काही महिन्यांपूर्वी गुगलच्या सुंदर पिचाई यांचा एक व्हिडीओ सगळीकडे फिरत होता. आरोग्य क्षेत्रात Artificial Intelligence कशी क्रांती घडवून आणेल हे त्यांनी अभिमानाने सांगितलं. तुमच्या डोळ्यातील रेटिनाचा स्कॅन करून पुढील पाच वर्षात तुम्हाला हार्ट अटॅक येऊ शकतो का याचा अंदाज computer द्वारे करता येऊ शकेल असा त्यांचा दावा होता.
आज हार्ट अटॅक तर उद्या कॅन्सर. माणसाचे आयुष्यमान अजून वाढणार. प्रथमदर्शनी वाटलं - अरे वाह, क्या बात है! नंतर असं जाणवलं की आयुष्यमान तर गेल्या दोनशे वर्षात प्रचंड वाढले आहेच की. १८०० साली संपूर्ण जगात असा एकही देश नव्हता जिथे सरासरी आयुष्यमान ३० वर्षांपेक्षा जास्त होते. त्यावेळी जगात गरिबीचे प्रमाण खूप जास्त होते आणि वैद्यकीय ज्ञान फारच तुटपुंजे होते. आपल्या पूर्वजांच्या वेळी मृत्यू लवकर येणार हे जणू गृहीतच धरलेले असावे आणि त्याचमुळे प्रत्येकाला आठ ते दहा मुले असायचीच कारण त्यातील ४-५ दगावणारच. परंतु पुढील दीडशे वर्षात मानवाने आरोग्य क्षेत्रात खूपच प्रगती केली. १९५० साली श्रीमंत देशात (अमेरिका, युरोप, जपान इत्यादी) हेच आयुष्यमान साठीच्या पलीकडे पोहोचले होते. परंतु तरी देखील श्रीमंत आणि गरीब देशात तफावत खूप जास्त होती. त्या साली नॉर्वे येथील सरासरी आयुष्यमान जर ७२ वर्षे असेल तर ते माली देशात फक्त २६ होते आणि मध्य आफ्रिकेत ३६ एवढेच होते. मात्र १९५० पासून पुढील ५०-६० वर्षात मानवाने आरोग्य क्षेत्रात क्रांती घडवून आणली. आज जगाचे सरासरी आयुष्यमान ७२.६ वर्षे आहे जे १९५० मधील नॉर्वे पेक्षा देखील जास्त आहे. याचाच अर्थ गेल्या दोनशे वर्षात आयुष्यमान दुपटीहून देखील अधिक वाढले; म्हणजेच आपल्या पूर्वजांपेक्षा आपण दुप्पट जगतो. परंतु आपण जास्त निरोगी झालो असे म्हणता येईल? अजिबात नाही.
पूर्वीच्या काळी आजच्या सुखसोयी गरिबांनाच काय श्रीमंतांसाठी पण अस्तित्वात नव्हत्या. जगातील आर्थिक दरी जशी वाढत गेली आणि सुखसोयी उपलब्ध होऊ लागल्या, तसा श्रीमंतांचा हव्यास अतिरेकी स्वरूप धारण करू लागला. आजची त्यांची जीवनशैली म्हणजे कमीत कमी कष्टात जास्तीत जास्त शारीरिक सुख. त्यामुळे सर्वसाधारण आयुष्यमान वाढले असले तरी शरीर आतून अजून अजून पोखरले जात आहे. डायबिटीस, रक्तदाब, कॅन्सर हे आजार चाळिशीतच लागले हे ऐकायला मिळणे फारच नॉर्मल झाले आहे; त्यात कोणालाच काहीच वाटत नाही.
दुसरी गोष्ट म्हणजे ह्या ज्या काही नवीन चाचण्या असतील त्या इतक्या महाग असतील की ज्या फक्त श्रीमंतांनाच परवडू शकतील. म्हणजे सुरुवातीला आयुष्यमान वाढेल ते फक्त अशा श्रीमंतांचे. ह्या चाचण्या सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचायला काही दशके जावी लागतील.
Artificial Intelligence वापरून असे पोखरलेल्या शरीराचे आयुष्यमान वाढविण्यात काय अर्थ आहे? हे म्हणजे मोडकळीस आलेल्या चाळीला टेकू लावून कसेबसे वाचवण्यासारखे आहे. जरा धक्का लागला तर अख्खी इमारतच कोसळायची. आज कोरोना विषाणूने ते दाखवून दिले आहे. नुसतेच वय वाढलेली पण प्रतिकार शक्ती नसलेली माणसे किडा मुंग्यांसारखी मृत्युमुखी पडली.
इ.स. पूर्व १०००० साली पूर्ण जगाची लोकसंख्या साधारणपणे १ कोटी होती असा अंदाज वर्तविण्यात येतो आणि पुरातत्व पुराव्यांनुसार तेव्हा देखील प्रचंड लोकसंख्येचा प्रश्न जगाला भेडसावत होता. जी लोकसंख्या इ.स. पूर्व १०००० साली एक कोटी होती ती १८०४ साली १०० कोटी झाली. पुढे १२३ वर्षात (१९२७ साली) दुप्पट म्हणजे २०० कोटी, मग ३३ वर्षात (१९६० साली) ३०० कोटी, मग १४ वर्षात (१९७४ साली) ४०० कोटी, मग १३ वर्षात (१९८७ साली) ५०० कोटी, मग १२ वर्षात (१९९९ साली) ६०० कोटी, नंतर १३ वर्षात (२०१२ साली) ७०० कोटी आणि जी त्यानंतर १५ वर्षांनी (म्हणजे २०२७ साली) ८०० कोटी होईल असा अंदाज आहे. आता जर लोकसंख्या अशीच वाढत राहिली आणि दुसरीकडून त्याचे आयुष्यमान वाढत राहिले तर हा भस्मासुर पृथ्वीला गिळंकृत करण्याचाच प्रयत्न करणार.
परंतु एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की आपल्यावर कुरघोडी करणार्यांना निसर्ग धडा शिकवत असतो आणि त्याची मोठी किंमत वसुल करतो. भूकंप, त्सुनामी, वादळे, दुष्काळ, महामारी इत्यादी संकटे ही डिवचलेल्या निसर्गाचा प्रक्षोभ आहे. निसर्गाला गुलाम समजून वागवण्याच्या मानसिकतेने आमंत्रण दिलेला हा प्रकोप आहे. प्रत्येकाने निसर्गाच्या लहरीला गंभीरपणे समजून घेण्याची गरज यातून स्पष्ट होते. तो इशारा आहे, तो समजून घेणार्यांसाठी आहे. नसेल त्यांना निसर्ग आपल्या न्यायाने वागवतो. तिथे दयामाया नसते. Nature Auto Corrects itself.
आज आपण कायम Epidemic आणि Pandemic हे शब्द ऐकत आहोत. त्याचा अर्थ म्हणजे साथीचा रोग आणि महामारी.
गेल्या २००० वर्षात किती महामारी आल्या त्याची एक झलक:-
१. The Antonine Plague (165 AD)
संपूर्ण रोमन सैन्यासहित पन्नास लाख लोक मृत्युमुखी पडले.
२. The Bubonic Plague
ह्या प्लेगचा आजपर्यंत दोनदा प्रादुर्भाव झाला. प्रथमतः ५४१-४२ साली ज्यावेळी अडीच कोटी लोकं ह्याचे बळी ठरले. दुसऱ्यांदा हा १३४६ ते १३५३ सालात प्लेग ऑफ लंडन म्हणून कुप्रसिद्ध झाला. या सात वर्षांच्या कालावधीत सुमारे दहा ते वीस कोटी लोकं याची शिकार झाले.
३. Cholera Pandemic (1852-1860)
याची सुरुवात भारतातून झाली आणि तो जगभर पसरला. सुमारे दहा लाख लोकं मृत्युमुखी पडली.
४. Flu Pandemic
* H3N8 - 1889/90 - दहा लाख
* Spanish Flu - 1818/20 - दोन ते पाच कोटी
* H2N2 Asian Flu - 1956/58 - वीस लाख
* Hongkong Flu - 1968 - दहा लाख
* H1N1 Flu - 2009 - पाच लाख
५. HIV (1976 - Present)
आजपर्यंत साडे तीन ते चार कोटी लोकं ह्याचे बळी ठरले आहेत.
६. Corona (2020 - ? )
त्यामुळे आपल्या लक्षात येईल की अशी येणारी महामारी काही वर्षे टिकते आणि आज मृत्युमुखी पडलेल्या एक लाख लोकांपेक्षा कितीतरी जास्त लोक त्याची शिकार होऊ शकतात. कुठलाही देश कायमचा लॉकडाऊन तर करू शकत नाही. आज ना उद्या आपल्या सर्वांना, हे संकट जरी असले तरी, प्राथमिक काळजी घेऊन आपापल्या कामाला लागायलाच लागेल. परंतु त्याच बरोबरीने स्वतःची प्रतिकार शक्ती कशी वाढवता येईल याचा विचार करणे खूप गरजेचे आहे.
माझे म्हणणे असे अजिबात नाही की मानवाने आरोग्य क्षेत्रात नवीन संशोधन करू नये अथवा जीवनमान वाढविण्याचा प्रयत्न करू नये. तो करायलाच हवा परंतु त्याच बरोबरीने लोकसंख्येचा विस्फोट कसा थांबवता येईल याचाही विचार व्हायला हवा. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे माणसाने कसली आणि कशासाठी घमेंड करावी? निसर्गातील एक निर्जीव विषाणू संपूर्ण जगभरातल्या "इकॉनॉमी" लोळवू शकतो याचे भान माणसाने ठेवले तर खऱ्या अर्थाने आयुष्यमान भव या आशिर्वादाचे पावित्र्य टिकून राहील.
यशवंत मराठे
yeshwant.marathe@gmail.com
#Health #Population #Corona #Pandemic #आरोग्य #लोकसंख्या #कोरोना #महामारी