कुत्र्यांचा हैदोस

माझ्या लहानपणी कुत्रा म्हणजे माणसाचा मित्र असे सांगण्यात येत असे. पण आज कुत्रे हे माणसाचे मित्र राहिलेले नाहीत, हे समाज म्हणून आपण मान्य करायची वेळ आता येऊन ठेपली आहे. कुत्र्यांची अलीकडच्या काही वर्षांत सातत्याने वाढत असलेली हिंसक बाजू ही माणसांच्याच मुळावर उठू पाहत आहे, हे आजचे वास्तव आहे.

दुर्दैवाने आज सांगताही येत नाही आणि सहनही होत नाही, अशा एका अस्वस्थ टप्प्यावर आपल्याला प्राणीहक्क कायद्याने आज सक्तीने आणून ठेवले आहे. हा कायदा तातडीने समूळ बदलला गेला नाही आणि प्रसंगी धोकादायक कुत्र्यांना मारायची परवानगी दिली गेली नाही तर, येत्या काळात माणूस विरुद्ध कुत्रा हे चित्र अधिकाधिक भेसूर होत गेल्यास त्यात नवल नाही.

आज महाराष्ट्रातील कुठच्याही शहरात एखाद्या वृद्ध माणसावर अथवा महिलेवर कुत्र्याने हल्ला केल्याची किंवा कुठच्याही शहराच्या आसपासची वस्ती अथवा झोपडपट्टीच्या जवळ एखाद्या लहान मुलावर देखील हल्ला झाल्याची बातमी वाचल्यास त्यात आज आश्चर्य वाटत नाही.

सगळ्या शहरात आणि बऱ्याच गावांमध्ये सुद्धा चायनीज पदार्थांच्या गाड्यांची संख्या वाढत असून, येथील मांसाहारी पदार्थ कचऱ्यात उघड्यावर फेकण्यात येतात. ते खाण्यासाठी कुत्र्यांच्या झुंडी जमत आहेत. या भटक्या कुत्र्यांचे मास किलिंग करा असे म्हणता येणार नाही. मात्र, त्यांचा बंदोबस्त झाला पाहिजे; त्याशिवाय चायनीज गाड्यांवर कारवाई करून त्यांना तंबीही दिली पाहिजे.

भल्या सकाळची वेळ असो वा रात्री उशिराची. तुम्ही एकटे असा वा कुणासोबत. रस्त्यारस्त्यावर आपला हक्क जमवून बसलेल्या भटक्या कुत्र्यांची आज दहशत निर्माण झाली आहे. वाचायला आणि ऐकायला अतिशयोक्ती वाटली तरी ती ही अतिशयोक्ती राहिली नसून, भटक्या कुत्र्यांची दहशत ही आजचे भेसूर वास्तव होऊन बसले आहे, हे कुणीही नाकारून चालणार नाही. (अपवाद, काही 'प्राणीमित्रांचा')

भटकी कुत्री हा दिवसागणिक एक गंभीर विषय होत चालला आहे, हे आपण दुर्लक्षून चालायचेच नाही. परंतु गंभीर अजूनही ज्यावर ठोस उत्तर सापडू शकलेले नाही हे ही तितकेच खरं. या भटक्या कुत्र्यांची ताकद आणि उपद्रवमूल्य एवढे वाढून सुद्धा यांच्याबद्दल आजवर तरी काहीही उपाय शोधता आलेला नाही. भटक्या कुत्रांच्या बाबतीत आपल्या म्हणी पण बदलायची वेळ आली आहे. नवीन म्हण: धरलं तर चावतंय आणि सोडलं तर लचका तोडतंय. याला कारण भटक्या कुत्र्यांची धरपकड करण्याला वा त्यांना मारून टाकण्याला प्रतिबंध करणारा प्राणीहक्क कायदा हाही आहे. एरवी ढीगभर कायद्यांतून पळवाट काढत काही ना काही करणाऱ्या वकिलांना कुत्रे हक्क कायद्यातून आजवर तरी कुठलीही पळवाट सापडू शकलेली नाही.

आधीच कायद्याने हात बांधले गेले म्हटल्यावर कुत्र्यांच्या उपद्रवावर परिणामकारक (?) उपाय म्हणून त्यांच्या नसबंदीची परवानगी दुसऱ्या कायद्याने दिली. पण ही नसबंदी म्हणजे कागदावर आकर्षक दिसणाऱ्या अनेक सरकारी योजनांच्या इतकीच 'परिणामकारक' ठरली, हे गेल्या काही वर्षांत कुत्रांच्या वाढत्या संख्येने दाखवून दिले आहे. खरं म्हणजे नसबंदी हा यावरचा कधीच अंतिम उपाय असूच शकणार नाही, हे अगदी स्पष्टच आहे. कारण नसबंदी किंवा रेबीजची लस ही कुत्र्यांच्यात भिनलेले क्रौर्य आणि पिसाळलेपण कसे कमी करणार?

कायद्यात बदल झाल्यास या कायद्यावरून अनेकांना धमकवणाऱ्या कुत्रे प्रेमींना देखील चाप बसेल, हे वेगळेच. आज शिवाजी पार्कला सुद्धा कित्येक जणांचा आवडता छंद काय तर कुत्र्यांना खायला घालणे. एक बाई तर मारुती वॅन घेऊन येते ज्याच्या डिक्कीत २ खाण्याने भरलेले मोठे डबे असतात; बरोबर एक मोलकरीण. ती काय करते तर लहान कंटेनर मध्ये ते खाणं काढायचं आणि कुत्र्यांसाठी ठेवायचं. ती बाई कमीत कमी २०-२५ कुत्र्यांना खायला घालते. च्यायला, एवढे प्रेम असेल तर जा घरी घेऊन सगळयांना आणि सर्वांना खायला घालत बस. हे मी तिला एकदा सांगितलं तर केवढी चिडली माझ्यावर. तिच्या व्यतिरिक्त बिस्किटे आणि डॉग फूड खायला घालणाऱ्या लोकांची तर भाऊगर्दी असतेच. ते कुत्रे खाऊन वाटेल तिथे हगतात तेव्हा मग ती घाण उचलायला मात्र कोणी येणार नाही. पालिकेच्या कामगारांनी ती घाण साफ करावी ही अपेक्षा ठेवणार आणि त्यांनी ती नाही केली की त्यांना शिव्या द्यायला मोकळे. सगळीकडे दांभिकता भरलीये.

आज नाहीतर उद्या या कायद्यात बदल करावाच लागेल, हे निश्चित. हा कायदा बदलून, भटक्या आणि उपद्रवी कुत्र्यांचा योग्य तो बंदोबस्त लावणारा (प्रसंगी माणसांना धोकादायक ठरणाऱ्या कुत्र्यांना जीवे मारण्याची मुभाही देणारा) कायदा ही आजची गरज बनली आहे.

यशवंत मराठे

#stray_dogs #प्राणीमित्र #भटकी_कुत्री

Leave a comment



Dilip Patwardhan

6 years ago

भूतदयेचा विपर्यास.

sheetal kulkarni

5 years ago

completely agree..

Contact Form

subscribe

Thank you for subscribing.

Something went wrong.

Contact Info

  • yeshwant.marathe@gmail.com

Follow Me

My Other Blogs: historycafe.in

Copyright © 2020 Sarmisal.

Made with ♡ by iTGS