मुंबईचा भाजी बाजार
मेहेर मार्केट ही मुंबईच्या भाजीपाल्याची गंगोत्री म्हटली जाते. सन 1858 च्या दरम्यान जुन्नर भागातील, धोंडिबा कृष्णाजी मेहेर यांनी नापिकीला कंटाळून नाणे घाटातून पायी तंगडतोड करत मुंबई गाठली. तिथे ब्रिटिश सरकारकडून लीझने जमीन घेऊन भाजीपाला पिकविण्यास सुरुवात केली. त्याच बरोबरीने त्यांनी ग्रामीण भागातील अनेकांना बोलावून घेऊन भाजीपाला पिकविण्याचे क्षेत्र अजून वाढवले व तेथेच भाजी विक्रीचा बाजार सुरु केला. तेच हे मेहेर मार्केट अर्थात भायखळा भाजी बाजार.
मुंबईची जमीन बहुतांशी काळी-पांढरी होती. त्या वेळी माहीम, परळ, वरळी आणि महालक्ष्मी ह्या भागात शेत जमिनी होत्या. त्या वेळी मुंबईत दादरची पाटील वाडी (आता तेथे हनुमान मंदिर आहे), घाटकोपरची भटवाडी, परळची पोयबावाडी, गोवंडीची बैंगणवाडी, माहीम, कुर्ला, वरळी, शिव, वसई, विरार, साष्टी या ठिकाणी भाजीपाला पिकवणाऱ्या वाड्या निर्माण झाल्या. तसेच अलिबाग व पनवेल वरून शेतकरी भाजीपाला घेऊन येऊ लागले. देवनारच्या बैंगणवाडी येथे राणोजी मोहनाजी भुजबळ हे मोठ्या प्रमाणात वांगी पिकवत असत म्हणून त्या भागाला बैंगणवाडी हे नाव पडले. ती वांगी पहाटे बैलगाडीतून भायखळा येथे विक्रीस येत.
तसं पाहता मुंबईतील अनेक भागांची नावे ही अशीच गमतीशीर आहेत. तुतारीच्या आकाराचे दौलदार फुलाचे झाड फुलविणारा भाग (ज्याच्या फुलाचे नाव परळ असे होते) तो भाग झाला परळ, ज्या भागात चिंचेची झाडे होती त्याचे झाले चिंचबंदर, भेंडीची झाडे होती त्याचा झाला भेंडीबाजार, उंबराची झाडे मोठ्या प्रमाणावर होती त्याचे झाले उमरखाडी, पाय धुण्यासाठी तलावाचा उपयोग केला जात असे त्याला पायधुनी म्हणत, केळीची झाडे असणाऱ्या भागाला केळीवाडी म्हणत, ताडांच्या झाडामुळे ताडवाडी हे नाव पडले. ताडदेव भागात एक देऊळ होते त्याला ताडदेव म्हणत. आगरी समाजाची वस्ती असणाऱ्या भागाला आग्रीपाडा म्हणत. जेथे खूप देवळे होती त्या भागास भुलेश्वर हे नाव पडले. भायखळा हे नाव भायाचा खळ ह्यामुळे प्रसिद्ध झाले. मुंबादेवी ही कोळी समाजाची देवता म्हणून मुंबई हे नाव पडले.
बाजारचा व्याप वाढू लागला तसतसा महाराष्ट्रातील सर्वच भागातून, एवढेच नव्हे तर भारताच्या कान्याकोपऱ्यातून, भाजीपाला विक्रीस येऊ लागला. मुंबई शहराची भाजीपाल्याची गरज भागू लागली. रेल्वेमुळे जवळजवळ 24 तास भाजीपाल्याची मोठ्या प्रमाणात आवक मार्केटमध्ये होऊ लागली आणि देशातील टर्मिनल मार्केट म्हणून ह्या मार्केटचा बोलबाला झाला. परंतु भाजीपाला ही अशी वस्तू आहे की फायदा होण्यासाठी योग्य वेळेतच त्याची विक्री झाली पाहिजे. नाशिवंत असल्यामुळे जरासा उशीर केला तर भाजीच तुम्हाला विकून खाईल.
मार्केट मधील लोकांचे जीवनमान 12 तास कष्टाचे होते. सुमारे 160 वर्षांपूर्वी जुन्नर आंबेगाव तालुक्यातून व महाराष्ट्राच्या इतर भागातून मेहेर, भुजबळ, वऱ्हाडी, नाईक, झुटे, ढोले, गोडसे, वाणी, डोके, कोल्हे, मंडलिक, बोरावके, बोऱ्हाडे, बालसराफ इत्यादी मंडळी नाणे घाटातून भायखळा भाजी बाजारात व्यापारासाठी आली व इथेच ती स्थिरावली. यातील काही मंडळींनी वाड्या खंडाने घेतल्या व तेथे भाजीपाला पिकवून तो मार्केट मध्ये विक्रीस आणला. इतरही अनेक ठिकाणच्या वाड्यांमधून अगदी पहाटेच तो माल ढीग लावून हारे, पाट्या अश्या मापाने विकला जात असत. भाजीपाला खरेदी करण्यासाठी मुंबईतील छोटया छोट्या मार्केटमधील किरकोळ व्यापारी (विशेषतः कुलाबा, फोर्ट, भुलेश्वर) येत असत. तसेच रेल्वेने कल्याण पासूनचे व्यापारी येत असत आणि मोठ्या प्रमाणात भाजी विक्रीची उलाढाल होत होती. 1977 च्या सुमारास 3000 टन भाजी 500-600 ट्रकच्या माध्यमातून विक्रीस येत असे. या व्यवसायात अनेक स्त्रियांनी भाजी विक्रीचा व्यवसाय केला.
त्या काळचे अर्थकारण म्हणजे 3 पै = 1 पैसा, 4 पैसे = 1 आणा, 16 आणे म्हणजेच 64 पैसे = 1 रुपया अशी हिशोबाची किचकट पद्धत होती. तरी सुद्धा जुन्या काळातील व्यापारी आणि ग्राहक कॉम्पुटर नसून देखील हिशोबाला पक्के होते. पुढे भारत स्वतंत्र झाला आणि हिशोबाची दशमान पद्धत सुरु झाली. तरी देखील सुरुवातीला भाजी मार्केटमध्ये जुनी पद्धत आणि नवीन दशमान पद्धत यांचा ताळमेळ घालताना वाद व्हायचे. कारण, गिऱ्हाईकांच्या डोक्यातला 'आणा' जात नव्हता. जवळजवळ दहा वर्षे जुनी चलन पद्धत चालू होती.
वजनाची मोजमापे:
1) चिळव
2) 2 चिळव म्हणजे 1 मिळव
3) 2 मिळव म्हणजे 1 कोळव
4) 2 कोळवी म्हणजे 1 चिपटं
5) 2 चिपटी म्हणजे 1 आठवा
6) 2 आठवे म्हणजे 2 शेर
7) 4 शेर म्हणजे 1 पायली
8) 16 पायल्या म्हणजे 1 मण
9) 20 मण म्हणजे 1 खंडी
10) 120 शेर म्हणजे 1 पल्ला
जुनी नाणी:
1) पै
2) अधेला
3) तीन पै किंवा दोन अधेले म्हणजे एक पैसा
4) दोन पैशांचा एक ढब्बू पैसा
5) 4 पैसे किंवा 2 ढब्बू पैसे म्हणजे एक आणा
6) 2 आण्यांची एक चवली
7) चार आणे किंवा दोन चवल्या म्हणजे 1 पावली
8) 2 पावल्या म्हणजे एक अधेली
9) 2 अधेली म्हणजे 1 रुपया.
अखेरीस ही जुनी मोजमापे व परिमाणे जाऊन 1 एप्रिल 1957 पासून दशमान पद्धत अंमलात आली.
12-12 तास काम करूनही इकडे व्यापारी आनंदी असत. ह्या भागातच पॅलेस सिनेमा, सात रस्त्याचे न्यू शिरीन टॉकीज, डिलायल रोडचे प्रकाश टॉकीज, लालबागचे जयहिंद टॉकीज, गणेश टॉकीज, नागपाड्याचे अलेक्झांड्रा टॉकीज इकडे सिनेमे बघितले जात. तसेच लालबागचे न्यू हनुमान थिएटर, भायखळा स्टेशन समोरचे लोकमान्य थिएटर (आता नाही), भायखळा शाळेचे मैदान, सर एल्ली कदुरी हायस्कूलचे मैदान, महाराष्ट्र हायस्कूलचे मैदान येथे तमाशाचे फड रंगत. त्याचा फार मोठा प्रेक्षक वर्ग हे बाजारचे व्यापारी, कामगार व गिरणी कामगार होते. ह्या मनोरंजनामुळे त्यांचा शीण भार हलका होत असे. आणि हो, तिथे थोडीफार दौलतजादागिरी देखील होत असे.
पुढे याच मार्केटमध्ये नामदेव उमाजी भालिंगे यांनी बी बियाणांचे दुकान सुरु करून विलायती भाज्यांचा प्रसार केला.
मेहेर कुटुंबाने हा बाजार आपल्या ताब्यात द्यावा असा ठराव महापालिकेने 1985 मध्ये केला. परंतु मुकुंदराव पाटील, छगन भुजबळ, अण्णासाहेब झुटे यांनी हे मार्केट सहकारी तत्वावर चालविण्याचा विचार मांडला.
येथील व्यापाऱ्यांनी व्यापारबरोबर सामाजिक, राजकीय, सहकार आणि धार्मिक क्षेत्रातही मोलाची कामगिरी बजावली आहे.
बाजारामधील काही ठळक घटना:
1) कामगार चळवळीचे जनक नारायण मेघाजी लोखंडे यांचा याच मार्केटमध्ये भाजीचा व्यवसाय होता
2) इ. स. 1882 साली लोकमान्य टिळक व गोपाळराव आगरकर यांची डोंगरीच्या तुरुंगातून सुटका झाल्यानंतर सत्यशोधक समाजातर्फे व्यापाऱ्यांनी त्यांचा सत्कार मार्केट मध्ये केला
3) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विवाह याच मार्केट मध्ये झाला
4) शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी याच मार्केट मध्ये कोथिंबीरचा व्यापार करून पैसे मिळवले व 'राजा शिवछत्रपती' हा ग्रंथ लिहिला
5) दलित पॅन्थरचे नेते कै. नामदेव ढसाळ यांनी याच मार्केटमध्ये पाटीवाल्यांची युनियन चालवली
6) स्वातंत्र लढ्यात निरनिराळ्या भागातून स्वातंत्र सैनिकांसाठी संदेश भाजीच्या करंड्यातून येत व ते योग्य त्या ठिकाणी पोहोचवण्याचे काम व्यापाऱ्यांनी केले
7) गोवा मुक्ती आंदोलन व संयुक्त महाराष्ट्र चळवळ ह्यातही व्यापाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग केला होता
यादी बरीच मोठी होईल म्हणून काही निवडक गोष्टींचाच उल्लेख केला आहे.
असा आहे मेहेर मार्केट तथा भायखळा मार्केटचा रंजक इतिहास.
@ यशवंत मराठे