नुकताच १६ डिसेंबर होऊन गेला आहे आणि बरोब्बर ५० वर्षांपूर्वी याच दिवशी भारताने पाकिस्तानचा निर्णायक पराभव केला होता त्याची आठवण झाली म्हणून हा लेख.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तिसरे युद्ध १९७१ मध्ये ३ डिसेंबर ते १६ डिसेंबर या कालावधीत घडले. फक्त १३ दिवसात संपलेले हे युद्ध जगातील सर्वात कमी काळ चाललेल्या युद्धांपैकी एक आहे. या युद्धात भारताचा नेत्रदीपक विजय झाला आणि पाकिस्तानचा दारुण पराभव.
हे युद्ध झाले तेव्हा मी फक्त ११ वर्षांचा होतो त्यामुळे तेव्हाच्या माझ्या आठवणी खूपच बाळबोध आहेत. युद्ध सुरु व्हायच्या बरेच दिवस आधीपासून युद्धाचे वारे घोंघावत होते. मग अशी बातमी आली की युद्ध नक्की होणार आणि पाकिस्तान १००% मुंबईवर हल्ला करणार. झालं, सगळ्यांचं धाबं दणाणलं. असं सांगण्यात आलं की जेव्हा सायरन वाजेल तेव्हा सर्वांनी सगळे दिवे बंद करायचे आणि प्रकाश कुठूनच दिसू नये म्हणून सगळ्यांनी आपल्या खिडक्यांच्या काचांना ब्राऊन पेपर चिकटवायचा. आम्ही सोसायटीतील सगळी मुलं कामाला लागलो. युद्धाची भयाणता कुठे समजत होती? काचांना पेपर चिकटविण्यातच आम्ही मग्न होतो. मग अधूनमधून टेस्ट सायरन वाजायचा आणि सगळे दिवे बंद होतात की नाही ते चेक करायला. आम्ही सगळे खाली उतरून कोणाचा दिवा चालू असेल तर बोंबाबोंब करून ते बंद करायला लावायचो. मग एका मित्राला काय वाटले माहित नाही पण म्हणाला जर खरंच हल्ला झाला तर ओरडायचं नाही; पाकिस्तानी विमानांना कळेल आणि आमच्या मंदबुद्धीची परिसीमा म्हणजे आम्हाला सगळ्यांना ते पटलं आणि मग आम्ही सगळे कुजबुजत बोलायची सवय करू लागलो. दिवे बंद झाल्यावरचा तो मिट्ट अंधार कधी बघायची सवयच नव्हती आणि त्यामुळे सगळे घरात न बसता खाली एकत्र जमायचे. नशीब नोव्हेंबर महिना असल्याने असह्य उकाडा नव्हता. मग रेडियोवरून सांगण्यात आलं की जेव्हा सायरन वाजेल तेव्हा सगळ्यांनी एकत्र न जमता घरातच बसावे पण ते देखील टेबलच्या खाली आणि मग आमची ती ही प्रॅक्टिस करून झाली.
अखेरीस ३ डिसेंबरला युद्ध सुरु झालं. तेव्हा टीव्ही नव्हता त्यामुळे बातम्या मिळण्याचा एकमेव स्रोत म्हणजे वर्तमानपत्र. पण आज मला खात्री आहे की तेव्हा मिळणाऱ्या बातम्या या नक्की सरकारी नियंत्रणाखाली असणार. माझे वडील आणि इतर मोठी माणसे रेडियोवरील बातम्या पण सारखे ऐकायचे आणि मग त्यांच्यात गहन चर्चा. आमच्या कानी काही शब्द पडायचे पण फारसा अर्थ काही कळायचा नाही. नंतर अशी एक गोष्ट ऐकली, खरी की वदंता याची कल्पना नाही, की कोळी लोकांना असं सांगण्यात आलं आहे की त्यांनी त्यांच्या होड्यांमध्ये दिवे लावून त्या समुद्रात उभ्या कराव्या. कारण काय तर म्हणे पाकिस्तानी विमानांना वाटावं की तीच मुंबई आहे आणि जे काही बॉम्ब पडतील ते समुद्रातच पडतील. आता विचार केला तर वाटतं की हे किती हास्यास्पद होते. पण तरी देखील आमची भीती कायमच कारण आम्ही अगदीच समुद्रकिनारी राहणारे; आम्ही कसे वाचणार?
नक्की तारीख आठवत नाही पण युद्ध सुरु झाल्यावर साधारण १० दिवसांनी, बहुदा १३ किंवा १४ डिसेंबरला, रात्री साधारण ८-८.३० च्या सुमारास सायरन वाजला आणि पाठोपाठ आकाशात एकामागे एक असे खूप लाल रंगाचे ठिपके दिसू लागले. सगळ्यांना वाटलं की पाकिस्तानने मुंबईवर हल्ला केला. सगळ्यांचेच धाबं दणाणलं; तेव्हाची ती भीती आजही अगदी स्पष्ट आठवते. अर्ध्या तासानंतर ऑल क्लिअरचा भोंगा वाजला आणि सगळ्यांच्या जीवात जीव आला. पण ते लाल ठिपके कसले होते ते काही कळलंच नव्हतं त्यामुळे रात्री उशिरापर्यंत मोठ्यांपासून लहान मुलांपर्यंत सगळ्यांचा नुसता चर्चेचा महापूर. मग दुसऱ्या दिवशी कळलं की भारतीय नौदलाला काही शंका आली म्हणून त्यांनी deterrent च्या स्वरूपात ट्रेसर बुलेट्सचा (हा शब्द बरोबर आहे की नाही याची कल्पना नाही) गोळीबार केला होता.
हा लेख लिहिण्याकरता जेव्हा मी जुने संदर्भ शोधत होतो तेव्हा असं वाचनात आलं की त्याकाळी पाकिस्तानी एयर फोर्सची एवढी क्षमताच नव्हती की ते मुंबईवर हल्ला करून परत जाऊ शकतील.
अखेरीस १६ डिसेंबरला पाकिस्तानने शरणागती पत्करली आणि युद्ध संपले. सर्व मोठ्या लोकांनी सुटकेचा निश्वास टाकला.
हे युद्ध निर्णायक जिंकल्यामुळे पंतप्रधान इंदिरा गांधी या एकदम हिरो झाल्या आणि १९७२ साली झालेल्या निवडणुकांमध्ये त्यांनी भरघोस यश मिळवलं.
आज तंत्रज्ञान एवढं पुढारलं आहे की जर भविष्यात परत कधी पाकिस्तानशी युद्ध झालं तर त्यावेळेसारखी मुंबई नक्कीच सुरक्षित राहणार नाही. त्यामुळे आपण एवढीच इच्छा आणि प्रार्थना करू शकतो की असे संहारक युद्ध होऊच नये.
@ यशवंत मराठे
yeshwant.marathe@gmail.com