इंग्रजी भाषेत फर्स्ट कझिन असे म्हटले की आपल्याला कळतच नाही नक्की कोण? आपल्याला कसे मावसभाऊ, मामेभाऊ, आत्तेभाऊ, चुलतभाऊ असे सांगण्यात एक जवळीक वाटते. मला असे वाटते की आपली नाती मावसभाऊ आणि मामेभाऊ यांच्याशी जास्त जवळची असतात. चुलत भावंडांशी तेवढी भावनिक जवळीक नसते. कारण माहित नाही पण असे लक्षात येते. ह्या बाबतीत मात्र मातृसत्ताक संस्कृती जास्ती प्रबळ आहे त्यामुळे आजोळ हा शब्द ऐकून भावनाविवश न होणारा मराठी माणूस विरळाच. आता या गोष्टीला अपवाद असतीलच पण मी त्याच्यात नाही शिरत. माझ्या बाबतीत तर असे घडले की आईला तीन बहिणी आणि दोन भाऊ; पण वडिलांना मात्र एकच बहीण; त्यामुळे मातृसत्ताक झिंदाबाद.
आजोळचे वर्णन थोडक्या शब्दांत लिहिणे म्हणजे पंडित भीमसेन, जसराज यांच्या मैफिलीचे वर्णन दहा वाक्यांत करण्यासारखे आहे. आम्हाला काय गवसले आणि आजच्या पिढीने काय गमावले हे सांगायला एकच शब्द पुरेसा आहे. तो म्हणजे ‘नातेसंबंध !’ संस्कारवर्गात न जाता संस्कारबीजे रुजविण्याची किमया तेथे होती. पैशाची श्रीमंती नव्हती पण खाण्याची ददात नव्हती. मामाचा गाव म्हटला की काय आठवतं? डेरेदार झाडांच्या आत कौलारू घर, प्रशस्त अंगण, शेणाने सारवलेली जमीन, झोपाळा, गुरांचा गोठा, नारळ, पोफळीची वाडी, विहीर, आंबे, फणस, करवंदाची रेलचेल. हापूस आंब्यांचा ढीग, विहिरीचे पाणी, चुलीवरचे जेवण आणि गुण्यागोविंदाने राहणारी वीस-पंचवीस माणसे आणि वीज, पंखे नसूनही कौलारू घरात लागणारी छान झोप.
माझी आई गोखल्यांच्या घरातील शेंडेफळ आणि ती अवघी दोन वर्षांची असताना वडिलांचे अकाली निधन. तिचे वडील म्हणजे एकदम लाल गोरे आणि त्यामुळे त्यांना गावातील लोक रंगीत गोखले म्हणून ओळखायचे (आज एखाद्याला रंगीत म्हटले तर त्यातून भलतेच अर्थ निघू शकतील, असो). त्यामुळे असेल कदाचित, आजीची सगळ्यात लाडकी म्हणजे माझी आई; पण त्याचबरोबर तिचा आईवर पगडा देखील खूप होता. आजोबांचे वयाच्या 44 व्या वर्षी अचानक निधन झाले तेव्हा आजीचे वय होते फक्त 32 आणि पदरी सहा लहान मुले. सगळ्यात मोठ्या मुलीचे पंधरा दिवसापूर्वी लग्न (वय वर्षे 16) झाले होते आणि इतर मुले अकरा, नऊ, सात, पाच आणि दोन वर्षाची. घरचा कर्ता सवरता पुरुष अचानक गेल्याने आभाळच कोसळले असणार. मुलांना गरिबीचे चटके बसू नयेत म्हणून ती कंबर कसून ती बाप म्हणून देखील ठामपणे उभी राहिली. त्यात परत भाऊबंदकीचा शाप तर पाचवीला पुजला होताच. बारीकसा शेतीचा तुकडा आणि त्यातून उत्पन्न ते काय असणार? पण तरी देखील ती स्वतः शेतकामाला लागली. घर आणि त्याची छोटी वाडी होती पण ती देखील कोर्ट कचेरीत अडकलेली. वाडीतील आंबा, नारळ यांची जी काही थोडीफार झाडे होती त्यांची राखण आणि निगराणीची जबाबदारी पण तिच्यावरच. अपरात्री कितीही वाजता वाडीत खुट्ट झाले तरी आजी कंदील आणि काठी हातात घेऊन बघायला धावायची. परिस्थितीने तिला भीती हा शब्दच बहुदा विसरायला लावला होता. सर्व मुलांना मॅट्रिक पर्यंत शिक्षण देण्याची जबाबदारी तिने नेटाने पार पाडली. या तिच्या गुणांमुळे तिचा गावात एक आदरयुक्त दरारा होता.
माझा सगळ्यात मोठा मावस भाऊ राम दांडेकर म्हणजे एक भन्नाट व्यक्तिमत्व. तो माझ्यापेक्षा सुमारे 15-16 वर्षांनी मोठा त्यामुळे आमच्या आजोळच्या वार्षिक धांगडधिंग्यात तो जरा कमीच. तो आला की आमची चंगळच असायची. तो तर आमच्या आजोळी म्हणजे आवास मध्येच बरीच वर्षे वाढला. त्यामुळे त्याच्या तिकडील कथांवर एक पुस्तकच काढावे लागेल. असो. आम्ही सर्व भावंडे, म्हणजे उषा-आशा-शरद कोकणे, जयश्री-जयवंत-जयेंद्र वर्तक आणि मी-वसंत-स्मिता अशी मावस भावंडे, विनायक-विजय गोखले हे मामेभाऊ असा आमचा एक चौकोन. तसे समीर-सुजीत गोखले हे देखील मामेभाऊ होते पण वयाने लहान असल्याने त्यामानाने लिंबू टिंबू. आम्ही सर्व भावंडे मे महिन्याची सुट्टी लागायची वाटच बघत असायचो. किमान तीन आठवडे मुक्काम पोस्ट आवास ठरलेला. भाऊच्या धक्क्यावरून बोटीत (शोभना नावाची बोट तर नक्की होती) बसायचे आणि मग पुढे रेवसहून सासवणेला जाणारी एसटी पकडायची. गोखल्यांच्या घराच्या दरवाजातच बस स्टॉप. आमचे आजोळ म्हणजे सुंदर, प्रशस्त घर, मोठी ओटी, झोपाळा, मोठी विहीर, मागे तुळशी वृंदावन, छोटी पडवी, लहान विहीर, नारळ आणि आंब्याची झाडे. आजी आमच्या पायावर पाणी घालून भाकरीचा तुकडा ओवाळून टाकत असे. आणि मग आत गेल्यावर आम्ही तिच्या पाया पडत असू. आजीचे आम्हाला बघून नेहमीचं पालुपद असे ‘पोरं वाळली रे’.
बहुतेक वेळा मे महिन्यात जात असल्याने गावाला पोहचेपर्यंत सगळे घामाघूम झालेले असायचे. त्यामुळे गेल्या गेल्या विहिरीतून पाणी काढून मस्त आंघोळ. लहानपणी चहा मिळण्याचा प्रश्नच नव्हता. आजीने काहीतरी खायला केलेले असायचे आणि ते हादडले की आम्ही भावंडे उंडारायला मोकळे. पुढचे तीन आठवडे आम्हां मुलांचा ड्रेस ठरलेला; अर्धी चड्डी, वर बनियन आणि हातात एक बारीकशी काठी. पायात चपला घालण्याची बहुदा त्यावेळी पद्धतच नव्हती त्यामुळे सगळीकडे अनवाणी भटकंती. कोणाच्या वाडीतील आंबे पाड, बोरं तोड, जाळीत घुसून करवंदे तोडणे हे आमचे लाडके छंद. जांब, ताडगोळे आणि जांभळं हा रानमेवा कितीही खाल्ला तरी समाधानच व्हायचे नाही. दमून तहान लागली की समोर दिसेल त्या घरात शिरायचं. गोखले काकूंची नातवंडे म्हटल्यावर गावातील कुठल्याही घरात सहर्ष स्वागत आणि पाण्याबरोबर एखादा गुळाचा छोटा तुकडा मिळायचा. तो कुठल्याही चॉकलेटपेक्षा त्यावेळी गोड लागायचा.
घरातील जेवण साधेच असायचे पण भूक इतकी लागलेली असायची की त्याच्याएवढे चविष्ट दुसरे काही असूच शकत नव्हते. सकाळी आटवल आणि त्यात मेतकूट-तूप घातले की स्वर्गानंदी टाळी लागायची. आमचा मोठा मधुमामा नसेपर्यंत आमची चंगळ असे. ही भाजी नको, आवडत नाही असे चोचले आजी आनंदाने पुरवत असे. परंतु सगळ्यांना मदत मात्र करण्याची सक्ती होती. डाळींब्या सोलल्या तरच उसळ मिळेल अशी आजीची 'गोड' धमकी असायची. पण एकदा का मधुमामा आला की आमची दातखीळ बसायची. आम्ही जेवताना तो आमच्या समोरच येऱ्याझाऱ्या घालायचा. भाजी आवडत नाही म्हणायची कोणाची टाप होती? न आवडणारी भाजी पहिलीच संपवून टाकली तर त्याचा हुकूम सुटायचा, आई याला भाजी आवडलेली दिसते; घाल अजून. आणि जर कधी शेवट खाऊ म्हणून पानात ठेवली तर ओरडायचा, काय रे भाजी कोण खाणार? तोंड दाबून बुक्क्यांचा मार; दुसरे काय? जेवणात ताक हे असायचेच. एकदा रामदादा आला असता, आजीचा अंदाज थोडा चुकला म्हणून तिने ताकात जरा सढळ हाताने पाणी घातले. चहामध्ये दूध कमी दिसल्यावर ज्याप्रमाणे पुलंचा अंतू बर्वा म्हणतो, ''रत्नांग्रीतल्या म्हशी तूर्तास गाभण का रे झम्प्या?" त्याच धर्तीवर रामदादा आजीला म्हणाला, आई (तो तिला आई म्हणूनच हाक मारत असे) आज समुद्राला खूपच भरती आलेली दिसते. आजी मनापासून खळखळून हसली. तसाच एकदा रामदादा आलेला असताना वाडीच्या कामाला येणाऱ्या भागू, गोदी आणि भीमा यांचे बोलणे टेप करून परत त्यांनाच ऐकवले. त्यांना काही कळेनाच की हे काय आहे? आपलाच आवाज ऐकून "आत्ता गो बया" म्हणून हसत सुटल्या.
परंतु गावाला जायचे म्हणजे सगळ्यात मोठा प्रॉब्लेम म्हणजे प्यायचे पाणी कारण ते खूप मचूळ होते. पहिले दोन-तीन दिवस पाणी पिऊच नये असे वाटायचे. माझी बहीण सगळ्या मुलींमधील लहान आणि ती तर पाणी पितच नसे. मग खास तिच्याकरिता जवळच्या वाडीतून पिण्याचे पाणी आणले जायचे आणि दुसऱ्या कोणाला प्यायची परवानगी नव्हती. आता असे पाणी घरात असताना न पिणे हे देखील कठीण; आम्ही अधूनमधून चोरून प्यायचो.
घराच्या पडवीत एक चांगला मोठ्ठा झोपाळा होता. मी लहानपणी त्याच्यावर बसायला खूप घाबरायचो. नंतर मात्र वेळ मिळाला की मुक्काम पोस्ट झोपाळा असे समीकरण झाले. आम्ही सर्व भावंडे रात्री पडवीतच सतरंज्या घालून झोपायचो. एक टेबल फॅन होता आणि तो किती जणांना पुरणार? त्यामुळे सगळ्या बहिणी त्यातल्या त्यात पंख्याच्या जवळ आणि आम्ही सगळे भाऊ कुठेतरी लांब. वारा लागण्याचा संबंधच नसायचा पण आम्हाला गप्पा मारण्याची आवड जास्त. कोणीतरी ओरडून झोपा आता असे सांगेपर्यंत आमची धमाल चालू असायची. मग कधी रामदादा आला की तो भुताच्या गोष्टी सांगून आमची बोबडी वळवायचा. आम्हाला त्याने जवळजवळ पटवून दिले होते की बाजूच्या वाडीत भूत आणि हडळ असे सगळे प्रकार आहेत. उषाताई तर इतकी घाबरट की भर दुपारी त्या वाडीकडे बघायची सुद्धा नाही.
गावात एसटी आली की आम्ही सगळे बघायला धावायचो की आपल्याकडे कोणी आलं का? आता रोज कोण येणार पण त्यात एक मजा होती. या आणि छोट्या छोट्या प्रसंगात आम्ही आनंदी असायचो.

दुपारी जेवणानंतर पत्ते, कॅरम, एकमेकांच्या खोडया काढणे आणि छपाछपी हे खेळ. बदाम सात खेळलो तर आजी पण आमच्यात सामील व्हायची. नंतर पाढे लिहून काढायचे; पावकी, निमकी, पाऊणकी, औटकी. तेव्हा ते अजिबात आवडायचे नाही. मग आजी आम्हाला तोंडी हिशेब विचारायची. त्याचा फायदा कालांतराने लक्षात आला. एकदा दुपार टळली की आम्ही एका माणसाची आतुरतेने वाट बघायचो आणि तो म्हणजे बर्फाचा गोळेवाला. प्रत्येकी किमान 4-5 फस्त करण्याचा आनंद काय वर्णावा? लाल, पिवळी, जांभळी जीभ दाखवत पुढचे एक-दोन तास हंगामा. तिन्हीसांजा झाल्या की श्लोक, रामरक्षा, मारुती स्तोत्र असे सगळे म्हणायची सक्ती असायची.
आणि हो, सगळ्यात मोठा प्रॉब्लेम म्हणजे संडास घरापासून मागे वाडीत. मुंबईत तशी अजिबात सवय नसल्यामुळे सुरुवातीला जायलाच नको वाटायचे. पण न जाऊन सांगतो कोणाला? त्यात परत तो टोपलीचा संडास (आजच्या मुलांना म्हणजे काय तेच कळणार नाही). त्यातून कुणाला रात्री लागली की मग मात्र घाबरगुंडी उडायची. कुठल्यातरी भावाची आर्जवे करायची की सोबतीला वाडीत चल. तो साहजिकच नाखूष असायचा मग उद्या माझ्या वाट्यातील दोन गोळे तुला देईन असे सांगितले की तो यायचा. ज्याला लागलेली असायची तो आत गेला की हा दुसरा एकटाच बाहेर. काळ्याकुट्ट अंधारात हातात फक्त एक कंदील. भीतीने दातखीळ बसायची वेळ. मग आतमधील भावाला अरे चल, लवकर आटप म्हणून तो आत गेल्यापासून हाकाटी चालू व्हायची.
कधी कधी दिवाळीच्या सुट्टीतही जायची वेळ यायची. तेव्हा मे महिण्याएवढे गरम नसायचे त्यामुळे मग आजी म्हणे अरे, बंब लावते, गरम पाण्याने अंघोळ करा. आम्ही त्या बंबाच्या आकर्षणानेच गरम पाणी घ्यायला तयार व्हायचो.
कालांतराने जसेजसे आम्ही मोठे होऊ लागलो आणि एकेक जण मॅट्रिकला गेला तसे आमच्या आवसच्या फेऱ्या कमी होऊ लागल्या. नंतर मग आजीलाही होईनासे झाल्यावर ती मुंबईला जवळजवळ स्थायिक झाली आणि त्यामुळे तर तो बंधच तुटला. आवासचे घर 1926 सालचे आणि जेव्हा 2000 च्या दशकात आमच्या मामांनी घर विकायचे ठरवले तेव्हा त्या घराची 80 वर्षे आम्ही सर्वांनी परत एकदा एकत्र येऊन दणक्यात साजरी केली होती. घराशी जोडलेले सगळे नातेवाईक कौतुकाने आले होते. आज जरी ते घर गोखल्यांचे राहिले नसले तरी आमच्यापैकी कोणीही जवळपास जातो तेव्हा घराचे बाहेरून दर्शन घेऊन येतो.

या आठवणी ना एखाद्या वारुळासारख्या असतात; एक मुंगी बाहेर आली की रांग थांबतच नाही. कधी रम्य भूतकाळाच्या.. कधी मोरपिसी.. सुखद आनंद देणाऱ्या.. कधी अनोख्या विश्वाची सफर घडविणाऱ्या.. तर कधी आयुष्यभर शिदोरीसारख्या पुरून उरणाऱ्या..! मामाचा गावही तसाच..! आठवणीतला.. प्रेमाला ओलावा असणारा ! नात्यांची वीण घट्ट करणारा.. कोणत्याही संस्कार वर्गात न जाता कळत न कळत संस्काराची खाण देणारा.. आणि नेहमीच हवाहवासा वाटणारा..! हा असा निर्व्याज्य प्रेम देणारा मामाचा गाव हरवला याची खंत मात्र वाटते.
पूर्वी आवास म्हणजे अनेक देवळे आणि भरपूर वाड्यांचे गाव. त्याला निसर्गसौन्दर्य असे काही नव्हते. समुद्रकिनारा सुद्धा नाही पण आम्हां भावंडांचा भावनिक बंध त्या घराशी इतका घट्ट होता की जणू आई आणि तिच्या बाळाची नाळ. आजदेखील आम्हा भावंडांना बांधून ठेवणारा तो एक मोठा दुवा आहे. आज आवास म्हणजे श्रीमंतांचे आणि सेलिब्रिटींचे गाव झाले आहे. मोठमोठ्या लोकांचे आलिशान बंगले, छोटी घरगुती रिसॉर्ट्स यांनी सारे व्यापून टाकले आहे. खरं सांगायचं तर आता नीट ओळखताच येत नाही. पण तरी देखील आमची नाळ काही तुटत नाही हेच खरे.
अशा या आजोळच्या हिंदोळ्यावर झुलावेसे वाटते |
त्या बालपणीच्या रम्य आठवणीत रमावेसे वाटते ||

पडवीवरती, ओसरी अंगणात पोरंच पोरं,
कैऱ्या, आंबे, चिंचा आणि आंबटचिंबट बोरं.
मुलींच्या भातुकल्या, सागरगोटे, बाहुल्यांची लग्न,
मुलं मात्र दिवसभर उनाडक्यात मग्न.
उन्हात उनाडणं, चतुर आणि फुलपाखरं पकडणं,
शहाळी, ताडगोळे, जांभळं, करवंद खाणं.
ती कातरवेळ त्या भुतांच्या गोष्टी,
देवाला नमस्कार करून म्हटलेली शुभंकरोती.
मामा-मावश्यांची कौतुकं, आजीचा प्रेमळ हात,
नातवंडांना भरवलेला दहीदूध भात.हृदयात हळव्या आठवणी आणि मनातलं काहूर,
कशाला झालो एवढे मोठे आणि झालो आजोळपासून दूर!
@ यशवंत मराठे
आशाताई भावे आणि जयश्रीताई अभ्यंकर यांच्या यांनी शेअर केलेल्या त्यांच्या आठवणींबद्दल खास आभार..