जातानाचे शब्द

"मी असा काय गुन्हा केला ?" हे शब्द प्रमोद महाजन यांनी आपल्या अंतसमयी उच्चारले होते असे म्हणतात. आपल्या सख्या भावानेच गोळ्या घातल्यावर विचारांच्या कल्लोळातून त्यांना असे व्यक्त व्हावेसे वाटले होते. "अरे, हे काय करताय ?" असे इंदिराजींनी अतिशय अविश्वासाने आपल्या मारेकऱ्यांना विचारले होते. महात्मा गांधीजींचे जातानाचे शब्द होते, "हे राम" तर चाफेकर बंधू किंवा भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांनी "वंदे मातरम" म्हणत मृत्यूचे स्वागत केले होते. तर मी या स्वार्थी जगात आता राहू शकत नाही असे म्हणून साने गुरुजींनी जीवनयात्रा संपवली आणि सात भाऊ असते तरी मातृभूमीसाठी दिले असते; आता माझे काम संपले असे ठामपणे सांगून स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी प्रयोपवेशन केले.
 
एखाद्याचे जातानाचे शब्द नेमके काय असतात याची आपल्याला अतिशय उत्सुकता लागून राहिलेली असते. एखादे वयोवृद्ध वडील गेल्यावर जेंव्हा नातेवाईक भेटायला येतात तेंव्हा "काही बोलले हो ते जाताना ?" असे हमखास विचारले जाते. 
 
अगदी बोलायला यायला लागल्यापासून आपण अगणित वाक्ये बोलतो पण आयुष्याच्या अंतकाळी जे बोलतो ते खरेखुरे असते. त्यात खोटेपणाचा, दांभिकपणाचा, मीपणाचा लवलेश सुद्धा नसतो. बऱ्याच वेळा आयुष्यातल्या चुकांची किंवा पापांची कबुलीही असू शकते. बालपण संपल्यानंतर इतका मनाचा निरागसपणा यापूर्वी कधीच अनुभवता आलेला नसतो. कदाचित समोर दिसत असलेल्या मृत्यूमुळे खऱ्याखुऱ्या जीवनाची जाणीव, आयुष्य संपताना होत असावी.
 
मी एका एकांकिकेबद्दल ऐकले होते की ज्यात लेखकाने कल्पना अशी केली होती की पराभव दिसायला लागल्यावर अडॉल्फ हिटलरने आपल्या नवपारिणीत वधुसह आत्महत्या केली होती. मग ज्या रात्री त्याने आत्महत्या केली, त्या रात्री त्याचा त्याच्या बायकोशी नेमका काय संवाद झाला असेल अशी कल्पना करून अतिशय कल्पकपणे दोघातले द्वंद्व त्यांनी उभे केले होते. पत्नीला जगायचे होते, सर्वसामान्य माणसाप्रमाणे संसार करायचा होता. पण हिटलरला शत्रूच्या हातात सापडायचे नव्हते. त्याला आपला अपमानास्पद मृत्यू नको होता. त्यामुळे आत्महत्येशिवाय त्याला दुसरा मार्ग दिसत नव्हता. आसक्ती आणि विरक्ती यातले नाट्य पाहताना दोघांनीही जीवनाच्या तत्त्वज्ञानावर केलेले भाष्य हा या एकांकिकेचा विषय होता. पत्नीच्या मनात मृत्यूच्या कल्पनेने आलेली थरारकता आणि त्यातून निर्माण झालेली अगतिकता मनाला स्पर्शून जाते आणि "हे मृत्यू, मी मला हवा तसा जगलो, आता हवा तसा मरणार" हा हिटलरच्या मनातील ठामपणा जाणवत राहतो.
 
जगणे आणि मरणे यात फार मोठा वैचारिक दरी असते. ती पार करण्याची इच्छा फार कमी जणांची असते. आपल्यापैकी जवळजवळ प्रत्येकाला त्या दरीपर्यंत जाऊच नये असे वाटत असते. कारण जगण्याची आसक्ती प्रत्येकालाच असते. तिथे मृत्यूचे स्वागत कोण आणि कसे करणार ? 
 
आयुष्यात मी आणि माझे करत इतकी संपत्ती आणि इतक्या वस्तू गोळा केल्या पण यातली एकही वस्तू मृत्यूबरोबर घेऊन जाता येणार नाही हे कळते पण वळत नाही. वेगवेगळ्या फ़ॅशनचे कितीही महागडे कपडे घातले तरी जन्माला येताना नागवे आलोय आणि मरतानाही तसेच जायचंय. येताना दोघांमुळे आलो आणि मेल्यावर चौघांच्या खांद्यांवरून जायचंय. आपण एकटे काहीच करू शकत नाही पण तरीही प्रत्येक हाव काही सुटत नाही. हे माझे, ते माझे, माझेही माझे आणि त्याचेही माझेच अशी आपली नेहमी भावना असते. जेव्हा मृत्यू समोर दिसायला लागतो, तेव्हा ही भावना बोथट होते. प्रत्येक चर्चमध्ये जशी कन्फेशन बॉक्स असते तशी काल्पनिक बॉक्स मृत्यूच्या जाणिवेने तयार होते.
 
आयुष्यात जे बेफामपणे वागलो, बोललो ते आठवू लागते. आयुष्यावर चढलेली खोटेपणाची आणि दांभिकतेची पुटे ढासळू लागतात. लहान बाळाची निरागसता मनात येऊ लागते. रागलोभाच्या आहारी जाऊन विस्कटून टाकलेली नाती पुन्हा गोळा करून आणाविशी वाटतात; खरे तर तोपर्यंत फार उशीर झालेला असतो. जेव्हा जगायचे असते तेव्हा आपण जगलेलोच नसतो. आणि जगावेसे वाटू लागते तेव्हा मृत्यू समोर येऊन उभा ठाकलेला असतो.
 
भाऊसाहेब पाटणकर यांचा सुरेख शेर आहे,
 
दोस्तहो, दुनियेस धोका, मेलो तरी आम्ही दिला ।
जाऊनी नरकात, पत्ता स्वर्गाचा आम्ही दिला ।।
हाय रे दुर्दैव माझे, सर्वास कळले शेवटी ।
सारे सन्मित्र माझे, तेथेच आले शेवटी ।।
 
आपल्यासारख्या सर्व पापी माणसांचा सर्वात शेवटचा मुक्काम नरक आहे हे त्यांनी नर्म विनोदाने मोजक्या शब्दात पटवून दिले आहे. पण काही काही माणसे खरोखरच वेगळी असतात. त्यांना जगण्याचीही आसक्ती नसते आणि मरण्याचीही भीती वाटत नाही. ही माणसे खऱ्या अर्थाने जीवन जगतात आणि हसऱ्या चेहऱ्याने मृत्यूला सामोरे जातात. 
 
सामाजिक कार्यकर्ते ग. प्र. प्रधान यांनी मृत्यू हसत हसत स्वीकारला. आपला काळ जवळ आला आहे हे कळल्यावर त्यांनी आपला पुण्यातील राहता वाडा साधना ट्रस्ट या संस्थेला फुकट देऊन टाकला. आपल्या एका डॉक्टर विद्यार्थ्याच्या हॉस्पिटलच्या सर्वात वरच्या मजल्यावरच्या खोली भाड्याने घेतली आणि स्वतः डाळ भात बनवून मृत्यू येईपर्यंत जगत राहिले. खरे तर तो वाडा विकला असता तर त्यांना करोडो रुपये मिळाले असते. पण आयुष्यभर एक तत्वज्ञान उराशी बाळगून जगलेल्या प्रधानांनी निस्वार्थीपणे त्यावर पाणी सोडले. पुलंनी तर आयुष्यात मिळालेल्या सर्व संपत्तीचा ट्रस्ट केला आणि समाजाकडून मिळालेली सर्व संपत्ती समाजाला परत देऊन टाकली. एक आदर्श जगणे यापेक्षा वेगळे काय असते ? 
 
सोळाव्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहून एकविसाव्या वर्षी जिवंत समाधी घेणारे ज्ञानेश्वर माऊली म्हणजे विरक्तीचे टोक.. त्यांच्या जीवनाचाही सोहळा होता आणि अजीवन समाधीचाही.. 
 
काही सामान्य माणसेसुद्धा असामान्य पद्धतीने जगतात आणि मृत्यूने आदर्श निर्माण करतात. मुंबईत राहणाऱ्या वसंत निकुंभ यांनी काही वर्षांपूर्वी दोन्ही हात पसरून मृत्यूचे स्वागत केले होते. आयुर्वेदाचा गाढा अभ्यास असलेले निकुंभ एखाद्या योग्यासारखे ८३ वर्षे जगले. आयुर्वेदात सांगितल्याप्रमाणे त्यांची रोजची दिनचर्या होती. त्यामुळे त्यांच्या नखात रोग नव्हता. पण एके दिवशी त्यांनी विचार केला की आयुष्यातल्या सर्व जबाबदाऱ्या पूर्ण झाल्या आहेत, लेकी, सुना नातवंडे सारे सुखी आहेत. मग आता जगून काय करायचे? त्यांनी इच्छामरण घ्यायचे ठरवले. पत्नी जिवंत असताना हा असा निर्णय घेणे म्हणजे आक्रीतच.. व्यवस्थित नियोजन करून हळूहळू एकेक खाद्यपदार्थाचा त्याग करत करत चार महिन्यांनी मृत्यूला त्यांनी बोलावून घेतले. या त्यांच्या निर्णयापासून परावृत्त करण्याचा सर्व नातेवाईकांनी खूप प्रयत्न केला पण ते आपल्या विचारांपासून ढळले नाहीत. तोंडी सांगून ऐकत नाहीत हे लक्षात आल्यावर सर्वांनी त्यांना पत्रे लिहिली आणि तुम्ही आम्हाला हवे आहात असे सांगितले तर त्या प्रत्येकाला स्वहस्ताक्षरात त्यांनी लिहिलेली उत्तरे आजही वाचायला मिळतात जी आयुष्याच्या तत्वज्ञानाने भरलेली होती. ज्याने आयुष्य आणि मृत्यू यांच्यातली सीमारेषाच पूर्णपणे पुसून टाकली आहे त्या माणसाचे तत्वज्ञान वाचत राहावेसे वाटते. जग हे मिथ्या आहे हे संतांनीच सांगितले पाहिजे असे नव्हे तर आपले आपल्यालाही ते कळू शकते हे वसंत त्र्यंबक निकुंभ यांच्या पत्रावरून आपल्याला कळते.
 
भिवंडीच्या धुंडिराज दीक्षित आणि त्यांच्या पत्नीचा मृत्यूसुद्धा असाच आदर्शवत होता. दोघांनाही कर्करोगाचे निदान झाले आणि त्या दिवसापासून दोघांनीही औषधोपचार थांबवला. दीक्षित सर सेवानिवृत्त शिक्षक होते. त्यांनी आपल्या मुलांना सांगितले की कर्करोगावर औषध नाही हे मी मुलांना शिकवायचो. मग मीच औषधोपचारावर तुम्हाला खर्च करायला का लावू ? ते पैसे तुमच्या मुलांच्या शिक्षणासाठी वापरा. आम्ही तृप्त आहोत, आम्हाला जाऊ द्या ! आणि खरोखरच त्या दाम्पत्याने कर्करोगाच्या वेदना शांतपणे सहन करत धीरोदात्तपणे जगाचा निरोप घेतला.
 
ज्याला जन्म आहे त्याला मृत्यू सुद्धा आहेच.. जेवढ्या आनंदाने आपण जगण्याचा आनंद घेतो तेवढ्याच आनंदात मृत्यूचे सुद्धा स्वागत करायला हवे. आणि आयुष्यभर असे जगायला हवे की मृत्यूसमयी अपराधीपणाची भावना फिरकता कामा नये.
 
 
@ यशवंत मराठे 
yeshwant.marathe@gmail.com
 

Leave a comment



Satish Dharap

3 years ago

Excellent.

Prashant Naik

3 years ago

खूप भावनिक विषय समोर मांडला आहेस. आपल्या सर्वांच्या मनात , आयुष्य एका टप्प्यावर येऊन ठेपले की मृत्यू विषयी कुतूहल निर्माण होते. ह्या लेखांतून तू ह्याच विचारांच्या (मधमाशीच्या पोळ्या ) वर हलकासा आघात केला आहेस.
लेखाचे चित्र समर्पक आहेच, पण त्याहून अधिक गूढता वाढवणारे आहे. 👌🏻👌🏻👌🏻

Ajit S Gokhale

3 years ago

सही...🙏

Hemant Marathe

3 years ago

निश:ब्द् 🙏

स्नेहा धारप

3 years ago

यशवंत , अतिशय सुंदर लेख. असामान्य व्यक्तींचे विशेषत्व समजले. विचारप्रवर्तक लेख आहे.

Prafulla Agnihotri

3 years ago

आत्तापर्यंत वाचलेल्या सगळ्या लेखातील हा एक सर्वोत्कृस्ट लेख आहे. वाचताना आणि नंतरही खूप अंतर्मुख होऊन विचार करायला प्रवृत्त केले. खूप छान.

vijay jadhav

3 years ago

यशवंत नेहमीप्रमाणेच खूप छान लिहिले आहेस ! बहुतेक जण मृत्यूविषयी बोलायला घाबरतात किंवा टाळतात ! पण मृत्यू हा प्रत्येकाच्या जीवनातील अविभाज्य घटक आहे त्याच्याबद्दल आपण जागरुकता ठेवलीच पाहिजे आणि आणि जेव्हा मृत्यू हा अटळ आहे हे समजून आपण जीवन जगण्यास सुरुवात करतो तेव्हा चे जीवन जगण्याची पद्धत आपली एकदमच बदलून जाते ! आपल्या जवळच्या माणसांची किंमत कळते

D.N.Patankar

3 years ago

उत्तम लेख.

Subscribe

Thank you for subscribing.

Something went wrong.

Contact Form

subscribe

Thank you for subscribing.

Something went wrong.

Contact Info

  • yeshwant.marathe@gmail.com

Follow Me

My Other Blogs: historycafe.in

Copyright © 2020 Sarmisal.

Made with ♡ by iTGS