पार्श्वगायक किशोर

तुम्हाला शीर्षक वाचून प्रश्न पडेल की हा काय प्रकार आहे? किशोर कुमार तर पार्श्वगायक होताच मग मी वेगळं काय सांगतोय? परंतु विचार करा की पार्श्वगायक म्हणजे कोण? तर असा गायक की जो पडद्यावरील व्यक्तिरेखेच्या तोंडून गात असतो. आणि ह्या श्रेणीत लगेच समोर येणारी नावे म्हणजे सैगल, मोहम्मद रफी, मन्ना डे, मुकेश, हेमंत कुमार, तलत मेहमूद आणि हो, किशोर कुमार. प्ले बॅक सिंगर म्हणून जेव्हा आपण किशोर कुमारचा विचार करतो तेव्हा आराधना चित्रपटाच्या आधी त्याने कोणाकोणासाठी पार्श्वगायन केले असा विचार केला तर देव आनंद आणि तो स्वतः सोडून डोळ्यासमोर पटकन नावं ही येत नाहीत आणि गाणीही आठवत नाहीत.

 

 

किशोरची प्रतिभा लक्षात घेता त्याला यश खूप आधीच मिळायला हवे होते. 'Kishore Kumar - The Man with the Golden Voice’ असूनही १९४८ - १९६९ या काळात तो 'पार्श्वगायक' म्हणून इतका दुर्लक्षित का राहिला?

 

किशोरच्या पार्श्वगायनाची सुरुवात झाली १९४८ साली जेव्हा त्याने 'मरने की दुआएं क्यों मांगू' हे त्यांचे पहिले गाणे गायले, परंतु सुपरस्टार होण्यासाठी त्याला २१ वर्षे लागली. त्याने १९६९ साली 'मेरे सपनो की रानी' या गाण्याने पार्श्वगायनाचा चेहरामोहराच बदलून टाकला. पण मग त्याने या २१ वर्षांत केलं काय? ही मधली वर्षे किशोरसाठी संमिश्र स्वरूपाची होती. त्याने १९५५ - १९६० दरम्यान एक अभिनेता म्हणून यश पाहिले पण ६० च्या दशकात आयुष्यातील वैयक्तिक अडचणींमुळे त्याला सर्व क्षेत्रांत उतरती कळा लागली. परंतु जेव्हा त्याने ६० च्या दशकाच्या उत्तरार्धात पार्श्वगायनालाच आपले करियर बनवण्याचा निर्णय घेतला तेव्हा फक्त एक चित्रपट त्याच्यासाठी पुरेसा ठरला.

 

आश्चर्याची गोष्ट अशी की त्याची काही उत्कृष्ट गाणी त्याच २१ वर्षांच्या काळातील आहेत. जेव्हा प्रीतीश नंदीने किशोरला स्वतःची १० उत्कृष्ट गाणी निवडायला सांगितली, तेव्हा त्याने याच काळातली तब्बल ६ गाणी निवडली. म्हणजेच, ती वर्षे आपण पूर्णपणे दुर्लक्षित करणे चूक ठरेल.

 

त्या २१ वर्षांमध्ये, असे सामान्यतः समजले जाते की, त्याने मुख्यत्वे त्यांचा मित्र, देव आनंद यांच्यासाठी अधूनमधून पार्श्वगायन केले आणि नायक म्हणून स्वतःसाठी पूर्णवेळ पार्श्वगायन केले. तथापि, त्या वर्षांचा नीट अभ्यास केल्यावर काही मनोरंजक माहिती समोर येते. ५० च्या दशकाच्या त्याने इतर अनेक कलाकारांसाठी पार्श्वगायन केले होते. ते कलाकार कोण होते ते चला बघूया...

 

१९४९ : रिमझिम या चित्रपटात किशोरचे "झगमग झगमग करता निकला" हे अप्रतिम सोलो गीत होतं. या गाण्याचे संगीतकार खेमचंद प्रकाश होते आणि ते किशोर साहू यांच्यावर चित्रित झालं होतं. याच चित्रपटात किशोर यांचं शमशाद बेगम यांच्यासोबत पहिलं युगल गीत "मेरे घर आगे है" हे देखील होतं, जे किशोर साहू यांच्यावरच चित्रित करण्यात आलं होतं.

 

१९५० : एस. डी. बर्मन यांनी 'प्यार' या चित्रपटात राज कपूरसाठी किशोरकडून तब्बल ५ गाणी गाऊन घेतली. पडद्यावर किशोरने राज कपूर याच्यासाठी गाणं गायल्याची ही एकमेव वेळ होती. पुढे ना एस. डी. बर्मन यांना, ना किशोरला आर.के. च्या चित्रपटांमध्ये काम मिळालं नाही. याच वर्षी, हंसराज बहल यांनी 'खिलाडी' या चित्रपटात किशोरला "ओ फूल चुननेवाली तू खुद ही गुलाब है" हे गाणं दिलं. या गाण्याचा व्हिडिओ उपलब्ध नाही, पण त्या चित्रपटात अशोक कुमार नायक असल्याने, कदाचित किशोरने त्याच्या मोठ्या भावासाठी गायलेलं हे पहिलं पार्श्वगायन असावं.

 

१९५१ : संगीतकार म्हणून मदन मोहन यांनी १९५० मध्ये स्वतंत्रपणे संगीत द्यायला सुरुवात केली. 'अदा' हा त्यांचा दुसरा चित्रपट होता. या चित्रपटात त्यांनी शेखर यांच्यावर चित्रित केलेल्या दोन गाण्यांसाठी किशोरला पार्श्वगायन करायला दिलं. पण त्या वर्षीचं सर्वात यशस्वी गाणं होतं एस. डी. बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं, 'बहार' चित्रपटातील करण दिवाण यांच्यावर चित्रित झालेलं "कुसूर आपका हुजूर आपका". त्याच वर्षी एस. डी. बर्मन यांनी किशोरकडून तीन वेगवेगळ्या अभिनेत्यांसाठी गाणी गाऊन घेतली – बहारसाठी करण दिवाण, नौजवानसाठी प्रेमनाथ आणि एक नजरसाठी गोप. त्याच वर्षी, किशोरने तलत मेहमूद यांच्यासोबत "हमारी शान" चित्रपटात त्या दोघांचं एकमेव पुरुष युगल गीत "दमडी दमडी पैसा पैसा" गायलं होतं, ज्याचे संगीतकार चित्रगुप्त होते.

 

१९५२ : या साली किशोरला अनेक संगीतकारांकडून पार्श्वगायनासाठी संधी मिळाली, पण ती मुख्यतः विनोदी गाण्यांसाठी होती. याची काही उदाहरणं म्हणजे:- मदन मोहन यांचं "ओ मॅडम एक से हम हो गए" (आशियाना, आगा यांच्यावर चित्रित), रोशन यांचं "दिल हो गया सेंटी फ्लॅट" (शीशम, गोप यांच्यावर चित्रित), एस. के. पाल यांचं "जियो जियो मेरे लाल" (माँ, भरत भूषण यांच्यावर चित्रित - लक्षात घ्या, "तुम बिन जाऊं कहा" या गाण्याला अजून दीड दशक बाकी होतं), आणि चिक चॉकलेट यांचं "बैयां छोडो बालम" (मेहमूदचे वडील मुमताज अली यांच्यावर चित्रित). पण किशोर यांच्यासाठी त्या वर्षीचं सर्वात महत्त्वाचं गाणं होतं हुस्नलाल भगतराम यांनी संगीतबद्ध केलेलं, काफिला चित्रपटातील अशोक कुमार यांच्यावर चित्रित झालेलं "वो मेरी तरफ यूं चले आ रहे है". हे गाणं खूप सुंदर आहे. त्याच वर्षीच्या इतर उल्लेखनीय गाण्यांमध्ये सी. रामचंद्र यांनी "सिन सिनाकी बबला बू" चित्रपटासाठी संगीतबद्ध केलेलं "कौन है ऐसा महफिल में जो ना तेरा दीवाना हो", जे रंजन यांच्यावर चित्रित झालं आणि भोला श्रेष्ठ यांचं "नजरिया" चित्रपटातील "ये काली घटा" यांचा समावेश होतो. चित्रगुप्त यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली किशोर यांनी "सिंदबाद द सेलर" मध्ये भगवान यांच्यासाठीही गाणं गायलं. त्याच वर्षी त्यांनी संगीतकार जिमी यांच्या "श्रीमतीजी" या चित्रपटासाठी तीन विनोदी गाणी गायली.

 

१९५३ : आज अनेकांचा विश्वास बसणार नाही, पण त्या वर्षी किशोरची सर्वाधिक यशस्वी जोडी संगीतकार रोशन यांच्यासोबत होती. रोशन यांनी १९५३ साली तीन चित्रपटांमध्ये, म्हणजेच मालकिन, माशूका आणि आगोश, किशोरकडून एकूण ६ गाणी गाऊन घेतली. १९५४ नंतर रोशन यांनी किशोर यांच्यासोबत काम करणं थांबवलं. आराधना प्रदर्शित होण्याआधीच त्यांचं निधन झालं, अन्यथा त्यांच्या जोडीने काही अप्रतिम गाणी नक्कीच दिली असती. रोशन यांचे पुत्र राजेश रोशन यांनी त्यांच्या वडिलांच्या निधनानंतर ७० च्या दशकात किशोर यांचा भरपूर वापर केला.

 

माशूका या चित्रपटातील मीना कपूर यांच्यासोबतचं एक सुंदर युगल गीत "ये समा हम तुम जवां" आगा यांच्यावर चित्रित करण्यात आलं होतं. माशूका हा मुकेश आणि सुरैया यांच्या मुख्य भूमिका असलेला चित्रपट होता. मालकिन या चित्रपटात किशोर यांची तब्बल ४ गाणी सज्जन यांच्यावर चित्रित झाली होती. नूतन यांचा नायिका म्हणून पहिला चित्रपट असलेल्या आगोशमध्ये किशोर आणि लता यांचं एक युगल गीत पुन्हा आगा यांच्यावरच चित्रित करण्यात आलं होतं. त्या वर्षीचं आणखी एक उल्लेखनीय पार्श्वगायन म्हणजे देव आनंद यांच्यासाठी केलेलं होतं, ते हमसफर या चित्रपटातील होतं. या गाण्याचं संगीत अली अकबर खान यांनी दिलं होतं. (पंडित पन्नालाल घोष, पंडित हृदयनाथ मंगेशकर आणि पंडित शिव-हरी यांच्याप्रमाणेच किशोरचे हे आणखी एका शास्त्रीय दिग्गजासोबतचं पार्श्वगायन होते).

 

१९५४ : त्या काळातलं एक खूप गाजलेलं पार्श्वगायन होतं "पहिली तारीख" चित्रपटातील "दिन है सुहाना आज पहिली तारीख है". हे गाणं किशोरने संगीतकार सुधीर फडके यांच्यासाठी गायलं होतं, जे त्याच्याच वर चित्रित झाले होते. त्याच वर्षी एस. डी. बर्मन यांनी "अंगारे" मध्ये जीवन यांच्यासाठी "गोरी के नैनों में निंदिया भरे" हे गाणं किशोरकडून गाऊन घेतलं. याशिवाय, "चाळीस बाबा एक चोर" मध्ये एस. डी. बर्मन यांनी किशोर-लता यांचं "ओ मेरी गुइयां दूल्हा दुल्हनिया" हे युगल गीत दिलं. हे गाणं कोणावर चित्रित झालं होतं याची माहिती नाही. त्याच वर्षीचं आणखी एक उल्लेखनीय पार्श्वगायन म्हणजे अरुण कुमार यांनी संगीतबद्ध केलेलं "परिणीता" (1954) मधील "ए बंदी तुम बेगम बनो". याशिवाय, मदन मोहन यांनी "मस्ताना" चित्रपटात गोप यांच्यासाठी किशोरकडून दोन गाणी गाऊन घेतली.

 

१९५५ : इल्झाम, मिस माला आणि नौकरी यांसारख्या चित्रपटांमुळे अभिनेता म्हणून किशोर वेगाने लोकप्रिय होत होता आणि त्यामुळे पार्श्वगायक किशोर थोडा मागे पडू लागला. तरीही, त्या वर्षी त्याने काही पार्श्वगायन केलं होतं, जसं की "राज दरबार" मध्ये चित्रगुप्त यांच्यासाठी "मीठी नारंगी लाना" आणि संगीतकार जयदेव यांच्या पहिल्याच "जोरू का भाई" या चित्रपटात बलराज साहनी यांच्यासाठी तीन गाणी गायली. पण त्यांची अभिनयाची मागणी वाढत होती आणि त्यामुळे त्यांचा वेळ अभिनयात जास्त जाऊ लागला होता.

 

१९५६ ते १९६४ या काळातील किशोरची अशी खूप गाणी आठवत नाहीत, ज्यात तो स्वतः नायक नव्हता किंवा देव आनंदसाठी त्याने पार्श्वगायन केलं नव्हतं. १९६२ मध्ये, दक्षिणामोहन टागोर यांनी संगीतबद्ध केलेला "रामदूत हनुमान" नावाचा एक अप्रदर्शित चित्रपट होता, ज्यात किशोर यांनी एक गाणं गायलं होतं. त्याचप्रमाणे, १९५६ मध्ये "आवाज" चित्रपटात सलिल चौधरी यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली "अरारम तारारम दुनिया के कैसे कैसे गम" हे अप्रतिम गाणं होतं, जे केवळ किशोरच गाऊ शकत होता, ते अन्वर हुसैन यांच्यावर चित्रित झालं होतं. तसेच, प्राण यांच्यासाठी गायलेलं "हाफ तिकीट" मधलं ते प्रसिद्ध गाणंही कोण विसरू शकेल?

 

१९६५ मध्ये, किशोर यांनी 'जोहर मेहमूद इन गोवा' आणि 'भूत बंगला' या चित्रपटांमध्ये मेहमूद साठी पहिल्यांदा पार्श्वगायन केलं. त्यानंतर ७० च्या दशकात, 'मस्ताना' (१९७०), 'हमजोली' (१९७०), 'अलबेला' (१९७१), 'लाखों में एक' (१९७१), 'कुंवारा बाप' (१९७४), 'उजाला ही उजाला' (१९७४) आणि अशा अनेक चित्रपटांमध्ये किशोर हा मेहमूदचा आवाज बनला.

 

१९६९ मध्ये 'आराधना' येण्याआधी, १९६६ ते १९६९ या काळात किशोर याच्या इतर काही यशस्वी पार्श्वगायनांमध्ये 'अभिलाषा' - १९६८ (संजय खान), 'फरिश्ता' - १९६८ (सुधीर), 'तीन बहुरानियां' - १९६८ (राजेंद्र नाथ), 'भाई बहन' - १९६९, 'आंसू बन गये फूल' - १९६९ (देव मुखर्जी), 'प्यार का मौसम' - १९६९ (भारत भूषण), 'खामोशी' - १९६९ (राजेश खन्ना), 'राहगीर' - १९६९ (बिस्वजीत), 'साबरमती' (बंगाली) - १९६९ (उत्तम कुमार).

 

परंतु किशोरची प्रतिभा लक्षात घेता असा प्रश्न असा पडतो की किशोरला १९५० आणि १९६० च्या दशकातील प्रथितयश नायकांसाठी पार्श्वगायन करायची संधी मिळाली नाही; म्हणजे संगीतकारांनी दिली नाही? काय कारण असेल? दुसरी शक्यता अशी की अशा संधी त्याने जाणीवपूर्वक टाळल्या? त्याचा विक्षिप्त स्वभाव लक्षात घेतला तर हे ही सहज शक्य आहे. म्हणूनच हे गूढ आपल्याला कधीच उलगडणार नाही; असो.

 

 

आणि मग २९ नोव्हेंबर १९६९ रोजी 'आराधना' प्रदर्शित झाल्यावर किशोरने 'मेरे सपनोंकी रानी' या गाण्याचा एक जबरदस्त 'पंच' दिला आणि किशोरचा पूर्ण कायापालट झाला. जसा दिलीप कुमारचा आवाज रफी, राज कपूरचा मुकेश, त्याचप्रमाणे राजेश खन्ना म्हणजे किशोर असे समीकरण झाले. आरके आणि केके यांनी जणू धुमधडाकाच करून टाकला. मग जितेंद्र, अमिताभ, शशी कपूर, धर्मेंद्र, ऋषी कपूर आणि ७० च्या आणि ८० च्या दशकातील बहुदा सर्व हिरोंसाठी किशोरने पार्श्वगायन केले. आर डी बर्मन, लक्ष्मीकांत प्यारेलाल, कल्याणजी आनंदजी, राजेश रोशन यांनी किशोरच्या अदभूत गायकीचा खजिना रसिकांसमोर पेश केला. त्यामुळे १९६९ नंतर बाकी सर्व पार्श्वगायक जणू झाकोळले गेले; अगदी मोहम्मद रफी सुद्धा. पुढील सुमारे १८ वर्षे किशोरने रसिकांच्या मनावर राज्य केलं. आणि १९८७ मध्ये त्याच्या निधनापर्यंत तो त्या पदावर अढळ राहिला.

 

@ यशवंत मराठे
yeshwant.marathe@gmail.com

Leave a comment



Pushkaraj Chavan

2 weeks ago

हा एकच लेख असा असेल की जो मला आवडला नाही. यात केवळ चित्रपटांची नावं आणि तो कोणत्या वर्षी प्रदर्शित झाला ईतकीच माहिती आली आहे. किशोरकुमारने किती गाणी कोणासाठी कधी गायली हे अपेक्षित नव्हतं. किशोर कुमारच्या विक्षिप्तपणाचे अनेक किस्से आहेत जे तितकेच मनोरंजक आहेत ते येतील असं वाटलं होतं पण नाही आले. आणीबाणीत त्याच्यावर आलेली बंदी, त्या मागचं कारण या गोष्टी अपेक्षित होत्या, त्याची लग्ने, याविषयी काही आलं नाही. लेख झालाय चांगला पण रंजक नाही वाटला.

Yeshwant Marathe

2 weeks ago

हा लेख फक्त आणि फक्त त्याच्या पार्श्वगायन संबंधी आहे. त्याचे तू उद्धृत केलेले किस्से काही प्रमाणात माझ्या पूर्वीच्या लेखात आले आहेत. असो. प्रत्येक लेख सगळ्यांनाच आवडेल असे होत नाही. अभिप्रायाबद्दल धन्यवाद.

संतोष राऊत

2 weeks ago

खुप छान माहिती पूर्ण लेख
या आधी लक्षात नाही आलं होतं याबाबत
छान

Contact Form

subscribe

Thank you for subscribing.

Something went wrong.

Contact Info

  • yeshwant.marathe@gmail.com

Follow Me

My Other Blogs: historycafe.in

Copyright © 2020 Sarmisal.

Made with ♡ by iTGS