हृषिकेश मुखर्जी दिग्दर्शित 'आनंद' हा चित्रपट हा खऱ्या अर्थाने हिंदी चित्रपट सृष्टीतील एक माईलस्टोन आहे. आपल्याला साधारणपणे चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरच्या गोष्टी ऐकून माहित असतात परंतु प्रत्येक चित्रपट बनण्याच्या प्रक्रियेत अनेक गोष्टी घडत असतात. दुर्दैवाने या अशा गोष्टी सहसा आपल्याला कधीच कळत नाहीत. परंतु सुदैवाने 'आनंद' बाबतीतील अनेक गोष्टी कळल्या त्याचा हा एक मागोवा.
हृषीदांच्या मनात या चित्रपटातील भूमिका कोणी कराव्यात याची तुम्ही कल्पना देखील करू शकणार नाही.
राज कपूर : आनंद सेहगल
दिलीपकुमार : डॉ. भास्कर बॅनर्जी
आणि
देव आनंद : डॉ. प्रकाश कुलकर्णी
या अशा भूमिका असलेला हा चित्रपट खरंच पडद्यावर आला असता तर? कल्पनेनेच मोहरून जायला होतं पण कल्पना सहसा खऱ्या आयुष्यात घडत नाहीत.
डॉ. कुलकर्णी ही मराठी नाव असलेली भूमिका कोणाकडून करून घ्यायची याची चर्चा हृषीदा आपल्या सहकार्यांबरोबर करत असतांना काही कामासाठी (खरं म्हणजे हृषिदांच्या आगामी चित्रपटात एखादी भूमिका मिळते आहे की नाही हे पहाण्यासाठी) रमेश देव हृषीदांकडे आला होता. त्याच क्षणी ‘आपला डॉ. कुलकर्णी सापडला‘ असे उत्स्फूर्त उद्गार हृषीदा यांनी काढले, आणि ती भूमिका रमेश देवला दिली गेली; असे खुद्द रमेश देवने सांगितले होते. पुढे त्याने हृषिदांना विनंती करून पत्नी सीमासाठी पण त्यात एक भूमिका पदरात पाडून घेतली !
आनंदची व्यक्तीरेखा राज कपूरवरून बेतली होती; तर डॉ. भास्करची व्यक्तीरेखा खुद्द हृषीकेश मुखर्जींवर बेतलेली होती. मात्र, या चित्रपट निर्मितीची वेळ आली तेव्हा राज कपूर पन्नाशीजवळ पोचलेला होता. म्हणून तो म्हणाला की, ही भूमिका मला देण्यापेक्षा ऐन तारुण्यात असलेल्या उमेदीच्या कलाकाराला द्या. तिसऱ्याच चित्रपटात अभिनय करत असलेल्या अमिताभ बच्चनने हृषिदांना अपेक्षित होती, त्याप्रमाणेच बाबू मोशायची भूमिका साकारली होती; आणि याबद्दल हृषिदा कमालीचे खूष होते.
या चित्रपटाचे संगीत दिग्दर्शन लता मंगेशकर यांनी करावे अशी हृषीकेश मुखर्जींची इच्छा होती. तसे झाले असते तर चित्रपटाचे नाव ‘आनंद’ आणि संगीत दिग्दर्शक ‘आनंदघन‘ (कारण याच टोपण नावाने लताबाई संगीत दिग्दर्शन करत असत) असे दृश्य दिसले असते. गंमत म्हणजे १९६१ साली ‘सखी रॉबिन‘ नावाचा चित्रपट आला होता; त्याच्या संगीत दिग्दर्शकाचे नाव होते ‘रॉबिन‘. आनंद चित्रपटात याचीच पुनरावृत्ती झाली असती.
हृषिदांचे हा चित्रपट पूर्ण झाल्यावर समाधान झाले होते, तरी हा चित्रपट ‘बॉक्स ऑफिस‘ वर किती चालेल याबद्दल ते साशंकच होते. मात्र, रमेश देव आणि सीमा हे पती पत्नी या चित्रपटाबद्दल इतका आत्मविश्वास बाळगून होते की, हा चित्रपट सहज रौप्य महोत्सव साजरा करेल अशी खात्री त्यांनी हृषिदांना दिली होती. असे झाले तर मी तुम्हा दोघांना प्रत्येकी रु. दहा हजार खास बक्षिशी म्हणून देईन असा शब्द हृषिदांनी या दंपतीला दिला. ‘आनंद’ने रौप्य महोत्सव साजरा करताच हृषिदांनी कबूल केल्याप्रमाणे या जोडप्याला रु. वीस हजार पाठवून दिले.
त्या वेळेस आर्थिकदृष्ट्या किशोर कुमार अडचणीत होता हे पाहून हृषीदानी किशोर कुमारला या चित्रपटात नायकाची भूमिका दिली होती. मात्र, हे किशोर कुमारला कळताच त्याचे डोके सटकलेच; आणि हा आपला अपमान समजून त्याने चित्रीकरणाचे एक श्येड्युल पूर्ण झालेले असतांना काहीही कारण न सांगता चित्रपटातून किशोरने आपले अंग काढून घेतले ! किशोर कुमारने या चित्रपटातील भूमिका न स्वीकारण्याचे एक कारण असेही सांगितले जाते की, एका बंगाली चित्रपट निर्मात्याने त्याला त्याच्या चित्रपटात भूमिका देतो असे सांगून फसवले होते. याचा किशोर कुमारला एव्हढा राग आला की, माझ्याकडे कोणी बंगाली निर्माता पुन्हा आला तर त्याला घरात घ्यायचे नाही, असे किशोर कुमारने त्याच्या माणसाला सांगितले होते.
मूळ कथा राज कपूरसाठी बेतलेली असल्यामुळे हा चित्रपट हृषीदानी राज कपूर आणि मुंबई शहर यांना अर्पण केला होता; आणि तसा उल्लेखही त्यांनी चित्रपटाच्या श्रेय नामावलीत केला होता. मात्र, त्या वेळच्या वैचारिक साप्ताहिक “माणूस" च्या समीक्षकाने या चित्रपटाच्या सुरवातीला राज कपूरचा उल्लेख असूनही तो चित्रपटात कोठेच न दिसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले होते ! याचाच अर्थ चित्रपट समीक्षकांमध्ये गेल्या ५०-५५ वर्षात फार काही फरक पडलेला दिसत नाही. असो.

याच कथानकावर तात्यासाहेब शिरवाडकरांनी मराठी नाटक लिहावे, असा प्रस्ताव मराठीतील एक जबरदस्त नाट्य निर्माते मोहन वाघ यांनी मांडला होता. मात्र, हा चित्रपट तात्यासाहेबांनी पाहिलेला नसल्यामुळे त्यांच्यासाठी या चित्रपटाचा एक खास 'शो' नासिकमध्ये आयोजित केला होता. त्याला हृषीदा यांच्याबरोबर गुलजारही हजर होते. इथपासून गुलजार आणि तात्यासाहेबांची दोस्ती सुरू झाली, असे म्हटले जाते. नाटकात आनंदची भूमिका मराठीतील सशक्त अभिनेते डॉ. सतीश दुभाषी यांनी खास त्यांच्या पद्धतीने केली होती. मात्र, शिरवाडकर, ‘आनंद‘ सारखे कथानक, सतीश दुभाषी सारखे अभिनेते आणि मोहन वाघांसारखे नाट्य निर्माते असूनदेखील नाटक लोकप्रिय झाले नाही.
या चित्रपटात सुरवातीला लता मंगेशकरने गायलेले 'ना, जिया लागे ना’, हे गीत होते. परंतु, लवकरच हे गीत चित्रपटात रसभंग करते म्हणून चांगले झालेले असूनही कापण्यात आले.
या चित्रपटाच्या 'प्रीमीयर शो’ नंतर झालेल्या पार्टीत, 'अमिताभ बच्चन हा केवळ आपल्या आवाजाच्या जोरावर तुझा प्रतिस्पर्धी ठरू शकण्याचा मोठा धोका आहे', असे फटकळ देवयानी चौबळने त्या वेळचा तिचा परम मित्र राजेश खन्नाला बजावले असे ऐकिवात आहे.
‘आनंद‘ हा चित्रपट हृषीदांनी ‘आर. के.’ साठी दिग्दर्शित करावा या बद्दल राज कपूर खूपच आग्रही होता. पण हृषीदा आणि राज कपूर यांची कामाची पद्धतच वेगळी असल्याने आणि आपल्याला ‘आर. के’ पद्धतीने काम करता येणार नाही याची खात्री असल्यामुळे हृषीदांनी त्या गोष्टीला निग्रहाने नकार दिला. राज कपूर हृषीदांना ‘बाबू मोशाय‘ अशी प्रेमाने हाक मारायचा. म्हणूनच ‘आनंद‘ मध्ये हृषीदांनी अमिताभला ‘बाबू मोशाय‘ बनविला.
‘आनंद‘च्या बरोबरीनेच हृषिदा त्यांच्या आगामी चित्रपट ‘गुड्डी‘ ची जुळवाजुळव करत होते. त्यांना गुड्डीच्या प्रियकराच्या भूमिकेसाठी एखादा अप्रसिद्ध आणि कोणतीही प्रतिमा नसलेला अभिनेता हवा होता. त्यामुळे त्यांनी अगोदर अमिताभला या भूमिकेसाठी नक्की करून काही चित्रिकरणही केले होते. परंतु, ‘आनंद‘ मुळे लोक त्याला ओळखू लागले; आणि त्याला अनपेक्षितपने खूपच लोकप्रियता लाभली. पण त्यामुळेच हृषिदांनी त्याला ‘गुड्डी‘ मधून काढण्याचा निर्णय घेतला. खरं तर अभिनेत्याला लोकप्रियतेमुळे नवीन भूमिका मिळतात. पण लोकप्रियतेमुळे भूमिका गमावली जाण्याचे हे अपवादात्मक उदाहरण असावे !
या चित्रपटात प्रथम दोनच गाणी होती. युनिट मधल्या लोकांच्या आग्रहामुळे आणखी एक गाणे वाढवले. मग सलीलदा म्हणाले ईपी ध्वनिमुद्रिका काढायची तर चार गाणी हवीत. मग नाईलाजाने चौथे गाणेही टाकले. कही दूर...‘ हे गीत योगेशनी दुसर्या चित्रपटासाठी लिहिले होते. पण तो चित्रपट पुरा न झाल्याने ते गीत या चित्रपटात घेण्यात आले. या गीताची चाल ऐकल्यावर ते गीत आपल्याला गायला मिळावे अशी हेमंतकुमार यांची इच्छा होती; पण सलीलदा यांनी ते अगोदरच मुकेशकडून गाऊन घ्यायचे असे ठरवले होते.
सलिलदांनी बनवलेल्या एकाच चालीवर समजुतीच्या घोटाळ्यामुळे गुलजार आणि योगेश यांच्याकडून दोन गीते लिहिली गेली. मात्र, गुलजारांनी लिहिलेले ‘ना जिया ना‘ हे गाणे ध्वनिमुद्रणासाठी निवडले गेले. निर्माता न घेतल्या गेलेल्या या गीताचे पारिश्रमिक योगेश यांना देण्यास तयार होता; पण त्यांनी ते गीत घेतले न गेल्याने पारिश्रमिक घेण्याचे नाकारले. मग योगेशना आणखी एक गीत लिहिण्याची संधी दिली गेली. ते गीत म्हणजे ‘जिंदगी कैसी है पहेली‘. श्रेय नामावलीच्या वेळेस या गीताचा उपयोग करण्याचे ठरले होते; पण नायक राजेश खन्ना याला हे गीत इतके आवडले की त्याचे चित्रिकरण त्याने हृषीदांना स्वत:वर करावयास लावले. या गाण्याच्या चित्रिकरणाचा खर्च स्वत: संगीत दिग्दर्शक सलिल चौधरी यांनी केला. इतकेच नव्हे तर जुहू चौपाटीवर त्याचे चित्रिकरण, राजेश खन्ना फुगे उडवत करेल; हे ही सलीलदा यांनीच सुचवले. अलीकडे सलिलदा यांच्या आठवणींच्या एका कार्यक्रमात त्यांच्या पत्नी आणि कन्येने ही गोष्ट सांगितली !

जरी राजेश खन्ना सुरवातीपासून स्वत:च्या गाण्यांसाठी किशोर कुमारचा उसना आवाज हवा, म्हणून आग्रही असायचा, तरी या चित्रपटात एकही गाणे किशोर कुमारने गायले नाही. याचे उघड कारण म्हणजे किशोर कुमारला ‘आनंद‘ची भूमिका देऊनही चित्रिकरणाचे पहिले श्येड्युल पूर्ण झाल्यावर हृषिदांना काहीही न सांगता किशोर कुमारने या चित्रपटातून आपले अंग काढून घेतले.
मध्यांतरानंतर हा चित्रपट अधिकाधिक गंभीर होत जातो; त्यामुळे सर्वसामान्य स्त्रियांचे चित्रपटगृहाबाहेर पडताना रडून सुजलेले चेहेरे पहावयास मिळत. त्यामुळे हा चित्रपट पाहताना स्त्रियांना एक नाही तर दोन रुमाल लागतात, असे बोलले जाऊ लागले !
‘आनंद'ने राजेशला केवळ व्यावसायिक यश किंवा समीक्षकांची वाहवा या पलीकडेही बरंच काही दिलं. त्या चित्रपटाने त्याला पडद्यावरची सर्वात महान आणि चिरकाल टिकणारी भूमिका दिली.
मला आशा आहे की ही "आनंद" यात्रा तुम्हाला आवडली असेल.
@ यशवंत मराठे
yeshwant.marathe@gmail.com
