या बंधनात अडकतील. त्यांच्या मते हे साफ झूठ आहे परंतु गेली काही हजार वर्षे ते आपल्याला कळलेलंच नाही. आपण किती आंधळे आहोत! त्यांच्या मते बंधनात अडकून प्रेम कधीच जन्म घेणार नाही कारण त्याचा जन्म फक्त स्वतंत्रेतच होऊ शकतो.
५. धर्माची गरज नाही : ओशो म्हणतात 'शतकानुशतके मानवाला पूर्णपणे चूक आणि धादांत खोटे असे सिद्धांत, मते, विश्वास गळी उतरवण्यात आले आहेत. आपण करतो काहीतरी एक आणि आकांक्षा मात्र स्वर्गगमनाची. कुठल्याही धर्माला अथवा धर्मगुरूंना तुम्हाला तुमच्या स्व ची ओळख व्हावी असे कधीच वाटत नसते कारण जेव्हा तुम्ही त्या शोधाच्या मार्गी लागता तेव्हा सर्व तथाकथित धर्मांच्या बंधनातून मुक्त होता.'
६. समाजवादापासून सावधान : ओशो म्हणतात की समाजवाद ही जीवन-विरोधी विचारधारणा आहे. समाजवाद आणि साम्यवाद (communism) या दोन्ही मध्ये जीवनाची व्यवस्था राज्याच्या हाती देण्यासारखे आहे. ज्याला आपण आज भांडवलशाही म्हणतो ती लोकांची भांडवलशाही आहे परंतु ज्याला समाजवाद आणि साम्यवाद म्हणतो ती म्हणजे राजकीय भांडवलशाही आहे; दुसरं काही नाही. आणि ही राजकीय भांडवलशाही जास्ती धोकादायक आहे.
७. विश्वास नको, शंका करा : ओशो म्हणतात की धर्म किंवा विज्ञान यांच्या आयत्या सत्यांनी आता काम चालणार नाही. ते संशयाबद्दल न बोलता संदेहाबद्दल (शंका) बोलतात. त्यांचे म्हणणे शंकेची कास धरूनच तुम्ही सत्यापर्यंत पोहोचू शकाल. श्रद्धा आणि विश्वास तुम्हाला जखडून टाकतात तर शंका तुम्हाला मुक्त करते.
८. संभोगातून समाधीकडे : ओशो जनसामान्यांना ज्ञात झाले किंवा जनसामान्यांमध्ये बदनाम झाले, ते संभोगाविषयीच्या तात्त्विक-आध्यात्मिक मांडणीमुळे. ओशोंनी १९६८ मध्ये 'संभोगातून समाधीकडे' ह्या प्रवचन मालेद्वारे पूर्ण देशामध्ये एकच खळबळ उडवून दिली! ज्या काळी चित्रपट सृष्टीमध्ये चुंबनाचं दृश्य जवळजवळ नसायचं, त्या काळात ह्या अवलियाने लैंगिकतेवर अतिशय क्रांतिकारी आणि मौलिक मांडणी केली.
“Sex” या प्रकाराचे प्रचंड विकृत आकर्षण व त्यातुन घडणारे गुन्हे आणि तितकाच जोरकसपणे “Sexuality”ला होणारा विरोध अशा दोन परस्परविरुध्द मनोधारणा एकाच समाजात असणारा देश म्हणजे आपला भारत. याचं मुख्य कारण म्हणजे भावनांच्या नियोजनाचा व नियमनाचा अभाव हे आहे. संतमहात्म्यांनी कायम आपल्या शिकवणूकीतुन असं वागु नका, तसं वागु नका हे सांगितलं पण तो भावनांना विरोध झाला, नियमन कसं करावं हे कोणीच सांगितलं नाही.
संभोग ही केवळ शारीरिक क्रिया नसून ध्यानधारणेचा तो एक मार्ग आहे, अशी मांडणी त्यांनी केली. ध्यानधारणा कशाला म्हणायचे? ज्या अवस्थेत आपला मेंदू आणि मन शून्यावस्थेत जाते, त्यावर विकार-विचारांचा प्रभाव उरत नाही, फक्त वर्तमानातला तेवढा एक क्षण आपण जगतो, त्या अवस्थेला ओशोंनी ध्यानधारणेची अवस्था मानले. संभोगाच्या सर्वोच्च क्षणी मनुष्य त्या अवस्थेला पोहोचलेला असतो. त्या अवस्थेचं वर्णन ओशो ‘डिव्हाइन एनर्जी’ म्हणजे अलौकिक शक्ती असंही करतात. या शून्य क्षणाची ज्या माणसाला सर्वार्थाने जाणीव होते, तो समाधीवस्था प्राप्त होऊ शकते.
ओशोंच्या मते सेक्स हे न टाळता येणारे नैसर्गिक कृत्य आहे आणि म्हणूनच ते त्याचे समर्थन करतात. सर्वसाधारणपणे जगातील सर्व धर्मात सेक्सला कडाडून विरोध असतो. कुठल्या संप्रदायाचे संत व्हायचे असेल किंवा संन्यास घ्यायचा असेल तर ब्रह्मचर्य पालन ही पहिली महत्वाची अट असते. परंतु ओशोंच्या संन्यासाची सुरुवात भोग तृप्त होऊन मुक्त झाल्यावरच होते. ओशोंच्या म्हणण्याप्रमाणे सेक्स ही शिडीची पहिली पायरी आहे तर समाधी ही शेवटची पायरी आहे. ते म्हणतात जर लग्न करायचे असेल तर कायदेशीर अडचणी आणा आणि घटस्फोटाचा कायदा एकदम सोप्पा करून टाका. पण आपल्याकडे बरोब्बर उलटी स्थिती आहे. लग्न करणे अति सोपे आणि घटस्फोट मिळणे महा कर्मकठीण.
सेक्स संबंधी ओशोंचे काही विचार :
* ब्रह्मचर्य हे सेक्सचे विरुद्धार्थी रूप नाही. परंतु ते सेक्सचे ट्रांसफॉर्मेशन आहे. जो सेक्स विरोधी आहे त्याला कधीही ब्रह्मचर्य प्राप्त होऊ शकत नाही.
* ज्या ज्या देशात सेक्सचा सहज स्वीकार होईल, त्या त्या देशात ऊर्जेचा खूप मोठा स्रोत मोकळा होईल ज्यायोगे त्या देशाची प्रगती होईल.
* एखाद्या मंदिरात जावे त्याप्रमाणे नवरा बायकोने एकमेकांकडे जावे कारण जेव्हा ते संभोग करतात तेव्हा ते त्या परमात्म्याच्या देवळातूनच जातात.
* संभोगाचे जे आपल्याला अभूतपूर्व आकर्षण आहे ते त्या क्षणिक समाधीसाठी आहे. ज्या दिवशी तुमची संभोगातून मुक्तता होईल, तेव्हापासून तुम्हाला संभोगाशिवाय समाधीचा अनुभव यायला सुरुवात होईल.
प्रसिद्ध विचारवंत शिवाजीराव भोसले ह्यांनी म्हटलं होतं की, केवळ 'संभोगातून समाधीकडे' ह्या प्रवचनांसाठी ओशो नोबेल पारितोषिक मिळवण्यास पात्र आहेत.
राज्यकर्त्यांना हे क्रांतिकारी विचार कसे मान्य होणार? कारण असे विचार अंमलात आणायचे म्हणजे सद्य धर्मसंस्था, समाजसंस्था पार ढवळून निघतील. आणि त्यामुळे ते करायची कोणाचीही हिंमत नाही.
ओशोंना आपल्या जीवनकाळात अनेक वादळांना तोंड द्यावे लागले. खरं तर काळाच्या पुढचे क्रांतीकारक विचार मांडल्याचा तो परिणाम असावा. आता एकविसाव्या शतकातील मानवापाशी सर्व प्रकारची भौतिक सुखे असतांनाही अंतरीचे रितेपण आणि मनो-तणावाच्या वेदना त्याला छळत आहे. यावर मात करून चैतन्यमय जीवन जगण्यासाठी ओशोंचे विचार आणि ध्यानविधी हा एक खूप सहज पर्याय असल्याचे जगाच्या जेवढे लवकर लक्षात येईल तेवढे चांगले.
ओशोंनी हजारो प्रवचने दिली आणि त्यातून शेकडो पुस्तके निर्माण झाली. मोहम्मद, कृष्ण, जीसस, नानक, भगवान बुद्ध, कबीर, महावीर, लाओ त्सू, मीराबाई, सहजो अशा असंख्य ज्ञानी पुरुषांविषयी व स्त्रियांविषयी ओशोंनी अतिशय सुंदर भाषेमध्ये निरूपण केलेलं आहे. तसेच गीता, झेन, ताओ, सुफ़ीसम, उपनिषदे, योग या तत्वज्ञानांवर देखील त्यांची असंख्य पुस्तके तयार झाली. त्यामुळे ही सगळी पुस्तके वाचणे शक्यच नाही. परंतु जी काही थोडीफार वाचली त्याने आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच पार बदलून गेला. मला जर कोणी विचारले की ओशोंची सगळ्यात मोठी शिकवण काय तर माझे उत्तर असेल -
To be here and now is to be authentic. No past, no future - this moment, all. This moment the whole eternity. Every moment we die, and every moment we are born. We have to live this moment as totally as possible so that if the next moment never comes, there is no complaint. Life is uncertain so live this moment, and live it totally.
@ यशवंत मराठे
yeshwant.marathe@gmail.com