आपल्या जीवनात स्वच्छतेचे महत्व कोणीही नाकारू शकत नाही. स्वच्छ परिसर, हवा, पाणी, वातावरण कोणाला नकोसे असते? स्वच्छता असेल तर स्वाभाविक पणे कमी आजार, कमी रोगराई आणि त्यामुळे आपली जीवनशैलीही बदलते आणि एकूणच आपल्या जीवनावर खूप चांगला परिणाम होतो.
भारत आणि पाश्चात्य देशांमधील एक सगळ्यात मोठा फरक म्हणजे स्वच्छता. त्यांची शहरे इतकी स्वच्छ आणि सुस्थितीत कशी असा प्रश्न आपल्याला नेहमीच पडतो, नाही का? आणि फक्त पाश्चिमात्य देशच कशाला अगदी आशियाई किंवा आफ्रिकन देशांमध्ये सुद्धा आपल्या मानाने प्रचंड स्वच्छता दिसते. आपण बऱ्याच वेळा आपली लोकसंख्या जास्त म्हणून हा प्रॉब्लेम येतो अशी एक समजूत करून घेतली आहे. जगातील मोठी मोठी शहरे बघा, भारतातील घाणीसमोर जेमतेम १०% वगैरे घाण असेल. पण मग त्यांना जमतं तर आपल्याला का जमत नाही हा प्रश्न भंडावून सोडतो. घाण करण्यामध्ये कदाचित आपल्या देशाचा जगात पहिला नंबर लागेल. या बाबतीत आपण जगाच्या काही दशके मागास आहोत.
आपल्याला हे सगळे माहीत आहे, पण तरीही आपण या साठी काहीच करत नाही. आपण आपले घर स्वछ ठेवतो आणि परिसराकडे दुर्लक्ष करतो. घर आपले आणि परिसर दुसऱ्यांचा या विचाराने भारताचा ऱ्हास केला आहे. स्वच्छता हे फक्त सरकारचे काम नाही, त्यांची जबाबदारी जरूर आहे. सरकारने योग्य त्या सुविधा पुरवल्यातच पाहिजेत. पण जोपर्यंत आपण स्वच्छता प्रिय होत नाही, स्वच्छतेचे महत्व, फायदे जाणून घेत नाही तो पर्यंत काहीही बदल होणार नाही. आपण विदेशी शहरांतील स्वच्छता पाहून त्याचे गुणगान गातो, मात्र तेथील स्वच्छता ही तेथे राहणाऱ्या लोकांमुळे आहे, त्यांच्या स्वच्छतेच्या सवयीमुळे आहे, हे आपण विसरतो. आपल्यातील किती जण आपल्या घराबरोबर, आपला परिसर, आपले ऑफिस स्वच्छ ठेवायचा प्रयत्न करतात? किती जण आपल्या मुलांना स्वच्छतेचे महत्व सांगतात? आणि त्याचे अनुकरण करायला सांगतात? आणि स्वतः अनुकरण करतात?
आपल्या नद्या या सांडपाणी वाहून नेणारी गटारे बनल्या आहेत. कचऱ्याचे डोंगरच्या डोंगर शहरांमध्ये तयार होत आहेत. आज सार्वजनिक ठिकाणी, बसमध्ये, लोकलमध्ये, ऑफिसेस मध्ये, उद्यानांमध्ये, इमारतींच्या आवारात, रस्त्यावर सगळीकडे आपल्याला अस्वच्छता दिसेल. सिगारेटची थोटके, खाद्य पदार्थांची वेष्टने, कागदाचे तुकडे, तंबाकू गुटख्याच्या पिचकाऱ्यांनी रंगवलेल्या भिंती दिसतील.
दुसरी अत्यंत गलिच्छ गोष्ट म्हणजे दहा पैकी कमीतकमी आठ लोकं (शहरातील बायकांमध्ये हे प्रमाण थोडेफार कमी, पण गावात बायका पुरुषांच्या अगदी खांद्याला खांदा लावून) पचापच थुंकताना दिसतात. आपल्या देशाचा नॅशनल पासटाईम जर काही असेल तर तो म्हणजे जिथे शक्य होईल तिथे थुंकणे. मुंबईतील अगदी पॉश थिएटर मध्ये जा, इंटरव्हल मध्ये टॉयलेट मध्ये गेलात की तेच दृश्य; मुतारीत थुंकणे. It is such a disgusting sight! पण सांगणार कोणाला? सगळेच थुंकण्यात मग्न. यांना कोणी थुंकी गिळली तर आजार होतो अशी शिकवण दिलेली असते बहुदा.
मी स्वतः अनुभवलेले उदाहरण सांगतो. मी एकदा गाडीतून येत असताना २-४ गाड्या समोर एक BMW उभी होती. गाडी असली जरी एक कोटी रुपयाची तरी मानसिकता एक रुपयाची पण नसणार. त्याची गाडी सिग्नलला उभी होती तेव्हा गाडीची काच खाली झाली आणि एक रिकामी पाण्याची बाटली, एक सॉफ्ट ड्रिंकची बाटली, एक अर्धवट खाल्लेले फूड पॅकेट असे रस्त्यावर शांतपणे फेकण्यात आले. मला इतका राग होता की जर मी बाजूलाच असतो तर चांगल्या दोन शिव्या हासडल्या असत्या. त्याचा मी पाठलाग करायचा प्रयत्न केला पण त्याला गाठणे मला जमले नाही.
आम्ही शिवाजी पार्कच्या आसपास रहाणारे तर त्रस्त झालो आहोत. कुठलाही सण, उत्सव, मिरवणुका झाल्या की पार्कची अगदी दयनीय अवस्था होते. अर्धवट खाऊन टाकलेल्या प्लेट्स, रिकाम्या बाटल्या (दारूच्या सुद्धा) यांची नुसती रेलचेल. माझ्यासारख्या चालायला जाणाऱ्या लोकांचे तर हालच हाल. एक प्रकारचा कुबट वास सर्वत्र पसरलेला असतो. महानगरपालिकेचे कर्मचारी तरी किती साफ करतील? त्यांची अक्षरशः कीव येते.
हल्ली काही वर्षातील नवीन प्रकार म्हणजे तरुण मुलामुलींचा ग्रुप पार्कच्या कट्ट्यावर वाढदिवस साजरा करतात. केकचे तुकडे, सॉफ्ट ड्रिंकच्या बाटल्या तिथेच फेकून निघून जातात. सांगायला गेलं तर अरेरावी. काय तर एवढी घाण इथे पडलेलीच आहे मग आम्ही टाकलं तर काय बिघडलं? तसेच चांगले शिकले सवरलेले श्रीमंत लोकं त्यांच्या पाळीव कुत्र्याला घेऊन फिरायला येणार, तो कुत्रा कुठेही हगणार आणि आम्ही मात्र प्रत्येक पाऊल खाली बघून जपून टाकायचं. सिम्पली हॉरिबल. आपल्या लोकांची सिव्हिक सेन्सच्या नावाने पूर्ण बोंब आहे. कोणालाच, कशाचेच काही वाटेनासे झाले आहे. आपण सर्व कोडगे झालो आहोत. झोपडपट्टीतील लोकांना दोष देण्यात काही अर्थ नाही आपणही सगळे नालायक आहोत. कधी कधी वाटतं की आपण एका मोठ्या घाणीच्या डब्यातच राहतो आहोत.
इथे लोकांना बदलायची गरज आहे, हे फक्त एकट्या सरकारचे काम नाही. आपल्यात स्वच्छतेची, सुंदरतेची आवड निर्माण झाली पाहिजे या शिवाय कुठलाच मार्ग नाही. स्वच्छ भारत अभियान हा एक स्तुत्य उपक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठ्या आत्मविश्वासाने हाती घेतला आणि काही ठिकाणी चांगला बदल दिसू पण लागला (रेल्वे). या उपक्रमाची सुरुवात सरकार आणि नागरिक भागीदारीपासून झाली परंतु आता दिसते की फक्त सरकारच काम करत आहे, आम जनता त्यांची साथ सोडत आहे. अशी प्रचंड कार्ये साध्य करण्यासाठी सरकार आणि जनतेची भागीदारी आवश्यक आहे नाही तर ते कधीही यशस्वी होणार नाही. सरकार त्यांचे काम करत आहे पण जनतेने आपली कर्तव्ये पार पाडली पाहिजेत. लोकशाहीत आपल्याला अधिकार मिळतात, परंतु आपण हे विसरतो की अधिकारांसोबत कर्तव्ये ही येतात. आपण आपली कर्तव्य विसरतो आणि केवळ अधिकारांसाठी आंदोलन करतो. भारत स्वच्छ करण्यासाठी आपण लोकांना पुढाकार घेण्याची गरज आहे, केवळ सरकार हे करू शकत नाही.
आपण येथे मूलभूत स्वच्छताविषयक समस्या आणि संबंधित पायाभूत सुविधांशी व्यवहार करीत आहोत, त्यामुळे अचानक दैदिप्यमान फरक जाणवेल असे स्वप्न पाहणे थोडे अवास्तवच ठरेल. पण आपण आज ज्या पद्धतीने वागतो आहोत त्याने एक काय पण शंभर मोदी आले तरी बारीकसा सुद्धा फरक पडणार नाही.
यशवंत मराठे
#SwachchaBharat #स्वच्छभारत