भालचंद्र उर्फ भाल्या देवधर हा माझा मित्र कसा काय झाला हे मोठं कोडंच आहे. बालमोहनमध्ये असला तरी चार वर्षांनी मोठा, त्यामुळे आधीपासून अजिबात माहितीचा नव्हता. साधारण 1979-80 साली पहिली ओळख झाली. काय त्याचे व्यक्तिमत्व!! साडे सहा फूट उंच, पिळदार शरीर, सावळा असला तरी किती रुबाबदार! मी त्याच्या प्रेमातच पडलो. भारतीय देखणा पुरुष हा तसा विरळाच. कोकणस्थ माणूस जरी गोरा, घारा असला तरी दिसायला चांगला असेलच असे नाही. पण कोकणस्थी सावळ्या सौंदर्याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे भाल्या. मिल्स अँड बून पुस्तकातील टिपिकल टॉल, डार्क अँड हँडसम हे बिरुद ज्याला एकदम चपखल बसेल असा माणूस. मनात विचार आला की पुरुष असून देखील हा माणूस मला इतका आवडला तर मुली तर पार पाघळून जात असतील. वाटलं यांच्यासमोर आपण तर फारच शामळू. पण कदाचित opposite poles attract ह्या उक्तीनुसार त्याची माझी मैत्री झाली. मी कोण कळल्यावर मला म्हणाला, अरे मी तुझ्या घरी येऊन तुझ्या वडिलांना भेटून गेलो आहे. माझा कॉन्ट्रॅक्टरचा व्यवसाय आहे, त्यामुळे काही काम मिळू शकेल का असा अंदाज घ्यायला त्यांना भेटलो होतो. तेव्हा तुला मी बघितलं होतं. मला काहीही आठवत नव्हतं पण तरी देखील मी तोंडदेखल्या हो हो मात्र केलं.
आमची मैत्री हळूहळू फुलू लागली कारण काही आवडत्या गोष्टी सारख्या होत्या उदा. दारू, सिगरेट. मला एकदा अचानक एक दुसरा मित्र भेटला आणि सांगू लागला की तू काय वेडा आहेस का त्या गुंड भाल्याशी मैत्री करायला? मी अवाक झालो; म्हटलं मला तर असे काही जाणवले नाही. तेवढ्यात भाल्या येताना दिसला आणि त्या मित्राने लगेच कलटी मारली. भाल्या म्हणाला काय याने सांगितलं की नाही की मी गुंड आहे म्हणून? म्हटलं अरे तू आहेस का तसा? पण कालांतराने माझ्या लक्षात आलं की बंडखोरी त्याच्यात जन्मजात ठासून भरली होती. अंगात अफाट ताकद त्यामुळे एखाद्या माणसाच्या कानफटात मारली तर डोळ्यासमोर अंधारी शंभर टक्के. आणि वय ही असे की अशा गोष्टींची एक नशा असते. या सगळ्यामुळे त्याची तशी ख्याती झाली असावी. पण बाहेरून राकट आणि कणखर वाटणारा भाल्या वस्तुतः मनातून अत्यंत प्रेमळ होता. एकदा एखाद्याला आपला म्हटला की त्याच्यासाठी काय वाटेल ते करण्याची तयारी.
हा राहायचा डी एल वैद्य रोडवरील नारायण निवास (जी आता अस्तित्वात नाही) या बिल्डिंगमध्ये. एकदा म्हणाला, जर घरी जाऊ चहा प्यायला. वाटेत एक नऊवारी साडी नेसलेल्या लहानखुऱ्या बाई समोरून येत होत्या. त्यांना बघून भाल्याने हात जोडले, म्हणाला, काय सुमतीबाई कुठे चाललात? त्या म्हणाल्या माउलींच्या देवळात, तर हा लगेच म्हणाला, म्हणजे आज ज्ञानेश्वरांबरोबर डेट दिसतीये. त्या बाई सुद्धा हसत निघून गेल्या. मी विचारले, अरे कोण या बाई? मला म्हणाला, च्यायला तू ओळखत नाहीस वाटतं, अरे ती माझी आई होती. हसून हसून माझी बोबडी वळायची वेळ आली.
देवधरांच्या एकत्र कुटुंबातील हा शेंडेफळ. पण वडील लवकर गेल्यामुळे जबाबदारीची जाणीव जरा जास्तच लवकर झाली असावी आणि त्या अंगभूत बंडखोरीचे मूळ इथे होते. उषाताई, जयाताई आणि मायाताई भाऊ म्हणून हाक मारायच्या, त्यामुळे कालांतराने संपूर्ण देवधर कुटुंबात तो भाऊ म्हणूनच ओळखला जायचा. सगळ्या भावंडांचे याच्यावर (मग सख्खे, चुलत असा भेदभाव नव्हता) प्रचंड प्रेम आणि हा ही त्यांच्यावर जीव टाकायचा. सगळ्या पुतण्यांचा आणि भाच्यांचा अत्यंत लाडका भाऊ काका किंवा भाऊ मामा.
देवधर मंडळी तशी खावून पिऊन सुखी पण मध्यमवर्गीय. त्यामुळे स्वतः कमवायला लागेपर्यंत काही त्याच्याकडे पैसे नसायचे. व्यवसाय चालू केल्यावर सुद्धा पहिली काही वर्षे तशी फारशी कमाई नसतेच. आणि व्यवसाय देखील भागीदारीत होता. त्याचा भागीदार, अकबर खान, हा त्याच्यापेक्षा वयाने तीन वर्षाने मोठा पण तरी देखील तो भाल्याचे सगळं ऐकायचा. तो भाल्यावर भावासारखे प्रेम करायचा.
एकदा आमच्या एका मित्राला कॉलेजची पुस्तके घेण्याएवढे पैसे नव्हते. त्याने आम्हाला असे सांगितले तेव्हा दुर्दैवाने माझ्याकडे अजिबात पैसे नव्हते. भाल्याने स्वतःच्या पाकिटातील सगळे पैसे त्याला दिले. मित्र लाजला तर हा काय म्हणतो, अरे नको काळजी करू; उद्या काहीतरी कमवीनच. खिशात फार पैसे नसताना सुद्धा त्याची दानत बघितली आणि थक्क झालो.
आधी म्हटल्याप्रमाणे मैत्रिणी भरपूर पण प्रेम वगैरे काही होते असे मला तरी वाटायचे नाही. त्याच्यात एक animal magnetism होता की कोणीही त्याच्याकडे ओढला जायचा आणि साहजिकच असे झालेले कुठल्या पुरुषाला आवडणार नाही? एक दिवस मला म्हणाला, की मी प्रेमात पडलोय. त्या मुलीला तू एकदा भेट. आणि अशी माझी निलीमा आपटेशी भेट झाली. मला तिची सगळी कौटुंबिक माहिती कळल्यावर जरा काळजीच वाटली कारण ह्या झंझावाताला सांभाळणं काही सोपी गोष्ट नव्हती. तिचे वडील Pfizer Asia चे मेडिकल डायरेक्टर. बरीच वर्षे आपटे मंडळी हॉंगकॉंग मध्ये राहत होती. रुईया कॉलेजच्या मागे प्रचंड मोठा फ्लॅट; ज्याच्या हॉलमध्ये 50-60 लोकं आरामात बसू शकली असती. एक उच्चभ्रू सांपत्तिक स्थितीतील कुटुंब आणि त्यामानाने भाल्या अगदीच मध्यमवर्गीय. वाटलं ही मुलगी एवढ्या मोठ्या घरातून एकत्र कुटुंब पद्धतीत आणि अडीच खोल्यांच्या घरात कशी काय रुळणार? थोड्याफार विरोधाला झुगारून 26 जानेवारी 1983 साली दोघे विवाहबद्ध झाले. अत्यंत कमी कालावधीत त्याने सर्व आपटे खानदानाला पण आपलेसे करून घेतले आणि ते सुद्धा इतके की जणू तो त्यांचा मुलगा. आम्ही त्याचे मित्र त्यामुळे आमचा तसा आपट्यांशी काहीच संबंध नव्हता पण भालूचे (आपटे खानदानाने थोडे बदललेले नाव) मित्र म्हणून आमचे तिथे कायमच सहर्ष स्वागत झाले.
सगळ्याच नवरा बायकोत भांडणे होतातच; होत नाही असे सांगणारे खोटं बोलतात असे माझे ठाम मत आहे. परंतु भाल्या निलीमाची खासियत म्हणजे एका दिवसात त्या भांडणाचा निचरा व्हायचा. मला नेहमी त्याचे आश्चर्य वाटायचे की मला माझ्या बायकोशी झालेले भांडण निस्तरायला किमान चार पाच दिवस लागतात; मग यांना कसं काय जमतं?
याच्याबरोबर कधीही बाहेर गेलो की कोणीतरी विचारायचेच की हे मिलिट्रीत आहेत का? मॉडेल आहेत का? याची छाप पडली नाही असे होणेच शक्य नव्हते. त्याच्या राकटपणाचे आणि ताकदीचे दोन किस्से सांगतो जे मी याची देही याची डोळा बघितले आहेत.
- एकदा त्याच्या कंस्ट्रक्शन साईटवर गेलो असता तिथल्या मुकादमने काम बरोबर केले नाही यावरून त्यांच्यात बाचाबाची झाली. भाल्याने त्याला अक्षरशः उचलला आणि दुसऱ्या मजल्यावरून खाली असलेल्या मातीच्या ढिगाऱ्यावर फेकला. मलाच फेफरं यायची वेळ आली पण हा बिनधास्त.
- त्याच्या मुलीला (अदिती) कडेवर घेऊन भाल्या आणि मी कुठेतरी चाललो होतो. मुलगी म्हणजे त्याचा जीव की प्राण. एका हिजड्याने आम्हाला हटकले आणि तो मुलीच्या अंगाला हात लावू लागला. भाल्याने दोनदा सांगितलं की बच्ची को हाथ मत लगाओ. पण त्या हिजड्याने काही ऐकले नाही. एका हातात कडेवर मुल असताना याने दुसऱ्या हाताने त्याने त्या हिजड्याच्या कानाखाली जो काही जाळ काढलाय की तो तिथेच फळाफळा मुतला.
त्याचे आईवर (तो अक्का म्हणत असे) निरतिशय प्रेम; एक प्रकारे त्याचे सर्वस्व. मला आठवतंय एकदा तो त्यांच्या बिल्डिंग मध्ये शिरला तेव्हा अक्का दमूनभागून कुठूनतरी आल्या होत्या आणि पहिल्याच पायरीवर होत्या. भाल्या अक्कांना म्हणाला लहानपणी मला उचलून घरी न्यायचीस ना? आता माझी पाळी आहे. त्यांना अक्षरशः कडेवर उचलून दुसऱ्या मजल्यापर्यंत तो घेऊन गेला. त्यांना आपल्या मुलाचे किती कौतुक वाटले असेल याची आपल्याला कल्पनाच करता येणार नाही. अक्कांचा तो श्रावण बाळच होता. त्यांना सांगायचा की मी तुला कधी मरूच देणार नाही. आणि मेलीसच तर एखाद्या माशासारखी तुला सुकवून जपून ठेवीन. या संवादानंतर दोघेही खूप हसायचे.
त्याची मुलगी, अदिती, त्याच्या जीवाचा कलेजा; अतिशय लाडकी. अदिती म्हणजे सौंदर्याचे मूर्तिमंत प्रतीक. आई बापाकडून सगळे बेस्ट निवडून तिला बनविली असावी असे रूप. त्यामुळे भाल्या तिच्या बाबतीत एकदम possessive. मी त्याला नेहमी गंमतीत म्हणायचो, अरे, ही कॉलेजमध्ये जाईल तेव्हा तू बहुदा रायफल घेऊनच तिच्या मागे फिरशील. काही वर्षानंतर भाल्यालाच हौस की आपल्याला दुसरे मूल हवे. 1993 साली दुसरी मुलगी, गार्गी, झाली. भाल्या तिला तेल लावण्यापासून सगळं करायचा. इतक्या लहान मुलीचे एवढे सगळे करणारा बाप मी तरी आजपर्यंत दुसरा कोणी बघितला नाही. गार्गी सुद्धा दिसायला इतकी छान की आम्ही त्यांना देखणी फॅमिली म्हणायचो.
मला नेहमी एक गोष्ट सांगायचा की माझे आजोबा आणि वडील दोघेही अकाली लवकर गेले त्यामुळे माझ्या बाबतीत तो तिजा होणार आहे. मी त्याला म्हटलं की तुला मरणाचे डोहाळे का लागले आहेत? मग दुसऱ्या मुलीला या जगात का आणलेस? जेव्हा मी असे सांगितले तेव्हा मात्र म्हणाला की आता याच्या पुढे असे बोलणार नाही.
त्याने तसे बोलणं थांबवले पण नियतीच्या मनात काहीतरी काळंबेरं असावे. शनिवार, 26 ऑगस्ट 1995 या दिवशी लोणावळ्याच्या आसपास त्याचा भयंकर अपघात झाला आणि काळाने त्याला अक्षरशः ओढून नेले. माझ्या एका मित्राचा फोन आला, अरे भाल्या गेला.. मला काय बोलावे तेच कळेना. एक प्रकारे सगळं वातावरण स्तब्ध आणि विषण्ण झाले. गेल्या 16-17 वर्षातील सगळे प्रसंग नजरेसमोरून एखाद्या सिनेमासारखे आठवत होते. पण एकच गोष्ट वारंवार जाणवत होती की तिजा झाला. 39 हे काय जायचे वय आहे का? काय हा नशिबाचा जीवघेणा खेळ. बायको 35 वर्षाची, मुली 10 आणि 2 वर्षांच्या. डोकंच चालत नव्हते.
त्यावेळी एक गोष्ट ऐकलेली आठवली. आचार्य अत्रेंनी राम गणेश गडकरींच्या पुण्यातील त्यांच्या पुतळ्याच्या अनावरण समारंभात असे म्हटले होते - "फार लवकर गेली हो ही मंडळी. एखादा हुशार विद्यार्थी तीन तासाचा पेपर जसा दीड तासात सोडवून लवकर घरी जातो, त्याप्रमाणे आयुष्याचा पेपर हे लवकर सोडवून निघून गेले".
भाल्या, तू ही तसाच निघून गेलास रे..
आज सुद्धा कधीही आमच्या मित्रांची भेट झाली आणि भाल्याचा विषय निघाला नाही असे कधीच होत नाही. एक बेधडक आणि अफाट व्यक्तिमत्व, एक प्रकारे वादळच शांत झाले म्हणा ना, पण त्या वादळाच्या खुणा आम्हां मित्रांच्या मनात अजून तशाच जाग्या आहेत.
जिंदगी के सफर में गुजर जाते है जो मकाम,
वो फिर नही आते, वो फिर नही आते..
भाल्या, जिथे असशील तिथे तू सर्वांना आनंदी करशील यात मला कसलीही शंका नाही. देवाला सुद्धा असा देखणा पुरुष त्याच्या दरबारात हवा असेल म्हणूनच तर त्याने तुला लवकर बोलावले.
@ यशवंत मराठे
yeshwant.marathe@gmail.com