चित्रपट सृष्टी; झगमगती चंदेरी दुनिया !! पण याच रुपेरी जगाच्या गर्भात किती गडद आणि काळाकुट्ट अंधार आहे याचा आपण कधी विचार करतो का?
दर वर्षी हजारो तरुण / तरुणी आपले नशीब आजमावायला या अजब दुनियेची सफर करतात. पण कधी विचार केलाय की यातले किती जण यशस्वी होतात? आपण नीट माहिती काढली तर आश्चर्याचा एक प्रचंड धक्का बसतो की गेल्या ५०-६० वर्षात ज्यांनी खूप यश बघितले असे हिरो आणि हिरॉईन मिळून शंभर सुद्धा होत नाहीत; आणि ज्यांना सुपरस्टार म्हणता येईल असे दोन्ही मिळून फक्त तीसच्या आसपास. अविश्वसनीय असलं तरी खरं आहे. याचाच अर्थ अपयशी ठरलेली अक्षरशः लाखो जण असतील.
आजचा विषय या अशा पूर्णपणे अयशस्वी लोकांबाबत नाही पण जे काही जण यशस्वी होऊन नावारूपाला आले परंतु कालांतराने ज्यांची वाताहात झाली अशांच्या आठवणीला उजाळा देणे हा आहे.
१. चंद्र मोहन - १९३० आणि १९४० या दशकातील एक सुपरस्टार. मोगले आझम या चित्रपटात मुख्य भूमिका मिळाली होती आणि दहा रिळे पूर्ण पण झाली होती. परंतु जुगार आणि दारूच्या व्यसनांनी पार वाट लावली आणि कदान्न अवस्थेत वयाच्या ४४ व्या वर्षी मृत्यू.
२. रुबी मायर्स (सुलोचना) - तिच्या काळातील सर्वाधिक पैसे कमावणारी अभिनेत्री. तिला स्टुडियो कडून मिळणारा पगार हा त्यावेळच्या मुंबईच्या गव्हर्नरपेक्षा जास्त होता. १९७३ साली दादासाहेब फाळके पुरस्कार पण मिळाला. कमावलेल्या पैशांचे नीट नियोजन न केल्यामुळे अत्यंत दरिद्री अवस्थेत झालेला मृत्यू जो एक दोन दिवसांनंतर कळला.
३. नलिनी जयवंत - एक सुप्रसिद्ध आणि यशस्वी अभिनेत्री परंतु अत्यंत एकाकी अवस्थेत मृत्यू झाला आणि तो देखील ३-४ दिवसांनंतर कळला. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे तिच्या पार्थिवावर कोणी हक्क सांगितला हे देखील नीट माहित नाही. तिच्या कुटुंबाने शेवटची काही वर्षे तिच्याशी असलेले सगळे संबंध तोडून टाकले होते.
४. कुक्कू - एक प्रसिद्ध नर्तकी. त्या काळी एका नाचासाठी ती सहा हजार रुपये घेत असे. तिच्याकडे त्या वेळी ३ गाड्या होत्या आणि त्यातील एक फक्त कुत्र्याला फिरवायला होती. मृत्यूसमयी संपूर्ण कंगाल अवस्था. कर्करोग होऊन ५२ व्या वर्षी मृत्यू. शेवटी वेदनाशामक गोळ्या घेण्याएवढे सुद्धा पैसे नव्हते.
५. भगवान दादा - अत्यंत यशस्वी निर्माते आणि नट. त्या काळात जुहू मध्ये २५ बेडरूमचे घर होते आणि ७ गाड्यांचा ताफा होता. पण दैवगती आणि उधळमाधळ यांनी पार पेकाटून टाकले. चाळीत एका खोलीत जायची वेळ आली आणि अक्षरशः विपन्नावस्थेत अखेर झाली.
६. मीना कुमारी - एक सुपरस्टार पण वैवाहिक आयुष्यातील अडचणींमुळे दारूचे व्यसन जडले. शेवटी हॉस्पिटलचे बिल भरायला पैसे नाहीत अशी परिस्थिती. दुःखद एकाकी मृत्यू.
७. परवीन बाबी - ग्लॅमर क्वीन; हिंदी चित्रपट सृष्टीच्या लैंगिकतेची परिभाषाच बदलून टाकली. Time मासिकाच्या १९७६ मधील कव्हर गर्ल. कालांतराने स्क्रिझोफ्रेनिया आजाराची शिकार होऊन एकाकी मृत्यू.
८. भारत भूषण - एक ठोकळेबाज अभिनेता. सुरुवातीच्या काळात दैवाची प्रचंड साथ त्यामुळे सर्व यशस्वी अभिनेत्रींबरोबर काम केले. उत्तमोत्तम गाणी पडद्यावर गायली. पण दैवाचे फासे फिरले आणि कालांतराने उधळ्या स्वभावामुळे स्टुडियोचा वॉचमन म्हणून काम करायची वेळ आली. शेवट एका भाड्याच्या खोलीत मृत्यू.
९. विम्मी - हमराज सिनेमामुळे प्रचंड गाजली. पण वैवाहिक जीवनातील ताणतणाव आणि पुढे घटस्फोट यामुळे दारूचे व्यसन आणि पुढे अत्यंत हलाखीची परिस्थिती. वयाच्या तिशीत मृत्यू; शेवटचे काही दिवस नानावटी हॉस्पिटलच्या जनरल वॉर्डमध्ये काढले. मृत्यूनंतर तिचे पार्थिव दहनासाठी फेरीवाल्यांच्या ठेल्यावरून नेण्याची वेळ आली.
१०. राज किरण - एक यशस्वी चरित्र अभिनेता. मानसिक आजाराने पीडित; आज म्हणे अमेरिकेत कुठेतरी आहे. कुटुंबाला देखील माहित नाही.
मला कल्पना आहे की ही सर्व प्रातिनिधिक उदाहरणे आहेत. सगळ्यांचा मागोवा घ्यायचा ठरवला तर लेख संपणारच नाही.
तसेच असे काही हिरो अथवा हिरॉईन जे एखाद्या धूमकेतू प्रमाणे या क्षितिजावर लुकलुकले पण काळाच्या ओघात फार लवकर लुप्त झाले. आणि मला नेहमी एक कुतूहल असते की या लोकांचे पुढे काय झाले? त्यांनी पैसे नीट वापरले की कंगाल झाले? आज कुठे आणि काय परिस्थितीत असतील? वानगीदाखल काही नावे आठवतात ती म्हणजे अनिल धवन, विजय अरोरा (एकेकाळी झीनत अमानने यादों की बारात सिनेमात अमिताभ ऐवजी हा चालेल म्हणून ह्याच्याबरोबर काम केले होते), महेंद्र संधू, नवीन निश्चल, प्रेम किशन, अरुण गोविल. कुमार गौरव (राजेश खन्ना नंतरचा भावी सुपरस्टार म्हणून बिरुद मिळालेला), राजीव कपूर इत्यादी. यातील काही फिल्मी कुटुंबातील असल्यामुळे त्यांचे ठीकठाक असेल पण बाकीच्यांचे काय? ह्या हिरोंप्रमाणे अशा हिरोईन्सही अनेक आहेत की ज्या आल्या, एक दोन सिनेमात चमकल्या आणि अचानक लुप्त झाल्या. काहींची लग्न झाली असतील पण आज माहिती काढायची म्हटली तर मिळत नाही. लोकं विसरून गेले.
प्रसिद्धी आणि पैसा ही मुख्य कारणे आहेत जी अनेकांना चित्रपट, टीव्ही आणि फॅशन उद्योगाच्या ग्लॅमरकडे आकर्षित करतात. तथापि, कालांतराने त्यांच्या लक्षात येतं की त्यामागे प्रचंड मेहनत, व्यस्त वेळापत्रक आणि आहाराचे पथ्य पाळावे लागते. त्यामुळे अशा महत्वाकांक्षी व्यक्ती देखील येथील वाईट जगात, जिथे प्रत्येक पायरीवर निर्दयी स्पर्धा आहे, तिथे बऱ्याच वेळा हरून सर्व गमावून बसतात.
सेलिब्रेटी स्टेटस हा एक भुलभुलैय्या असून यश तुमच्या मागे आहे, तोपर्यंत तुम्हाला मागणी असते, किंवा तुमचा स्वीकार केला जातो. एकदा का तुमच्या हातून हे यश निसटलं की तुम्हाला कुणीही विचारत नाही. आपल्याला विचारणारी माणसं एका क्षणात अदृश्य होत असतात; या गोष्टीची जाणीव ठेवणे फार कठीण असते. या व्यवसायात विशिष्ट उंची गाठण्याचा प्रयत्न अनेक जण करतात. मात्र त्या उंचीवर जागा कमी आहे याचा विचार होत नाही.
एक प्रसिद्ध म्हण आहे की ग्लॅमर इंडस्ट्रीमध्ये कोणतेही दोन व्यावसायिक मित्र होऊ शकत नाहीत. या चंदेरी दुनियेला एकाकीपणाचा शाप आहे. आणि ज्यांना ही गोष्ट हाताळता येत नाही अशा व्यक्ती आत्महत्या करण्यास प्रवृत्त होऊ शकतात. भारतात आजवर अंदाजे सोळा अभिनेत्री आणि नऊ अभिनेत्यांनी स्वत:चं आयुष्य संपवलं आहे. त्यामागची कारणं अनेकदा चित्रपट क्षेत्रातल्या अपेक्षा पूर्ण न करता येणे, प्रेमभंग किंवा नैराश्य अशी सांगितली जातात. खरं तर त्यांना या निर्णयाप्रत घेऊन जाणाऱ्या व्यवस्थेचे परीक्षण व्हायला हवे; पण ते करायला वेळ आहे कुणाकडे?
प्रत्येक माणसाला राग येतो, दु:ख होतं, असूया वाटते, भीती वाटते, आनंद होतो. त्याच्या मनात अशा विविध भावभावनांचे तरंग उमटत असतात. त्याप्रमाणे तो वर्तन करतो. बॉलिवुड असं एक जग आहे की जिथे तुमच्या सर्वच भावभावना दडपल्या जातात. इथे सतत एक असुरक्षिततेची भावना असते. यशालाच इथं किंमत असल्यानं त्यापुढे माणूस अगदीच क:पदार्थ होऊन जातो. यशाच्या शिखरावर पोहोचलेल्यांनाही मागे खेचण्यासाठी अनेक हात सरसावलेले असतात. इथं जगायचं म्हणजे तुमच्याकडे प्रचंड संयम हवा. आणि या जगात रहायचे असेल तर त्या जगाच्या नियमाप्रमाणे वर्तन करावं लागतं. त्यात अनेक संवेदनशील माणसांची ससेहोलपट होते.
यावरून असं लक्षात येतं की तिकीटबारीवर मोठं यश, कायम आकर्षक दिसणं तसंच आजकाल सोशल मीडियावरच्या काही कसोट्यांमध्ये यश मिळवण्याचं सिनेतारकांवर प्रचंड मोठं दडपण असते. दीपिका पदुकोण सारख्या अत्यंत यशस्वी अभिनेत्रीला सुद्धा अशा वातावरणात डिप्रेशन येऊ शकते हे लक्षात ठेवायला हवे. भविष्याची अनिश्चितितता, खाजगी आयुष्यातील अनेक घटना आणि त्यामुळे मनावर होणारे आघात या सगळ्यांमुळे बॉलिवुडची सुपरस्टार श्रीदेवी ही कधीच शांत किंवा संतुलित अवस्थेत नव्हती. कदाचित सतत तरुण दिसण्याच्या दबावामुळे वारंवार केलेल्या कॉस्मेटिक सर्जरी, तिच्या मृत्यूचं कारण ठरली असण्याची शक्यता असूही शकते.
परंतु एक गोष्ट नाकारता येत नाही की आज प्रत्येक व्यक्तीस प्रत्येक क्षेत्रात कुठल्या ना कुठल्या ताणतणावाचा सामना करावाच लागतो. आणि येणाऱ्या समस्यांना तोंड देऊन मार्ग काढावाच लागतो. त्यामुळे विपरीत परिस्थिती आणि लोक हाताळण्यासाठी मजबूत मानसिकता असणे अत्यंत आवश्यक आहे. परंतु ही गोष्ट देखील खरी आहे की या प्रसिद्ध जगामध्ये दगाबाजी आणि होणारी टीका खूप वरच्या पातळीची आहे आणि म्हणूनच मानसिक कणखरता नसेल तर व्यक्ती उन्मळून पडतात.
कालाय तस्मे नमः
यशवंत मराठे
yeshwant.marathe@gmail.com
#Bollywwod #Glamour #Forgotten_Heroes #Celebrity_Status #Tragic_End