बऱ्याच जणांना प्रश्न असतो की हिंदू कालगणना म्हणजे काय? आम्हाला ज्ञात अथवा माहित असलेल्या ग्रेगोरियन कॅलेंडरपेक्षा ती वेगळी का आहे? आणि मुख्य म्हणजे त्याला खरंच काही शास्त्रीय आधार आहे का?आणि त्याचा इतिहास काय आहे? म्हणून हा लेख लिहिण्याचा उहापोह..
भारतीय कालगणनेचा विचार करताना नेहमी दोन प्रश्न प्रत्येकाच्या मनात असतात.
प्रश्न १. राम आणि कृष्ण या दोन अवतारांच्या जन्माविषयी माहिती देताना जन्माची वेळ, दिवस (तिथी) व महिना अशी अचूक माहिती दिली जाते मग जन्माच्या वर्षाचा उल्लेख का केला जात नाही? जर ते जन्माचे वर्ष दिले असते तर वर्तमानकाळातील कितीतरी वाद मिटले असते.
या प्रश्नाचे उत्तर असे आहे की, निरनिराळ्या काळात वेगवेगळ्या कालगणना अस्तित्वात येऊ शकतात त्यामुळे प्रचलित कालगणनेप्रमाणे जन्मवर्ष दिल्यास आणि नंतर ती कालगणना जाऊन नवीन कालगणना झाली तर मग जुन्या जन्मवर्षाला काही संदर्भच राहणार नाही. उदाहरणार्थ रामदास स्वामींचा जन्म शके १५३० साली झाला असे सांगून सुद्धा आपल्याला काहीही अर्थबोध होत नाही कारण पूर्वीची शालिवाहन शक कालगणना आणि हल्लीची ख्रिस्त जन्मावर आधारित इसवी सन कालगणना यांच्यातील परस्पर संबंध आपल्याला माहिती नसतो. परंतु जाणकार सांगू शकतात की, शके १५३० म्हणजे इ.स. १६०८. पण असे जाणकारच नसतील तर काय करणार?
म्हणून आपल्या पूर्वजांनी अतिशय शास्त्रीय पद्धत शोधून काढली आणि ती म्हणजे ज्या दिवशी एखादी घटना घडली त्यावेळेची ग्रहस्थिती सांगायची. म्हणजेच नवग्रहांची राशी व नक्षत्रे यांच्या संदर्भात स्थाने सांगायची उदाहरणार्थ बुध या राशीत होता, या नक्षत्रात होता, गुरु अमक्या राशीत होता वगैरे. ही ग्रहस्थिती जशीच्या तशी परत येत नसल्याने गणिताच्या आधारे आजपासून किती वर्षांपूर्वी ही ग्रहस्थिती होती हे कळल्याने रामाचा जन्म किती वर्षांपूर्वी झाला हे शोधता येऊ शकते. ह्यावरून एका गोष्टीचा निष्कर्ष निघतो की त्याकाळी ग्रहस्थितीचे गणित जाणणाऱ्या बऱ्याच व्यक्ती उपलब्ध असणार. याच पद्धतीने साधारण २००१ च्या सुमारास सौरभ क्वात्रा या माणसाने कॉम्प्यूटरच्या सहाय्याने राम जन्माची तारीख शोधून काढली. त्याच्या गणिताने आजपासून सुमारे ९००० वर्षांपूर्वीची होती. गंमत म्हणजे त्याने राम वनवासाला जाण्याची तारीख, राम-रावण युद्ध सुरु आणि संपल्याचा दिवस, राम वनवासाहून परत आल्याचा दिवस अशा अनेक तारखा काढल्या होत्या. हे शक्य झाले कारण रामायणात वरील घटना घडल्या त्यावेळची ग्रहस्थिती दिलेली आहे. आश्चर्याची गोष्ट अशी की, वरील तारखांवरून राम १४ वर्षे वनवासात होता, राम-रावण युद्ध किती दिवस चालले हे दिसून येते. याचाच अर्थ असा की रामायणात लिहिलेली ग्रहस्थिती खरी होती अन्यथा दोन तारखांमधील अंतर १४ वर्षे येणार नाही. वरील सर्व माहिती १८ एप्रिल २००१ च्या टाईम्स ऑफ इंडियाच्या स्पिकिंग ट्री या सदरात आली होती.
श्री. क्वात्रा यांनी काढलेल्या तारखेनुसार रामजन्म हा डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात येतो त्यामुळे आपल्याला प्रश्न पडतो की, हल्ली रामनवमी तर मार्च / एप्रिल महिन्यात येते तेव्हा ९००० वर्षांपूर्वी रामजन्म डिसेंबर महिन्यात कसा येऊ शकतो? याचे उत्तर असे की पृथ्वीचा ऍक्सिस (अक्ष अथवा आस) हा सरळ तर नाहीच (तो २३.५ अंशांनी कललेला आहे) पण तो स्थिरही नाही. तो सुद्धा एका काल्पनिक स्थिर अक्षाभोवती फिरत असतो. या गतीला परांचन गती (Precession Motion) असे म्हणतात व या फिरण्याला परिवलन म्हणतात. पृथ्वीचा अक्ष २५८०० वर्षात ३६० अंश फिरतो म्हणजेच एक प्रदक्षिणा पूर्ण करतो. या परांचन गतीमुळे वसंत संपात बिंदू (Summer Equinox) बदलत असतो. या क्लिष्ट गणितात न शिरता आपण एवढेच लक्षात घेऊया की डिसेंबर ते एप्रिल हा ४ महिन्यांचा फरक परांचन गतीमुळे झाला आहे.
परंतु एका गोष्टीचे कौतुक करायला हवे की आपल्या पूर्वजांनी घटना केव्हा घडली हे सांगण्यासाठी ग्रहस्थितीचा केलेला उपयोग अत्यंत शास्त्रीय आहे. नीट विचार केला तर ग्रहस्थिती सांगण्याची परंपरा अजून चालू आहे पण आपले त्याकडे लक्ष जात नाही. आपण जेव्हा एखादे धार्मिक कार्य करण्याचा हातात पाणी घेऊन संकल्प सोडतो त्यावेळी गुरुजी काय म्हणत असतात त्याकडे आपले लक्षच नसते. ते म्हणत असतात:-
अद्य ब्रह्मणो द्वितीये परार्धे विष्णूपदे श्रीश्वेतवाराह कल्पे वैवस्वत मन्वंतरे अष्टाविंशतितमे युगचतुष्के कलियुगे प्रथमचरणे जंबूद्विपे भरतवर्षे दक्षिणापथे रामक्षेत्रे बुद्धावतारे दंडाकारण्ये देशे गोदावर्या: दक्षिणादिग्भागे शालिवाहन शके अस्मिन् वर्तमाने (अमुक नाम) संवत्सरे (अमुका) यने (अमुक) ऋतो: (अमुक) मासे (अमुक) तिथौ (अमुक) वासरे (अमुक) नक्षत्रे (अमुक स्थिते) वर्तमान चंद्रे (अमुक स्थिते) श्रीसूर्य (अमुक स्थिते) देवगुरौ शेषेशु ग्रहेशु यथायथं राशिस्थानस्थितेषु
प्रश्न २. चंद्रावरती आधारित कालगणना ठेवल्यास वर्षाचे दिवस ३५४ होतात. त्यामुळे या कालगणनेची सूर्यावरती अवलंबून असणाऱ्या ऋतुचक्राशी जुळवून घेण्यासाठी अधिक महिन्याची योजना करावी लागते. हे सर्व उपदव्याप टाळण्यासाठी सूर्यावरती आधारित कालगणना भारतीयांनी का स्वीकारली नाही?
या प्रश्नाचे उत्तर असे की, त्याकाळी आजच्या सारखी छापील कॅलेंडर किंवा पंचांग सर्वसाधारण माणसाला उपलब्ध नव्हते. त्यामुळे महिन्यातील दिवस किंवा तिथी ठरविण्याचा सोपा मार्ग कोणता तर चंद्राच्या कला बघणे. हा मार्ग सगळ्यांनाच उपलब्ध होऊ शकतो. त्या व्यतिरिक्त तिथी ठरविण्यात जर चूक झाली तर पौर्णिमा अथवा अमावस्या बघून कोणालाही सुधारणे १५ दिवसाच्या कालावधीत शक्य होते म्हणून महिने चंद्राशी जोडलेले आहेत. ऋतू मात्र सूर्याच्या भ्रमणावरती अवलंबून असल्याने वर्षाचे गणित सूर्याशी निगडित असणे जरुरीचे आहे. शिवाय आपली धार्मिक कार्ये विशिष्ट ऋतूत व्हायला पाहिजेत असा धर्मशास्त्राचा दंडक आहे. म्हणूनच ऋतूचक्राशी जोडून घेण्यासाठी आपल्याला अधिक मासाची योजना करावी लागते. अधिक मास का, केव्हा व कोणता घ्यावयाचा याचेही गणित ठरलेलं आहे.
अधिक मास आणि क्षय मास:
दर वर्षी सौर्य वर्ष आणि चांद्र वर्ष यात ११ दिवसांचा फरक आहे. तीन वर्षांच्या कालावधीत हा फरक सुमारे ३३ दिवसांचा होतो म्हणजे एक महिन्याचा होतो. त्यामुळे तिसऱ्या वर्षात एक महिना अधिक घेतला तर ही वर्षे जोडली जातील आणि सण व ऋतु यांचे संतुलन बिघडणार नाही ही अधिक मासाची योजना करण्याची मूळ संकल्पना आहे. परंतु अधिक मासाच्या युक्तीबरोबर भारतीय पंचांगात क्षय मासाचाही प्रवेश झाला कारण चांद्र महिन्याची ऋतुंबरोबर सांगड ठेवण्यासाठी काही प्रदीर्घ कालावधीनंतर चांद्र वर्षातून एक महिना बाद करणे भाग पडते.
- अधिक (असंक्रांती) मास: ज्या चांद्र मासात सूर्याची एकही संक्रांत होत नाही तो अधिक मास होतो. जेव्हा सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो त्याला संक्रांत म्हणतात. सूर्य जेव्हा मकर राशीत प्रवेश करतो त्याला आपण मकर संक्रांत (मकर राशीत संक्रमण) म्हणतो. सूर्याच्या इतर संक्रांतींना आपण महत्व देत नाही. जेव्हा सौर मास चांद्र मासापेक्षा मोठा असतो त्यावेळी सौर मासाच्या प्रारंभी एक अमावस्या असते व दुसरी अमावस्या महिन्याच्या अंतिम टप्प्यात येते. पहिल्या अमावस्येनंतर येणाऱ्या महिन्याला (चांद्र मास) अधिक किंवा मल मास म्हणतात. दुसऱ्या अमावस्येनंतर येणारा महिना नेहमीचा समजला जातो आणि त्याच्या आधी निज हे पद लावले जाते. उदा. अधिक श्रावण आणि नंतर येणार निज श्रावण. कोणतेही धार्मिक विधी अधिक महिन्यात केले जात नाहीत. या महिन्यात देवाची भक्ती करावी असा प्रघात आहे म्हणून अधिक महिन्याला पुरुषोत्तम मास असे सुद्धा म्हटले जाते.
- क्षय मास: अगदी क्वचित चांद्र मास सौर मासपेक्षा थोडा मोठा असतो अशा एका सौर मासात एकही अमावस्या येत नाही आणि सूर्य दोन राशी ओलांडतो. या सौर मासाशी निगडित जो चांद्र मास असतो त्या मासाला चांद्र वर्षातून गाळले जाते आणि या मासाला क्षय मास हे नाव आहे. ४ जानेवारीच्या सुमारास सूर्य पृथ्वीच्या सर्वात जवळ असल्याने त्याची गती वाढते. सर्वसाधारणपणे जानेवारी महिन्यात मार्गशीर्ष, पौष, माघ हे महिने येतात. बहुतांश वेळा पौष महिन्याचा क्षय होतो. क्षय मास १९ किंवा १४१ वर्षांनी येतो परंतु ४, ६५, ७६, १२२ या वर्षांच्या कालावधीनंतर सुद्धा क्षय मासाचे आगमन झाले आहे. क्षय मासाच्या अगोदर आणि नंतर अधिक मास आल्याचे लक्षात येईल. याचे कारण क्षय मासाच्या आधीच्या व नंतरच्या सौर महिन्यात आपोआपच दोन अमावस्या उद्भवतात त्यामुळे दोन चांद्र मास अधिक होतात. याचाच अर्थ ज्या वर्षात क्षय मास येतो त्या वर्षात ११ महिने असतील असा गैरसमज होण्याची शक्यता आहे परंतु तसे होत नाही. त्या वर्षी १२ - १ + २ = १३ महिने असतात.
या सर्व गोष्टींवरून निष्कर्ष निघतो की सोय आणि शास्त्र यांची उत्तम सांगड घालून परंपरा निर्माण केल्या जात होत्या.
हिंदू कालगणना कशी विकसित होत गेली हे पाहिल्यास त्याचे तीन कालखंड आहेत असे दिसून येईल.
१. वैदिक कालखंड - अज्ञात भूतकाळापासून इ.स.पू १५०० पर्यंत
२. वेदांग ज्योतिष कालखंड - इ.स.पू १५०० पासून इ.स.पू ४०० पर्यंत
३. सिद्धांत ज्योतिष कालखंड - इ.स.पू ४०० पासून आतापर्यंत
यापैकी वैदिक कालखंडाबद्दल असलेला शास्त्रीय आधार आपण वर बघितला. वेदांग ज्योतिष्याच्या ऋगवेदीय ज्योतिष आणि याजुस् ज्योतिष अशा दोन संहिता (ग्रंथ) आहेत. या दोन्हीही ग्रंथातील गणित दशमांन पद्धतीवर (Decimal System) आधारित आहे. याचाच अर्थ असा की, गेली ३५०० वर्षे दशमांन पद्धती भारतात अस्तित्वात आहे. या ज्योतिषात बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, त्रैराशिक इत्यादी गणिती क्रियांचा उपयोग करण्यात आला आहे. म्हणूनच अनेक पाश्चात्य व पौर्वात्य विद्वानांना या छोट्या ग्रंथाचा अभ्यास करावासा वाटला. इ.स. १८७३ साली हिंदुस्थानात वास्तव्याला आलेल्या मुलकी (Revenue) अधिकारी विल्यम ब्रेनांड (William Brennand) याला असे वाटले की पाश्चात्य विद्वानांनी हिंदू गणित आणि खगोलशास्त्र याला योग्य तो न्याय दिला नाही आणि म्हणून त्याने निवृत्तीनंतर अभ्यास करून इ.स. १८९६ मध्ये हिंदू ऍस्ट्रॉनॉमी हा ग्रंथ लिहिला. कोणताही पूर्वग्रह न ठेवता ब्रेनांड यांनी आपली मते या ग्रंथात मांडली आहेत.
हिंदू खगोल शास्त्रात युग, महायुग, मन्वंतर, कल्प अशी लाखो वर्षांची कालमापने दिलेली आहेत. या कालगणनेनुसार कल्प म्हणजे ब्रह्माचा एक दिवस. ब्रह्माच्या एका दिवसाचा कालावधी आहे ४ अब्ज ३२ कोटी (४३२ कोटी) वर्षे. त्याचे गणित खालीलप्रमाणे:-
- कली युग - ४ लाख ३२ हजार वर्षे = १ कलियुग
- द्वापार युग - ८ लाख ६४ हजार वर्षे = २ कलियुगे
- त्रेता युग - १२ लाख ९६ हजार वर्षे = ३ कलियुगे
- सत्य युग - १७ लाख २८ हजार वर्षे = ४ कलियुगे
- महायुग - चारी युगे मिळून होणारे = १० कलियुगे
- एक मन्वंतर = ७१ महायुगे + १ सत्ययुग = ७१४ कलियुगे
- एक कल्प = १४ मन्वंतरे + १ सत्ययुग = १०००० कलियुगे
- म्हणजेच ४ अब्ज ३२ कोटी वर्षे
एका कल्पात विश्वाचा जन्म होऊन त्याचा नाश होतो. असे ६ कल्प आहेत. त्यांची नावे:
१) कूर्म २) पार्थिव ३) सावित्र ४) प्रलय ५) श्वेतवराह ६) ब्राह्म
सध्या श्वेतवराह कल्प चालू आहे (संकल्पाच्या वेळी गुरुजी काय म्हणतात ते वाचलंत की लक्षात येईल) म्हणजे याचा अर्थ याच्या आधी चार वेळेला विश्व निर्माण होऊन त्याचा नाश झाला आहे.
आश्चर्याची गोष्ट म्हणजे आधुनिक विज्ञानाप्रमाणे विश्वाचे आयुष्य एवढ्याच अब्जावधी वर्षात मोजले जाते त्यामुळे हिंदू खगोल शास्त्रातील कालगणनेत सत्यांश दडलेला आहे असा महत्वाचा मुद्दा ब्रेनांडने आपल्या ग्रंथात मांडला आणि सिद्ध करून दाखविला.
पंचांग:
हिंदू कालगणना असे म्हटले की आपल्याला एक शब्द आठवतो तो म्हणजे पंचांग. या नावावरूनच लक्षात येते की त्याची पाच अंगे असणार; ती कोणती?
१. नक्षत्र २. तिथी ३. वार ४. योग ५. करण
चंद्राला पृथ्वीभोवती प्रदक्षिणा करण्यास २७.३ दिवस लागतात त्यामुळे आपल्या पूर्वजांनी चंद्राच्या भासमान भ्रमण मार्गाचे २७ भाग केले आणि त्याला नक्षत्र हे नाव दिले. सूर्य आणि चंद्र रोज पूर्वेकडून पश्चिमेकडे सरकत असतात परंतु चंद्राची गती सूर्यापेक्षा जास्त जलद असते. चंद्राची सूर्यसापेक्ष गती म्हणजे तिथी अशी तिथीची शास्त्रीय व्याख्या आहे.
सायन आणि निरयन पंचांग वाद:
१८५७ नंतर म्हणजे आधुनिक कालखंडात केरुनाना छत्रे, ज्ञानकोशकार श्रीधर केतकर, शं.बा. दीक्षित, लोकमान्य टिळक, रघुनाथाचार्य वगैरे खगोल शास्त्राविषयीचे अग्रणी निर्माण झाले. त्यांनी जेव्हा पंचांगाचा चिकित्सक अभ्यास केला तेव्हा त्यातील त्रुटी लक्षात आल्या. त्यांना असे दिसून आले की, ग्रंथाला अनुसरून सिद्ध केलेल्या ग्रहस्थिती, ग्रहणकाल, तिथ्या या प्रत्यक्ष निरीक्षणाशी जुळत नाहीत. त्यामुळे पंचांगात सुधारणा करणे आवश्यक झाले. त्यातूनच सायन आणि निरयन पंचांग हा वाद निर्माण झाला व जो आजपर्यंत नीट सुटलेला नाही.
सायन व निरयन वाद काय आहे ते त्यातील क्लिष्टता कमी करून समजून घेण्याचा प्रयत्न करूया:-
पृथ्वीच्या परांचन (precession) गतीमुळे वसंत संपात बिंदू हा साधारण ७२ वर्षांनी एक अंश मागे जातो. राशिचक्राची सुरुवात वसंत संपात बिंदू पासून केली जाते परंतु हा बिंदूच स्थिर नाही त्यामुळे २००० वर्षांपूर्वी जेव्हा पंचांग तयार करण्याचे सिद्धांत गणित निर्माण झाले त्यावेळी राशींची जी स्थिती होती ती आता राहिलेली नाही. त्यामुळे पंचांग तयार करताना वसंत संपात बिंदूचे (summer equinox) चलन किंवा अयन लक्षात घेऊन जे पंचांग तयार केले जाते ते सायन (स + अयन) पंचांग. ज्या पंचांगात हे चलन लक्षात घेतले जात नाही ते निरयन पंचांग.
इ.स. २८० साली सायन आणि निरयन पंचांगे सारखीच होती कारण दोघांचे संपांत बिंदूचे स्थान एकच होते. परंतु संपात बिंदूच्या चलनामुळे ग्रहांची व राशींची आजची आकाशातील स्थिती यात १७३८ वर्षात फरक पडला आहे. या इतक्या वर्षात संपात बिंदू (१७३८ / ७२) = २४.१ अंशांनी मागे सरकला आहे. संपात बिंदू मागे सरकल्यामुळे रास पुढे सरकल्यासारखी भासते. त्यामुळे सायन रास काढण्यासाठी निरयन राशीत २४ अंश जोडावे लागतात. सूर्याला एक अंश पुढे सरकण्यासाठी वर्षाला एक दिवस जास्त लागतो यामुळे सूर्याला हे जादा २४ अंश कापण्यासाठी २४ दिवस अधिक लागतात. इ.स. २८० मध्ये २२ डिसेंबर रोजी सूर्य मकर राशीत प्रवेश करत होता (म्हणजेच तेंव्हाची मकर संक्रांत). आज सूर्याला मकर राशीत प्रवेश करण्यासाठी २४ दिवस अधिक लागतात म्हणजेच १४ जानेवारी. परंतु आजपासून ६२ वर्षांनी हा दिवस १५ जानेवारी किंवा कधी कधी १६ जानेवारी असेल.
मग असा प्रश्न येईल की आपण आजपासून पुढे सूर्यावरती आधारित कालगणना का स्वीकारत नाही? अगदी प्राचीन काळापासून भारतीय पंचांगात दोन मूलभूत तत्वांचा स्वीकार करण्यात आला आहे:-
१. सुयोग्य ऋतुंमध्येच धार्मिक विधींचे पालन करण्यात यावे
आणि
२. धार्मिक विधींचे दिनांक चंद्राच्या कलेच्या आधारे निश्चित करावेत.
याचाच अर्थ ऋतूंचे नियमन सूर्य करतो आणि धार्मिक विधींचे नियमन चंद्रावरून असल्याने भारतीय पंचांग चांद्र - सौर होते म्हणजे महिने चंद्राच्या कलेप्रमाणे व वर्ष सूर्याच्या गती प्रमाणे.
भारतातील महत्वाच्या कालगणना:
आपल्या भारतातील दुसरा एक घोळ म्हणजे ही एकच कालगणना अस्तित्वात नाहीये. त्यामुळे महत्वाच्या कालगणना कोणत्या याचा एक छोटा मागोवा:-
१. कलियुगाब्ध: महाभारतातील परीक्षित राजा शिकारीला गेला असता तो एक ध्यानस्थ ऋषींच्या गळ्यात मेलेला साप टाकतो. त्या ऋषीचा मुलगा परीक्षित राजाला शाप देतो की तू सात दिवसात सर्पदंश होऊन मरशील. तेव्हा प्रश्न असा पडला की परीक्षितासारखा सत्वशील राजा असा का वागला? तेव्हा त्याचे उत्तर असे देण्यात आले की द्वापारयुग संपून कलियुगाचा प्रारंभ झाल्याने राजाची बुद्धी भ्रष्ट झाली. हा संदर्भ लक्षात घेऊन आर्यभट्टाने कलियुगाची सुरुवात तेव्हा झाली असे धरले. त्यावेळच्या ग्रहस्थितीनुसार ग्रेगोरियन कॅलेंडरप्रमाणे ती तारीख इ.स. पूर्व २३ जानेवारी ३१०१ अशी येते आणि तो कलियुगाचा प्रारंभ धरण्यात आला. म्हणून आज २०१९ मध्ये कलियुगाब्ध - २०१९ + ३१०१ = ५१२० हा येतो आणि त्याचा वर्षारंभ चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे गुढीपाडव्यालाच येतो.
२. विक्रम संवत: इ.स. पूर्व ५७ कार्तिक शुद्ध प्रतिपदा म्हणजेच दिवाळीतील पाडवा हा विक्रम संवतचा प्रारंभ दिन समजला जातो. ख्रिस्ताब्धात (इसवी सनात) ५७ मिळवले की विक्रम संवतचे वर्ष येते. इ.स. २०१९ म्हणजे विक्रम संवत २०७६. हे संवत गुजराथ आणि उत्तर भारतातील व्यापारी वर्ग या कालगणनेप्रमाणे व्यवहार करतात. याचे महत्वाचे कारण असे की, दिवाळीनंतर नव उत्पादित धान्ये बाजारात येतात व त्यांची खरेदी विक्री चालू होते त्यामुळे व्यापारी वर्गाला हे वर्ष सोयीचे ठरते. दक्षिण भारतात नवीन धान्ये दिवाळीपूर्वीच येत असल्याने ह्या कालगणनेचा प्रसार तिथे झाला नाही. विक्रम संवत चालू करणारा राजा विक्रमादित्य कोण ह्याबद्दल मतभेद आहेत कारण इ.स. पूर्व ५७ या काळात विक्रमादित्य नावाचा राजा इतिहासाला ज्ञात नाही. त्यामुळे त्या काळात जी मालवगण कालगणना, कृत संवत या नावानी उज्जैन राजधानी असलेल्या माळव्यात चालू होती तिचे नामांतर समुद्रगुप्तचा मुलगा विक्रमादित्य याने इ.स. ३८० ते ४३० या काळात केले असावे किंवा उज्जैन नरेश यशोवर्मन याने हूण आक्रमक मिहीरगुल याचा पराभव करण्याचा (इ.स. ५२८) जो विक्रम केला त्याच्या स्मरणार्थ हे नामांतर असावे असे इतिहास तज्ज्ञांना वाटते.
३. श्री नृप शालिवाहन शक:- शालिवाहन शक कार्दमक घराण्यातील चष्टन या शक राजाने सुरू केले आहे. पहिल्या शतकात महाराष्ट्रावर क्षहरात क्षत्रप घराण्यातील राजा नहपान हा ४६ वर्षापासून राज्य करीत होता क्षत्रप आणि सातवाहनांमधे वारंवार होत असलेल्या युद्धाला इतिहास साक्षी आहे. पण पहिल्या शतकाच्या ७८ व्या वर्षी नासिक येथील गोवर्धन येथे सातवाहन (शालीवहान) राजा गौतमीपुत्र सातकर्णी आणि क्षत्रप नहपान यांच्यामधे त्या काळातील सर्वात मोठे युद्ध झाले व त्या युद्धात नहपान राजा हरला व त्याचा शिरच्छेद झाला असा ह्या युद्धाचा उल्लेख नाशिक लेणीमधे मध्ये सातकर्णी राजाची आई गौतमी बलश्री हिने शिलालेख कोरलेला आहे. ह्या युद्धात सातवाहनांनी क्षहरात वंशाचा अस्त केला. क्षहरातांच्या अस्तानंतर क्षत्रपांचे नवीन घराणे उदयास आले ‘कार्दमक’, कार्दमक घराण्यातील पहिला राजा चष्टन गादीवर आला. ज्या दिवशी चष्टन गादीवर बसला त्या दिवशी त्याने जे शक सुरु केले त्याला आपण “शालिवाहन शक” असे संबोधतो. इ.स. ७८ मधे हे शक चष्टनाने सुरु केले. आणि नंतर त्याला काहींनी “शक राजांचा संवत” असेही संबोधले. चष्टनानी आणि त्यानंतरच्या सर्व कार्दमक घराण्यातील राज्यकर्यांनी शालिवाहन शकाचा वापर जवळ जवळ ३०० वर्ष केलेला दिसतो आणि सातवाहनांनी या शकाचा वापर केलेला दिसत नाही. इसवी सनाच्या वर्षातून ७८ कमी केले की शके वर्ष कळते उदा. इ.स. २०१९ म्हणजे शके १९४१.
४. राज्यारोहण शक:- शिवाजी महाराजांनी सुद्धा ६ जून १६७४ या दिवसापासून (जेष्ठ शुद्ध १३) म्हणजेच स्वतःच्या राज्यारोहणाच्या दिवशी राज्यारोहण शक चालू केला. परंतु ही कालगणना कोणीही वापरत नाही.
५. भारतीय सौर पंचांग:- भारतात निरनिराळ्या प्रांतात वेगवेगळी पंचांगे वापरली जातात की ज्यांची वर्षारंभे सुद्धा वेगळी असतात. याशिवाय सायन आणि निरयन हा वाद आहेच. हा सर्व गोंधळ दूर करण्यासाठी सर्वांना समान आणि शास्त्रशुद्ध अशी भारताची कालगणना असावी या विचाराने १९५२ साली डॉ मेघनाद साहा यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी नेमली आणि त्यांनी १४ सप्टेंबर १९५४ रोजी अहवाल सादर केला. भारतीय सौर पंचांग २२ मार्च (वसंत संपात बिंदू) १९५७ पासून ही कालगणना सुरु करण्यात आली. त्यातील महत्वाचे मुद्दे खालीलप्रमाणे:
- हे पंचांग पूर्णपणे सूर्याशी निगडित आहे. त्यामुळे त्यात अधिक महिना घेण्याची जरूर नाही. याचे वर्ष ३६५.२४२२ इतक्या दिवसाचे आहे.
- वर्ष संख्या शालिवाहन शकातच मोजली जाते.
- वर्षारंभ सूर्य संपात बिंदूवरती आल्यावर केला जातो म्हणून वर्षारंभ देखील २२ मार्च या दिवशी व लीप ईयर असल्यास २१ मार्च रोजी केला जातो. महिन्यांची नांवे चैत्र, वैशाख अशीच आहेत. या कालगणनेचा चंद्राशी काही संबंध नसल्याने पक्ष, तिथी यांना काही स्थान नाही.
- चैत्र महिन्याचे दिवस ३० आणि लीप ईयरच्या वर्षी ३१ दिवस. वैशाख, जेष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद या महिन्यांचे दिवस ३१ आणि अश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ, फाल्गुन हे सहा महिने ३० दिवसांचे आहेत.
हे पंचांग अगदी शास्त्रशुद्ध असून देखील आकाशवाणी वरती भारतीय सौर दिनांक सांगण्यापलीकडे याचा प्रसार झाला नाही किंवा केला गेला नाही. परंतु स्वतंत्र भारताची स्वतःची एकत्रित कालगणना असावी ही कल्पना कौतुकास्पद होती आणि आहे.
हा एवढा प्रदीर्घ लेख लिहिण्याचे कारण म्हणजे आजच्या पिढीला हा इतिहास माहित व्हावा आणि आपले पूर्वज किती पुढारलेले होते ते कळावे व त्याचा सार्थ अभिमान वाटावा. हा माझा हेतू जरी काही अंशी सफल झाला तरी मला मनापासून आनंद होईल.
@ यशवंत मराठे
yeshwant.marathe@gmail.com
(कव्हर फोटो: १८७१-७२ सालातील हिंदू कॅलेंडरचे एक पान)