अहंकार आणि स्वार्थ

स्वतःच्या अहंकारासाठी आपण दुसऱ्याला किती गृहीत धरतो ना?

 

आपल्या आयुष्यात अनंत व्यक्ती आपल्या संपर्कात येत असतात. काहींशी जन्माने (आई, वडील, भावंडे, नातेवाईक), काही कौटुंबिक (बायको, मुले), काही बनविलेली (मित्र, मैत्रिणी) आणि काही व्यावसायिक (नोकरी, धंदा वगैरे) अशी अनेक नाती जुळत असतात. यातील नाती कुठल्यातरी भावनेशी संलग्न असतात; मग ते प्रेम, राग, मत्सर अशी काहीही असू शकतात.

 

आपण जीवन जगत असताना १००% स्वतःसाठी जगत असतो. अगदी आपल्या आईपासून निःस्वार्थी समाजसेवकापर्यंत विचार केला तरी कुठेतरी वृद्धावस्थेत काळजी घेण्यापासून, समाजाकडून मिळणाऱ्या श्रेयापर्यंत अत्यंत सूक्ष्म पातळीवर कुठेतरी स्वार्थ हा दडलेला असतोच. प्रत्येक नाते हे भावना, प्रेम या सगळ्या धाग्यांपेक्षाही स्वार्थाच्या बळकट धाग्यांनी जोडलेले असते ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही.

 

 

आता स्वार्थ आला की अहंकार पाठोपाठ येतोच आणि अहंकाराची नांगी मोडणे महाकर्मकठीण काम; तुटता तुटत नाही. हा अहंकार पैशाचा, बळाचा, सत्तेचा, खुर्चीचा या कशाचाही असू शकतो. या गोष्टींची सुरुवात बऱ्याच वेळा स्वतःच्या घरापासून होते. जर पुरुषाला असे सतत वाटत असेल की माझी बायको आणि मुले माझ्यावर अवलंबून आहेत, तर तो त्यांना गृहीत धरू लागतो. त्यातूनच अनावधानाने अथवा मुद्दामून तो त्यांना कमी लेखून त्यांचा पदोपदी अपमान करत असतो. पूर्वी बायका आर्थिकदृष्ट्या दुर्बळ असल्याने त्या नवऱ्याने केलेले असे अपमान निमूटपणे सहन करायच्या. आता थोडी परिस्थिती बदलते आहे पण अजूनही पुरुषाचे वर्चस्व काही खूप कमी झालेले नाही.

 

या अहंकरामुळेच मनुष्य प्रत्येक क्षणी आपल्यापेक्षा दुर्बल लोकांचे कायमच अपमान करत असतो.

 

 

 

आपण जेव्हा दुसऱ्याला बोलतो तेव्हा आपल्याला असंच वाटत असतं की आपण योग्यच गोष्टीसाठी बोलतो आहोत. पण आपण नुसती चूक दाखवून गप्प नाही बसत ना? आपण त्या माणसाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करतो. परंतु जोपर्यंत डोळ्यासमोर निमूटपणे ऐकून घेणारी ती व्यक्ती दिसत असते तोपर्यंत नाहीच जाणवत हे सगळं.

 

आपण कळत नकळत कधीतरी कोणालातरी दुखावलेलं असतं ना? अनेकदा तर एकाच माणसाला अनेकवेळा फक्त हक्काचं माणूस म्हणून. मग पश्चातापही होतो पण मग अहंकार आड येतो किंवा त्या नात्याला गृहीतच धरलेलं असतं म्हणून माफी सुद्धा मागत नाही.

 

 

 

पण एक दिवस आयुष्यात असा येतो की आपली चूक झाली, आपण दुसऱ्याला दुखावलं हे समजल्यावरही काहीच करता येत नाही. अनेकदा बायको मेल्यावर नवऱ्याला शहाणपण सुचतं किंवा उपरती होते. मग त्याचे मन एखाद्या भूंग्याप्रमाणे कुरतडत राहते. त्याला बायकोची मनापासून माफी मागायची असते पण तिला आता आणणार कुठून ? त्याला आता एका क्षणासाठी तरी तिला सांगायचं असतं की मी जरी कितीही तुझ्यावर हक्क गाजवला, तुझा सतत पाणउतारा केला असला तरी पण माझं खूप प्रेम होतं तुझ्यावर. पण ते तिला आता कसे कळणार? कदाचित असा नवरा नशिबी आला म्हणून तिला आयुष्य संपल्याचा आनंद झाला असेल तर? या विचाराने त्याच्या मनाच्या चिंधड्या होतात. बरं, आता स्वतःला शिक्षा द्यायची म्हटली तरी शक्य नसते.

 

किती शुल्लक कारणांनी आपण जिवाभावाची माणसं तोडतो आणि मग झुरत बसतो त्यांच्यासाठी आयुष्यभर.

 

अपराधीपणाची भावना घेऊन जिवंत रहाणं फार भयंकर असतं. खास करून जेव्हा ती माणसं आपल्याला सोडून जातात, आणि नंतर जी आपल्या जगण्याचं कारण असण्याची जाणीव होते आपल्याला..

 

 

मग त्या व्यक्तीला अशी जाणीव होते की आजपर्यंत आपण ज्यांना ज्यांना जिव्हारी लागणारे बोललो त्यांच्या मनात आपल्याबद्दल काय भावना असतील? आता त्यांची माफी मागितली तर ते मला माफ करतील का? आता देवानेच मला मार्ग सुचवावा असे वाटत राहते. पण देव कुठे स्वर्गात राहत नाही; तो आपल्या अंतर्मनातच ठाण मांडून बसलेला आहे. मग यातून सुटकेचा काही मार्ग आहे?

 

  • बोलताना १०० वेळा विचार करून बोलायचं. आजनंतर तो माणूस आपल्याला आयुष्यात परत कधीच दिसला नाही तरी आपण तेव्हा असं नको होतं बोलायला ही आपल्याला बोचणी राहता कामा नये. अत्यंत विचारपूर्वक बोलायचं.
  • आयुष्यं असं जगायचं जणू काही ही आपली शेवटची भेट..
  • कधी चुकून दुखावलंच कोणाला तर पटकन मनापासून सॉरी म्हणून टाकायचं. काय माहित पुन्हा संधी मिळेल का?
  • जगात खरं म्हणजे काहीच इतकं श्रेष्ठ नसतं ज्यासाठी आपण आपल्या माणसाला इतकं दुखवावं, अगदी आपला अहंकार सुद्धा! आपण सहज दुर्लक्ष करू शकलो असतो हे लक्षात ठेवायला हवे.
  • भले आपल्या मृत्यूनंतर रडणारे नसले तरी चालतील; पण निदान कुणाला सुटकेची भावना वाटेल इतकं आपण दुसऱ्यासाठी त्रासदायक ठरू नये. आपल्यावर प्रेम करणारी माणसं असतात तोपर्यंतच त्यांची किंमत आपल्याला कळायला हवी. नंतर कळून काय उपयोग?
  • आत्मपरीक्षण हा अहंकार नाहीसा करण्याचा सगळ्यात सोपा मार्ग आहे. अहंकाराच्या भरात जेव्हा आपण समोरच्या व्यक्तीशी बोलत असतो आणि त्यांचा अपमान करत असतो त्याक्षणी त्यांच्या डोळ्यात रोखून बघा....त्यावेळी दिसणारा केविलवाणेपणाचा भाव म्हणजे देवाचा शाप आहे असे समजा. हा क्षण जरी तुमच्या दोघांपुरता मर्यादित असला तरीच कुठेतरी त्याची नोंद होत असते याची जाणीव असणे फार महत्वाचे आहे. बुद्धीच्या, सौन्दर्याच्या, पैशाच्या अथवा शक्तीच्या बळावर जेव्हा आपण एखाद्याला नामोहरम करतो, तेव्हाच स्वतःसाठी एक नवीन खड्डा निर्माण करत आहोत हे लक्षात ठेवले तर असे प्रसंग घडण्याचे टळू शकेल.

 

 

 

@ यशवंत मराठे 
yeshwant.marathe@gmail.com
  

Leave a comment



Parag Dandekar

4 years ago

Your blog on Ahankar and Swarth: you have written it well. Ahankar starts with the formation of your body and the feeling you get that this is me and the rest are different. This happens in the first moments when you feel someone is lifting you or feeding you etc. while Swarth is a feeling and all those actions which consider you and you alone. The Swarth emotion can be modified by practice, While Ahankar emotion is partially good. If one does not have Ahankar, it will be difficult for that self to fulfil "Purusharth".
This is my understanding with my limited intellect.
Thanks for sharing

स्नेहा धारप

4 years ago

खूप छान. विचार करायला लावणारी व खूप महत्त्वाची गोष्ट आहे.

Contact Form

subscribe

Thank you for subscribing.

Something went wrong.

Contact Info

  • yeshwant.marathe@gmail.com

Follow Me

My Other Blogs: historycafe.in

Copyright © 2020 Sarmisal.

Made with ♡ by iTGS