Bombay Plague

1896 च्या प्लेगने मुंबईचा चेहेरामोहरा कायमचा कसा बदलला ?

(Nadia Nooreyezdan)

त्या प्लेगने मुंबईची पुनर्रचना केली आणि एका क्रांतिकारी लस निर्मितीला प्रेरणा दिली.

कॅथॉलिक इतिहास असलेल्या बांद्रा या मुंबईच्या समुद्र किनार्‍यालगतच्या उपनगरातील वळणावळणाच्या गल्ल्यांत, गर्दीने ओसंडणार्‍या चौका-चौकात, चुन्याने रंगवलेले अनेक क्रॉस आढळून येतात. अनेक शतकांपूर्वी, जेव्हा या शहराला “बॉम्बे” असे संबोधले जात होते, तेव्हा या शहराला ग्रासणार्‍या प्लेग महामारीची आठवण करून देणार्‍या त्या खुणा आहेत. मुंबई नगरीच्या विस्मरणात गेलेल्या एका आपत्तीनेच या शहराला आजचे स्वरूप व आकार दिला.

19 व्या शतकाच्या अखेरीस आलेल्या ब्युबोनिक प्लेगच्या साथीत भारतात 10 दशलक्ष (एक कोटी) माणसं दगावली. हॉंगकॉंग वरुन आलेल्या जहाजातून तो आला आणि मुंबईच्या दमट कोंदट वातावरणात त्याचा फैलाव सहजगत्या वेगाने झाला. आणि लवकरच हे बंदर शहर ह्या महामारीचे केंद्रबिंदु बनले. ब्रिटिश वसाहतवादी राजवटीने रोगाचा फैलाव रोखण्यासाठी लोकांना जबरदस्तीने घरातून हुसकावून बाहेर काढून त्यांना सुधार छावणीत डांबणे अशा कठोर उपायांची अमंलबजावणी करण्यास सुरवात करताच अनेकांनी पलायन केले आणि त्यामुळे, प्लेग देशभरात फैलावला. युक्रेन येथील ओडेसा शहरातील ज्यू डॉक्टर, वाल्डेमार हाफकीन, यांनी मुंबईत येऊन प्लेगच्या विरूद्ध जगातील पहिल्या लसीचा शोध लावून तेव्हा इतिहास घडविला.

इतिहासाची पुनरावृत्ती होत असल्याचे, सध्याच्या महामारीच्या काळात दिसून येत आहे. शहरव्यापी लॉकडाऊन सुरू होताच, अगदी अशाच प्रकारची भयभीत करणारी, मुंबईबाहेर जाणार्‍या स्थलांतरित कामगारांच्या लोंढ्यांची चित्रे दिसून आली. कोविड-19 चा सामना करण्यासाठी, सध्याच्या सरकारने 123 वर्ष जुना कायदा लागू केला आहे, ज्या कायद्याद्वारे ब्रिटिश वसाहतवादी राजवटीने ब्यूबॉनिक प्लेगच्या वेळी भारतीयांवर संपूर्ण नियंत्रण मिळवले होते. मुंबई शहराची संस्कृती आणि इतिहास ह्याच्या विशेष अभ्यासक असलेल्या सार्वजनिक इतिहासकार अलिशा सदिकोट यांच्या मते 1896 सालची आणि आजची परिस्थिती यात लक्षणीय साम्य आढळते.

1890 सालची मुंबई कशी होती?

बॉम्बे हे भारतातील प्रथम क्रमांकाचे आणि लंडन नंतरचे ब्रिटीश साम्राज्यातील दुसरे सर्वात मोठे शहर व्हावे अशी ब्रिटीशांची इच्छा होती. १९ व्या शतकाच्या मध्यावर, आधुनिकतेच्या आणि औद्योगिकीकरणाच्या प्रारंभिक काळात, बॉम्बे, हे व्यापारी बंदर ते जागतिक दर्जाचे शहर असे बदलू लागले होते. गॉथिक वास्तुशैली आणि भव्य स्मारके हा बदल अधोरेखित करीत होता. उच्चभ्रू ब्रिटिश आणि श्रीमंत भारतीय ह्यांचा छोटा समूह ह्या भव्य आणि भारावून टाकणार्‍या जागी वास्तव्याला आला. पण हा केवळ दर्शनी भाग होता. येणार्‍या लोकांना भुरळ घालण्यासाठी समुद्राचे दर्शन होईल अशा तर्‍हेने जमिनीच्या एका छोट्या तुकड्यावर उभारलेले हे दिखाऊ शहर होते. औद्योगिकीकरण झाल्यामुळे मुंबईत स्थलांतर करणारे बरेच लोक हे गरीब कामगार वर्गातील होते. कापड गिरण्या व गोदीमध्ये काम करण्यासाठी ते शहरात गेले आणि प्रत्यक्षात मात्र त्या काळात त्यांचे राहणीमान खालावले. हे शहर त्यांच्यासाठी नव्हतेच.

मुंबईमध्ये प्लेग कसा आला आणि तिथे त्याचा जास्त उद्रेक का झाला?

प्लेग हा अनेक दशकांपासून चीनमध्ये पसरला होता आणि 1894 मध्ये हाँगकाँगमध्ये त्याची जाहीर वाच्यता करण्यात आली. प्लेगचे जीवाणू उंदीरांच्या अंगावरील पिसवांमध्ये असत, असे उंदीर हाँगकाँग बंदरातून मुंबई बॉम्बे बंदरात पोहोचले. मुंबईचे हवामान दमट होते, त्याकाळी पुष्कळ पाऊस पडत असे, आणि सांडपाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने पाणी तुंबत असे, हे वातावरण उंदरांच्या पैदाशीला पोषक ठरले. आपल्याकडे मल जल वाहून नेण्याची व्यवस्था पुरेशी नसल्याने मानव आणि प्राण्यांच्या मैल्याची घाण असे. आणि वेगाने औद्योगिकीकरण होत असलेल्या त्या तीन दशकांत पायाभूत सुविधांकडे फारसे लक्ष देण्यात आले नव्हते. ‘चाळी’ किंवा लहान खोल्या असणार्‍या इमारती गिरण्यांच्या शेजारी बांधण्यात आल्या. आणि अकुशल कामगारांनी जवळपासच मोकळ्या जागांवर तंबू किंवा झोपड्या वसवल्या. बांधकाम विषयक कोणतेही नियम नसल्याने, जागेचे मालक पुरेशी हवा वा सूर्यप्रकाश मिळेल ह्याचा विचार न करता बांधकाम करू लागले. अशा पद्धतीने वसवल्या गेलेल्या मुंबई शहरात तेथील रहिवासी रोगाला सहज बळी पडले आणि जवळजवळ २० वर्षे मुंबईत प्लेगचे संकट कायम राहिले.

ब्रिटिश वसाहतवादी सरकारने या उद्रेकाला कसा प्रतिसाद दिला?

सरकारने या उद्रेकाकडे कामगार वर्ग आणि त्यांची दाटीवाटीने राहण्याची ठिकाणे यामुळे उद्भवलेली समस्या अशा दृष्टीकोनातून पहिले. त्यांनी रोगाची लक्षणे असणार्‍या अथवा रोग्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांना शोधून काढून त्यांना विलग केले, त्या भागाचे निर्जंतुकीकरण केले आणि घरे जमीनदोस्त केली. विलग करणे, अलग ठेवणे आणि निर्जंतुकीकरण करणे अशी त्यांची योजना होती आणि राजसत्तेचा, बळाचा पूर्ण वापर करून त्यांनी ती पार पाडली. खरं तर, त्यांनी लोकांना तिकडून हटवून हॉस्पिटल मध्ये पाठवून आणि प्रसंगी अनेकदा बळाचा वापर करून त्यांना “प्लेग छावण्या” मध्ये डांबले. याचे तीव्र पडसाद जनमानसात उमटले आणि स्थलांतरित मजूर मुंबईतून पळ काढू लागले.

ते दृश्य मुंबईतील मागील महिन्यात घडलेल्या परिस्थिती सारखेच दिसले असेल, जेव्हा स्थलांतरितांचे लोंढे पळून जायच्या प्रयत्नात रेल्वे स्टेशनवर लोटले. त्यावेळी त्याचा अर्थ असा होता की प्लेग रेल्वे लाइनच्या मार्गे संपूर्ण भारत देशभर फैलावेल. बॉम्बे बरोबर असलेला सर्व व्यापार उदीम थांबला आणि हे अर्थव्यवस्थेसाठी फार हानिकारक होते. आणि या शहराच्या समृद्ध दक्षिण टोकापलीकडे काय घडतय याकडे 30 वर्षे दुर्लक्ष केल्यानंतर शेवटी सरकारला समाजातल्या इतर वर्गांसाठी चांगले राहणीमान पुरवण्याची खात्री द्यावी लागली. परंतु, त्यांनी प्लेगला ज्या क्रूर पद्धतीने हाताळले त्याचा परिपाक म्हणजे गरीब आणि कष्टकरी वर्गावरचा घालाच ठरला.

दरम्यान, सूक्ष्मजंतू शास्त्रज्ञ या वरचा उपाय शोधण्यात गुंतले होते. ग्रँट मेडिकल कॉलेजच्या कक्ष क्र. 000 मध्ये काय घडत होते?

त्यावेळी, संशोधक आपण कशाचे संशोधन करतोय ह्या बद्दल अनभिज्ञ होते. इथले डॉक्टर्स जिवाणू अलग करून ते हाँगकाँग मध्ये ज्या जिवाणूंवर अभ्यास होतोय त्यासारखेच आहेत का ते तपासून पहात होते. दरम्यान, ओडेसा या शहरातील एक सूक्ष्मजंतू शास्त्रज्ञ डॉ. वाल्देमार मोरडेकाई हाफकिन, हे तेव्हा कलकत्त्यामध्ये त्यांनी विकसित केलेली कॉलराची लस देत होते. प्लेगच्या उद्रेकाची बातमी आल्यानंतर, त्यांना मुंबईला बोलावून घेण्यात आले आणि त्यांनी येथे एका शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कक्ष क्र. 000 मधील एका तात्पुरत्या उभारलेल्या प्रयोगशाळेमध्ये आपले संशोधन चालू केले.

तुप किंवा लोण्यापासून बनवलेल्या अति-चरबी युक्त कढणात प्लेगच्या जिवाणूंच्या वसाहती वाढवण्यात आणि त्यात कमकुवत झालेल्या जिवाणूंपासून लस तयार करण्यात हाफकिन यांना यश आले. सश्यांवर घेतलेल्या या लशीच्या चाचण्या यशस्वी झाल्यावर हाफकिन यांनी या लशीचा प्रयोग स्वतःवर केला. त्यानंतरची 30 वर्षे, ही लस जगातील सर्वात प्रभावी लस म्हणून ओळखली गेली. या लसीमागचे शास्त्र सरकारी अधिकार्‍यांना पटवून देण्यात खूप वेळ गेला हे खरं, मात्र जेव्हा त्यांची खात्री पटली, तेव्हा त्यांनी मध्य मुंबईतील राज्यपालांची हवेली हाफकिन यांना देऊन टाकली. तेथील बॉलरूमचे रूपांतर हाफकिन यांनी एका प्रयोगशाळेत केले आणि या लशीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात करण्यास सुरुवात केली.

या संकटाने शहराला कसे बदलले?

जेव्हा 1910 च्या सुमारास लोकांना कळून चुकले की प्लेग हा आता सर्वत्र पसरलाय, आणि त्यापासून सुटका नाही तेव्हा ते मुंबईला परतू लागले. शहर कसे बदलेल हा प्रश्न सरकारसाठी त्यावेळी खूप महत्त्वाचा होता. हा प्रश्न आज देखील आपण विचारत आहोत - कोविड 19 नंतरच्या परिस्थितीशी शहरे कशी जुळवून घेतील?

1898 मध्ये, ब्रिटीशांनी “बॉम्बे सिटी इम्प्रूवमेंट ट्रस्ट" या सरकारी नगर रचना मंडळाची स्थापना केली, त्यांनी त्वरेने आखणी करून शहरात कामे सुरु करून सार्वजनिक जागांची / ठिकाणांची निर्मिती सुरु केली – मुख्यत्वे करून रस्ते, ज्यांच्या खालून पाण्याचा निचरा करणारे पाइप आणि सांडपाणी वाहून नेणारी गटारे बांधता आली. ते घरे जमीनदोस्त करून, लोकांना विस्थापित करत होते, परंतु या विस्थापितांचे पुनर्वसन करणे त्यांना त्यानंतर कधीच शक्य झाले नाही.

जवळपास एका दशकानंतर त्यांनी जे पुढचे पाऊल उचलले ते म्हणजे, सर्वसामान्य मध्यमवर्गीयांसाठी नियोजित उपनगरे निर्माण करणे. पूर्वी जेथे “प्लेग छावण्या” होत्या अशा जागा त्यांनी निवडल्या, त्यामध्ये सांडपाण्याची गटारे, रस्ते, सार्वजनिक वाहतूक, इतर सुविधा, इत्यादी – म्हणजेच लोक तेथे राहायला आल्यावर त्यांना जे काही लागेल या सर्व गोष्टींचा एक आराखडा बनवला. या काळात त्या परिसरामध्ये, अधिकाधिक बँका, नोकर्‍या, कॉलेजेस, उद्याने, धार्मिक स्थळे आणि रेल्वे लाईन्स निर्माण झाल्या. आज, अधिकांश जनता अशा स्वयंपूर्ण नगराच्या अथवा वसाहतीच्या कल्पनेकडे पुन्हा वळण्याचा विचार करत आहेत आणि तोच बॉम्बे सिटी इम्प्रूवमेंट ट्रस्टचा वारसा आहे.

बॉम्बेच्या इतिहासातील प्लेग ही सर्वात भयंकर गोष्ट होती आणि तरी देखील ती विस्मरणात गेली.

खरं तर तुम्हाला प्लेग समजल्याशिवाय हे शहर समजणे शक्य नाही. वांद्र्यामध्ये, प्लेगच्या क्रॉसवर लावलेल्या मार्बलच्या पाटीवर “रोगराईपासून संरक्षणासाठी” असे कोरलेले असते. परंतु, बहुतांश लोकांचे याकडे लक्ष जात नाही. प्लेगच्या इतिहासाबद्दलची ही सर्वात विचित्र गोष्ट आहे – पण दुर्दैवाने कोणालाच याची आठवण नाही. आपल्या राहण्याच्या आणि जगण्याच्या पद्धतीमध्ये प्लेगने आमुलाग्र बदल घडवून आणलाय. बॉम्बेने 20 वर्ष दु:ख सोसलंय.

आपण इतिहासातून काहीच का शिकलो नाही?

यशवंत मराठे

yeshwant.marathe@gmail.com

#Plague #Bubonic_Plague #Bombay #प्लेग #मुंबई

Leave a comment



Shubhada. Jahagirdar

5 years ago

Yeshwant very intriguing information. Today's population would not have bothered to dig in the history of covid 19 would not have erupted.

aroundindiaghansham

5 years ago

उत्तम विवेचन

aroundindiaghansham

5 years ago

Contact Form

subscribe

Thank you for subscribing.

Something went wrong.

Contact Info

  • yeshwant.marathe@gmail.com

Follow Me

My Other Blogs: historycafe.in

Copyright © 2020 Sarmisal.

Made with ♡ by iTGS