खळाळती नदी

नदी असा शब्द वापरला की मनात पहिला विचार काय येतो? खळखळणारा प्रवाह. वाहणे हा नदीचा धर्म.

महाराष्ट्रात आणि भारतातच काय पण जगभरात वाहती नदी हे आज अप्रूप आहे. जगातील साधारण १७५ मोठ्या नद्यांपैकी जेमतेम एक तृतीयांश नद्या मुक्तवाहिनी आहेत. १००० कि.मी. पेक्षा जास्त लांबीच्या फक्त २१ नद्या या थेट समुद्रास मिळतात.

भारतीय लोकांच्या आयुष्यात नद्यांचे स्थान फार मोठे आहे. नद्या पिण्याचे पाणी तर देतातच परंतु त्या दळणवळण आणि वीज निर्मितीचे, तसेच अनेक लोकांच्या उपजीविकेचे ते एक मुख्य साधन आहे. त्यामुळे आपली बहुतेक शहरे नदीकाठी का वसली आहेत हे लक्षात येईल. हिंदू धर्मात नदीला अनन्यसाधारण महत्व आहे आणि बहुतेक सर्व नद्या यांना देवता मानले जाते.

भारतात पर्वत, नद्या आणि शंकर (शिव) यांची एक अभूतपूर्व सांगड घालण्यात आली आहे. नद्यांशी निगडित कथांची रेलचेल. प्रत्येकाची काहीतरी एक दंतकथा, आचारपद्धती आणि वास्तुशास्त्र आहे. महाराष्ट्रात, तसे भारतातील सर्वच ठिकाणी, नदीचा उगम हे एक तीर्थक्षेत्र मानले जाते; जिथे देवळं, पायऱ्या आणि इतर स्थापत्य कलांचा वापर दिसून येतो. उदा. त्र्यंबकेश्वर - गोदावरी, महाबळेश्वर - कृष्णा, भीमाशंकर - भीमा. आपल्या नद्यांना, विहिरींना आपण पावित्र्य बहाल केले आहे. जवळ जवळ प्रत्येक नदीच्या उगमाशी, संगमाशी शिवमंदिर आहे, पवित्र डोह आहेत, पवित्र विहिरी आहेत. हिंदू धर्मातील एका मानण्यानुसार नदीचा उगम हा पर्वतश्रेणींमध्ये, शिवलिंगाच्या आसपास असतो.

पण हो, हे सगळे होते आपल्या पूर्वजांच्या काळी. आजची परिस्थिती काय आहे? दयनीय हा शब्द सुद्धा थिटा पडेल अशी दुर्दशा आपणच केली आहे.

माणूस किंवा प्राण्यांना डिहायड्रेशनमुळे, विषबाधेमुळे, रक्त प्रवाहातील अडथळ्यांमुळे, आणि विविध प्रकारच्या इन्फेक्शनमुळे किंवा अनेक प्रकारच्या कॅन्सरमुळे सुद्धा ताप येतो तसेच आज जमिनीला सुद्धा डिहायड्रेशन झाले आहे, आणि नदी प्रवाहांना अडथळे व विषबाधा. जमिनीतील जीवांना विषबाधा आणि त्यांचे कुपोषण/उपोषण, आणि पृथ्वीला इन्फेक्शन आणि कॅन्सर असे सर्व आजार झालेले आहेत

डिहायड्रेशन

आपण जमिनीवर भोके पाडली. त्यातून वारेमाप पाणी उपसा चालू आहे. विहिरी अपुऱ्या वाटल्या म्हणून बोअर वेल खोदल्या. दोनशे, पाचशे, हजार, बाराशे फुटांपर्यंत आणि चार इंचांपासून अगदी अडीच फूट व्यासाच्या बोअर वेल आहेत.

दर वर्षी जेवढे पाणी पृथ्वीवरील जमीन पिते त्या पेक्षा जास्त उपसा चालू आहे. साहजिकच जमिनीला डिहायड्रेशन झाले आहे. डिहायड्रेशनमुळे ताप येतोच येतो. ओ आर एस, लिंबू पाणी किंवा सलाइन मधून पाणी देऊन माणसाला झालेल्या डिहायड्रेशनवर मात करता येते. त्याचप्रमाणे डोंगर माथ्यावर वृक्ष लागवड करणे, पाणलोटाची कामे करणे, भूजल पुनर्भरण योग्य रीतीने करणे, तलाव बनवणे, जुने तलाव सुधारणे या प्रकारे जमिनीचे रीहायड्रेशन करणे हा त्यावरचा उपाय आहे.

विषबाधा

आधुनिक मानवाने त्याच्या चौकसपणातून अनेक रसायने तयार केली त्यातील बरीच महाभयंकर विषारी आहेत. ही रसायने हवेत, पाण्यात, जमिनीत, व विविध जीवांमध्ये पसरलेली आहेत. विचार करा आपण जर साधे व्हिटॅमिन किंवा ब्लड प्रेशर व डायबेटीसचे औषध जास्त खाल्ले तरीही आपल्याला त्रास होतो. इथे तर मानवांनी कीटकनाशके किंवा तण नाशके किंवा न्यूक्लिअर कचरा नुसता निर्माण नाही केला तर तो उधळला आहे शेतावर आणि शत्रूंच्या जंगलांवर. होणारच ना मग जमिनीला विषबाधा. यावर उपाय एकच! विषे बनवणे आणि वापरणे ताबडतोब बंद करायला हवे आणि जी विषे पर्यावरणात आहेत त्यांचा निचरा होईल असा प्रयत्न करणे.

रक्त प्रवाहातील अडथळे

मानवी शरीरात अनेक रक्त वाहिन्या असतात. त्यातील एकही रक्त वाहिनी बंद झाली तर तिथे रक्त साठते आणि रक्ताचा छोटा फुगा किंवा गाठ बनते तिथे त्याने त्रास होतो. अशी गाठ मेंदूत बनली तर अर्धांग वात किंवा मृत्यू सुद्धा होऊ शकतो आणि ज्या भागांपर्यंत त्या रक्त वाहिन्या रक्त पुरवत होत्या त्या भागांना रक्त पुरवठा कमी होतो. आणि तिथे गँग्रीन होतो तो भाग मरून जातो. निरुपयोगी होतो, कापून काढावा लागतो. या सर्वांमुळे ही माणसाला ताप येतो. ही झाली वैद्यक शास्त्रीय माहिती. आज गोदावरी सारखी महानदी, (जिचे जलग्रहण क्षेत्र म्हणजे एकूण पाणलोट अर्ध्या दक्षिण भारताएवढे आहे), ती ही कोरडी राहात आहे. साहजिकच तिच्या तीरांवर गँग्रीन सदृश परिणाम होऊ लागला आहे.

आता विचार करूया; आपल्या पृथ्वीवरील जलप्रवाह म्हणजे नदी, नाले, ओहोळ यांचा आणि भूमी अंतर्गत वाहणाऱ्या जलप्रवाहांचा सुद्धा. हे पृथ्वी-शरीराचे जणू रक्त प्रवाहच आहेत अशी उपमा वराह मिहिरांनी जलप्रवाहांना दिली होती. आधुनिक माणसांनी नद्यांवर धरणांमागून धरणे बांधायला सुरुवात केली. त्यातील बहुसंख्य धरणे उगमाजवळील भागात, तिथे जास्त पाऊस पडतो आणि कठीण जलाभेद्य प्रस्तर आहेत म्हणून बांधली जातात. कोयना धरण बांधण्याच्या काळात आंध्र-कर्नाटकातील काही जाणकार लोकांनी हा प्रश्न उठवला होता की या धरणाचे पाणी कोकणात साठवून वीज बनवणे वगैरे छान आहे पण यामुळे आमच्याकडे येणाऱ्या पाण्यावर परिणाम होईल. सबब हे धरण होऊ नये.. पण त्या काळी विजेचा प्रचंड तुटवडा पण प्रचंड मागणी असल्याने देशाने आणि महाराष्ट्राने या विरोधाला जुमानले नाही ते धरण झाले. आणि त्यानंतर धरणांची साथच आली. याच परिणाम काय झाला तर नद्या शॉर्टकट मारून समुद्राला मिळू लागल्या. प्रवाहाची आणि नद्यांची फारकत धरणांपासून सुरु झाली.

ह्या धरणांमागे साठवलेले पाणी ही झाली पृथ्वीच्या शरीरातील रक्तप्रवाहातील गाठ. या गाठीतील पाणी वापरून त्यावर केली रासायनिक शेती. म्हणजे पुन्हा विषप्रयोग; आणि त्यामुळे आजार व ताप. आज आपण जेव्हा नद्यांची दैनावस्था पाहतो तेव्हा पहिल्यांदा काय आठवते? प्रदूषण, अतिक्रमण, कचरा, दुष्काळ, पूर. त्यामुळे नदी वाहती नसणे हे आपण खूप सहज मान्य केले आहे, नाही का? हे पाणी पूर्वी भरपूर लांब वाहून समुद्राला मिळत असे आणि त्याचा जीवनदायी उपयोग दोन्ही किनाऱ्यांवरील माणसांसह सर्व जीवांना होत असे.

अगदी ताजे उदाहरण घ्या. जून महिन्यात निसर्ग वादळाबरोबर जो पहिला पाऊस पडला त्यात गोदावरीची उपनदी, नांदेड येथील लेंडी नदी, दुथडी भरून वाहू लागली. आता तुम्हाला प्रश्न पडेल की सुरुवातीला मी खळाळणाऱ्या प्रवाहाबद्दल एवढं कौतुक केले मग आता दुथडी भरून वाहत्या नदीमध्ये बघून मला आनंद का होत नाही?

पण हीच तर खरी समस्या आहे. पहिल्या पावसात नदी भरते, याचा अर्थ जमीन पाणी पिऊ शकत नाहीये कारण ती बेशुद्ध किंवा मृत आहे. तिच्यावर अति ट्रॅक्टर, अति खते, अति कीटकनाशके यांचा मारा चालला आहे. जमिनीमध्ये जीवन नाही कारण गांडूळे नाहीत, वाळवी नाही, मुंग्या नाहीत, गोम सारखे संधिपाद नाहीत; आणि मुख्य म्हणजे बुरशी नाही. या सर्व जीवांना खायला जमिनीमध्ये माणसांनी अन्नच उरू दिलेले नाही किंवा खूप विषांचा वापर करून त्यांना मारून टाकले आहे. या दुथडी भरून वाहणाऱ्या नदीचा व्हिडीओ बघा.

[wpvideo 63qNbkmf ]

त्यातील पाण्याचा रंग बघा.. किती माती घेऊन जाते आहे ते बघा. उरलीसुरली जमिनीची सुपीकता सुद्धा वाहून चालली आहे.

[wpvideo MCfdtXw3 ]

हे पाहून तरी आपले डोळे उघडणार आहेत का? बहुदा नाहीच कारण उद्याचा विचार करतो कोण? मला आज पाणी मिळतंय ना; बस्स. आपल्या पूर्वजांनी ज्या गोष्टी आपल्या हाती सोपवल्या त्याची पूर्ण विल्हेवाट लावून आपण पुढच्या पिढीला काय देणार याची आपल्याला कुठे फिकीर आहे?

यशवंत मराठे

yeshwant.marathe@gmail.com

(with Technical Inputs from Dr. Ajit Gokhale, Natural Solutions)

#नदी #धरण #पाणी #पूर #Ecology #Rivers #Water

Leave a comment



Dr Rafik

4 years ago

You are partially right. The land getting water saturated is not there because of
1. excessive concrete jungle and non -porous roads
2. excessive deforestation. The roots in the soil act like sponge
3. The mountains are no more water reservoirs because of deforestation and houses due to which the water springs are short lived
4. That's why immediately flooding ocurs with slightest rainfall
5. kindly see one movie by Nasiruddin Shah on this subject. I have forgotten the name.

Contact Form

subscribe

Thank you for subscribing.

Something went wrong.

Contact Info

  • yeshwant.marathe@gmail.com

Follow Me

My Other Blogs: historycafe.in

Copyright © 2020 Sarmisal.

Made with ♡ by iTGS