अंधा कानून

बऱ्याच लोकांनी अमिताभ बच्चनचा अतिशय गाजलेला मुकद्दर का सिकंदर हा सिनेमा कदाचित बघितला असेल. त्यातील व्हिलन दिलावर कोठ्यावरील झोहरा हिच्यावर आंधळं प्रेम करत असतो पण झोहरा मात्र सिकंदरच्या प्रेमात बुडलेली असते. परंतु त्यामुळे वेडापिसा झालेला दिलावर सिकंदरला जीवे मारतो. आता या तीन नावांच्या जागी तुकोजीराव, मुमताज आणि बावला अशी नावे टाका म्हणजे एक नवीन कथानक तयार होईल. माझी खात्री आहे की तुम्हाला वाटत असेल की माझं डोकं ताळ्यावर आहे की नाही? 
 
 
 
 
ही आहे एका आंधळ्या प्रेमाची आणि त्यातून उदभविणाऱ्या प्रतिशोधाची एक घडलेली शोकांतिका. सूडाच्या भावनेनी पछाडलेला माणूस कसा पशुत्वावर उतरतो ह्याची ही कथा आहे. त्यातील पात्र अगदी राजवाड्यासून कोठ्यापर्यंत पेरलेली आहेत. वाचा तर मग. 
 
१२ जानेवारी १९२५ : मुंबईतली एक संध्याकाळ. साधारण ७.००-७.३० वाजता विलींग्डन क्लबातून खेळून बाहेर पडलेल्या तीन ब्रिटीश अधिकार्‍यांना कुलाब्यातल्या बराकीत जायचं होतं. बोलण्याच्या नादात पेडर रोडवरून खाली उतरल्यावर गाडी चालवणार्‍या ले. सेगर्टनी ह्युजीस रोडकडे न जाता चुकून गाडी लिटल गिब्ज रोडवर घेतली तोपर्यंतही त्यांनाही कल्पना नव्हती की एका खळबळजनक ऐतिहासिक घटनेचे ते प्रत्यक्षदर्शी साक्षीदार होणार आहेत.
 
एका बाईच्या किंकाळीने हे शिलेदार भानावर आले आणि पाठोपाठ बंदूकेच्या गोळ्या झाडल्याचे आवाजही आले. दुसर्‍या क्षणी हातात गोल्फस्टीक घेऊन सेगर्ट-बेटली स्टीफन पुढे धावले. अंदाजे आठ दहा माणसांनी एका मोटारीला वेढा घातला होता. त्यांच्या हातात तलवारीसारखी तीक्ष्ण हत्यारे होती. दोघांच्या हातात पिस्तूलं होती. ते ज्या गाडीनी आले होते ती लालरंगाची मॅक्सवेल गाडी रस्त्यात आडवी घालून त्यांनी ती मोटार थांबवली होती. तिघांचेही लष्करी प्रशिक्षण वेळीस कामाला आले. दुसर्‍या क्षणी त्यांनी हल्लेखोरांवर प्रतिहल्ला चढवला. हल्लेखोरांचे उद्दीष्ट नजरेसमोर दिसत होते. त्या सुंदर बाईला जबरदस्तीने गाडीतून बाहेर काढण्यात यश येत नाही असे बघितल्यावर हल्लेखोरांनी पिस्तूलाच्या गोळ्या झाडल्या आणि त्या बाईला वाचवणारा पुरुष जखमी होऊन खाली पडला. आता हल्लेखोर आणि या गोर्‍या सैनिकांची हातघाईची मारामारी सुरु झाली. हल्लेखोरांपैकी एकाने बाईच्या चेहेर्‍यावर वार केला. तोपर्यंत कर्नल व्हिकरीही दुसर्‍या मोटारीतून खाली उतरले होते. लष्करी अधिकार्‍यांचे वाढते बळ पाहून हल्लेखोरांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला. तिघांना नि:शस्त्र करण्यात त्यांना यशही आलं पण तोपर्यंत सेगर्टच्या खांद्यावर चाकूचा वार झाला. एक पिस्तूलाची गोळी पण चाटून गेली. दोन हल्लेखोरांना काबूत घेण्यात या अधिकार्‍यांना यश आलं. बाकीचे हल्लेखोर अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले. झटापट संपेपर्यंत ज्या पुरुषाच्या अंगावर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या तो मात्र जागीच गतप्राण झाला होता.
 
पुढच्या काही दिवसात सर्व हल्लेखोरांना ताब्यात घेण्यात पोलीसांना यश आलं. सगळे हल्लेखोर इंदूरहून मुंबईत आले होते आणि इंदूर संस्थानाचे नोकर होते. हल्ल्यात वापरलेली लाल मॅक्सवेल गाडी पण इंदूरचीच होती. 
 
त्या बाईचं नाव होतं मुमताज आणि मृताचं नाव होतं अब्दुल कादेर बावला. ती एक नाचणारी आणि तो मुंबईचा एक श्रीमंत व्यापारी. मुंबई हायकोर्टात खटला सुरु झाला आणि एका प्रेमाच्या प्रतिशोधाची भयानक कहाणी जगासमोर आली.
 
 
 
मुमताज इंदूरच्या महाराजांच्या जनान्यातली एक नाचणारी. महाराज तुकोजीरावांच्या खास आवडीची! काहीजण म्हणतात की महाराजांनी तिला मुंबईच्या कोठ्यावरून पळवून इंदूरला नजरकैदेत ठेवलं होतं. पण तिचं मन गुंतलं होतं मुंबईतल्या अब्दुल कादेर बावलामध्ये. इंदूरच्या त्या जबरदस्तीच्या वास्तव्यात महाराजांपासून तिला एक मुलगी पण झाली. त्या मुलीला जन्मानंतर एका नर्सकरवी मारून टाकण्यात आलं. महाराजांनी अत्याचाराची सीमा ओलांडल्यावर मुमताज धाडस करून इंदूरहून पळून जाण्यात यशस्वी झाली. अमृतसर-दिल्ली-नागपूर मग मुंबई असा प्रवास करत अब्दुल कादेर बावलाकडे आली. मुंबई तेव्हा ब्रिटीश इंडीयाचा भाग होती आणि त्यामुळेच बावला गाफील राहीला. महाराज सूड घेतील अशी शंका पण कदाचित त्याच्या मनाला शिवली नसेल.
 
खटला सुरु झाला. हल्लेखोरांच्या बाजूने वकील होते बॅ. मोहमद अली जीना. (गंमत आहे की नाही सर्व नामचीन गुन्हेगारांना वाचवायला देशातील सर्वोत्कृष्ट वकील नेहमीच मिळत आले आहेत; तेव्हा ही आणि आज देखील परिस्थिती तशीच आहे). एकेक साक्षीदार पुढे येत गेले आणि कहाणी उलगडत गेली. जीनांनी हल्लेखोरांचे उद्दीष्ट खून नसल्याचा मुद्दा मांडण्याचा प्रयत्न केला, पण मुमताजच्या चेहेर्‍यावर केलेला वार त्या मुद्द्याला खोडून काढत होता. बावलानी गोळ्या झाडल्याचा मुद्दा पण पुढे आला. बावलाचे पिस्तूल कोर्टापुढे आले. त्यातून एकही गोळी झाडली नसल्याचे स्पष्ट झाले. एक शेवटचा प्रयत्न म्हणून वकीलांनी असा मुद्दा मांडला की मुमताज इंदूरला यायला तयार होती पण बावला विरोध करत होता. इथे बॅ नरीमन यांनी साक्ष दिली की या हल्ल्याच्या काही दिवस अगोदर मुमताज त्यांच्याकडे कायदेशीर सल्ला घ्यायला आली होती तेव्हा तिने स्पष्ट केले होते की जीव गेला तरी चालेल पण इंदूरला जाणार नाही.
 
सरकारी वकील आणि न्यायाधीशांनी शेवटपर्यंत कोणाच्या आदेशावरून हा खून करण्यात आला हे सत्य जगासमोर येऊ दिले नाही. प्रत्येक विधानात इंदूरकडून एव्हढाच उल्लेख आला. तुकोजीरावांचे नाव प्रत्यक्षात आलेच नाही आणि ते सुखनैव आपल्या इंदूरच्या महालात होते. सर्वसाधारण सरकारी नोकरांच्या बचावाला बॅ. जीनांसारखा वकील कसा उभा राहीला याची वाच्चता पण कोणीही केली नाही.
 
सात गुन्हेगारांना शिक्षा ठोठावण्यात आली. तिघांना फाशी तर इतरांना जन्मठेप. जन्मठेप झालेल्यापैकी एका कोर्टातच वेड लागले. फणसे नावाच्या एका हल्लेखोराला शिक्षेत सूट द्यावी असे न्यायाधिशांच्या मनात असूनही त्यांना तसे करता आले नाही. केस अपीलात प्रिव्ही कौन्सीलासमोर लंडनला चालवण्यात आली. १५०,००० पौंडांची फी भरून सर जॉन सायमन या ज्येष्ठ कायदेतज्ञाला उभे करण्यात आले पण काही उपयोग झाला नाही.
 
महाराज तुकोजीराव इंदूरमध्ये मौजमजेत होते पण त्यांच्या वैयक्तिक सूडाच्या प्रवासात अनेक माणसं मात्र जीवाला मुकली.
 
 
 
सगळ्या कायदेशीर तरतूदी संपल्यानंतर तुकोजीरावांना ब्रिटीशांनी कायद्याच्या कचाट्यात धरले. एक तर कायद्याला समोर जा किंवा राज्यत्याग करा. तुकोजीरावांवी दुसरा पर्याय स्विकारला. तुकोजीरावांनी सिंहासन सोडले आणि अल्पवयीन यशवंतरावांना गादीवर बसवले. 'शक्य तो दूरच रहा' असा मैत्रीपूर्ण सल्ला ब्रिटीशांनी दिला असल्यामुले ते युरोपात गेले. 
 
 
 
 
महाराज स्विट्झरलंडमध्ये अ‍ॅनी मिलर नावाच्या अमेरीकन बाईच्या प्रेमात पडले. १९२८ साली युरोपमध्ये असताना त्यांची आणि नॅन्सी अ‍ॅनी मिलरची ओळख झाली. त्यांनी तिच्यासमोर विवाहाचा प्रस्ताव ठेवला. महाराज अ‍ॅनीच्या प्रेमात इतके बुडून गेले होते की वेळ पडल्यास धर्म बदलायची तयारी पण त्यांनी केली होती. पण तसे काही झाले नाही. अ‍ॅनीनी हिंदू धर्म स्विकारला. त्यांचे नवीन नाव राणी शर्मिष्ठादेवी झाले.
 
 
 
 
सोबतच्या फोटोत दिसणारे हे पेराच्या आकाराचे, जुळे असावेत असे वाटणारे हिरे इंदूर पिअर्स या नावानी प्रसिध्द आहेत. तजेलदार, सुंदर, स्वच्छ आणि जराही ऐब नसलेले हे हिरे साधारण सेहेचाळीस कॅरेट वजनाचे आहेत. तुकोजीराव होळकर यांनी ही हिर्‍यांची जोडी त्यांची नवपरिणीत पत्नी अ‍ॅनी मिलरला विवाहात भेट दिली. आपल्या नूतन पत्नीला इतकी सुंदर भेट देणारे तुकोजीराव १९२६ साली युरोपात का आले याचे कारण कळल्यावर या हिऱ्यांकडे बघण्याचा आनंदच नाहीसा होतो. एका खूनाच्या प्रकरणातून चौकशीला सामोरे जायला नको म्हणून सोयीस्कररीत्या महाराज इंदूर सोडून युरोपात फिरत होते. कालांतराने हे हिरे बाजारात विक्रीला आले. हॅरी विन्स्टन नावाच्या व्यापाऱ्याने ते खरेदी करून विकले आणि नंतर पुन्हा परत विकत घेऊन परत विकले. आता ही इंदूर पिअर्सची जोडी रॉबर्ट मोवाड ह्या एका सुप्रसिद्ध जवाहिऱ्याच्या संग्रहात आहे.
 
 
इंदूर पिअर्स अजूनही सुरक्षित आहेत पण काही प्रश्न आजही अनुत्तरीत आहेत.
 

मारणारे फाशी गेले ते त्यांच्या गुन्ह्यातील सहभागामुळे पण पंचवीस तीस वर्षाच्या या तरुणांना इरेस घालणारा कायद्याच्या बाहेर कसा राहीला? आणि ते सुद्धा न्यायप्रिय म्हणून मिरवणार्‍या ब्रिटीशांच्या राज्यात?

अब्दुल कादेर बावलाला न्याय मिळाला पण मुमताझ आणि तिच्या मुलीला न्याय मिळाला का?
नॅन्सी मिलरची राणी शर्मिष्ठादेवी म्हणून इतिहासात नोंद झाली पण प्रतिशोधाच्या पाशवी प्रवासात मुमताझ कुठे गेली याची कुणालाच माहीती नाही.
तुकोजीराव सुद्धा ब्रिटीशांच्या कायद्याच्या हातावर देखील तुरी देऊन कसे काय उजळमाथ्याने जगत राहीले? 
 
ज्या खुनाच्या प्रकरणात त्यांना चौकशीला तोंड द्यावं लागलं असतं ते प्रकरण मुंबईच्या हायकोर्टात आजही मुमताझ केस म्हणून प्रसिद्ध आहे. 
 
 
 
 
मुमताझचं बावलावरचं प्रेम आंधळं होतं.
तुकोजीरावांचा प्रतिशोधही आंधळा होता.
ब्रिटीशांचा कायदा तर त्याहून आंधळा होता.
 
ये अंधा कानून हैं!! 
 
 
@ यशवंत मराठे 
yeshwant.marathe@gmail.com

Leave a comment



Rajendra Phadke

4 hours ago

Fantastic - it’s a wonderful story, very well narrated!

Contact Form

subscribe

Thank you for subscribing.

Something went wrong.

Contact Info

  • yeshwant.marathe@gmail.com

Follow Me

My Other Blogs: historycafe.in

Copyright © 2020 Sarmisal.

Made with ♡ by iTGS