#MeToo ही चळवळ अमेरिकेत वर्षभरापूर्वी चालू झाली. तेव्हा मला पुढे येणाऱ्या बायकांबद्दल कौतुक वाटलं कारण लोकांसमोर येऊन अशी बाब स्वीकारणं ही खरंच धाडसाची गोष्ट आहे.
गेल्या महिन्यात तनुश्री दत्ता या नटीने नाना पाटेकर विरुद्ध लैंगिक शोषणाची तक्रार केली आणि काय विचारता मिडिया नुसता पेटून उठला. मग एका पाठोपाठ एक नवीन नवीन नावे समोर येऊ लागली आणि आता तर काय त्याची नुसती दलदल होऊ घातली आहे. मला तनुश्री आणि इतर बायकांच्या धाडसाबद्दलही कौतुक आहे कारण ही गोष्ट जगासमोर स्वीकार करणे आणि ते देखील भारतात, ही सोपी घटना नाही.
आपण एका गोष्टीचा विचार करूया - आपल्याला एखादी गोष्ट किंवा हवी ती संधी देणाऱ्या व्यक्तीनं आपल्याकडून काही अपेक्षा केली तर कुणाला आजपर्यंत चुकीचं वाटल्याचं ऐकीवात आहे? काय मागावं हा त्याचा प्रश्न असतो आणि मागणी पुरवावी की नाही हा आपला प्रश्न असतो. एखाद्यानं पैसे मागितले तर आपण त्याला भ्रष्टाचार म्हणतो आणि जे करण्यात आज भारतात कुणालाच गैर वाटत नाही कारण त्याची आज सगळ्यांना सवय झालीये. पण जर त्याच व्यक्तीनं एखाद्या स्त्री कडे तिचे शरीर मागितलं तर? जर समोरच्या व्यक्तीच्या लक्षात आलं की एखाद्या स्त्रीची काम किंवा संधी मिळवण्यासाठी वाट्टेल ती किंमत मोजायची तयारी आहे की मग अशी प्रकरणं घडणे अजिबात कठीण नाही.
ह्याच पार्श्वभूमीवर मला एक गोष्ट कळत नाही की आपले लैंगिक शोषण झाले आहे याची जाणीव इतक्या वर्षांनी कशी काय होते? आपण असे एक गृहीत धरू की काही जणींनी तक्रार करण्याचा प्रयत्न केला पण तो दाबण्यात आला. पण आता इतक्या वर्षांनंतर त्याची मिडिया ट्रायल कशी काय होऊ शकते. तनुश्री पत्रकारांच्या मार्फत पोलिसांना सांगते की नानाची नार्को टेस्ट करा. हा काय प्रकार आहे? तुम्हांला आठवत असेल तर काही वर्षांपूर्वी प्रीती जैन नावाच्या नटीने मधुर भांडारकरच्या विरुद्ध तक्रार केली, काय तर तो म्हणे गेले ४ वर्षे माझ्यावर बलात्कार करतोय. वेडेपणाचा कळस. तिच्या कथेवर एक सिनेमा पण निघाला म्हणे.
आता कोणीतरी एम जे अकबर यांच्यावर २५ वर्षांपूर्वी (१९९३) घडलेल्या घटनेसाठी आरोप केला आहे. याला काय अर्थ आहे? कोण १० वर्षांनी, कोण २५ वर्षांनी आरोप करत सुटल्यात. उद्या ५० वर्षांपूर्वी काहीतरी घडलं होतं म्हणून पण आरोप होतील.
या चित्रपटसृष्टीत, टीव्ही जगतात गेली अनेक वर्षे लैंगिक शोषणाबद्दल कुजबुजले जाते. आपल्याकडे त्याला कास्टिंग काऊच असे गोंडस नाव. मुमताज या नटीचे आत्मचरित्र वाचलेत तर थरकाप उडेल. अगदी स्पॉट बॉय पासून हिरो, प्रोड्युसर, डायरेक्टर पर्यंत सर्वांनी तिचा वापर केला. तिने ते फक्त नावे न घेता लिहिले.
आज अनेक हेरॉईन्सची पडद्यामागे अनेक जणांशी रिलेशनशिप किंवा शरीर संबंध असतात आणि त्याबद्दल माझे काहीच म्हणणे नाही. मी त्यावरून त्यांना बदफैली तर अजिबात म्हणणार नाही कारण तो त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे आणि मी त्याचा आदर करतो.
मी अनेक बायकांच्या तोंडून असे कायम ऐकत आलो आहे की त्यांना एक सहावे इंद्रिय आहे ज्यायोगे पुरुषाची वाईट नजर सुद्धा त्यांना लगेच कळते. मग जर एखाद्या पुरुषाने हात पकडला तर तो झटकून टाकता येत नाही? त्याला तिथल्या तिथे थोबाडून काढावे. कुठल्याही स्त्रिच्या मनाविरुद्ध तिला हात लावायचा कुठल्याही पुरुषाला काहीही हक्क नाही आणि त्याला फटकारलेच पाहिजे पण ते तेव्हांच त्याच वेळेला.
मग असं तर नसेल ना की त्यावेळी त्यांना ग्लॅमरची संधी सोडायची नसते मग भले तडजोड म्हणून असेल पण या नट्या ते करायला तयार होतात. आता हे पुरुषांनी करावं का असा प्रश्न येईल. अजिबात करू नये पण जर करून जर त्याचा कार्यभाग साध्य होत असेल तर तो सुद्धा अशी संधी सोडत नाही. मग तो पुरुष आता २५ वर्षांनी दोषी? हे कुठेतरी पटत नाही.
आपल्या देशात स्त्रियांचं खरं लैंगिक शोषण होत असेल तर या ग्लॅमर जगतापेक्षा गावागावात होतंय. आणि ते याच्यापेक्षा जास्त भयानक आहे. प्रत्येक धर्मातील ठेकेदारांच्या दारी दुसरं काय घडतंय? चर्च मधील कितीतरी फादर लोकांच्या बाबतीत बालसंभोगाच्या (Pedophilia) असंख्य तक्रारी आहेत. नन्स वर बलात्काराच्या घटना घडतायेत. यात हिंदू आणि मुसलमान धर्मगुरु, बाबा काही कमी नाहीत.
काही महिन्यांपूर्वी केरळमधील नन्सच्या बलात्काराची केस झाली. सुरुवातीला तिच्याकडे कोणी बघितलंच नाही. खूपच बोंबाबोंब झाली म्हणून ती मिडियात आली. पण आता त्या बातमीला तनुश्री दत्ताने पार झाकोळून टाकलयं. कारण मिडीयाला टीआरपी पाहिजे; दुसरं काही नको. आज त्या नन्सचे काय झाले आणि तो फादर अटकेत आहे का बेल घेऊन बाहेर आहे याची किती लोकांना माहिती आहे? त्या फादरचं गेल्या आठवड्यात जालंधर शहरात तुफान जोरात स्वागत अशी बातमी तुम्ही वाचली असेलच.
आज कायदा सर्वस्वी बायकांच्या बाजूचा असल्यामुळे या अशा ग्लॅमरने भुकेलेल्यांचे फावलं आहे. मी निर्दोष आहे हे पुरुषाला सिद्ध करायला लागते पण जर एखाद्या बाईने कम्प्लेंट केली तर तो पुरुष गुन्हेगार आहे हे सिद्ध करायची जबाबदारी तिच्यावरही थोडीतरी हवी का नको?
माझ्या मते आज खूप पुरुष घाबरलेले असतील कारण कोण कधी कसला जुना डूख धरून कम्प्लेंट करेल याचा भरवसा नाही आणि मग त्याच्या समाजातील नावाचा पार बोऱ्याच वाजणार. या सगळ्या प्रकारचे दूरगामी परिणाम काही फार चांगले होतील असं मला वाटत नाही. उलट कॉर्पोरेट जगतात स्त्रियांबाबत भेदभाव वाढतील अशी मला भीती वाटते. बायकांना नोकऱ्या देताना लोक दहा वेळा विचार करतील. कालच माझा एक मित्र ज्याची जवळजवळ १००० कोटी उलाढालीची कंपनी आहे तो मला सांगत होता की ज्याच्या बऱ्याच डिपार्टमेंट मधील लोकांनी त्याला ऑलरेडी सांगितलं की शक्यतो आमच्या बरोबर काम करणारी स्त्री नको. हे खूप चुकीचं आहे पण त्यांच्या भीतीला उत्तर काय? दुसरा माझा एक मित्र सरकारी क्षेत्रातील बँकेत मोठ्या पदावर आहे आणि तो देखील मला सांगत होता की आज एखाद्या कामचुकार बाईची बदली करणे पण कठीण झाले आहे. याला काही अर्थ आहे का?
आज कुठल्याही ऑफिसमध्ये स्त्री पुरुष एकत्र काम करताना थोडीशी मस्करी, थोडेसे flirting असतेच आणि ते स्वाभाविक आहे. मला त्यात काही गैर वाटत नाही. एखाद्या बाईला तू सुंदर दिसतेस असे सांगणे हे जर लैंगिक वागणे ठरू लागलं तर कठीण होऊन बसेल. उद्या एखाद्या बाईबरोबर मिटिंग असेल तर बरोबर तिसरा माणूस घ्यावा लागेल अशी परिस्थिती येईल. बरं कोणी काही कम्प्लेंट केली तर कंपनी लगेच त्या माणसाला काढून टाकणार. असे होऊ शकते म्हणून मग काय त्याने शरीरावर कुठेतरी कायमचा कॅमेरा लावून ठेवायचा की काय?
जगात सर्वच क्षेत्रात घाणेरडी लोक आहेत जे असले अश्लील प्रकार करायला कायमच तयार असतात पण तसेच बहुतांश लोक चांगले असतात. पण आज या भीतीने त्यांचा बरोबरीच्या स्त्री कलिग्सशी संपर्कच तुटण्याचा धोका आहे. मग काय उद्या पुरुष आणि स्त्रिया यांच्यामध्ये काय भिंत उभी करायची का?
मराठीत एक म्हण आहे की सुक्याबरोबर ओलंही जळतं त्याचे आज प्रत्यंतर मिळतंय.
हे सगळं विचित्र आहे आणि कुठेतरी याचा विचार व्हायला हवा, कायद्यात बदल करावा लागेल, मिडिया ट्रायल तर नक्कीच टाळल्या गेल्या पाहिजेत आणि तक्रार करायला काही वेळ मर्यादा असावी का याचाही विचार व्हायला हवा असं मला वाटतं. नाहीतर मग जोपर्यंत फायदा मिळतोय तोपर्यंत गप्प आणि तो मिळणं बंद झालं की लैंगिक शोषणाची तक्रार. जे दोषी असतील त्यांना शिक्षा व्हायलाच हवी पण आजच्या एकतर्फी कायद्याचा बडगा सुधारला गेला पाहिजे अन्यथा आपल्या समाजाची घडीच बिघडून जाईल.
यशवंत मराठे
#metoo #NanaPatekar #TanushreeDutta