द्वेष नको; स्पर्धा करा

आज महाराष्ट्रातील बहुजन समाजातील मुख्य मुद्दा ब्राह्मणांनी केलेल्या अत्याचाराचा आणि अपमानाचा असतो. पण थोडा इतिहासाचा विचार करूया का?
 
समस्त देव क्षत्रिय; सन्माननीय अपवाद परशुराम पण तो देखील फक्त ५०% ब्राह्मण. अजून एक अपवाद म्हणजे वामन; परंतु वामन आणि नरसिंहाने ज्यांना संपवले ते 'बळी' आणि 'हिरण्यकश्यपू' दोघेही ब्राह्मण. सगळे राजे क्षत्रिय सन्माननीय अपवाद पुष्यमित्र श्रुंग. त्यामुळे अर्थातच समाज व्यवस्था, न्याय व्यवस्था याचे अधिकार त्यांच्याकडे. मनुस्मृती रचणारा ऋषी सुद्धा क्षत्रिय; तो सुद्धा ब्राह्मण नाही. ब्राह्मण फक्त ज्ञान सांभाळून ठेवणारे आणि भविष्यातील पिढ्यांना प्रदान करणारे. ब्राह्मणांच्या अधिकारात काय होते?? पौरोहित्य, धार्मिक परंपरा आणि चालीरीतींचे पालन करवून घेणे आणि शिक्षण देणे. १८१८ पूर्वी शस्त्र हातात घेणारे पेशवे आणि तशी चार ब्राह्मण डोकी अपवाद. बाकी सगळे, झाडून सगळे फक्त शिक्षण आणि पौरोहित्य हाच व्यवसाय करत होते.
 
आणि तरीही आपल्या देशात २०० वर्षात ब्राह्मणांनी जितक्या शिव्या खाल्ल्या आहेत तितक्या शिव्या जगातील समस्त शोषण, अन्याय आणि अत्याचार करणाऱ्या लोकांनी खाल्ल्या नाहीत.
 
आज सुद्धा समजा ५०% आरक्षण आहे तर उरलेल्या ५०% मध्ये ब्राह्मण किती आहेत? महाराष्ट्रात जास्तीत जास्त ३%. परंतु असा कोणताच व्यवसाय उरला नाही जिथे ब्राह्मण घुसले नाही आणि अग्रेसर झाले नाही. आणि जे तथाकथित बहुजन जे स्वतःच्या पूर्वजांना शुद्र म्हणतात, ते आज टक्केवारीने किती आहेत?? आणि ते या सर्व व्यवसायात कुठे आणि किती आहेत?? मग हे आरक्षण धोरण, सर्वांना समान शिक्षण याचे लाभार्थी बहुजन आहेत का ब्राह्मण?? आरक्षण धोरण पूर्ण चुकले आणि फसले आहे का?? याचा पूर्ण गांभीर्याने विचार करा. 
 
सर्व जाती आपापले जातीनिहाय व्यवसाय करत होत्या आणि समाजाची गरज भागवत होत्या. आज त्यापैकी सुद्धा काही व्यवसाय ब्राह्मणांनी हस्तगत केले आहेत. सर्वाधिक प्रतिष्ठेच्या आणि पैसे कमावून देणाऱ्या नोकऱ्या ब्राह्मणांनी काबीज केल्या आहेत. वास्तवात हे सगळे अन्य समाजाच्या हातात येऊ शकले असते. ब्राह्मणांना शिक्षण आणि पौरोहित्य यात आपल्या संस्कृतीने बांधून ठेवले होते परंतु आजच्या परिस्थितीत बहुजन म्हणवणारे कितीही आरक्षण मिळाले तरी स्पर्धा कशी आणि किती करतील?? आणि जे पारंपारिक व्यवसाय करून पोट भरू शकत होते त्यांना आपण पांढरपेशा व्यवसाय हाच श्रेष्ठ हे मेंदूत घुसवल्याने त्यांना सुध्दा पारंपारिक व्यवसाय करण्याची इच्छा उरलेली नाही. आणि म्हणूनच महाराष्ट्रात बेकारांच्या फौजा फिरत आहेत. आणि नाभिक कर्म, खाटिक कर्म, आणि बारा बलुतेदारी मधील कितीतरी व्यवसाय आता बाह्य राज्यातील लोक किंवा अन्य धर्मीय ताब्यात घेत आहेत. 
 
परिवर्तनशील समाज
 
महाराष्ट्रीय आणि बंगाली ब्राम्हण समाज हा स्वतःच्या कुटुंबाच्या आणि समाजाच्या मर्यादेत अत्यंत परिवर्तनशील राहिला आहे. कुठल्याही चांगल्या बदलाला या समाजाने जाहीर विरोध केला असला तरी वैयक्तिक आणि स्वतःच्या समाजापुरते मात्र सगळ्यात आधी स्विकारले आहे. त्यातूनच त्यांनी स्वतःची मक्तेदारी निर्माण केली आहे. स्त्रियांना शिक्षण नाकारणारा, सावित्रीबाई फुलेंवर दगड आणि शेण मारणारा ब्राम्हण समाज शिक्षणाचे महत्त्व ओळखून सगळ्यात आधी आनंदी जोशींच्या रूपाने भारतातली पहिली महिला डॉक्टर स्वतःच्या समाजातून बनवतो, महर्षी कर्वे यांच्याकडून महिलांसाठी स्वतःचे पहिले विद्यापीठ उभा करतो आणि स्त्रीचा विधवा किंवा सामान्य पुनर्विवाह करण्यात सर्वात अग्रेसर असतो.
 
समुद्र ओलांडल्यामुळे जातीय वर्ण नाहीसा होतो म्हणून स्वतःच्या पुढाऱ्यांना शिक्षा घ्यायला भाग पाडणारा ब्राम्हण समाज विलायतेत शिकायला स्वतःच्या पोरांना पाठवायला उत्सुक असतो, आणि "सागरा प्राण तळमळला" हे देखील कौतुकाने ऐकतो. आता तर बहुसंख्य ब्राम्हण समाज समुद्र ओलांडून, भारतीयत्व सोडून अमेरिकन झालाय आणि त्याचा अभिमान बाळगून आहे. चपला बनवणे हे खालच्या जातीचे काम आहे असे मानणारा ब्राम्हण समाज आज पटवर्धन आणि अभ्यंकर सारखे ब्रँड उभे करतो. ब्रेड खाऊ घालून ख्रिस्ती मिशनरी आपला धर्म बाटवतात हे सांगणारा ब्राम्हण समाज आज जोशी वडेवाले बनून समस्त लोकांना वडापाव खाऊ घालतो. आंतरजातीय लग्न तुलनेने सगळ्यात जास्त ब्राम्हण समाजात होतात आणि तरीही महाराष्ट्रात ऑनर किलिंग घडल्याचे कधी मी तरी वाचले नाही. ब्राम्हणाच्या अभिनेत्रींनी परधर्मातल्या मुलांशी लग्ने केली म्हणून कुटुंबाने किंवा समाजाने त्यांना वाळीत टाकले वगैरे मी ऐकले नाहीये. मांसाहार पाप मानणारा ब्राम्हण समाज सदाशिव पेठेत सगळ्यात जास्त मांसाहारी भोजनालये उभारतो.
 
ब्राम्हण समाजाच्या ह्या वागण्याला दुतोंडीपणा म्हणून भूमिका घेतली जाऊ शकते, पण सत्य हे आहे की फुले, शाहू, आंबेडकर, सयाजीराव, भाऊराव पाटील या लोकांनी जे काही विचार आणि कार्य बहुजन समाजाला ब्राम्हणी वर्चस्वाच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी केले, त्यातून बहुजनांनी कमी आणि महाराष्ट्रीय ब्राम्हण समाजाने जास्त धडा घेतला. डार्विन म्हणतो की तेच सजीव टिकून राहतात जे आजूबाजूच्या बदलांशी जुळवून घेतात. आणि या बाबतीत महाराष्ट्रीय ब्राम्हण समाज सगळ्यात पुढे आहे आणि म्हणूनच तो आजही स्वतःची सांस्कृतिक, आर्थिक आणि शैक्षणिक मक्तेदारी टिकवून आहे.
 
उत्तर आणि दक्षिण भारतातले बहुतांश ब्राम्हण हे आजही प्रचंड रूढीवादी आहेत, पण महाराष्ट्र आणि बंगालमधील ब्राम्हणांनी समाजसुधारक लोकांचं कार्य वेळीच ओळखले आणि ते अंगिकारून स्वतःचा उत्कर्ष घडवला. जेव्हा बहुजनांची पोरे दगड मारून, शाई फेकून, मोर्चे काढून, अंगावर केसेस घेवून स्वतःचे आयुष्य मातीत घालत असतात, तेव्हा ब्राम्हण समाजातील मुले कुठल्यातरी परीक्षेच्या तयारीत किंवा व्यवसाय-नोकरीत राहून "जाऊ दे आपल्याला काय करायचं आहे?" म्हणून अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करत स्वतःची प्रगती सुरू ठेवत असतात. ब्राम्हणवाद संपवायचा असेल तर बहुजनांना आधी महाराष्ट्रीय किंवा बंगाली ब्राम्हणांसारखी लवचिकता, व्यावहारिक दृष्टिकोन स्वतःच्या खासगी आणि सामाजिक जीवनात आणावा लागेल. नाहीतर येणाऱ्या पिढ्यान् पिढ्या फक्त वांझोट विरोध करण्यात वाया जातील.
 
ब्राह्मण द्वेष आणि आरक्षण ही आपली शस्त्रे मानून अजूनही त्याच आवर्तनात फिरणारे बहुजन आत्मपरीक्षण कधी आणि कसे करतील?? याचा अर्थ असा नाही की मी आरक्षण सोडून द्या असे सांगतो आहे. पण आरक्षणाचे संरक्षण वांझोटे आहे हे समजून घ्या, हे मात्र नक्कीच सांगतो आहे. मी सांगत नाही की ब्राह्मण द्वेषाचा त्याग करा पण ब्राह्मण द्वेष निर्बुद्ध व्यक्ती सारखा करू नका. ज्या नेत्यांनी तुम्हाला ब्राह्मण द्वेष शिकवला, त्या चष्म्यातून ब्राह्मणांचा द्वेष करू नका. 
 
एक वेगळा विचार देतो. ब्राह्मणांवर प्रेम नका करू, ब्राह्मणांना श्रेष्ठ नका मानू. पण ब्राह्मणांचा द्वेष करायच्या ऐवजी स्पर्धा करा.. 
 
तसे पाहिले तर सामान्य पुरोगामी व्यक्तीच्या आयुष्यात जन्माला आल्यापासून मरेपर्यंत ब्राह्मण येतच नाही. बायको गर्भवती असताना खाजगी दवाखान्यात जाल तर तिथे जाताना तुम्ही गैर ब्राह्मण डॉक्टर निश्चित गाठू शकता. मुल झाल्यावर नामकरण करताना तुम्हाला ब्राह्मण लागत नाही. लग्न सुद्धा तुम्ही रजिस्टर करू शकता, ब्राह्मण लागत नाही. मृत्यूनंतर सुद्धा विद्युत दाहिनीत जाळू शकता, ब्राह्मण लागत नाही. जन्माला आल्यापासून मरेपर्यंत जर तुमचे ब्राह्मणांच्या वाचून काही अडतच नाही तर विनाकारण द्वेष करून स्वतःची उर्जा कशाला वाया घालवता??
 
हे १००% सत्य आहे की आपल्या समाजात दलितांना सामाजिक स्थान दिले जात नसे. त्यांचा अपमान केला जात असे. पण तो कालखंड मागे पडूनही आता २०० वर्ष लोटली आहेत. अजूनही त्याच त्याच गोष्टी उगाळून नक्की काय हशील आहे?? त्यासाठी आजचे तुमचे जीवन द्वेषाने भरू नका. ज्ञानाचे, स्पर्धेचे प्रत्येक क्षेत्र तुम्हाला आणि ब्राह्मणांना समान खुणावते आहे. तुम्ही तुमची उर्जा ब्राह्मण द्वेषात खर्च करतात. तो विचार मांडणाऱ्या नेत्यांचे कार्यकर्ते होऊन मिरवता. तुमच्या वयाचे ब्राह्मण तरुण याच काळात अभ्यास करून त्या क्षेत्रात मुसंडी मारतात. होतं काय की ५-१० वर्षांच्या नंतर तुमच्या बरोबरचा तुमचा मित्र भरपूर पैसे कमावत असतो. आणि तुम्ही विद्वेषी विचार पोसून आयुष्यात कुठेच नसता. 
 
परिणाम काय? अजून ब्राह्मण द्वेष वाढतो. 
 
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय म्हणाले होते? शिका, संघटीत व्हा आणि संघर्ष करा.
 
यातील पहिला टप्पा शिका आपण पार करतच नाही. त्या आधीच संगठीत होऊन संघर्ष सुरु. आणि संघर्षाची दिशा काय ब्राह्मण द्वेष. ज्यातून काहीच मिळत नाही. अगदीच काहीच मिळत नाही असे नाही. भडकावणाऱ्या राजकीय नेत्याचे तुमच्याच जीवावर करियर घडते तो आपल्या नातेवाईक मंडळींच्या साठी कोट्यावधी रुपये छापतो. आणि तुम्ही आहात तिथेच. द्वेष करायला शिकवणारे राजकीय नेते त्यावर स्वतःचे पोट भरतात हे सत्य समजून घ्या. ब्राह्मण द्वेष हा पूर्णवेळ पोट भरायचा व्यवसाय झाला आहे. आणि आता या व्यवसायात सुध्दा स्पर्धा प्रचंड वाढली आहे. 
 
ब्राह्मणांच्या नादाला तुम्ही लागू नये म्हणून तुम्हाला २२ प्रतिज्ञा दिल्या. त्यात सुद्धा देव नाकारा, ब्राह्मण लोकांच्या कडून पूजा करून घेऊ नका सांगितले. त्याचे पालन होते. पण द्वेष सुटता सुटत नाही. आणि जोवर द्वेष सुटत नाही तोवर प्रगती होत नाही. ज्या क्षेत्रात जर ब्राह्मण अग्रणी आहेत तर तिथे त्यांना मात देण्यासाठी तशी विजीगिषु वृत्ती निर्माण करा. अभ्यास, खेळ, व्यवसाय प्रत्येक बाबतीत ब्राह्मणांना मी माझ्या गुणांच्या, कौशल्यांच्या बळावर पराभूत करेन ही जिद्द बाळगा. ज्ञानाच्या, गुणवत्तेच्या प्रत्येक प्रांतात अधिकाधिक अभ्यास आणि कष्ट करून मी सर्वोच्च स्थान प्राप्त करेन जी जिद्द विकसित करा. 
 
पेशव्यांनी पर्यायाने ब्राम्हणांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव बदनाम केले असा प्रचार करणाऱ्यांनी खालील प्रश्नांची उत्तरे द्यावीत. 
  • ज्याने शहाजी राजांना कैद केले तसेच ज्याने संभाजी महाराजांचा (शिवरायांचा भाऊ) घात केला तो बाजी घोरपडे कोण होता?
  • शिवरायांच्या विरुद्ध चालून आला तो जावळीचा मोरे कोण होता?
  • ज्याने शंभू राजांना पकडून दिले तो गणोजी शिर्के कोण होता?
  • शिवरायांवर चालून आलेला त्यांचा चुलता मंबाजी भोसले कोण होता?

 

हे प्रश्न प्रतीकात्मक आहेत आणि त्यात कुठल्याही विशिष्ठ जातीचा अपमान करण्याचा उद्देश नाही. गद्दारी, फितुरी हा कुठल्याही एका ठराविक जातीचा, पंथाचा दुर्गुण नाही. असे लोक प्रत्येक जातीत आढळतात; इतिहासाच्या पानापानांवर अशा गद्दारांची नावे आढळतात. पण डोळ्यांवर जातीयवादाचा चष्मा लावणाऱ्यांना दुसरे काही दिसत नाही. 

 
मित्रहो.. याचा प्रत्येकाने गांभीर्याने विचार करणे अत्यावश्यक आहे.
 
 
@ यशवंत मराठे 
yeshwant.marathe@gmail.com 
 

Leave a comment



Rajendra Phadke

3 years ago

विचारप्रवर्तक लेख - पण, माझ्या मते, दुर्दैवाने मोकळ्या मनाने विचार करू शकणारे बहुजन कितीसे आहेत, ह्याचीच शंका आहे!

सDudhir Dandekar

3 years ago

भारताचा द्वेष करून पाकिस्तानची जी स्थिती झालेली आहे तसाच हा प्रकार आहे द्वेष माणसाला आंधळा करतो ही. गोष्ट लक्षात घेतली पाहिजे एक वेगळ्या दृष्टिकोनातून चांगले विचार मांडले आहेत

Prashant Naik

3 years ago

विचार करायला लावणारा लेख . समाजातील उच थरातील व्यक्ति व त्यांची मुले ही नेहमीच वेगळ्या वाटा अजमावतात . त्याचे फायदे आपल्या पुढे दिसत आहेत. आरक्षण हे एक शापित मृगजळ ठरत चालले आहे. सरकारी नोकऱ्या कमी कमी होत आहेत . त्यामुळे आरक्षित जागा देखील कमी होत आहेत. आरक्षित पदांवरील सरकारी अधिकाऱ्यांची मुले योग्य शिक्षण घेऊन आपल्या आई वडिलां सारखे ऊच पदस्थ अधिकारी बनत आहेत. जी मागासवर्गीय मुले गरीब घरातून येतात त्यांना ह्या आरक्षणाचा काहीही फायदा होत नाही , कारण त्यांचेच जाती बांधव आपल्या शिक्षण / क्लाससेस च्या superior input मुळे स्पर्धा परीक्षा सहजतेने पर करतात.
मग उरले काय ? आपल्या नैराश्य चा राग कोणाच्या तरी डोक्यावर फोडण्याचा उपदव्याप

पुष्कराज चव्हाण

3 years ago

माझे बहुतेक मित्र हे ब्राह्मण समाजातले असून केवळ दोन-तीनच बहुजन समाजातले आहे. मी माझ्या शालेय जीवनात या सर्वांच्या घरी गेलेलो आहे आणि सर्वांकडे मला आपुलकी आणि प्रेमाची वागणुक मिळालेली आहे. या मित्रांनी ही माझ्यावर खूप प्रेम केलं. त्यामुळे माझ्या मनाला कधीच ब्राम्हणद्वेष शिवला नाही. ब्राह्मण द्वेष हा दुर्दैवी आहे. आणि तू म्हणतोस तसा त्यात काहीच अर्थ नाही.

Contact Form

subscribe

Thank you for subscribing.

Something went wrong.

Contact Info

  • yeshwant.marathe@gmail.com

Follow Me

My Other Blogs: historycafe.in

Copyright © 2020 Sarmisal.

Made with ♡ by iTGS