माझी बहीण स्मिता पटवर्धन हिच्या पुण्यातील सोसायटीत श्री. भगवान जोशी उर्फ जोशी काका राहतात असे तिच्या कडून बरेच वर्षे ऐकायचो. त्यांच्या छोट्या मोठ्या कामांना ती आणि माझा मेव्हणा, दिलीप, त्यांना मदत करत असल्यामुळे त्यांच्याकडे काकांचे जाणे येणे होते. तिथे सुमारे ४-५ वर्षांपूर्वी माझी त्यांची पहिली भेट झाली.
काकांचा जन्म इस्लामपूरचा. काकांना त्यांच्या चित्तपावन असण्याचा आणि तसेच गोरा रंग व घारे डोळे ह्याचा प्रचंड अभिमान आहे. त्यांचे वडील गो म जोशी यांचा वेदाची एक शाखा मीमांसा यावर सखोल अभ्यास आणि विस्तृत लिखाण आहे. भारताचे राष्ट्रपती, डॉ राधाकृष्णन यांच्या हस्ते गो म जोशींचा सत्कार झाला होता.
Kaka was a Topper at MA / MSc in Applied Mathematics and then later IAS Batch of 1959. He joined Financial Services of Defence Ministry and subsequently became Controller of Defence Accounts, Western Command. He retired as Financial Advisor.
माझा मोठ्या सरकारी पदावर काम केलेल्या लोकांबद्दलचा अनुभव काही फार चांगला नव्हता. असे निवृत्त अधिकारी अत्यंत गर्विष्ठ आणि आढ्यतेखोर असतात असा माझा ठाम समज झाला होता. परंतु काकांना भेटल्यावर ह्या सगळ्या समजुती गळून पडल्या. इतका मोठा माणूस इतका विनम्र असू शकतो यावर विश्वासच बसेना.
काका हे एक ज्ञानभांडार आहे. त्यांना भेटल्यावर मला पहिल्यांदा Information, Knowledge and Wisdom ह्यातला फरक लक्षात आला. मला संस्कृत फारसे येत नाही आणि माझे वाचनही अतिशय मर्यादित असल्यामुळे काकांना भेटले की अजि म्या ब्रह्म पाहिले अशी माझी स्थिती होते. ते एकदा बोलायला लागले की काय काय संदर्भ ते सांगतील याचा नेम नसतो. उपनिषदे, सूत्रे, भगवदगीता, काकांची अतिप्रिय ज्ञानेश्वरी, Arthur Schopenhauer, Friedrich Nietzsche, Immanuel Kant सारखे पाश्चिमात्य तत्त्ववेत्ते आणि बरेच काही, सगळे आठवत पण नाहीत. मी फक्त माझी ज्ञानेंद्रिय एकवटून श्रोत्याची भूमिका घेतो आणि तो वर्षाव माझ्या मर्यादित क्षमतेत साठवण्याचा निष्फळ प्रयत्न करतो.
Physics आणि Mathematics हे काकांचे अतिशय लाडके विषय. या विषयावर ते एकदा बोलायला लागले की त्यांच्या दृष्टीने काळच थांबतो, पण जेव्हा ते त्यांच्या नकळत concepts of infinity किंवा तत्सम काही गोष्टींबद्दल बोलू लागले की माझी तर दातखीळच बसते. तसे ते कुठच्याही विषयावर बोलू शकतात उदा. अर्थव्यवस्था, राजकारण, समाजकारण, व्यवस्थापन, तत्वज्ञान, अध्यात्म, त्यांना कुठच्याच विषयाचे वावडे तर नाहीच पण ते अधिकाराने बोलू शकतात एवढी त्यांना माहिती असते, वाचन असतं. मला नेहमी प्रश्न पडतो की एवढे सगळे त्यांच्या लक्षात कसे राहते? नक्कीच त्यांच्या मेंदूला जरा जास्त सुरकुत्या असाव्यात.
मी त्यांना कधीही भेटलो तरी एकच गोष्ट घडते की मी त्यांना अत्यंत बाळबोध काहीतरी प्रश्न विचारतो आणि समोरून पडणाऱ्या धबधब्याचे जे काही २-४ थेंब माझ्यात रुजतात, तो ठेवा म्हणून मी जतन करतो.
त्यांच्या असलेल्या अफाट ज्ञानाची काही छोटी उदाहरणे:
१. काकांचा एक जुना विद्यार्थी जर्मनीत आहे व फार मोठ्या पदावर असणाऱ्या ह्या विद्यार्थ्याने लठ्ठ पगाराची नोकरी सोडून बाॅन विद्यापीठात Ph.D साठी पंडितराज जगन्नाथाचे काव्यशास्त्र व काव्य सौंदर्य हा विषय घेतला आहे आणि तो काकांचे मार्गदर्शन घेतो.
शहाजहानच्या धाकट्या बहिणीशी जगन्नाथाचे लग्न झालेलं असल्याने काशीच्या ब्राम्हणांनी वाळीत टाकलेला जगन्नाथ गंगाकिनारी जातो आणि अप्रतिम असे काव्य "गंगालहरी" म्हणता म्हणता जलसमाधी घेतो हे सर्व काकांच्या तोंडून ऐकणे हा एक विलक्षण अनुभव आहे. माझे तर भाग्य एवढे मोठे की हे "गंगालहरी" संस्कृत काव्य काकांच्या तोंडून अख्खे ऐकायला मिळाले; अजूनही आठवले तरी थरारून जायला होतं.
२. केंद्र शासनाच्या सेवेत असताना काका काही PSU वर डायरेक्टर होते आणि त्यावर बोलताना सरकारचा दृष्टीकोन कसा नसावा किंवा असावा (do's and dont's) त्याबाबत संत तुलसीदासाची एक रचना त्यांनी सांगतली आणि वर भरीला म्हणून विदूराने धृतराष्ट्राला दिलेल्या प्रसिद्ध सल्ल्याचे संस्कृत वचनही ऐकवले. (मला दोन्हीही आठवत नाहीयेत)
३. वर्षभरापूर्वी कृष्ण या विषयावर बोलताना त्यांनी सांगितले की ते कुठचीही गोष्ट वेगवेगळ्या सूत्रांकडून खात्री करून घेतल्याशिवाय बोलतच नाहीत. कृष्णाबद्दल जगातील अनेक लोकांनी काय लिहिलंय याचा त्यांनी सखोल अभ्यास केला होता. ही त्यांची अभ्यासू वृत्ती पदोपदी जाणवते आणि तेव्हा असं लक्षात आलं की आपण किती उथळ असतो एखाद्या गोष्टीवर पटकन विश्वास ठेवायला.
आता वयोपरत्वे ते वर्षातील ६ महिने त्यांच्या मुलाकडे दिल्लीला असतात त्यामुळे हल्ली जरा भेटी कमी झाल्या आहेत. पण ते पुण्यात आले की वेळात वेळ काढून काकांना भेटणे व जेवढे शक्य होईल तेवढे त्यांच्या ज्ञानाचे दान पदरात पाडून घेणे याचा चान्स मी सोडत नाही.
या वर्षीच्या २३ जानेवारीला त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला फोन केला तेव्हा मी असं सहजच म्हटलं की आम्हा सर्वांना असेच मार्गदर्शन करत रहा. तर लगेच म्हणाले की मी कुठला मार्गदर्शक? तुम्ही साधक असलात तर देवच तुम्हांला मार्गदर्शन करेल.
मी त्या भगवंताचे शतशः आभार मानतो की हा ज्ञानभंडार माझ्यासमोर अधूनमधून उघडला जातो कारण त्या ज्ञानाची स्वप्नात सुद्धा कल्पना करणे मला अशक्य आहे.
अफाट व्यक्तिमत्व
🙏🙏🙏🙏