वयाच्या बावीस तेवीसाव्या वर्षी जेव्हा एखाद्या तरुणाला लक्षात येते की आपल्या वडिलांच्या अकाली निधनानंतर आपल्या कुटुंबावर खूप मोठे आर्थिक संकट घोंगावत आहे, डोक्यावर बरंच कर्ज आहे, आलेले संकट निभावून नेण्याचे धाडस अथवा साहस दाखवणारा कोणीही बरोबर नाही तेव्हा तो तरुण काय करेल? जे काही शिल्लक आहे ते विकणे याच्या व्यतिरिक्त दुसरा पर्याय काय?
या अडचणींमुळे रानडे रोडवरील एक 100-150 फुटाचा गाळा सोडला तर हातात काहीही नाही. वडिलोपार्जित धंदा कसला तर किराणा मालाचा म्हणजे वाणी; पण एवढया छोट्या जागेत तो कसा होणार? जागेच्या अडचणीमुळे नवीन व्यवसाय तरी काय करणार आणि भांडवल कुठून आणायचे? त्यामुळे अशा परिस्थितीत बहुतेक जण आहे तो गाळा विकून टाकण्याचाच निर्णय घेतील, नाही का?
परंतु या कच्छी मुलाने अशा आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी मात्र एकदम अनोखा मार्ग चोखाळला. मराठी मित्र परिवारात वावरल्याने बऱ्यापैकी चांगली मराठी भाषा येत आणि समजत होती. परंतु त्या पुंजीच्या जीवावर तो युवक मराठी पुस्तकांची लायब्ररी सुरु करण्याचा विचार करेल असे कोणाच्या स्वप्नात देखील आले नसते. या युवकाने कांती गाला ही आपली ओळख अतिशय थोड्या अवधीत दादर सर्क्युलेटिंग लायब्ररीचा कांती अशी निर्माण केली.
कांती हे एक अजब रसायन आहे. त्याने नुसतीच लायब्ररी चालू नाही केली तर स्वतः प्रचंड वाचन केले. येणाऱ्या मेंबर्सशी कुठली पुस्तके चांगली आहेत असा संवाद साधण्याएवढा त्याचा अभ्यास दांडगा होता. लोकं त्यालाच विचारायचे की आम्ही काय वाचावे? मग हा त्यांच्याशी काही काळ गप्पा मारून त्यांची काय आवड आहे हे जाणून घ्यायचा आणि त्याप्रमाणे पुस्तके वाचायला द्यायचा. आपली मातृभाषा नसलेल्या भाषेवर असे प्रभुत्व किती जण गाठू शकतात? कदाचित काही हजारात कांतीसारखा एखादाच विरळा.
माझी आणि कांतीची ओळख बहुदा 1977 सालची. वाचन, हिंदी सिनेमे, संगीत आणि क्रिकेट हे आमच्या दोघांचेही जिव्हाळ्याचे विषय त्यामुळे तारे फार लवकर जुळले. कॉलेज संपले की, चुकला फकीर जसा मशिदीकडे जातो तसा, मी कांतीच्या लायब्ररीत जायचो. जागा इतकी लहान की आतमध्ये उभं राहणे शक्यच नसायचे त्यामुळे तो दरवाजातील टेबलावर आणि मी बाहेरच फुटपाथवर. अशा स्थितीत तासनतास गप्पा मारत उभं राहणे यातच मजा. आता इतका वेळ तिथे घालवत असल्यामुळे आजूबाजूचे सर्व दुकानदार ओळखीचे. शेजारचा रमेशभाई, स्टोव्हवाला दिनेशभाई, स्टेशनरी दुकानाचा गजा, समोरील भाजीवाला, बाजूचा केमिस्ट ही सगळीच माझी दोस्त मंडळी.
बरं गंमत म्हणजे हे असे करणारा मी एकटाच नव्हतो. रमेश तांबे, नितीन प्रधान, विजू सप्रे, सुरेश पाटणकर, सुहास केळकर, संजय दीक्षित ही काही वानगीदाखल नावे. तसेच कालांतराने प्रसिद्ध झालेले द्वारकानाथ संझगिरी, प्रमोद पवार आणि सतीश पुळेकर ही मंडळी सुद्धा अधूनमधून हजेरी लावून जात असत. मोबाईल नसण्याच्या जमान्यात दादरमध्ये एकमेकांना निरोप ठेवण्याचा आमचा हुकुमाचा एक्का म्हणजे कांती.
आमचे गप्पा मारण्याचे आवडते विषय म्हणजे क्रिकेट मधील रेकॉर्ड्स आणि हिंदी चित्रपट गाणी. खूप सिनेमे देखील एकत्र बघितले. आयुष्यातील माझ्या दोन महत्वाच्या गोष्टींसाठी मी कांतीचा कायमचा ऋणी आहे. पहिली म्हणजे माझ्या वाचनाची आवड अजून वृद्धिंगत करणे, आणि दुसरी म्हणजे तिथे मला लाभलेले भाल्या देवधर, अजय कामत, सुधीर नेरुरकर, संजू कोल्हटकर, नितीन मुंढे यांच्यासारखे जिवाभावाचे मित्र. या दोन गोष्टींकरता कांतीला शंभर गुन्हे देखील माफ आहेत. पण हो, तसा त्याने एकही गुन्हा केला नाही ही गोष्ट अलाहिदा.
भविष्यात पुढे होणाऱ्या बदलांचा आधीच विचार करून त्याप्रमाणे आपल्या धंद्यात बदल करणे हे फार कमी लोकांना साध्य होते परंतु ही कला कांतीला फार चांगली जमली होती. पुस्तक लायब्ररीचे भवितव्य ओळखून त्याने वेळीच म्युझिक कॅसेट्स, सीडीज आणि व्हिडियो कॅसेट्स या क्षेत्रात पाऊल ठेवले. येणारी डिजिटल क्रांती विचारात घेऊन मग ग्रीटिंग कार्ड्स हा धंदा आणि आता मोबाईल हॅन्डसेट्स, रिचार्ज असे स्वतःला कायम reinvent करत राहिल्यामुळे आज तो 40-45 वर्षांनी सुद्धा धंद्यात टिकून उभा आहे. बदलत्या धंद्यानुसार दादर सर्क्युलेटिंग लायब्ररीचे DCL आणि आता Welwisher असे नामांतर होत गेले.
या सगळ्या प्रवासात त्याची आर्थिक प्रगती सुद्धा थक्क करणारी होती. त्याने सगळी कर्जे तर फेडलीच पण संपूर्ण परिवाराला सांपत्तिक सुस्थिती दिली. सचोटीने व्यवहार करून देखील अशी प्रगती साध्य करता येते याचे कांती हा एक ठळक उदाहरण आहे.
कांतीला सगळ्याच खेळांचे इतके वेड की जेव्हा आवडणाऱ्या टेनिसपटू केविन करनचे नाव त्याने आपल्या मुलाला ठेवले तेव्हा त्याचा आनंद बघण्यासारखा होता. गेल्या काही वर्षात त्याची बायको कुसुम आणि मुलगा केविन यांच्या इंस्युरन्स व्यवसायाचे बस्तान नीट बसल्यामुळे आता तो स्वतःचा व्यवसाय बराचसा आपल्या भावाकडे सोपवून त्याच्या इतर आवडींवर जास्त लक्ष देऊ लागला आहे. शिवाजी पार्क जिमखान्यात तो गेले काही वर्षे सक्रिय झाला आहेच. मग मधेच कधीतरी एखादा संगीत कार्यक्रम आयोजित करणे असाही एक प्रयत्न करून झाला. आज अनेक मराठी न्यूज चॅनेल्सवर राजकीय विश्लेषक म्हणून कांतीचे जेव्हा दर्शन होते तेव्हा खूप आश्चर्य आणि अभिमान वाटतो. महत्वाचे म्हणजे त्याने हे सर्वस्वी स्वतःची राजकीय समज आणि भान या जोरावर कमावलेला हा मान आहे; कुठल्या पक्षाचा समर्थक म्हणून नव्हे.
कांतीचा जनसंपर्क अफाट आहे. त्याच्या ओळखीचं कोणीही आणि कुठेही निघू शकतं. परंतु एका मित्राला दुसऱ्याशी जोडून देऊन जगाची कामे करून देणे हे ज्या प्रमाणात कांतीने निस्वार्थीपणे अनेक वर्षे हजारो लोकांसाठी केलंय तसे माझ्या पाहण्यात तरी इतर कोणी नाही. Totally unparalleled.
जसा फिनिक्स पक्षी राखेतून पुन्हा जन्म घेऊन भरारी मारतो तशीच कांतीने अतिशय कठीण आर्थिक परिस्थितीतून भरारी मारली. हे भल्याभल्यांना सुद्धा शक्य होत नाही.
कांतीचा हा गेल्या चाळीस वर्षांचा प्रवास बघितला की त्याच्याच भाषेत बोलायचे म्हणजे "सॉलीटच आहे रे".
परवा 26 जानेवारी हा त्याचा वाढदिवस आणि तसेच त्याच्या लायब्ररीची सुरुवात देखील याच दिवशी झाली. त्याला मनःपूर्वक शुभेच्छा.
© यशवंत मराठे
yeshwant.marathe@gmail.com