भारतीय संस्कृतीत होम-हवन, यज्ञ-याग करण्याची प्रथा, परंपरा आहे. असे होम-हवन करताना मंत्रोच्चारानंतर आहुती देताना स्वाहा; ज्याचा अर्थ अर्पण करणे. दुसऱ्या प्रकारे विचार केला तर आहुती म्हणजे अग्नीला अर्पण केलेल्या वस्तू. त्यांच्या जळून जाण्याला काहीच महत्व नाही?
आपल्या पुरुषप्रधान समाजात किती स्त्रियांची आहुती दिली जाते याची काही गणतीच नाही. आणि या आहुत्या काही फक्त आजच्या समाजातल्या नाहीत. अगदी रामायणापासून हे चालूच आहे. रावणवधानंतर सीतेलाच आपले शीलभ्रष्ट नसण्याचा पुरावा म्हणून अग्निदिव्य करावे लागले. तरी सुद्धा कालांतराने कोणी एक परीट काहीतरी बोलला म्हणून रामाने ती गर्भवती असताना तिचा त्याग केला. अखेरीस तिने धरणीमातेच्या उदरात शिरणे पसंत केले. दुसरी उर्मिला.. लक्ष्मण रामाबरोबर चौदा वर्षं वनवासाला निघून गेला. राम सीतेच्या बरोबरीनं लक्ष्मणाचं कौतुक झालं, पण अयोध्येत राहूनसुद्धा चौदा वर्षं वनवास, तोही एकटीनं भोगणाऱ्या, आणि तो देखील नवविवाहित असताना, उर्मिलेच्या आयुष्याच्या आहुतीची दखल कोणीही घेतली नाही.
कधी कधी असं वाटतं की त्या सीतेला अथवा उर्मिलेला कुणीतरी बोलतं करायला हवं. रामराज्याच्या आदर्शवादी यज्ञात त्यांची आहुती अशीच पडून गेली.
शिवाजी महाराजांच्या आठ राण्यांपैकी तीन- सईबाई, सोयराबाई व पुतळाबाई यांच्याबद्दल आपल्याला थोडीफार माहिती असते पण बाकीच्या पाच राण्यांचे काय? काशीबाई, सकवारबाई आणि इतर तिघी (लक्ष्मीबाई, सगुणाबाई, गुणवंताबाई; ज्यांची नावेही अगदी विरळा लोकांना माहित असतील). राजकीय कारणासाठी ह्या पाच जणींबरोबर महाराजांचा विवाह झाला. पण नंतर अफझलखान येतोय, म्हटल्यावर ह्या पाचजणींना चिंता वाटली नसेल? आपला नवरा औरंगजेबाच्या कैदेत अडकलाय हे कळल्यावर यांचा जीव सैरभैर झाला नसेल? निश्चितच झाला असणार! पण स्वराज्याच्या यज्ञात ह्या पाच आहुत्या तशाच जळून गेल्या. त्याचप्रमाणे टिळकांनी, सावरकरांनी मांडलेल्या स्वराज्याच्या यज्ञात पहिली आहुती सौ. टिळकांची व सौ. सावरकरांची पडली.
बहुतेक सर्व आहुत्या या स्त्रियांच्याच. कारण हे निमूटपणे जळून जाणं हे त्यांच्या अंगवळणीच पडलेलं असतं जणू! आणि हो, आपण त्या स्त्रियांना देवत्व मात्र लगेच बहाल करतो.
परंतु आपल्या समाजाचा दांभिकपणा बघा. नवरात्रीत मोठ्या भक्तिभावाने देवीची घटस्थापना करतो. मातीच्या मूर्तीला देवी मानतो आणि हाडामासाच्या देवीवर मात्र बलात्कार करतो.. मुलीची चाहूल लागताच गर्भात त्या मुलीला मारून टाकतो.. आणि त्यातून मुलगी जन्माला आलीच तर तिला अतिशय निर्दयपणे उकळत्या दुधात अथवा पाण्यात टाकून मारून टाकतो.. स्त्रीला फक्त ती एक स्त्री आहे म्हणून शिक्षण थांबवावं लागतं.. स्त्री हुंड्यासाठी आजही घराघरात जळते आहे.. स्त्री वर, लहानग्या चिमुरडीवर, मतीमंद, गतिमंद मुलींवर हा समाज बलात्कार करतो आहे.. दररोज..
त्या समाजाला देवीची मूर्ती स्थापन करायचा तरी काय अधिकार आहे? कोणी दिला हा अधिकार ह्या असल्या वासना पीडित समाजाला?
समाजाचा दांभिकपणा अधोरेखित करून त्यावर अचूक बोट ठेवत गिरीश कर्नाडांनी 'नागमंडल' हे नाटक लिहिले होते.
आपल्या नवऱ्याचे बाहेर संबंध आहेत हे माहित असूनही पत्नीने त्याच्याशी एकनिष्ठ राहावे, त्याची तक्रार करू नये; त्या उलट झालंच तर स्त्रीजन्माचे भोग म्हणून ते सोसावेत. त्याचवेळी तिने मात्र कुठल्याही परपुरुषाशी बदफैली करू नये याकडे तिच्या पतीचा, कुटुंबाचा, समाजाचा पर्यायाने सगळ्यांचाच कटाक्ष असतो. तर दुसरीकडे बाहेरख्याली असणाऱ्या नवऱ्याने बायकोवर संशय घ्यावा अन खरं खोटं जाणून न घेता तिच्या अब्रूचे खोबरे आपल्याच हाताने गावभर उधळावे ही बाब आपल्याकडे सामान्य आहे. पती उघडपणे व्यभिचारी असतानाही त्याचे मन जिंकण्यासाठी चालणारी भारतीय स्त्रीची हतबलता, पती कितीही बाहेरख्याली असला तरा आपण एकनिष्ठ आहोत हे सिद्ध करण्याची विवाहित स्त्रीवरच लादलेली गरज; मात्र दुसरीकडे व्यभिचारी पतीला त्याच्या विवाहबाह्य संबंधाबद्दल समाजाकडून - नाटकात ग्रामपंचायतीकडून साधा जाबही विचारला जात नाही हे प्रखर वास्तव आणि खेड्यातील न्यायव्यवस्थेचे एकनिष्ठता सिद्ध करण्यासाठी स्त्रीला उकळत्या तेलात हात घालण्यास सांगणे, नागाच्या वारूळात हात घालण्याचा आदेश दिला जाणे अशा शिक्षा स्त्रियांना सर्रास दिल्या जातात. हे सर्व असह्य आहे.
हा आपला पुरुषप्रधान समाज इतका कसा काय निर्लज्ज होतो?
स्त्रीच्या अधिकाराच्या कक्षा पुरुषाने का ठरवायच्या? पुरुष स्त्रीला अशा एका बंधनात ठेऊ इच्छितो की ज्याची दोरी सदैव त्याच्या ताब्यात असेल. मी तिला बाहेर जाऊ देतो; नोकरी करू देतो; मी तिला हे देतो आणि ते देतो त्यामुळे मी कसा मोठया मनाचा आहे याची फुशारकी. अरे, पण देणारा तू कोण? आणि मूलभूत प्रश्न हा आहे की तू कोण असा तीस मार खां की ज्याची स्त्रीला परवानगी घ्यायला हवी? हा हक्क स्त्रीने पुरुषाला खचितच दिलेला नाही. पंखांचा आकार आणि उंच उडण्याची क्षमता ही फक्त तिची तीच जाणते. महत्वाची गोष्ट आहे ती एकत्र साहचर्य आणि सहवास यांची; परंतु ते conditions apply असू नये अन्यथा तो एक व्यवहार अथवा हिशेब होतो.
गोपाळराव जोशांसारखा एखादा सन्माननीय अपवाद की जो आपल्या पत्नीला- आनंदीबाईला डॉक्टर करण्यासाठी स्वतः जीवापाड झटला. तसेच काही प्रमाणात कस्तुरबा म्हणा, किंवा सावित्रीबाई फुले म्हणा, ज्या स्वकर्तृत्वाने उजळूनही गेल्या!
ज्या दिवशी प्रत्येक घरातली स्त्री, ही सुरक्षित असेल.. तिला तिचं खरं स्थान प्राप्त होईल.. समाजात रात्री अपरात्री ती एकटी न घाबरता फिरू शकेल.. त्याच दिवशी ह्या समाजात खऱ्या अर्थाने घटस्थापना होईल.
@ यशवंत मराठे
yeshwant.marathe@gmail.com