किशोर आणि दुर्मिळ संगीतकार 

या चित्रपट सृष्टीत दर्जेदार पार्श्वगायकांची अजिबात वानवा नाही; जी अगदी कालच्या कुंदनलाल सैगल पासून आजच्या अरिजीत सिंग पर्यंत लांबलचक होईल. आपल्या जगाच्या आभाळात एकच ध्रुवतारा असला तरी पार्श्वगायकांच्या मांदियाळीत मात्र किशोरकुमार आणि मोहम्मद रफी असे दोन ध्रुव तारे आहेत असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरणार नाही. 

 

 
"किशोर कुमार" असा विचार केला तर प्रामुख्याने कोणती नावे समोर येतात? संगीतकारांमध्ये सचिन देव बर्मन, राहुल देव बर्मन, लक्ष्मीकांत प्यारेलाल, कल्याणजी आनंदजी, राजेश रोशन व बप्पी लाहिरी आणि नायकांमध्ये प्रामुख्याने राजेश खन्ना, देवआनंद अमिताभ बच्चन; तसेच शशी कपूर, संजीवकुमार, धर्मेंद्र, जितेंद्र व ऋषि कपूर. याला काय कारण असावे? शंकर जयकिशन, ओ पी नय्यर, रवि, मदनमोहन, सी रामचंद्र हे अभिजात आणि दर्जेदार संगीतकार किशोरकुमारच्या बाबतीत काहीसे हात आखडताना दिसून येतात किंवा कदाचित त्यांचे कंपोझिशन किशोरच्या आवाज आणि गायकीला अनुसरून होत नसावे. 
 
तुमच्या अंदाजाने किशोरकुमारने किती संगीतकाराकडे गाणी गायली असावीत? सचिन देव बर्मन, राहुल देव बर्मन, लक्ष्मीकांत प्यारेलाल, कल्याणजी आनंदजी, राजेश रोशन, बप्पी लाहिरी आणि स्वतः संगीतकार किशोर कुमार हे न धरता त्यांची एक यादीच पाहूयात.  
 
१. खेमचंद प्रकाश २. हंसराज बहल ३. मदनमोहन ४. हुस्नलाल भगतराम ५. भोला श्रेष्ठ ६. चिक चॉकलेट (हे संगीतकाराचे नाव आहे) ७. रोशन ८. मन्नाडे ९. अनिल बिस्वास १०. उस्ताद अली अकबर खान ११. आर सुदर्शनम आणि धनीराम १२. सी रामचंद्र १३. अविनाश व्यास १४. खय्याम १५. चित्रगुप्त १६. सलिल चौधरी १७. वेदपाल १८. सुधीर फडके १९. बी डी बर्मन २०. जयदेव २१. बुलो सी रानी २२. शंकर जयकिशन २३. ओ पी नय्यर २४. हेमंत कुमार २५. रवि २६. एन दत्ता २७. एस मोहिंदर २८. बिपीन दत्ता २९. उषा खन्ना ३०. प्रेम धवन ३१. गणेश ३२. सोनिक ओमी ३३. चाँद परदेसी ३४. एम के पुजारी ३५. जयकुमार पार्टे ३६. लाला सत्तार ३७. शारदा ३८. सपन चक्रवर्ती ३९. सत्यम ४०. रवींद्र जैन ४१. प्रदीप रॉय चौधरी ४२. सपन जगमोहन ४३. श्यामल मित्रा ४४. नितीन मंगेश ४५. अनिल अरुण ४६. श्यामजी घनश्यामजी ४७. हेमंत भोसले ४८. अनु मलिक ४९. हृदयनाथ मंगेशकर ५०. राम लक्ष्मण ५१. बाबला ५२. अमर उत्पल ५३. जुगल किशोर - तिलकराज ५४. बासू मनोहारी ५५. महेश - नरेश ५६. वनराज भाटिया ५७. अजित वर्मन ५८. अनुप जलोटा ५९. आनंद मिलींद ६०. मनोज - ज्ञान ६१. उत्तम - जगदीश ६२. दीपन चॅटर्जी ६३. नदीम श्रवण ६४. सी पी भाटी ६५. मन्धीर जतिन ( जतिन ललित मधला जतिन) ६६. नचिकेता घोष ६७. दक्षिणा मोहन टागोर ६८. चंद्रू हिंगोरानी ६९. शिव हरी 
 
वरील लिस्टमध्ये जरी किशोरकुमार सोडला आणि आधीचे एस डी सकट सहा जण मिळवले तर किमान ७५ संगीतकाराकडे किशोरकुमार गायलेला आढळतो. आता यातील हे प्रमुख सहा जणं म्हणजे सचिन देव बर्मन, राहुल देव बर्मन, लक्ष्मीकांत प्यारेलाल, कल्याणजी आनंदजी, राजेश रोशन आणि बप्पी लाहिरी कडे किशोरकुमार अक्षरशः धोधो गायलाय, त्यांच्या प्रसिद्ध गाण्यांचा विचार केला तर हा लेख संपणारच नाही. आणि मला कल्पना आहे की ती सर्व गाणी तुमच्यातील बऱ्याच जणांना माहिती असतीलच. 
 
परंतु या यादीतील मानवंत आणि अप्रसिद्ध संगीतकारांची गाणी घ्यायची म्हटली तरी हा लेख खूप मोठा होईल, म्हणून मग विचार केला की यातील काही नामवंत संगीतकारांच्या किशोरकुमारने गायलेल्या दर्जेदार गाण्यांचा छोटासा आढावा घेऊया. कशी वाटते कल्पना? 
 
१. किशोरकुमार आणि सुधीर फडके - पूर्वी रेडिओ सिलोन स्टेशनवर महिन्याच्या प्रत्येक पहिल्या तारखेला आपल्या बाबूजींचे गाणं न चुकता लागत असे, ते गाणं इतकं लोकप्रिय झालं की विचारु नका, ते अर्थातच किशोरकुमारने गायलं होतं, सिनेमाचं नाव होतं 'पहिली तारीख' आणि ते गाणं होतं - दिन है सुहाना आज पहिली तारीख है...
 
२. किशोरकुमार आणि मदनमोहन - मदनमोहनने खरतर लता मंगेशकर यांच्या सोबत जबरदस्त काम करुन ठेवलय. त्याचा आवडता पार्श्वगायक होता मोहम्मद रफी, परंतु जेव्हा गरज पडली तेव्हा त्यानं किशोरचा आवाज पण वापरला. अदा, भाई भाई, चाचा झिंदाबाद, मनमौजी, परवाना, लडका लडकी, बावर्ची, एक मुठ्ठी आसमान या सारख्या काही मोजक्याच सिनेमात ही जोडी जमली. यातील मनमौजी सिनेमातील गाणं खूप लोकप्रिय आहे - जरुरत है जरुरत है जरुरत है... आणि दुसरे महत्वाचे गाणे - हर कोई चाहता है इक मुठ्ठी आसमान
 
३. किशोरकुमार आणि ओ पी नय्यर - ओपी मुख्यत्वे गुरुदत्त आणि शम्मी कपूर सोबत काम करत असे. ओपीचा पण मुख्य आवडता गायक होता मोहम्मद रफी. ओपी त्याच्या ठराविक घोडा गाडीच्या ठेक्या साठी पण ओळखला जातो. ओपी आणि किशोरकुमार हे काँबिनेशन तसं चटकन लक्षात येत नाही, परंतु नया अंदाज, कभी अंधेरा कभी उजाला, अक्लमंद, श्रीमानजी, ऐसा भी होता है, आणि एक बार मुस्कुरा दो या काही मोजक्या सिनेमात हे काँबिनेशन आढळून येत, यातील एक बार मुस्कुरा दो मध्ये एक किशोरचे कमालीचे गाजलेले सोलो गाणं आहे - रुप तेरा ऐसा दर्पण में ना समाए...
 
४. किशोरकुमार आणि शंकर जयकिशन - खरं तर मुकेश आणि मोहम्मद रफी हे शंकर जयकिशनचे सर्वात आवडते गायक होते. पण नई दिल्ली, शरारत, करोडपती, रंगोली, उमंग, अलबेला, अंदाज, एक नारी एक ब्रह्मचारी, जाने अंजाने, दुनिया क्या जाने, कल आज और कल, लाल पत्थर, पर्दे के पीछे, सीमा, दिल दौलत दुनिया, जंगल मे मंगल, रिवाज, आज की ताजा खबर, वचन, लव इन बाँबे, महफिल, गंगा और गीता, चोरनी, इट का जवाब पत्थर से या सिनेमात किशोरनं शंकर जयकिशन साठी हजेरी लावली, यातील १९७१ चा राजेश खन्नाच्या अंदाज मधील गाणं भारतभर गाजलं होतं - जिंदगी एक सफर है सुहाना... 
 
५. किशोर कुमार आणि रवी - रवी हा गुणी संगीतकार. खास करुन बी आर चोप्रा कँपचा आवडता संगीतकार होता. महेंद्र कपूरचा सुयोग्य वापर जर कोणी केला असेल तर तो आधी रवीने आणि मग कल्याणजी आनंदजी व ओपीने. परंतु रवीकडे किशोरकुमारने पण काही गाणी गायली आहेत. दिल्ली का ठग, बाँबे का चोर, धडकन, नाग पंचमी, एक महल हो सपनों का, मनु द ग्रेट या काही माफक सिनेमांच्या पलीकडे हे काँबिनेशन फारसं गेलं नाही. परंतु दिल्ली का ठग मध्ये आशा भोसले यांच्या समवेत गायलेलं हे जे गाणं आहे त्याला तोड नाही आजतागायत - ये राते ये मौसम नदी का किनारा... तसेच मला खूप आवडणारे गाणे म्हणजे - देखा है जिंदगी को कुछ इतना करीब से (चित्रपट: एक महल हो सपनों का)
 
६. किशोरकुमार आणि सलिल चौधरी - वास्तविक हे बंगाली कनेक्शन असून पण किशोरकुमार सलिल चौधरींकडे तसा कमी गायलाय, सलिल चौधरींचा आवडता गायक तसा मुकेश होता. परिवार, आवाज, मुसाफिर, हाफ टिकट, मेरे अपने, अनोखा दान, अन्नदाता, जीवन ज्योती या सारख्या सिनेमात किशोरकुमारने सलिल चौधरीच्या रेकॉर्डिंगला हजेरी लावली. यातील हाफ टिकट मधलं गाणं जे किशोर पुरुष आणि महिला अश्या दोन्ही आवाजात गायला ते गाणं होतं - 'आके सीधी लगी दिल पे जैसे कटरिया', हे गाणं अफलातून आहे आणि हे फक्त किशोर कुमार गाऊ शकतो. तसचं मेरे अपने मधल्या 'कोई होता' याला तोड नाही. परंतु एक खास गाणं नमूद करावयाचे आहे ते अन्नदाता सिनेमातील आहे आणि हे गाणं नीट ऐका कारण इतके चढ उतार गाण्याच्या पट्ट्यांचे आहेत की कोणीही सराईत गायक पुन्हा मूळ पदावर येणं मुष्कील समजेल, इतके ते गायला अवघड आहे पण किशोरकुमारने कमाल करुन ठेवली आहे, गाणं आहे - गुजर जाए दिन दिन....
 
७. किशोरकुमार आणि सी रामचंद्र - किशोरकुमारने सी रामचंद्र सोबत लहरे, पहिली झलक, बाप रे बाप, आशा, दाल में काला, पायल की झंकार, रुठा न करो हे सिनेमे केले आहेत एक पार्श्वगायक म्हणून. यातील सर्वात प्रचंड लोकप्रिय गाणं अर्थातच आशा या सिनेमा मधील, जे आशा भोसले यांच्या समवेत गायलेलं जे तेव्हाचं कदाचित पहिलं रॅप साँग या सदरात मोडणारं होतं - इना मिना डिका... 
 
८. किशोरकुमार आणि खय्याम - किशोरचा ठेहराव असलेला आवाज जर ऐकायचा असेल तर खय्याम शिवाय पर्याय नाही, गाणं ऐकताना शांत वाटत रहातं आणि हीच खरी ताकद होती खय्याम यांची, त्यांनी धोबी डाॅक्टर, कभी कभी, त्रिशूल, थोडीसी बेवफाई, दर्द, दिल ए नादान या सिनेमात सोबत काम केलंय. यातील सगळीच किशोरची गाणी अप्रतिम आहेत. परंतु राजेश खन्नाच्या थोडीसी बेवफाई मधलं गाणं जे किशोर कुमारने लता मंगेशकर यांच्या समवेत गायलेलं लाजवाब गाणं म्हणजे - हजार राहें मुडके देखी...
 
९. किशोरकुमार आणि रविंद्र जैन - निसर्गदत्त संगीताची देणगी असलेली ही दोन माणसं खरतर, कारण रवींद्र जैन हे डोळ्यानं आंधळे असून पण जर संगीतात काय ताकद असू शकते हे सर्व जगाला दाखवून देणारं व्यक्तीमत्व. या जोडीने सौदागर, चोर मचाए शोर, पती पत्नी और वो, प्रतिशोध, भाग्य, मेहरबानी वगैरे सिनेमात काम केलय. परंतु या सगळ्यात शशीकपूरच्या 'चोर मचाए शोर' मधलं गाणं अत्यंत भावस्पर्शी असलेलं लोकप्रिय होतं - घुंगरू की तऱ्हा बजता ही रहाँ हू मैं 
 
१०. किशोर कुमार आणि जयदेव - चित्रपट: मान जाईये - ये वही गीत है जिस को मैने
 
११. किशोरकुमार आणि चित्रगुप्त - चित्रपट: इंतजार - चंदा की किरनो से लिपटी हवाए
 
१२. किशोर कुमार आणि सपन जगमोहन - चित्रपट: कॉल गर्ल - उलफत में जमाने की हर रस्म को ठुकराओ
 
तर अशा प्रकारे साधारणपणे किशोरनं त्याच्या काही दुर्मिळ संगीतकारांकडे काही छान कामगिरी करुन ठेवली आहे, खरं तर हा विस्तार अजून खूप वाढू शकतो कारण शिव हरी, हृदयनाथ मंगेशकर, हेमंत कुमार, श्यामल मित्रा आणि स्वतः किशोरकुमार यांनी एक संगीतकार म्हणून रसिकांसाठी किशोर सोबत काही अफलातून ठेव ठेवली आहे. तसेच अगदी अनु मलिक, आनंद मिलींद, नदीम श्रवण पर्यंत किशोरची श्रवणीय गाणी आहेतच. याचे कारण किशोरकुमार हे एक अजबच रसायन होतं. आणि बहुतेक सर्व संगीतकारांना किशोरच्या आवाजानं भुरळ घातली. 
 
त्याचा आवाज थेट त्याच्या हृदयातून आपल्या हृदयाचा भेद घेत असल्याचे कित्येक गाण्यांमधून दिसते. अभिनयाचा खुबीने वापर त्यानं त्याच्या गायकीत अप्रतिम करुन घेतला. किशोरचा व्हॉइस मॉड्युलेशनचा अभ्यास जबरदस्त होता. तो अजून जगला असता तर मला खात्री आहे की ए आर रहमानने त्याच्या आरडी एवढाच छान उपयोग करून घेतला असता. पण आपले नशीब तेवढे चांगले नाही. एका परफेक्ट पार्श्वगायकाची व्याख्या काय असं जर कोणी विचारले तर त्याचं उत्तर म्हणजे किशोरकुमार. 
 
एक गोष्ट कुठलाही चित्रपट रसिक मान्य करेल की सत्तरीच्या दशकात किशोर इस बॉलिवूड पे सचमुच पुरा छा गया था.. 
 
कोणत्याही पद्म आणि राष्ट्रीय पुरस्काराशिवाय या इहलोकाचा निरोप घेतला असला तरीही किशोर त्याच्या मृत्यूनंतर तब्बल ३३ वर्षानंतर सुद्धा तो अजूनही आवाजरुपी आपल्यातच कायम आहे. मला खात्री आहे की यापुढेही अव्याहतपणे रसिकांच्या मनावर राज्य करत राहील. आणि सतत रसिकांच्या व कानसेनांच्या सोबत राहून नवीन गायकांना कायम स्फूर्ती देत राहील...
 
 
@ यशवंत मराठे 
yeshwant.marathe@gmail.com 
 
 
(संदर्भ - विश्वास नेरुरकर आणि अतुल तळाशीकर यांचे लेख) 

Leave a comment



भाई देवघरे

2 years ago

मस्त माहिती.

Contact Form

subscribe

Thank you for subscribing.

Something went wrong.

Contact Info

  • yeshwant.marathe@gmail.com

Follow Me

My Other Blogs: historycafe.in

Copyright © 2020 Sarmisal.

Made with ♡ by iTGS