शेती - एक अपरिहार्यता?

शेती व्यवसाय गोत्यात का आला ??
 
आपला भारत हा शेतीप्रधान देश आहे असे मानले जायचे. स्वातंत्र्य मिळाले तेव्हा अर्थव्यवस्थेत शेतीचा असलेला सुमारे ५५% हिस्सा आज अंदाजे १७-१८% इतका कमी झाला आहे. सुमारे पन्नास वर्षांपूर्वी माणसाची श्रीमंती व प्रतिष्ठा ही शेतीवर अवलंबून होती. परंतु आजची काय परिस्थिती आहे? गावातील एखाद्या माणसाला काय करतोस असा प्रश्न विचारला की त्वरित उत्तर मिळते - "काय नाय जी, शेती करतो". म्हणजेच त्याचा अर्थ दुसरा काही पर्याय नाही म्हणून शेती. 
 
त्यावेळच्या शेतकऱ्यांची तरुण पिढी एक तर शहरात स्थलांतरित झाली अथवा गावात उनाडक्या करत फिरते. त्यांना शेती करण्यात शून्य इंटरेस्ट. वंशपरंपरागत चालत आलेल्या जमिनीचे झालेले शेकडो तुकडे, त्यात पून्हा त्यावर चालू असलेले कोर्टाचे दावे आणि कज्जे. त्यामुळे आजचा शेतकरी पार पिचून गेला आहे. 
 
आज शहरांप्रमाणेच ग्रामीण भागात देखील श्रीमंत आणि गरीब यांच्यातील आर्थिक दरी खूप वाढते आहे. परंतु आज परंपरेने प्रतिष्ठित असणारे श्रीमंत शेतकरी एक प्रकारे लुळे पांगळे जीवन जगत आहेत कारण सर्व कामे मजुरांकडून करून घेण्याची सवय झाली आहे. शेतीतील अगदी किरकोळ कामांसाठी देखील मजुरांवर अवलंबून राहण्याची वेळ आली आहे. 
 
त्याच सुमारास शेतीत मोठया प्रमाणात यांत्रिकीकरणाला सुरुवात झाली. आता मजुरांना काम मिळणार नाही, मजुरांची मस्ती जिरेल अशा गप्पा मोठे शेतकरी मारू लागले होते परंतु याचा उलट परिणाम झाला. शेतकऱ्याप्रमाणेचं मजूर देखील आळशी झाले आणि नांगरणी, वखरणी, विहिरी फोडणे यासारखी असंख्य अंगमेहनतीची कामे सहज करणारे मजूर अगदी किरकोळ कामांना देखील नकार देऊ लागले. निवडणुका जिंकण्यासाठी मग सबसिडी आली. गरिबांसाठी स्वस्त धान्य उपलब्ध होऊ लागले, त्याचा अत्यंत प्रतिकूल परिणाम शेती व्यवसायावर झाला. मजुरांमधील व्यसनाधिनता वाढली, आणि आळसासोबतच त्यांची कार्यक्षमता कमी झाली.
 
मोठया शेतकऱ्यांनी एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे होती की, शेती करणे हा "आपला" व्यवसाय आहे त्यामुळे मजुरांच्या नावाने ओरड करण्यात काही अर्थ नाही. परंतु या शेतकऱ्यांनी केले काय? 
 
१. गावपातळीवरील निवडणुका जिंकण्यासाठी व स्वतःची प्रतिष्ठा सिद्ध करण्यासाठी लबाड व फुकट्या लोकांसाठी आणि कधीही कामात न पडणाऱ्या लोकांसाठी खर्च करणे.
 
२. शेतीत अनावश्यक गुंतवणूक करणे; उदाहरणार्थ आपला परिसर कोरडाठाक आहे हे माहीत असून देखील ठिकठिकाणी ट्युबवेल करणे, शाश्वत पाण्याचा साठा नसून देखील चार पाच किलोमीटर अंतरावरून पाईपलाईन करणे इत्यादी.
 
३. ठिबक सिंचनासाठी अट्टाहास करणे: ठिबक संच व्यवस्थित सांभाळणे कठीण होऊन जाते कारण  म्हणजे नळ्या चोरीस जाणे, नळ्याचे खारी व उंदरांकडून होणारे नुकसान, नळ्या बंद पडणे, ठिबक संच जोडण्यासाठी किरकोळ साहित्य वारंवार खरेदी करणे, ठिबकमुळे शेताची कोळपणी नीट न होणे, त्यामुळे तण माजणे परिणामी मजुरीवरील खर्च वाढणे. पर्यायाने अमाप खर्च करणे. 
 
४. लग्नकार्यात आपल्या ऐपतीपेक्षा जास्त खर्च करणे, हुंडा देण्यासाठी एक तर जमिनीचा तुकडा विकणे अथवा प्रसंगी कर्ज काढणे. 
 
परंतु महत्वाचा प्रश्न म्हणजे शेतीचे उत्पन्न वाढवायचे कसे? 
 
मृगाचा पाऊस पडून गेला आणि आपण पंधरवड्यात कधीही बाहेर फिरायला गेलो तर आपल्याला तरारून आलेले हिरवेगार गवत दिसते. झाडे पण रसरसलेली दिसतात, असे हे सगळे दृश्य असते जे आपल्या सगळ्यांना जाणवते. पण त्याच्या मागचा कार्यकारण भाव काय आहे याची जाणीव फार कमी लोकांना असते. 
 
सजीवाच्या निर्मितीसाठी १६ प्रकारची अमिनो आम्ले लागतात, त्या पैकी दोन अमिनो आम्ले ही विद्युतभारीत असावी लागतात. अर्थात जीवाच्या निर्मितीसाठी विजेची आवश्यकता आहे. जीवातील चेतना कदाचित विद्युत उर्जेने कार्यरत होत असेल. शास्त्रज्ञांनी एकपेशीय सजीव प्रयोग शाळेत घडवताना हे सिद्ध केले आहे. 
 
ढगांचा गडगडाट आणि विजांचा कडकडाट होऊन पाऊस कोसळतो त्यावेळी पृथ्वीवर हे विद्युतभारीत जल कोसळते. त्या पावसानंतर शेतात पेरलेल्या बीजातून जे पिक येईल त्याच्या वाढीचा वेग उत्तम असेल. त्या पिकाची रोगप्रतिकार क्षमता उत्तम असेल आणि तुम्ही जितक्या बिया पेरल्या असतील त्यातील बहुतांशी बिजांचे रोपात रुपांतर होईल. याचं कारण जमिनीला जे विद्युतभारीत जल प्राप्त झाले आहे, ते सृजनाचा वेग वृद्धिंगत करते आणि बीजाला चेतना देऊन फलित करते. 
 
ही गोष्ट वेद रचयित्या ऋषींनी लाखो वर्षांपूर्वी सांगितली असं म्हटले की आजच्या मंडळीना थोतांड वाटण्याचा संभव आहेच. पण हे कपोलकल्पित नाही. हे पूर्ण निसर्ग विज्ञान आहे. 
 
गुगल करून बघा इलेक्ट्रोकल्चर हा शब्द वाचायला मिळेल. 
 
Electro Culture is a group of techniques that uses electricity & magnetism to assist plant growth. Plants are sensitive to electricity & magnetism. Improved plant growth, quality & increased yields are some of the noticeable effects. The technology can also be used to protect plants from pests & diseases. 
 
पावसाळ्याच्या सुरुवातीला पडणारे पाणी असे विद्युतभारीत आणि चेतनामय असते. म्हणूनच झाडे रसरसलेली दिसतात.  
 
या तंत्राच्या वापराचे चीन आणि अमेरिकेत शेकड्यांनी प्रयोग चालू आहेत. याचा त्यांना लाभ सुद्धा होतो आहे. पण हे सगळे कृत्रिम प्रयोग आहेत. ही कृती निसर्ग मात्र स्वतः घडवतो. तुम्ही फक्त ती वेळ साधून तुमची पिके लावली पाहिजेत इतकेच. यासाठी तुम्हाला कोणत्याही कृत्रिम प्रयत्नांची गरजच नाही. 
 
आपल्याकडील ऋषींनी हे सूत्र निसर्गातूनच समजून घेतले आणि त्याला आपल्या शेतकऱ्यांना वापरण्याची पद्धती सुद्धा सुचवली. जुन्या काळात आपल्याकडे एक पद्धत होती, चैत्र पाडवा अर्थात गुढी पाडव्याला ग्राम सभा होणार. शेतीचे सगळे करार होणार (बटई आदी). त्यानंतर गावातील ब्राह्मण पंचांग वाचून सांगणार. त्यात पर्जन्यफळ हा महत्वाचा भाग असे. या वर्षी कोणत्या नक्षत्रावर किती पाउस पडणार आहे आणि त्या नुसार या वर्षी कोणते पिक चांगले येणार आहे याचे ते भाकीत असे. शेतकरी त्या अनुसार, त्या नक्षत्रावर पाऊस पडला, की त्या प्रमाणे लागवड करत असत. ही साधी सोपी, अत्यंत प्रभावी पद्धत. 
 
आजच्या स्पर्धेच्या जगात गट शेती करून बाजारपेठेच्या मागणीप्रमाणे उत्पादन करणे अत्यंत गरजेचे आहे. त्याच बरोबरीने शेती व्यवसायाला पूरक व्यवसाय अथवा शेतीसोबत कमी भांडवलावर उभे राहणारे छोटेमोठे व्यवसाय सुरू करावेत,
 
आत्मविश्वास, चिकाटी व ठाम धोरण निश्चित करून या कठीण परिस्थितीतून मार्ग काढणे हा एकच पर्याय आहे. आणि यासाठी सर्वांनी एकत्र येणे व सल्लामसलत करणे आवश्यक आहे तरंच शेतकरी टिकेल.
 
 
@ यशवंत मराठे 
yeshwant.marathe@gmail.com
 
 
 
प्रेरणा: 'सुजीत भोगले' यांचा लेख आणि 'अमृतकुंभातील तुषार' पुस्तक
 

Leave a comment



प्रशांत नाईक

2 years ago

आपल्या GDP चा ५५% भाग असलेला शेती व्यवसाय हा फक्त १८% झाला आहे. पण त्याचे कारण वेगळे आहे. इंजिनीअरिंग व सेवा व्यवसाय खूप वाढले आहेत. त्याच बरोबर शेतीची उत्पादकता काही पटींनी वाढली आहे. पूर्वी जे पीक एका एकरात मिळत होते त्यांच्या ३-४ पट अधिक पीक आज मिळते.
आपल्या देशात सुद्धा अनेक प्रयोग चालू आहेत व त्याचा परिणाम गावांमध्ये दिसून येत आहे.

Contact Form

subscribe

Thank you for subscribing.

Something went wrong.

Contact Info

  • yeshwant.marathe@gmail.com

Follow Me

My Other Blogs: historycafe.in

Copyright © 2020 Sarmisal.

Made with ♡ by iTGS