बऱ्याच लोकांचे असे ठाम मत असते की आशा ही लतापेक्षा जास्ती चतुरस्र गायिका आहे आणि आशा लतापेक्षा जास्त लोकप्रिय आहे. त्यांच्या मताचा मी आदर करून देखील असे म्हणतो की जर हिंदी चित्रपट सृष्टीचा विचार केला तर लताची प्रतिभा ही एका वेगळ्या जगातील आहे. परंतु एक गोष्ट तितकीच खरी की आशा काही ‘ऑलसो रॅन’ कॅटेगरी मध्ये मोडत नाही. त्यामुळे, लता लता असेल तर आशा आशा आहे.
आशाने तिचे पहिले मराठी गाणे १९४३ मध्ये माझं बाळ या चित्रपटातील "चला चला नवबाला" हे वयाच्या १० व्या वर्षी गायले. तिचे हिंदी चित्रपट सृष्टीतील पहिले गाणे हे चुनरिया (१९४८) ह्या सिनेमातील "सावन आया" हे होते पण पहिले सोलो गाणे १९४९ सालातील रात की रानी या चित्रपटात होते. ओ पी नय्यरनी तिला प्रथमतः सीआयडी या चित्रपटामध्ये गाण्याची संधी दिली पण तिला खरे यश १९५७ च्या नया दौर या चित्रपटाने दिले जेव्हा ती पहिल्यांदाच मुख्य हेरॉईनसाठी तिने सर्व गाणी म्हटली. त्याकाळी लता मंगेशकर, गीता दत्त आणि शमशाद बेगम यांची सद्दी होती त्यामुळे सर्व प्रमुख गाणी त्यांना मिळत आणि त्यांनी नाकारलेली (म्हणजे सहकलाकारांवर चित्रित झालेली किंवा सवंग) गाणी आशाच्या वाट्याला यायची. कदाचित त्यामुळे असेल पण आशाची गाजलेली हिंदी सोलो गाणी खूप कमी आहेत. एक प्रकारे हा तिच्यावर अन्यायच झाला पण तरी देखील तिने कधीही लताची कॉपी करण्याचा प्रयत्न केला नाही. तिने स्वतःची वेगळी स्टाईल ठेऊन आपले व्यक्तित्व जोपासले यातच तिचा मोठेपणा आहे.
या सर्व कठीण दिव्यातून आणि तसेच स्वतःच्या कौटुंबिक शोकांतिकेतून तिला दोन संगीतकारांनी सावरलं आणि तिला स्वतःची अशी ओळख दिली आणि ते म्हणजे ओपी नय्यर आणि आरडी बर्मन.
आशाच्या संगीतजीवनात ओ. पी. नय्यरचा सिंहाचा वाटा आहे. ‘छम छमा छम’ (1952) ते ‘टॅक्सी ड्रायव्हर’ (1973) या एकवीस वर्षांत ओ. पी.नं आशाला 162 ‘सोलो’ व 154 द्वंद्वगीतं दिली. ओ. पी.कडे आशा तुफान गायली. ‘कुछ तो ऐसी बात कर जालिम’ (‘कैदी’), ‘छोटासा बालमा’ (रागिणी’), ‘आइये मेहेरबाँ’ (‘हावडा ब्रिज’), ‘रातों को चोरी चोरी’ (‘मुहोब्बत जिंदगी है’), ‘मै शायद तुम्हारे लिए’ (‘ये रात फिर न आयेगी’), ‘मेरी जान तुमपे सदके’ (‘सावन की घटा’), ‘ये है रेशमी’ (‘मेरे सनम’) व ‘चैन से हमको कभी’ (‘प्राण जाये पर वचन न जाये’)… ‘चैन से हमको कभी’ ही ओ. पी. व आशाची सर्वोत्कृष्ट निर्मिती म्हणता येईल. परंतु त्याच सुमारास त्यांचे संबंध विकोपाला गेले होते त्यामुळे ‘चैनसे हमको कभी’ला मिळालेले पारितोषिक घ्यायला आशा गेली नाही. ओ.पी. गेला. त्यानं समारंभात पारितोषिकही स्वीकारले पण परतताना वाटेत हाजी अलीला समुद्रात फेकून दिले. दोघांनीही एकमेकांवरचा सगळा राग त्या बिचाऱ्या गाण्यावर काढला. त्यातूनही ते गाणं जगलं व गाजलं.
आशाची ‘सोलो’ गाणी लतासारखी त्या प्रमाणात चटकन आठवत नाहीत. पण सर्वच संगीतकारांकडे तिची उत्तम गाणी आढळतात. ‘दिल श्याम से डूबा जाता है’ (‘संस्कार’ – अनिल विश्वास), ‘दिल लगाकर हम ये समझे’ (‘जिंदगी और मौत’ – सी. रामचंद्र), ‘सबासे मे कहे दो’ (‘बँक मॅनेजर’ – मदन मोहन), ‘निगाहे मिलाने को’ (‘दिल ही तो है’ – रोशन), ‘तोरा मन बडा पापी’ (‘गंगा जमना’ – नौशाद), ‘पान खाये सैंय्या’ (‘तीसरी कसम’ – शंकर जयकिशन), ‘काली घटा छाये’ (‘सुजाता’ – एस. डी. बर्मन), ‘मेरा कुछ सामान’ (‘इजाजत’ – आर. डी. बर्मन), ‘ऐ गमे दिल’ (‘ठोकर’ – सरदार मलिक).
अगदी पहिल्यापासून बघितले तर चित्रपट गीतांमध्ये संगीतकाराला सगळं क्रेडिट मिळतं, गायक किंवा गायिका कोण हे फारसे महत्वाचे नसे. ते समीकरण लता आणि आशा या दोन बहिणींनी आणि रफी-किशोर या गायकांनी बदलले. आज सुद्धा रेहमानचे संगीत असलेल्या गाण्यात गायक किंवा गायिका कोण हे बऱ्याच वेळा माहितीच नसते.
आशा भोसलेची जीभ तिखट आहे याचा वाचलेला एक किस्सा. राजकुमार संतोषीच्या ‘अंदाज अपना अपना’मधील ‘ये रात और ये दूरी’ या गाण्याचं रेकॉर्डिंग चालल होतं. ओ. पी. नय्यरच्या संगीतावर राजरोस दरोडा घालून ढापलेली चाल आशाला समजून सांगताना नवोदित संगीतकार तुषार भाटिया म्हणाला, ‘आशाजी, ऐसा नही, ऐसा. मुझे ऐसा चाहिये’. एक दोन वेळा ऐकून घेतल्यावर आशा ताडकन म्हणाली – ‘ओ. पी.ची चाल कशी गायची हे तू मला शिकवतोस? मै तो सदियों से गाते आयी हूँ. तू तर तेव्हा जन्मलाही नसशील.’ तुषार भाटियाची बोलती बंद झाली.
आणखीन एका गोष्टीने तिला एक स्वतःचे स्थान देऊन वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलं आणि ती म्हणजे मराठी गीते. आशाचं मराठी संगीतातील कर्तृत्व अगाध आहे. तिथं तिनं काही करायचं बाकी ठेवलेलं नाही. तिने कुठल्या प्रकारची गाणी मराठीत म्हटली नाहीत? भक्तीगीते, प्रेमगीते, शृंगारगीते, नाट्यसंगीत, बालगीते, वग, तमाशागीते, चित्रपटगीते, भूपाळी, भावगीते. अफाट रेंज. माझ्या मते मराठी गीतांमध्ये लतापेक्षा देखील आशा जास्त लोकप्रिय झाली आणि तिने इथे मात्र तिने लताला मागे सारलं. एक झलक म्हणून गाणी बघा.
१. अत्तराचा फाया, २. उठी श्रीरामा पहाट झाली, ३. उषःकाल होता होता, ४. एका तळ्यात होती, ५. कठीण कठीण कठीण किती, ६. का रे दुरावा, ७. केव्हांतरी पहाटे, ८. चंद्रिका ही जणू, ९. चांदणे शिंपीत जासी, १०. जिवलगा, राहिले रे दूर, ११. तरुण आहे रात्र अजुनी, १२. धुंदी कळ्यांना, १३. नाच रे मोरा, १४. नाच नाचुनि अति मी दमले, १५. परवशता पाश दैवे, १६. पांडुरंग कांती दिव्य तेज, १७. प्रेम सेवा शरण, १८. बुगडी माझी सांडली गं, १९. मर्मबंधातली ठेव ही, २०. मागे उभा मंगेश, २१. मी मज हरपून बसले, २२. युवती मना दारुण रण, २३. ये रे घना, २४. रवि मी चंद्र कसा, २५. रामा रघुनंदना, २६. रूप पाहता लोचनी, २७. रेशमांच्या रेघांनी, २८. शूरा मी वंदिले, २९. स्वप्नात रंगले मी, ३०. ऋतू हिरवा ऋतू बरवा
दीनानाथ मंगेशकरांचा नाट्यगीतांचा वारसा जर कोणी पुढे चालवला असेल तर तो फक्त आशानेच.
त्याच प्रमाणे आशा नवनवीन प्रयोगाला कायम तयार असते. तरुण परदेशी गायकांबरोबर fusion गाण्यात तर तिचा कोणी हातच धरू शकत नाही. तिने माझ्या माहितीनुसार इंग्रजी, स्पॅनिश, रशियन, मले, झेक, नेपाळी या परदेशी भाषांमध्ये गाणी म्हटली आहेत. आणि अर्थातच भारतीय भाषांबद्दल तर बोलायलाच नको; १५ तरी नक्कीच असतील. तसेच कुठच्याही शैलीतील (genre) गाणे निवडले तर असं म्हणता येणार नाही की या शैलीत आशाचे एकही गाणे नाही.
गेल्या काही वर्षात आशाने चित्रपट संगीतातून जवळजवळ विरक्ती घेतली आहे पण तिच्या ८९ वर्षाच्या वयाला लाजवेल असा गोडवा अजून तिच्या आवाजात आहे. आयुष्यात आलेल्या अडचणींचे तिने कधीही अवडंबर माजवले नाही; चेहरा कायम हसतमुख. या गोष्टीसाठी आशाला त्रिवार सलाम!!
@ यशवंत मराठे
yeshwant.marathe@gmail.com