मूर्तिमंत सौंदर्य

काही वर्षांपूर्वी, 4 जून रोजी गुगलने हिंदी चित्रपट अभिनेत्री नूतनला गुगल डूडल द्वारे सन्मानित केले होते, जो तिचा 81 वा वाढदिवस असता.

 

एका पोर्ट्रेटमध्ये तिच्या अलौकिक अभिनयाची दखल घेणे केवळ अशक्य होते आणि म्हणून आम्ही चार भिन्न अभिव्यक्ती दर्शविल्या, असे गुगलने त्यांच्या निवेदनात म्हटले होते.

"या प्रतिमेमध्ये बंदिनीमधील मानसिक कलहात गुंतलेली खुनी, सुजातामधील व्यथित अस्पृश्य, सीमाची बंडखोर अनाथ - सर्व संस्मरणीय पात्रे नूतनने साकारलेली आहेत, जी अभिनेत्री संवादाऐवजी केवळ चेहऱ्यावरील हावभाव आणि देहबोली वापरून गुंतागुंतीच्या भावना व्यक्त करण्यासाठी ओळखली जात होती" असे गुगलने पुढे म्हटले.

तिचे चेहरे Google मध्ये "oo" साठी वापरले गेले. 

नूतन ही कुमारसेन आणि शोभना समर्थ यांच्या ज्येष्ठ कन्या होती. जरी ती युरोपमध्ये शिकलेली असली तरी तिने भारतीय आणि पाश्चात्य संस्कृती तितक्याच प्रभावीपणे आत्मसात केल्या होत्या. तिला सुंदर व्यक्तिमत्त्वाव्यतिरिक्त, चित्रपट सृष्टीतील सर्वात कॅमेरा-फ्रेंडली चेहऱ्याचे वरदान होते. कै. सुब्रत मित्रा, (सत्यजित रे यांच्या अपू ट्रायलॉजीमधील त्यांच्या कामासाठी प्रशंसनीय असलेल्या सिनेमॅटोग्राफरच्या मते), नूतन ही कुठल्याही अँगलमधून कायमच फोटोजेनिक दिसायची. 

1950 च्या दशकातील बॉलीवूडच्या नर्गिस, मधुबाला आणि मीना कुमारी या अद्वितीय त्रिमूर्तीनंतर, ज्या एकमेव अभिनेत्रीने निरनिराळ्या शैलीतील भूमिका सर्वात जास्त संस्मरणीय बनविल्या ती म्हणजे नूतन. जेव्हा पुरुष कलाकार त्यांच्या अभिनयाने चित्रपट सृष्टी गाजवत होते तेव्हा तिने अनेक चित्रपट केले जे संपूर्णपणे तिच्या व्यक्तिरेखेभोवती फिरत होते आणि स्वतःच्या आगळ्यावेगळ्या आणि वैविध्यपूर्ण शैलीने तिने रुपेरी पडद्यावर वर्चस्व गाजवले. तिने आपल्या उदात्त अभिनयाच्या जोरावर त्या चित्रपटांना सर्वकालीन अभिजात दर्जा मिळवून दिला. नूतनने स्वत:ला या व्यक्तिरेखेत इतके झोकून दिले की, सिनेमा सोडल्यानंतरही तिच्या प्रत्येक हालचाली, हावभाव, नजर आणि शब्द प्रेक्षकांच्या मनात घर करून राहायच्या. तिचे डोळे इतके बोलके होते की जणू हजारो शब्दांपेक्षा ते भावना जास्त व्यक्त करत असत. 

बंदिनीमधील तिचा अभिनय हिंदी चित्रपटसृष्टीतील आतापर्यंतच्या पाच सर्वोत्कृष्ट चित्रपटांपैकी एक आहे (मीना कुमारीचा साहिब बीबी और गुलाम, नर्गिसचा मदर इंडिया, वहिदाचा गाईड आणि शबानाचा अर्थ). 

तिचे फक्त तीन चित्रपट - सीमा (1955), सुजाता (1959) आणि बंदिनी (1963)- भारतातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्रींमध्ये तिचे स्थान अधोरेखित करतात. या चित्रपटांनी नुसत्याच विश्वासार्ह कथा कथन केल्या नाहीत, तर त्या आपल्या हृदयाला स्पर्श करणार्‍या पात्रांमार्फत त्या काळातील गंभीर सामाजिक समस्यांना तोंड फोडले. नूतनने या चित्रपटांमधील भावनांनी ओतप्रोत भरलेल्या व्यक्तिरेखा अशा चितारल्या की त्याला काही तोडच नाही. विरह, खिन्नता, दुःख आणि करुणा या अत्युच्य भावना ज्या सहजतेने प्रेक्षकांसमोर मांडल्या की ते नतमस्तक झाले. 

आशा भोसले यांच्या खोल आणि गंभीर आवाजात गायलेल्या “अब के बरस भेजो” या गाण्यात, नूतनचा चेहरा कॅलिडोस्कोपसारखा दिसतो, ज्यामध्ये अनेक भावना एकाच वेळी व्यक्त होताना दिसतात. बऱ्याच वेळा, तिची निरव शांतता शब्दांपेक्षा अधिक अभिव्यक्त असते.

त्या काळच्या अभिनेत्री अति-भावनिकतेमध्ये अडकलेल्या दिसतात. मीना कुमारी कायम शोकांतिकेतच असायची, तर नर्गिसच्या चेहऱ्यावर नेहमीच आवेगपूर्ण भाव दर्शवायचे, गीता बाली एक चिरंतन अनाथ वाटायची आणि मधुबाला ही दैवी सौंदर्याची खाण होती. यापैकी कोणाचीही खऱ्या वास्तववादाच्या किंवा व्यावहारिकतेच्या रूपात कल्पना केली जाऊ शकत नाही. यामुळेच नूतन या पडद्यावरील राण्यांपेक्षा खूपच पुढे होती. 

सर्वोत्कृष्ट अभिनयाचा एक वैशिष्ट्यपूर्ण गुण म्हणजे कमीत कमी शब्दात स्वतःच्या भावना व्यक्त करता येणं आणि यात नूतनचा हात पकडणाऱ्या अभिनेत्री अति विरळा. बंदिनीतील कल्याणी जेव्हा तिला मानसिक पीडा देणाऱ्या व्यक्तीच्या चहात विष मिसळते तेव्हाच एकही शब्द नसलेला अभिनय विसरणे कसे शक्य आहे? किंवा पाऊस पडत असताना गांधीजींच्या पुतळ्याखाली अपुरा निवारा शोधणारी हरिजन मुलगी? तसेच सुनील दत्त फोनवर नूतनला ‘जलते हैं जिसके लिए’ गातो तेव्हाचा अभिनय आठवून बघा; जसे अश्रू रिसीव्हरवर शांतपणे पडतात, तसतसे तुम्हाला प्रत्येक ओळीवर तुटलेल्या हृदयाचा आवाज ऐकू येतो. 

नूतन जरी 'भावनांची राणी' म्हणून लोकप्रिय असली तरी ती 'दिल्ली का ठग', 'दिल ही तो है' आणि 'तेरे घर के सामने' यांसारख्या धमाकेदार संगीत आणि कॉमेडीजमध्ये ती तितकीच प्रभावी होती. 

काही आघाडीच्या चित्रपट निर्मात्याच्या मते घागरा-चोली आणि स्विमिंग सूटमध्ये तितकीच आकर्षक दिसणारी एकच नायिका होती आणि ती म्हणजे शर्मिला टागोर. परंतु नूतनने देखील साडीत अडकलेल्या देवीच्या प्रतिमेपासून वेगळे होऊन दोन्ही प्रयत्न यशस्वीपणे केले. आणि तिच्या या प्रयत्नांमुळे प्रेक्षक देखील अजिबात नाराज झाले नाहीत. कारण त्यांचा तिच्यावर ठाम विश्वास होता की ती कुठच्याही भूमिकेत आपला सर्वोत्तम अभिनयच करेल. आणि त्यामुळे तिने पडद्यावर काहीही केले तरी सौंदर्याच्या दृष्टीने ते चुकीचे असूच शकत नाही. प्रेक्षकांच्या याच आत्मविश्वासाच्या बळावर ती चार दशकाहून अधिक काळ ती भारतीय चित्रपटसृष्टीची आयकॉन होती. 

आणि हे तिचे वेगळेपण तिला पन्नाशीच्या दशकातील महान अभिनेत्रींच्या मांदियाळीत चार अंगुळे वरचे स्थान मिळवून गेले. तिने सर्वोत्कृष्ट अभिनयासाठी पाच फिल्मफेअर पुरस्कार जिंकले आणि हा विक्रम जवळपास ३० वर्षे तिच्या नावावर होता जोपर्यंत तिची भाची काजोलने २०११ मध्ये तिच्याशी बरोबरी करेपर्यंत. तिने मेरी जंगमधील भूमिकेसाठी सहाय्यक अभिनेत्रीचा आणखी एक पुरस्कार जिंकला.

नूतनच्या रुपेरी पडद्यावरील अभिनयाचा संदर्भ देताना, तिला कायम पार्श्वगायनाची साथ देणाऱ्या लता दीदींच्या मते नूतन ही अशी एकमेव अभिनेत्री होती की जी पडद्यावर गाण्यांना लिप सिंक इतकं सुरेख करत असे की प्रेक्षकांना वाटावं की खरंच ती गाते आहे. 

तिच्या कारकिर्दीतील इतर उल्लेखनीय चित्रपट म्हणजे पेइंग गेस्ट, अनारी, छलिया, सोने की चिडिया, मिलन, सरस्वती चंद्र, सौदागर, मैं तुलसी तेरे अंगान की आणि नाम. 

हिंदी चित्रपट प्रेमी नूतनचे ते सुंदर हास्य आणि पडदा व्यापून टाकणारे तिचे भावुक डोळे विसरू शकत नाही. कदाचित देवालाही तिच्या हास्याचा मोह झाला असेल आणि म्हणूनच वयाच्या अवघ्या 54 व्या वर्षी तिला आपल्याकडे बोलावून घेतले.

 

नूतन ही हिंदी चित्रपटसृष्टीतील माझी सर्वकालीन आवडती अभिनेत्री आहे.

 

@ यशवंत मराठे 

yeshwant.marathe@gmail.com 

Leave a comment



Pradeep Gogte

2 years ago

Well said, Yeshwant.
Nutan was indeed an incomparable legend of the cine world of the 1950s and 60s. For some strange reason, we movie buffs appreciated Meena Kumari, Nargis, Waheeda Rahman and others but, for sheer facial expressions exhibiting a thousand emotions, none of these had that ethereal quality.
Thanks for your article. Keep writing.

पुष्कराज चव्हाण

2 years ago

आजवरच्या तुझ्या सर्व लेखांपैकी अगदी आवडलेला आणि आनंदाने वाचलेला हा तूझा नूतन वर लिहिलेला लेख. मधुबाला तिच्या आरस्पानी सौंदर्या मुळे लोकप्रिय होती तर नूतन तिच्या नितळ, सोज्वळ सौंदर्यामुळे सर्वसामान्यांना आपल्यातलीच एक वाटल्याने प्रेक्षकांच्या किंवा सिनेरसिकांच्या हृदयात ठाण मांडून बसली होती. अभिनयात मात्र नूतन सर्वश्रेष्ठ होती हे मात्र त्रिकालाबाधित सत्य आहे. नूतन माझ्या आयुष्यात मला आवडलेली पहिली परस्त्री आहे.

RAJENDRA MADHUSUDAN PHADKE

2 years ago

अलौकिक अभिनेत्रीचं अभ्यासपूर्ण वर्णन !

दिलीप सुळे

2 years ago

नूतन च चित्र डोळ्यांसमोर येत, इतका सुंदर लेख आहे.

Contact Form

subscribe

Thank you for subscribing.

Something went wrong.

Contact Info

  • yeshwant.marathe@gmail.com

Follow Me

My Other Blogs: historycafe.in

Copyright © 2020 Sarmisal.

Made with ♡ by iTGS