असे होई लग्न

लग्न हा कुठल्याही भारतीय कुटुंबात एक मोठा महत्वाचा घटक आहे. आता भारतातील सर्व प्रदेशातील लग्न समारंभ कसे होतात याची पूर्ण माहिती असणे कोणालाही शक्य नाही. खरं सांगायचं तर अगदी महाराष्ट्रातील लग्न परंपरा याबद्दल लिहिणे देखील तितकेच अवघड आहे. 

 

महाराष्ट्रातील मध्यमवर्गीय समाजातील - म्हणजे मुख्यत्वेकरून ब्राह्मण आणि सीकेपी, सारस्वत मंडळी इत्यादींचे लग्नसोहळे कसे होते हे पाहणे हे मोठे मनोरंजक आहे. त्यातील काही भाग आधीच्या पिढीकडून ऐकला आहे आणि काही थोड्याफार प्रमाणात अनुभवलेला आहे. त्याला थोडा इंटरनेट शोध जोडला एवढंच. 

 

अगदी जुन्या काळातली, म्हणजे १००-१५० वर्षांपूर्वीची ७-७ दिवस चालणारी लग्ने, त्यातील हुंड्यांच्या, रुसव्याफुगव्यांच्या गोष्टी, लग्नातले विधी, दातांनी लवंग तोडण्यापर्यंतचे आंबटशौकीन प्रकार येथून प्रारंभ करून सध्याची ’हम आपके है कौन’ धर्तीची संगीत, जिजाजींचे जोडे लपविणे, फेटे बांधणे, बारात असल्या नाटकांनी साजरी होणारी पंजाबी स्टाईल लग्ने या सर्वांचे सिंहावलोकन करण्याची माझ्यात कुवत नाही. परंतु पाहिलेले, ऐकलेले, वाचलेले यांची नोंद करणार आहे. ही नोंद देखील खूपच अपुरी असेल ह्याची मला खात्री आहे.

 

१) घरचेच पूजा सांगणारे भटजी, काही ढालगज भवान्या, रिटायर्ड पेन्शनर प्रकारचे लोक मध्यस्थी करून नावे सुचविणे, टिपणे इकडून तिकडे देणे अशी अगदी पहिल्या टप्प्यावरची कामे उरकत असत. मुलगी गृ.कृ.द. (गृहकृत्यदक्ष), मुलगा सालस स्वभावाचा, नाकासमोर पाहून चालणारा, सरकारी कायम नोकरीवाला आहे असे निर्वाळे दिले-घेतले जात हे म्हणजेच मुलगा/मुलगी सांगून येणे.

 

२) तदनंतर ’मुलगी पाहणे’ हा कार्यक्रम उभयता आईवडिलांकडे वा कोणा नातेवाइकाकडे होई. पहिल्याच फटक्यात जमले असे नशीब बहुश: कोठल्याच मुलामुलीचे नसे. दोन चारापासून डझनावारी वेळा ह्यातून जावे लागे. अगदी जुन्या काळात ’मुली, चालून दाखव पाहू’ येथपासून चाचपणी केली जाई. मुलाचे हस्ताक्षर पाहिले जाई. ’चहापोहे हिनेच केले आहेत’ किंवा ’समोरचा बाळकृष्ण हिनेच भरला आहे’ असा मुलीच्या पाककौशल्याचा अथवा गृहकृत्यदक्षपणाचा पुरावा दाखवून दिला जाई.

 

३) ह्यानंतरचे महत्त्वाचे पाऊल म्हणजे देण्याघेण्याच्या बैठकीचे. दोन्ही पक्ष आपापले मुत्सद्देगिरीसाठी नाव कमावलेले कोणी काका, मामा, मावसोबा ह्यांना Chief Negotiator म्हणून नेमत असत. पुढच्या खोलीत पुरुष आणि उंबर्‍यापलीकडे स्त्रीवर्ग असे पक्ष आमनेसामने उभे राहात. काहीवेळ आमचे घराणे कसे नावाजलेले आहे, आमचे अमुकतमुक नातेवाईक कसे उच्च सरकारी अधिकारी - म्हणजे बहुधा मामलेदार वा तत्सम असे ’भाऊसाहेब’ ह्या सार्वत्रिक उपाधीने ओळखले जाणारे - आहेत अशी खडाखडी झाल्यावर मुख्य कुस्ती सुरू होई. हुंडा देण्याची कितपत ऐपत आहे असा अंदाज घेऊन आपली मागणी वरपक्ष मांडत असे आणि ’नाही हो, आमची इतकी उडी नाही’, ’ऐपत नव्हती तर मुलगी दाखविलीच कशाला” असे वार एकमेकांवर टाकल्यावर आणि अखेर हुंडा आणि वरमाईचा मान, अन्य नातेवाईकांचे मानापमान, आमची इतकी पाने, तुमची किती असल्या हुलकावण्या देऊन झाल्या की याद्या होत. ज्यावर दोन्ही बाजूचे मुत्सद्दी आणि आईवडील सह्या करत. लगोलग गुरुजींना विचारून, कार्यालय कसे उपलब्ध आहे, सुट्या कशा आहेत वगैरे तपशील तपासून लग्नाची जागा आणि तारीख-मुहूर्त ठरत असे.

 

४) आता लग्नाचे कापडचोपड, दागिने, निमंत्रणे पाठविण्यासाठी पत्ते गोळा करणे, निमंत्रण पत्रिका छापून घेऊन त्या पाठविणे, लग्नाचा फराळ तयार करणे अशी कामे घरातल्या घरातच पार पडत. ओळखीचा आचारी बोलावून ’इतक्या माणसांच्या स्वैपाकाला काय साहित्य लागेल’ असा अंदाज घेण्यात येई. सगळ्या गोष्टींची जबाबदारी घेणारी मंगल कार्यालये होण्याआधी लहान गावातील लग्ने घरच्या घरी मांडव घालून आणि पुण्यासारख्या शहरांमधून छोट्यामोठ्या वाड्यांमधून निघालेल्या कुटीर उद्योग वजा कार्यालयांमधून होत असत. स्वैपाकाला आचारी आणि मेहनतीला एखादा गडी ह्यांच्या मदतीने घरातीलच महिलामंडळ जेवणावळी उठवत असे.

 

५) लग्नाच्या पत्रिका हा मजेदार प्रकार होता. सर्वात वर छापखानावाल्याकडे असतील ते छपाईच्या ब्लॉकवरील गणपती. आत्तासारखे डिझायनर गणपती कोणालाच ठाऊक नव्हते. एकंदरच पत्रिका ठराविक मजकूराच्याच असायच्या. समोरासमोर घडी घातलेली दोन पाने छापलेली आणि छोट्या पाकिटात बसतील इतकीच. काही कल्पक लोक पाकिटालाही फाटा देऊन पत्रिकेवरच तिकीट चिकटवत असत. हॅन्ड मेड पेपरच्या डिझायनर तीनचार पानांच्या पत्रिका कोणी पाहिल्याच नव्हत्या. पत्रिकेमध्ये डाव्या बाजूस 'सौ बाईसाहेब ह्यांस' असा मायना आणि अखेरीस 'लेकीसुनांसह लग्नास अवश्य यावे अशी विनंती बायकांच्या बाजूने असे. उजव्या बाजूस मुख्य पत्रिका. त्यामध्ये घरातील सर्वात वडिलधार्‍या व्यक्तीने निमंत्रण पाठविले आहे असा सूचक मजकूर. शेवटी सह्यांमध्ये विवाहित मुलगे आणि त्यांच्या बायका इतकेच असायचे. लहान मुलांना वगैरे तेथे स्थान नसे. हे निमंत्रण ’इष्टमित्रांसह’ असे पण म्हणून त्यावरून चार टवाळ मित्र गोळा करून कोणी लग्नाला गेला असे ऐकलेले नाही. वधूच्या मागे ’चि.सौ.कां.’ (चिरंजीव सौभाग्यकांक्षिणी) असे उपपद, ती ’सौ. होण्यापूर्वीचे म्हणून, लावत असत. स्वातंत्र्यापासून तरी भारतात एकच Standard Time चालू आहे. तत्पूर्वी रेल्वेचा 'मद्रास टाइम' हा मुंबईच्या वेळेहून अलग असे. त्याची स्मृती मुहूर्ताच्या वेळेपुढे 'स्टँ.टा.' अशा अक्षरांमधून बरीच वर्षे नंतरही टिकून होती. अगदी गरीब घरांमध्ये वेगळी पत्रिका छापून न घेता बाजारातील तयार पत्रिका, सुमारे १००-१२५ इतक्या, विकत घेऊन त्यामध्ये हाताने 'रिकाम्या जागा भरा' अशा मार्गाने मुलगा-मुलगी, आईवडील, लग्नाची तारीख आणि वेळ असा आवश्यक मजकूर हाताने भरून पाठवलेल्या पत्रिकाही पूर्वी असायच्या. पत्ते लिहितांना योग्यतेनुसार चि., ती.स्व., रा.रा.’सौ., गं.भा., ह.भ.प., वे.शा.सं. इत्यादि उपपदे आठवणीने लिहिली जात.

 

शंभर एक वर्षांपूर्वीच्या पत्रिकांमध्ये हल्लीसारखी 'विवाहबद्ध होणार आहेत' चालीवरची गुळमुळीत भाषा न वापरता 'अमक्यातमक्यांचा शरीरसंबंध करण्याचे योजिले आहे' असे खुल्लमखुल्ला छापलेले असे. लोकमान्य टिळक यांच्या कन्येच्या लग्नाची ही पत्रिका बघा. 

 

 

त्या काळी बहुदा असा विचार असावा की ताकाला जायचे तर भांडे कशाला लपवायचे? "वधुवरांचा शरीर संबंध करण्याचे योजिले आहे" हे तेव्हा बरोबरच मानले जायचे. Norbert Elias यांचे युरोपच्या मध्ययुगीन इतिहास आणि समाजशास्त्रज्ञ या विषयावर एक अतिशय गाजलेलं पुस्तक आहे - Civilizing Process : The History of Manners (१९३९) ज्यात मुख्यत्वे तो युरोपातल्या सामाजिक चाली/रूढी कश्या बदलत गेल्या ह्यांचा सविस्तर इतिहास तो नोंदवतो.

 

 

 

मध्ययुगीन लग्नाविषयी लिहिताना तो म्हणतो की, वधुवरांचा शरीरसंबंध झाल्याशिवाय (दुसऱ्या दिवशी तशी खात्री करून घेतली जात असे) लग्न पूर्ण झालं असं मानलं जात नसे. काही प्रसंगी प्रत्यक्ष पाहुण्यांसमोरही हा शरीरसंबंध होत असे. (गेम ऑफ थ्रोन्स मधला बेडिंग सेरिमनी आठवतोय का?). अरेबिअन नाईत्स मधल्या अनेक गोष्टींत सुद्धा लग्नानंतरच्या दिवशी वधूचा कौमार्यभंग झाल्याची खात्री केली जाताना दिसते. वधूपुढे जाताना वर एक विशिष्ट प्रकारची पिसं भरलेली कापडी पिशवी पुरुष आपल्या पायजम्या आतून बांधून घेत असे, जेणेकरून त्याचं लिंग उत्तेजित झाल्याचा भास व्हावा, असेही उल्लेख आढळतात.

 

६) निमंत्रण केवळ लग्नमुहूर्ताचेच असे. ज्यांना जेवणाचे आमंत्रण असेल ते प्रत्यक्ष भेटीतूनच अक्षता द्यायच्या वेळीच मिळे.

 

७) लग्नसोहळा एकूण सकाळ ते संध्याकाळ इतकाच. तेवढ्यातच 'श्रीमंतपूजना'पासून - सीमान्तपूजन - ते वरात आणि लक्ष्मीपूजन बसवून घेतलेले असे. 'वाङ्निश्चय' नावाचा मिनिसोहळा दुसरे लहान कार्यालय घेऊन करण्याइतके पैसे बहुतेक वधूपित्यांकडे नसतच. प्रत्यक्ष लग्नाच्या धार्मिक बडबडीमध्ये कोणालाच स्वारस्य नसे. धूर डोळ्यात जाऊन बेजार झालेले वरवधू आणि भटजी, आणि स्वरचित मंगलाष्टके म्हणण्यासाठी उत्सुक हौशी कवी/कवयित्री आणि हल्लीच्या मावश्या व आज्या इतकेच जण काय चालले आहे ते पाहात असत. बेसुर मंगलाष्टके गाण्याची हौस पुरवणे कालांतराने अति बोकाळले. बाकी निमंत्रित मांडवात बसून पूर्वी 'नेहरू अथवा इंदिरा आणि आता मोदी कुठे आणि कसे चुकले’ अशा राजकारणाच्या चर्चांच्या फडात मग्न असतात. दोन्ही पक्षांतील गोंडस ’चिल्ली पिल्ली’ मांडवात धुमाकूळ घालून पकडापकडी आणि लपंडावात करमणूक मिळवत असत. बायका एकमेकींच्या दागिन्यांचा आणि साड्यांचा लेखाजोखा मांडत बसलेल्या असत.

 

 

८) जेवणाखेरीजच्या निमंत्रितांना लग्नापाठोपाठ 'पानसुपारी' दिली जाई. त्यामध्ये कोठल्यातरी गोड सुपारीचे पुडे, झिरमिरीत कागदात गुंडाळलेला पेढा आणि एक कसलेतरी फूल इतकेच मिळे. घरातल्याच चुणचुणीत मुलांकडे हे काम सोपवले जाई.

 

९) लग्न लागताच आहेर देणार्‍यांची रांग उभी राही. नव्या जोडप्यामागे कोणी विश्वासू नातेवाईक सर्व आहेरांची वहीत नोंद करत बसलेला दिसे.

 

१०) लग्नाच्या मुख्य जेवणाच्या वेगळ्याच कथा. जवळजवळ १९६० पर्यंत रेशनिंग आणि अनेक गोष्टींच्या टंचाईमुळे, आणि नंतर शास्त्रींच्या काळात आठवड्यातील एक दिवस उपास करण्याच्या आवाहनामुळे निमंत्रितांची संख्या मर्यादित असे. चाट ते चायनीज स्टॉल्स लावून कुंभमेळा भरविण्याची रीत तर फारच दूर होती. मुख्य पक्वान्न अगदी जुन्या काळात केवळ बुंदी/मोतीचूर लाडू हे असे. नंतर जिलब्या आल्या. ७५-८० नंतर फ्रूट सॅलड आले. अजून कालांतराने गुलाबजाम, आमरस ह्यांच प्रवेश झाला. दोन किंवा तीन पंक्ती बसत असत. पहिली लग्न लागताच ऑफिसला जायची घाई असलेल्या लोकांसाठी, दुसरी सर्वसामान्य आणि तिसरी खाशांची. पंगत जमिनीवर पाट मांडून होई. सुरुवातीला दोन जण जेवणार्‍यांच्या कपाळावर तांबडे गंध लावण्याचे काम करीत असत. ह्यासाठी दोन चांदीच्या साखळ्या असत. एकाने ओला लेप कालवायचा आणि दुसर्‍याने त्यामध्ये साखळ्या बुडवून जेवणार्‍याच्या कपाळावर गंध लावायचे. घरातील शाळकरी मुले पाणी वाढण्याच्या कामावर असत तर पोक्त बायका भात, वरण, आमटी, भाजी, कोशिंबिरी, लाडू, जिलब्या वाटण्याच्या कामावर. एकदा नव्या जोडप्याने पंक्तीमधून फिरून एकेक आग्रहाची जिलबी/लाडू प्रत्येक पानात घालण्याची पद्धत होती आणि तेव्हाच ’नाव घेणे’ ही देखील एक महत्वाची प्रथा होती. मुलीपाठोपाठ अन्य वडीलधार्‍या बायकाही आपली ही हौस पुरवून घेत असत. त्याच पाणीवाल्या मुलांनी सुसंगति सदा घडो, हरीच्या घरी शेवया तूपपोळ्या, असे श्लोक म्हणून आपल्या चुणचुणीतपणाचा पुरावा दाखवून द्यावा अशीही अपेक्षा असे. पंगत संपता संपता तीच मुले पानापुढे विडे ठेवण्याच्या कामावर लावली जात.

 

११) ’Event Management' हे शास्त्र अद्यापि जन्मले नव्हते. त्यामुळे ’Event Manager' वर सर्व धावपळ सोपवून दोन्ही पक्षाच्या बायकापुरुषांनी लग्न enjoy करायचे ही कल्पना स्वप्नात देखील निर्माण झाली नव्हती. जवळजवळ सर्व कामे घरातीलच पुरुषबायका, आणि इथे पु ल देशपांडे यांनी अजरामर केलेला "नारायण" टाईपचे लोक उरकत असत.

 

१२) संध्याकाळी 'रिसेप्शन' नावाचा प्रकार खूप विरळा असे. तेथे पूर्वी बहुधा गोल्डस्पॉट सारखे पेय, आणि नंतर आईसक्रीम असे बदल झाले. येथे आहेर देखील १०-१५ रुपयांच्या मर्यादेतील असत. तसेच ठराविक निरुपयोगी भेटवस्तूंचे चारचार सेट येऊन पडत. उदा. लेमन सेट, सुपारी-लवंग ठेवण्यासाठी लाकडी तबकात तबला-डग्गा.

 

१३) रिसेप्शन झाले की नव्या जोडप्याला कोणी वडीलधारी मंडळी जवळच्या देवळात नेऊन देवाच्या पाया पडण्याचा कार्यक्रम आवरून घेत.

 

१४) हे झाले की लग्नघरी दोन्ही पक्षाची निवडक मंडळीच उरत. आणि मग सुरु होई मुलीला पाठवण्याची तयारी. नातेवाइकांमधील  ४-५ सुरेल (असं त्यांना वाटत असे) आवजाच्या बायका वाजवायची पेटी घेऊन बसत आणि न चुकता "गंगा यमुना डोळ्यात उभ्या काsss" असं आर्त स्वरात गायला लागत! डोळ्यात बोटं घालून रडे आणण्याचाच प्रकार होता तो. हमसाहमशी रडतानाच ’जा मुली जा, दिल्या घरी तू सुखी राहा’ म्हणत नवरीच्या पाठवणीचा कार्यक्रम संपन्न होत असे. आणि नवरी मुलगी य प्रत्येकीला नमस्कार करुन पुढे निघाली की बळेबळेच तिच्या तोंडात पेढा कोंबला जायचा. ती बिचारी रडतारडता तो पेढा कसाबसा गिळत असावी. अखेरीस 'प्रिया मी बावरते' असे गुणगुणत ’नववधू’ सज्ज होई अणि एका नव्या कुटुंबाची पायाभरणी संपन्न होई.

 

 

अशी ही साठा उत्तराची कहाणी, पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण!!  

 

@ यशवंत मराठे 

yeshwant.marathe@gmail.com 

Leave a comment



Pushkaraj Chavan

2 days ago

छान झालाय लेख. पगतीत (पंक्तीत) नवविवाहित जोडप्याने वाढणे व त्यासोबत लग्नघरातील ईतरांनी आग्रह करुन वाढणे यात एक व्यक्तीगत जवळीक वाटणे या गोष्टीचा आनंद असे.
खुप छान वर्णन केलंयस यशवंत आवडला लेख. मन आठवणींत रमून गेलं. हल्ली हे सगळं अनुभवायला मिळत नाही. कॉन्टॅक्ट दिलं की झालं. आता आमंत्रित आले काय जेवले की नाही हे देखील समजत नाही. लग्न घरातील मजा उरली नाही.

अजित गोखले

2 days ago

खूपच छान झाला आहे लेख. वाचताना लहानपणापासून पाहिलेली अनेक लग्ने डोळ्यासमोरून जात होती.

राजस्थान व तेलंगणा भागातील प्रवासामध्ये मला असेही कळले आहे की तेथील अनेक परंपरागत जीवन जगणाऱ्या समाजांमध्ये अशी परिस्थिती होती की ज्यांच्या घरी लग्न ठरले आहे त्या लोकांना प्रत्यक्षात खूपच कमी धावपळ करायला लागत असे. सगळे गाव संपूर्ण समारंभ आपला मानून करत असत आणि या घरातील लोकही इतरांच्या लग्नांमध्ये अशाच प्रकारे सहभागी होत असत.

लग्न समारंभ सहा सहा सात सात दिवसांचे असत...

सामाजिक वीण चांगली असणे आणि समृद्धी असण्याचे ते लक्षण आहे असे मला वाटते.

Contact Form

subscribe

Thank you for subscribing.

Something went wrong.

Contact Info

  • yeshwant.marathe@gmail.com

Follow Me

My Other Blogs: historycafe.in

Copyright © 2020 Sarmisal.

Made with ♡ by iTGS