गेल्या आठवड्यात मी आमच्या नीरजा संस्थेच्या कामासाठी कुंर्झे गावातील धुमाड पाडा येथे गेलो होतो. तिथे आमच्या संस्थेमार्फत एक बंधारा बांधण्याचे काम चालू आहे.
कामाचे निरीक्षण झाले, नवीन सूचना देऊन आम्ही निघालो.
तेवढ्यात पाड्यातील एक आदिवासी मनुष्य पुढ्यात आला आणि आमच्या घरी चहा प्या असा आग्रह करू लागला. आम्ही हो म्हणू असे बहुदा वाटले नसावे पण होकार दिल्यावर म्हणाला, साहेब, पण काळा चहा प्यावा लागेल. तिथे लहान मुलांना द्यायचे दूध सोडल्यास कोणालाच दुधाची चैन करणे परवडत नाही. त्यालाही हो म्हटल्यावर खुष झाला. मस्त उकळवलेला (टी बॅगचा नव्हे) इतका फक्कड चहा मी तरी कधी प्यायलो नव्हतो.
आता तिथून निघणार तेवढ्यात गावचे सरपंच आम्हाला शोधत तिथे आले आणि म्हणाले की BDO (Block Development Officer) साहेबांनी आम्हाला भेटायला बोलावले आहे. आम्हाला आश्चर्यच वाटलं कारण तसे आमचे काहीच काम नव्हते.
आम्ही त्यांच्या ऑफिस मध्ये गेलो तर त्यांनी सामान्यपणे सरकारी अधिकारी ज्या तक्रारी करतो म्हणजे, उदा. चांगली माणसं नाहीत, बजेट नाही वगैरे. आम्हाला कळेनाच की हा काय प्रकार आहे. शेवटी आम्ही न राहवून आम्हाला बोलावण्याचे कारण विचारले. तर त्याची पार्श्वभूमी अशी की गेल्या काही दिवसात अनेक पाड्यांचे मोर्चे त्याच्या कार्यालयासमोर निघाले की आमच्या पिण्याच्या पाण्याची सोय करा.
आम्ही नीरजा संस्थेमार्फत गेल्या २-३ वर्षात जवळजवळ ५० बोअर वेल विक्रमगड तालुक्यात केल्या आहेत त्यामुळे पुढील दोन आठवड्यात नीरजाने किमान १२ बोअर वेल तरी कराव्या अशी त्यांची विनंती होती कारण त्यांचे बजेट खूप अपुरे आहे. आम्ही त्यांना म्हटलं की अहो साहेब, आमची संस्था फार छोटी आहे, आम्ही कुठेकुठे पुरे पडणार? आम्ही हे बंधाऱ्याचे काम हाती घेतले आहे त्यात अजून एवढ्या बोअर वेल नाही शक्य होणार. तर ते आम्हाला म्हणाले की तुम्ही स्वतः या पाड्यांवर जाऊन खात्री करून घ्या.
तरी देखील जेव्हा आम्ही थोडी कुरकुर करत होतो तेव्हा BDO म्हणाले की साहेब, तुम्हाला विनंती करण्याचं मुख्य कारण म्हणजे नीरजाने केलेल्या एकाही बोअर वेल मध्ये आज २-३ वर्षांनी सुद्धा पाणी नाही असं झालेलं नाही. त्यामुळे तुम्ही बोअर वेल केलीत तर लोकांना पाणी मिळत राहील अशी आम्हाला खात्री आहे.
ऐकून आम्ही थक्क झालो. तेव्हा पूर्णपणे पटलं की कसल्याही प्रकारची इच्छा न ठेवता निस्वार्थ बुद्धीने आपण काम केलं तर मग तो जगनियंता म्हणा, सदगुरु म्हणा, देव म्हणा, आपल्या पाठीशी उभा रहातो. मी आणि सुधीर दांडेकर या दोघांचे हात आपोआप मिटले.
आम्ही मग १२ ठिकाणी जाऊन आलो आणि त्यातील १० जागा नक्की ठरवल्या. गेल्या ४-५ दिवसात खालील १० ठिकाणी बोअर वेल बसवण्यात आली आणि महत्वाची गोष्ट म्हणजे सर्वच्या सर्व ठिकाणी व्यवस्थित पाणी लागले.
हांडवे पाडा (कुंर्झे गाव), पडवळ पाडा गाव, ठाकरे पाडा (म्हसरोळी गाव), नालशेत गाव, देहेरजे गाव, चरी गाव, दापचेरी गाव, विलशेत गाव, तळावली गाव आणि करसूड गाव.
आमच्या या सामाजिक कार्यात कोणाला हातभार लावायचा असेल तर जरूर संपर्क करा. धन्यवाद.
|| श्री स्वामी समर्थ ||
यशवंत मराठे
Cell: 98200 44630
Mail: yeshwant.marathe@gmail.com