एप्रिल २०१६ मधे काही कामानिमित्त जकार्ताला गेलो होतो. आता इंडोनेशिया हा बहुसंख्य मुस्लिम असलेला देश. जगातील सर्वात जास्त मुस्लिम लोकसंख्या याच देशात त्यामुळे तिथे नक्की काय आणि कसे असेल याची एक उत्सुकता तसेच अनामिक भीती होती. जकार्ताची लोकसंख्या १.५० कोटी म्हणजे मुंबईपेक्षा थोडी जास्त. बरं देशही काही प्रगत नव्हे. बरीच झोपडीपट्टी दिसली पण घाण आणि कचरा मुंबईपेक्षा खूपच कमी. पूर्ण २-३ दिवसात एखाद-दुसरी बाई सोडली तर कुठल्याही स्त्रीने बुरखा घातलेला दिसला नाही. प्रचंड प्रमाणात लहान मुली शाळेत जाताना दिसल्या म्हणजे कुठेतरी सरकारचा शिक्षणावर फोकस असावा.
शहराच्या मध्यभागी एक प्रचंड लांबलचक पुतळा दिसला; पटकन काय आहे ते कळेना म्हणून विचारलं तर सांगण्यात आले की हा 'अर्जुन विजय रथ' आहे. रथाचे सारथ्य श्रीकृष्ण करत असून अर्जुन मागे आरूढ झाला आहे. मुस्लिमबहुल देशाच्या राजधानीच्या मध्यभागी हिंदू संस्कृती? डोकंच गरगरायला लागलं.
दुसऱ्या दिवशी म्युझियम बघायला गेलो तर मुख्य दरवाजात गणपतीची एक खूप मोठी मूर्ती. सगळ्या मूर्त्या कुठच्या तर शंकर, विष्णू, गरुड, अगस्ती वगैरे फक्त हिंदू आणि थोडेफार बुद्ध. पूर्ण म्युझियम मध्ये इस्लामचा बारीकसा पण गंध नाही. धक्क्यातून सावरायला बराच वेळ लागला. तिथे असेही कळले की काही वर्षांपूर्वी पाकिस्तानचे पंतप्रधान इंडोनेशियाला गेलेले असताना त्यांनी तिकडच्या अध्यक्षांना विचारले की तुम्ही मुसलमान असून हिंदू संस्कृतीचे जतन का करताय, तेव्हा त्यांनी उत्तर दिले की we cannot forget our fathers. आपले पूर्वज हिंदू होते हे त्यांनी अत्यंत सहजरित्या accept केले आहे.
इंडोनेशियात त्यांच्या लष्कराची (आर्मी, नेव्ही, एअर फोर्स) बोधवाक्ये आणि घोषवाक्ये ही आजही संस्कृत भाषेतील आहेत त्याची काही ठळक उदाहरणे.
Aceh Province: 'पञ्चचित' ("Five Goals")
Jakarta: 'जया रया' ("Glorious and Great")
National Police: 'राष्ट्र सेवाकोत्तमा' ("People's Main Servants")
Military: 'त्रि धर्म एक कर्म'
Army: 'कार्तिका एका पक्षी' ("Unmatchable Bird with Noble Goals")
Navy: 'जलेस्वेव जयामहे' ("On the Sea We Are Glorious")
Air Force: 'स्वाभुअना पक्ष' ("The Wings of the Motherland")
Marine Corps: 'जलेषु भूम्यां च जयामहे' ("On the Sea and Land we are glorious")
Paskhas: (Indonesian Air Force Special Forces): 'कर्मण्ये वाधिका अस्ते मा फलेषू कदाचन' ("You have a right to perform your prescribed duty, but you are not entitled to the fruits of action" (Bhagavad Gita, Chapter 2, Verse 47)
Police Academy: 'धर्म विचक्षण क्षत्रिय
Military Police: 'सत्य-वीर्य-विचक्षणा'
Coast Guard: 'धर्म जल प्रजातम'
धर्माचे असे एकमेकात मिश्रण झाले तर जगातील बहुतांश प्रॉब्लेम सहजी सुटू शकतील. मला कल्पना आहे की सद्य परिस्थितीत हे एक दिवास्वप्नच ठरेल पण चांगली स्वप्ने बघायला कोणाच्या परवानगीची गरज नाही.
यशवंत मराठे
#travelogue #jakarta #indonesia