हिंदी चित्रपट सृष्टीतील एका फारशा माहित नसलेल्या संगीतकाराबद्दल संगीत दिग्गज काय म्हणतात ते ऐका:
अनिल बिस्वास (जे स्वतः एक सर्जनशील प्रतिभाशाली म्हणून ओळखले जातात): हा मनुष्य हिंदी चित्रपटांमधील एकमेव मूळ संगीतकार होता. माझ्यासह आम्ही सर्वजण प्रेरणेसाठी कोणत्यातरी स्त्रोताकडे वळतो पण ते त्यांना करायची कधीच गरज भासली नाही. त्यांनी रचलेल्या संगीतातील प्रत्येक नोट त्यांची स्वतःची होती.
नौशाद: तो एक अत्यंत प्रतिभावान माणूस होता, संगीताबद्दल खूप जाणकार होता, पण त्याचा स्वभाव त्याला महागात पडला. एखाद्याने किरकोळ सूचना केली तरी त्याचा पारा चढत असे. ‘तुला संगीताबद्दल काय माहिती आहे?’ तो जवळजवळ सर्वांशी भांडला. यामुळे त्याने आयुष्यभर घरी बसून आपली प्रतिभा वाया घालवली. पण त्याने निर्माण केलेल्या संगीत, जरी ते कितीही छोटे असले तरी हिंदी चित्रपट संगीतातील सर्वोत्कृष्ट कार्यांपैकी एक आहे.
असा हा एक विलक्षण प्रतिभावान संगीतकार त्याच्या संगीतापेक्षा मुँहफट, घमंडी, मूडी, शीघ्रकोपी अशा विशेषणांनीच जास्त गाजला हे त्याचं दुर्दैव. परंतु त्यावेळचे सगळे मान्यवर संगीतकार, गायक एकमुखाने त्यांना "जिनियस" असेच संबोधतात.
"लताजी, ठीक से गाईये, ये कोई नौशाद की धुन नहीं है असे दीदींना सुनावणारा पण त्याचवेळी "एक लता ही गाती है बाकी सब रोती है.. असे अभिमानाने जाहीरपणे सांगणारा एकमेव संगीतकार ज्याने लतादीदींच्या आवडत्या संगीतकारांच्या यादीमध्ये मानाचे स्थान ग्रहण केले आहे असे संगीतकार म्हणजे सज्जाद हुसेन.
लताने तिच्या मुलाखतींमध्ये अनेकदा असे सांगितले आहे की सज्जाद हे एकमेव संगीत दिग्दर्शक होते ज्यांच्या रचना गायला ती थोडी घाबरत असे. काही अंशी हे कचरणे सज्जादच्या व्यक्तिमत्त्वामुळे असेल पण, खरे सांगायचे तर, त्याने तिला त्याची काही सर्वोत्कृष्ट गाणी दिली - ए दिलरुबा (रुस्तम सोहराब, 1963), जाते हो तो जाओ (खेल, 1950), आज मेरे नसीब ने ( हुलचुल, 1951), वो तो चले गए आये दिल (संगदिल).
१५ जून १९१७ रोजी सीतामऊ, मध्यप्रदेश मध्ये जन्मलेले सज्जाद आपल्या नऊ भावंडांमध्ये सर्वात धाकटे. त्यांचे वडील महंमद अमीर खान, खरे तर व्यवसायाने शिंपी होते आणि काही खास समारंभासाठी विशेषतः राजदरबारात संगीत जलसे होत असत त्यासाठी "राजा रामसिंह" यांची राजवस्त्रे ते शिवत असत. तेव्हा दरबारात उत्तमोत्तम कलाकारांचा राबता असे. संगीत जलशांची लयलूट असे. त्यामुळे संगीत कानावर पडून पडून महंमह अमिर यांना ही त्यात रुची निर्माण झाली. त्यांनी सतार शिकण्यास सुरुवात केली आणि लवकरच त्यात प्राविण्यही मिळविले.
सगळ्या भावंडांमध्ये फक्त सज्जादना संगीतात रस होता त्यामुळे वडिलांबरोबर ते ही जलशाला जात असत. अगदी लहान वयात म्हणजे ६/७ व्या वर्षी त्यांनी आपत्या वडिलांकडून सतारीचे धडे घेण्यास सुरुवात केली. आणि हळूहळू त्यात नैपुण्य मिळवण्याच्या दृष्टीने वाटचाल सुरु केली.
एकदा राजदरबारी महफिलीत केलेल्या कलाकाराच्या वादनाने सज्जाद एवढे प्रभावित झाले की घरी आल्यावर अगदी तंतोतंत तसेच वादन करुन आपल्या वडिलांना आश्चर्यचकित केले. आपल्या लेकामध्ये असलेले वादनकौशल्य त्यांनी जाणले होते आणि वेळोवेळी प्रोत्साहीत ही केले पण "इसे रोजी रोटी का जरिया मत बनाओ" अशी कडक सूचनाही केली. त्यांनीही वडिलांच्या मृत्यूपर्पंत ते वचन पाळले. नंतर मात्र संगीतात रीतसर करीयर करण्यासाठी आपले बंधू निसार हुसेन यांच्याबरोबर मुंबई गाठली.
एका परिचितांकडे त्यांनी कुंदनलाल सैगल यांचे "दुख के दिन अब बीतत नाही" हे गाणे ऐकले. त्यांना गाण्याचे प्रेझेंटेशन इतके आवडले की त्यांच्या मनात आले मी पण हे करु शकतो. संगीतकार होण्याची त्यांची इच्छा जोर धरु लागली.
फिल्म इंडस्ट्रीत त्यांची ओळख ना देख! लगेच काम कोण देणार? सुरुवातीला सोहरराब मोदींच्या "मिर्नव्हा मूव्हीटोन" मध्ये ३०/- महिना पगारावर वादक म्हणून आणि नंतर वाडिया मूव्हीटोन मध्ये ६०/- पगारावर काही काळ नोकरी केली. त्यांनी मीर साहेब आणि रफीक गजनवी या संगीतकारांचे "सहाय्यक" म्हणूनही काम केले.
१९४० मध्ये मीर अल्लाबक्ष (मीनाकुमारीचे वडील) यांनी त्यांचे मेंडोलीन वादनातील कौशल्य ओळखले. अल्लाबक्ष स्वतः उत्तम हार्मोनियम वादक होते. संगीताची जाण होती. "शाही लुटेरे" सारख्या एक दोन चित्रपटांना संगीत ही दिले होते. सज्जादनी त्यांच्याकडेही काही काळ वादक सहाय्यक म्हणून काम केले. त्यानंतर संगीतकार "हनुमान प्रसाद" यांच्याकडे सहाय्यक असताना १९४४ सालच्या "गाली" या चित्रपटात निर्मला अरुण (गोविंदाच्या आई) यांच्याकडून "आग लगे सावनमें" आणि "अब आजा दिल ना लगे" ही दोन गाणी गाऊन घेतली.
स्वतंत्रपणे संगीतकार म्हणून सज्जाद यांचा पहिला चित्रपट "दोस्त" (१९४४) यातील नूरजहाँन यांनी गायलेली "कोई प्रेमका देके संदेसा" आणि "बदनाम मोहब्बत कौन करे" ही गाणी खूप गाजली. पण नूरजहाँचे पती "शौकत हुसेन रिझवी" यांनी संगीतकाराला त्याचे श्रेय न देता पत्नीच्या आवाजाला दिले. त्यामुळे नाराज होऊन सज्जाद यांनी पुन्हा नूरजहाँ कडून गाणे गाऊन घेतले नाही.
"सैया" (मधुबाला, अजित) हा सज्जाद यांचा दुसरा चित्रपट; त्याच्यात लताची सहा उत्कृष्ट सोलो गीते आहेत, जी विंटेज हिंदुस्थानी चित्रपट संगीताच्या सर्व चाहत्यांसाठी एक खरी मेजवानी आहे. नीट रेकॉर्डिंग झाले नाही म्हणून तेव्हा त्याच्या रेकाॉर्डस निघाल्या नाहीत. नंतर ट्रॅकमधून घेऊन रेकॉर्ड्स बनविल्या गेल्या असे खुद्द लतादीदींनी मुलाखतीत सांगितलयं. सज्जाद यांच्या विषयी विचारले तेव्हा त्या म्हणाल्या की ते परफेक्शनिस्ट होते. एखादे वाद्य अथवा गायक बेसूरा झालेला त्यांना अजिबात खपत नसे. त्यांच्या "संगदिल" च्या गाण्यांनी मला वेगळी ओळख दिली. "रुस्तम सोहराब" मधले "ए दिलरुबा नजरे मिला" हे माझ्यासाठी सर्वात कठीण गाणे होते. "ऑफबीट" संगीताचे हे गाणे उत्तम उदाहरण आहे. लतादीदी "रुस्तम सोहराब" हा सज्जाद यांचा संगीताच्या दृष्टीने सर्वात उत्तम चित्रपट मानतात.
सज्जाद वेळेच्या बाबतीत किती शिस्तप्रिय होते याची गायिका मुबारक बेगमनी एका मुलाखतीत सांगितलेली छोटीशी आठवण! ते संगीतकार लक्ष्मीकांत यांचे वादक म्हणून उमेदवारीचे दिवस होते, एका रेकॉर्डिंगला लक्ष्मीकांतना उशीरा आलेले पाहून सज्जाद त्यांना म्हणाले, मियाँ ये कोई आनेका वक्त है? सब साजिंदे तैयार बैठे हैं, आर्टिस्ट माईकपर जा चुका है और आप अब आ रहे हो. कोई जरुरत नहीं है रुकनेकी.
ज्येष्ठ पत्रकार राजू भारतन म्हणतात, "किशोर कुमार मीना कुमारीचा नायक असल्याचे सांगितल्यावर सज्जादने रुखसाना (1955) साठी संगीत देण्याचे अर्धे प्रोत्साहन गमावले होते." त्यांच्या नजरेतून किशोर कुमार हा गायक नसून “शोर कुमार” आहे. त्यातून परत गोष्टी आणखी गुंतागुंतीच्या करण्यासाठी "तेरा दर्द दिल में बस लिया" रेकॉर्ड केल्यानंतर, लता मंगेशकर आजारी पडल्या आणि या चित्रपटासाठी आणखी रेकॉर्ड करू शकल्या नाहीत. लता सोलो आणि किशोर-आशा युगल गीत "ये चार दिन बहार के" चांगले असले तरी संगदिलच्या उच्चांकानंतर रुखसाना साउंडट्रॅक थोडासा कमी का होतो हे कदाचित यावरून स्पष्ट होते.
सज्जाद हुसेन यांनी आपल्या ३०/३५ वर्षांच्या कारकीर्दित धरम, १८५७, कसम, खेल (देवआनंद, निगार सुलताना) मगरुर, हलचल (दिलीपकुमार, नर्गिस), संगदिल (दिलीप कुमार, मधुबाला), रुखसाना (किशोरकुमार, मीनाकुमारी) रुस्तुम सोहराब (पृथ्वीराज कपूर, सुरैया, प्रेमनाथ) मेरा शिकार इ. मोजक्या चित्रपटांना संगीत दिले आहे. १९७७ साली प्रदर्शित झालेला "आखरी सजदा"हा त्यांचा अंतिम चित्रपट!
खूप वेळा ऐकलेला हा किस्सा. सज्जाद सांच्या "संगदिल" मधील "ये हवा ये रात ये चांदनी" या मधुर गाण्यावरुन प्रेरीत होऊन मदन मोहन यांनी त्यांच्या "आखरी दांव" मध्ये "तुझे क्या सुनाऊ मैं दिलरुबा" ची चाल बांधली. सज्जादना हे अजिबात आवडले नाही. ते एका कार्यक्रमात म्हणाले "आजकल हमारे गाने तो क्या, उनकी परछाईया भी चलती है". यावर मदनजींचे उत्तर ऐकण्यासारखे आहे. ते नम्रपणे त्यांना म्हणाले "हुजूर आपसे बेहतर कोई और उस्ताद है ही नहीं जिसके गानेकी मैं नकल उतारुँ.
सज्जादजी सतार, सरोद, बासरी, रुद्रवीणा, व्हायोलीन, स्पॅनिश आणि हवाईन गिटार, जलतरंग, पियानो, क्लेरीनेट अशी अनेक वाद्ये उत्तमरीत्या वाजवत. मेंडोलीन सारख्या पाश्चात्य वाद्यावर १६ वर्ष रियाज करुन त्यांनी त्यातून अशक्यप्राय वाटणारे शुध्द भारतीय शास्रीय संगीताचे सूर वाजवून दाखविले आहेत. ते अभिमानाने म्हणत "मैंने नामुमकीन को मुमकीन करके दिखाया!" म्युझिक इंडस्ट्री मध्ये "Accomplished Mandolinist" म्हणून त्यांची ख्याती होती. मी स्वतः एका संगीत समारोहात त्यांच्या मेंडोलिनची मैफल ऐकली आहे. ती मैफिल ऐकल्यानंतर मला त्यांना भेटायची जाम इच्छा होती कारण ते माझ्या घराच्या अगदी जवळ माहीम बजारमध्ये राहायचे. परंतु तिथे राहणाऱ्या माझ्या मित्राने सांगितले की ते असे ऐऱ्यागैऱ्याला भेटत नाहीत त्यामुळे मनात असून सुद्धा कधी जमले नाही.
सज्जाद यांचा मुलगा, मुस्तफा सज्जाद याच्याकडे त्याच्या वडिलांच्या संस्मरणीय आठवणी आहेत. १९५६ साली कोलकाता येथे एका संगीत समारंभात जिथे बड़े ग़ुलाम अली, विनायकराव पटवर्धन, अली अकबर खान, अहमदजान थिरकवा आणि निखिल बॅनर्जी यांसारखे एक से एक दिग्गज आमंत्रित होते त्यांच्यासमोर सज्जादनी मेंडोलिनवर राग "शिवरंजनी" आणि "हरीकौंस" वाजवून सर्वांनाच संभ्रमात टाकले कारण पाश्चिमात्य वाद्यावर पक्का हिंदुस्तानी राग वाजवणे ही विलक्षण चकित होण्यासारखी गोष्ट होती. यानंतर बड़े ग़ुलाम अली खाँ साहेबांनी एक कठीण लड़ीदार तान छेडली असता सज्जाद हुसेननी ती तंतोतंत मेंडोलिनवर वाजविली. ते ऐकून सगळे श्रोते निःशब्द झाले.
या प्रतिभावान संगीतकाराला इतके उत्तम संगीत देउनही काम न मिळण्याचे किंवा त्यांच्याकडून प्रथम काम देऊन नंतर काढून घेण्याची उदाहरणे खूप आहेत. एक शीघ्रकोपी, वादग्रस्त व्यक्तिमत्व हे त्याचे मुख्य कारण असावे. चित्रपट निर्माते दिग्दर्शक के असिफ, यांच्याशी वाद झाल्यामुळे मुगल-ए-आजम सारख्या एपिक चित्रपटाला संगीत द्यायची संधी हुकली.
"सैंया" च्या रेकॉर्डिंगच्या वेळी, फिल्मालयचे सर्वेसर्वा शशधर मुखर्जींनी या चित्रपटाचे संगीत चालेल ना? असे विचारल्यावर त्यांना उलट "कशावरुन तुमची फिल्म चालेल"? असे विचारले होते. "संगदिल" च्या रेकॉर्डिंगच्या वेळी लतादीदींशी कडक शब्दात बोलल्यामुळे दिलीप कुमार बरोबरही वाद झाले. खूप लोकं त्यांच्या स्वभावामुळे दुखावली गेली. परिणामी त्यांना काम मिळणे बंदच झाले. पण शेवटपर्यंत हा संगीतकार कुठेही तडजोड न करता आपल्याच मिजाशीत जगला.
त्यांच्या विक्षितपणाचे अनेक किस्से सांगितले जायचे परंतु त्यातले किती खरे आणि किती खोटे हे तो भगवंतच जाणे. असे म्हटले जायचे की त्यांच्याकडे दोन कुत्रे होते ज्यांना त्यांनी संगीतकारांची नावे दिली होती आणि त्यामुळे, 'ऐ नौशाद इधर आ' अशी हाक मारण्यात त्यांना म्हणे आनंद मिळायचा.
परंतु त्यांचे एक म्हणणे कायम असायचे, मैंने कभीभी "आम" नही "खास" संगीतही दिया. माझी गाणी भले लोकप्रिय नसतील पण जाणकारांकडून पसंत केली गेली.
सज्जाद यांची सर्व मुले मुस्तफा, नूर महंमद अब्दुल करीम, नासिर आणि युसुफ वादक म्हणून संगीत क्षेत्रातच आले.
२१ जुलै १९९५ रोजी या संगीतकाराने अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या जीवनकाळातील एकाकीपणाने त्यांच्या मृत्यूवरही आपली छाया पाडली आणि विस्मृतीत गेलेल्या या महान कलाकाराला अंतिम समयी श्रध्दांजली वहाण्यासाठी संगीत क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींपैकी फक्त संगीतकार खय्याम आणि पंकज उधास हजर होते. चित्रपटसृष्टीतील इतर कोणीही त्यांना अंतिम श्रद्धांजली वाहण्याची तसदी घेतली नाही.
असा होता हा अवलिया...
@यशवंत मराठे
yeshwant.marathe@gmail.com
प्रेरणा: कृपा देशपांडे यांचा लेख