म्हातारपणी कुठे?

माझी दोन्ही मुलं परदेशी स्थायिक असल्यामुळे मनात आलेले विचार मांडावे असं वाटलं. यात कोणाला काही सल्ले देण्याचा हेतू नाही. प्रत्येक व्यक्तीची गोष्ट आणि व्यथा वेगवेगळी असते परंतु कायम परदेशात रहायची वेळ आली तर काय? या संबंधी विचारांचं वादळ उठलं.

 

पण हो, हे जगातील प्रगत देशांबद्दल, म्हणजे प्रामुख्याने अमेरिका, कॅनडा, पश्चिम युरोप, बद्दल मी बोलतोय. 

 

मुलं परदेशी स्थायिक झाली यात त्यांना दोष देण्याचा प्रश्नच येत नाही. त्यांच्या करियरच्या दृष्टीने तो निर्णय बरोबरच आहे. एकदा मी माझ्या एका अमेरिकेत स्थायिक झालेल्या मित्राला विचारलं होतं की तू भारतातून अमेरिकेत कायमस्वरूपी स्थायिक होण्याचा निर्णय का घेतलास? तेव्हा त्याचं उत्तर होतं "भेदभाव सगळीकडे होतो, प्रश्न सगळ्यांचे काही सारखे तर काही वेगवेगळे आहेत पण अमेरिकेत सिस्टम सुधारण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला जातो आणि इथे माणसांना किड्या मुंग्यांसारखं ट्रिट केलं जात नाही."

 

हे नक्कीच खरं आहे. शिक्षणासाठी गेलेली मुलं तिथेच स्थायिक होतात त्याचे हे प्रमुख कारण असेल कदाचित. आणि त्यांच्या पुढची पिढी, ज्यांचा जन्मच जर परदेशी झाला असेल, काय करेल? खरं सांगायचं तर भारतातील जाती भेद आणि तेढ लक्षात घेता त्यांनी इथे येऊच नये अशा मताचा मी आहे. त्याला ब्रेन ड्रेन म्हणा हवं तर पण दुर्दैवाने मला तरी दुसरा पर्याय दिसत नाही.

 

परंतु भारतात राहणाऱ्या त्यांच्या आई वडिलांनी, ज्यांचं बरंचसं आयुष्य भारतातच गेले असेल, काय करावं हा स्वाभाविक प्रश्न असतो. सर्वसाधारणपणे "म्हातारपणी मुलं जवळ असावीत" असा विचार केला जातो त्यामुळे ती जर परदेशी असतील तर मुलांकडे जाऊन रहावं असा एका मतप्रवाह दिसून येतो. "एखादे गृहस्थ अमेरिकेत असतात सध्या त्यांच्या मुलीकडे अथवा मुलाकडे" असे पूर्वी भारतात ऐकलं की ऐकणाऱ्या भारतीयाला, ते गृहस्थ मरण्यापूर्वीच जणू स्वर्गात गेलेत असा फील यायचा. 

 

एक जमाना होता की मुंबई ते पुणे एवढ्या अंतरासाठी कधी कधी दहा तास लागायचे, जे आज सुद्धा कधी कधी लागू शकतात. पाऊस पडला की अख्ख्या मुंबईत खड्डे पडायचे; जे अजूनही पडतात. मुंबई गोवा महामार्गाची दुर्दशा वर्षानुवर्षे तशीच आहे. भारतात धुळीने भरलेले रस्ते आहेत, किचाट आहे, गर्दी आहे, घाणेरड्या सवयी असलेले लोक आहेत. आणि जुन्या काळात या दुर्व्यवस्थेमुळे तरुणांना काय पण म्हाताऱ्यांना देखील भारत नकोसा वाटायचा. 

 

पण आता असं खरंच राहिलंय का? नाही तसं... भारत बदललाय आणि बदलतोय.

 

म्हातारा माणूस म्हणून लागणाऱ्या आणि भारतात असणाऱ्या सुविधांचा आपण विचार करूया. 

 

एक्सप्रेस वे आले, परदेशी गाड्या आल्या. Super speciality hospitals आली. ओला, उबर, झोमॅटो, स्विगी, डंझो, ऍमेझॉन, झेप्टो, जीपे, अर्बन कंपनी वगैरेनी भारताचा स्वर्ग बनवला आहे. बटन दाबलं की काही क्षणात तुम्हाला आपण श्रीमंत असल्याचा भास होतो. वस्तू नाही आवडली की परत घ्यायला दारात हजर.

 

परदेशी Door delivery असली तरी फार महाग असते. फर्नीचर स्वतः assemble करावं लागतं. शिवाय वस्तू परत करायची असेल तर गाडी काढून एका विशिष्ट पत्यावर वस्तू देऊन यावी लागते. तुमची गाडी तुम्हालाच धुवावी लागते, कपड्यांना इस्त्री स्वतःच करावी लागते, घराची साफसफाई, स्वैपाकानंतरची भांडी तुम्हालाच घासावी लागतात. अगदी एक कप चहा सुद्धा आयता मिळत नाही. तरूणपणी हे ठीक असतं पण म्हातारपणी ही सगळी कामे करणे शक्य होईल का? आपण तरूणपणी काम करतो कारण म्हातारपणी आराम करता यावा म्हणून. मग आता म्हातारपणी सुद्धा फक्त कामच करायचं का? 

 

साधारणपणे ८०% भारतात ३६५ दिवसांपैकी ३५० दिवस तरी हवा उबदार असते. बाहेर जाण्यासाठी कोणतीही नैसर्गिक अडचण नसते. Occasional driver मागवून, किंवा ओला, उबर, रिक्षा वगैरेने सहज प्रवास करता येतो. परदेशात हीच गोष्ट dependency निर्माण करते. बऱ्याच ठिकाणी (खास करून अमेरिकेत) public transport नसतोच. मग घरात अडकून राहिल्यासारखं वाटू शकतं. प्रचंड थंडी असल्यामुळे घरात कपड्यांचा एक लेयर, घराबाहेर पडताना चार लेयर, परत गाडीत दोन लेयर आणि उतरताना चार लेयर असे सोपस्कार करत बसावं लागत. तरूणपणी याची चटकन सवय होते, पण म्हातारपणी movement स्लो होतात. आणि त्याचा त्रास होतो. थंडीचे सहा महिने बाहेर वॉक वगैरे करता येत नाही. घरात सोय नसेल तर शरीराला चालतं ठेवण्यासाठी असलेला किमान व्यायाम कसा करणार?

 

पूर्वी श्रीमंत मंडळी उपचारासाठी इंग्लंड अथवा अमेरिकेत जात असत किंवा बहुदा जावंच लागायचं.

 

आज भारतात X ray, sonography वगैरे OPD सुविधा सहज accessible असतात. पुन्हा त्याचे result normal असतील तर ते लगेच कळतं. "सगळं काही नॉर्मल आहे" असं तो technician च आपल्याला सांगतो आणि रिपोर्ट हातात ठेवतो. परदेशात specialist च्या उरावर डॉलर घालून तुम्हाला तुम्ही नॉर्मल असल्याचं ऐकावं लागतं. भारतात दर वर्षी माफक दरात Full check up करता येतो. त्याच्या उलट तिथे नुसती दाढ भरायला कमीत कमी हजार डॉलर खर्च येतो. यावरून इतर रोगांचा अंदाज करा. त्यामुळे हल्ली बरेच लोकं, अगदी परदेशी नागरिक सुद्धा, वैद्यकीय सेवेसाठी भारतात येतात ज्याला medical tourism म्हणून संबोधले जाते.

 

पाश्चात्य देशात फ्री मेडिकल सिस्टीम आहे पण तिथल्या सिस्टीम आणि रहिवाशांनी ती abuse केल्यामुळे निकृष्ठ होत चालली आहे. साठीनंतर अशी बरीच औषधं जी OTC नसली तरी भारतात ती फार्मसीमधे ओळखीवर मिळतात. भारतात पुन्हा त्याच निदानासाठी आणि prescription साठी स्पेशालिस्टच्या उरावर शेकडो डॉलर घालावे लागत नाही. त्यामुळे जीवन सुसह्य होतं. कधी कधी आपल्यालाच माहीत असतं की आपल्याला विशेष काही झालेलं नाही. काही औषध केमिस्टकडून आणून पटकन बरं होता येतं. याउलट पाश्चिमात्य देशात तुम्हाला तडफडत रहावं लागतं. तिथे Prescription शिवाय औषधं मिळत नाहीत. Appointment शिवाय डॉक्टर भेटत नाही; Appointment लगेच मिळत नाही आणि अगदी मरायला टेकल्याशिवाय emergency मधे घेत नाहीत. औषधं तर प्रचंड महाग अगदी एक डॉलर म्हणजे एक रुपया समजलात तरी. 

 

म्हातारपणी तर स्पेशल assistance साठी किती डॉलर मोजायचे याची मोजदाद करणे कठीण. परावलंबी झालो तर भारतात माणूस ठेवणं जास्त स्वस्त नाही का?  

 

भारतात मनुष्यबळ सहज उपलब्ध आहे. एकटं असणाऱ्या म्हाताऱ्यांसाठी वेगवेगळे फूड options आहेत. स्वैपाकाला माणूस ठेवण्यापासून डबा आणण्यापर्यंत सोयी आहेत. एखाद्या बाईला जरी स्वैपाकाची खूप आवड असली, तरी कधीतरी आयतं जेवायला मिळावं असं वाटतं. अमेरिकेत ते कसं करणार? घरगुती अन्न आणायचं तरी स्वतः गाडी काढून घ्यायला जावं लागतं. 

 

परदेशी कोणी कितीही उच्च पदस्थ म्हणून रिटायर झाला तरी उर्वरीत आयुष्य काढायचं असेल तर नोकरी ही करावीच लागते. साठवलेल्या डबोल्यावर फार वर्षे काढता येत नाहीत. परदेशातील बहुसंख्य देशात आता retirement age ६७ ते ६९ आहे. मला वाटतं हा एक अमानुष प्रकार आहे. नोकरीमुळे माणसाला जीवनात मोकळा वेळ मिळालेला नसतो. जो रिटायरमेंट नंतर मिळतो. काही माणसं मुश्किलीने सत्तरी गाठतात आणि लुडकतात, मग या लोकानी काय नोकरी करता करताच देह ठेवायचा का ?

 

पश्चिमी देशात पाचशे घरं असलेल्या कम्युनिटींमधे सुद्धा चिटपाखरू रस्त्यावर दिसत नाही. आज एखादे आजोबा तिथे नातवाला अथवा नातीला खिडकीत उभं करून चालणारी पमपम दाखवू शकत नाही, पक्षी दाखवू शकत नाही, अर्ध्या तासाने एक गाडी येते. एखादा पक्षी दिसतो. अशा ठिकाणी म्हातारा माणूस बोअर होणार नाही का? 

 

सर्वसाधारणपणे पूर्वी खूप अबोल असलेले आजोबा, सत्तरीनंतर खूप बोलू लागतात. त्यांच्या तरूणपणच्या खूप गोष्टी त्यांना परत परत सांगायला आवडतात. पण परदेशात म्हाताऱ्यांना श्रोता कोण? अनेक दशके असलेला मित्र परिवार आणि सोशल सर्कल सहजी मोडून असे विस्थापित होणे खरंच शक्य आहे? आणि हो, नातवंडांचे आकर्षण जरूर असते परंतु ती नातवंडे ५-६ वर्षांची होईपर्यंत सगळी गंमत आणि मजा. नंतर ते एकदा का त्यांच्या विश्वात गेले की त्यांचा आजी आजोबांशी बोलण्यात अथवा खेळण्यात इंटरेस्ट राहील हा भाबडा आशावाद आहे कारण तशी अपेक्षाच चुकीची आहे.

 

आणि म्हणून केवळ मुलं जवळ असावीत म्हणून हा एकटेपणा सहन करायचा का?

 

सगळ्यात मोठा मानसिक घोळ असा की जर का माझे काही बरेवाईट झाले तर माझा मुलगा अथवा मुलगी जवळ असेल. आता नवरा बायको मधील एक व्यक्ती जाणार आणि दुसरी एकटी मागे राहणार मग तेव्हा काय असा प्रश्न उभा राहतो. माझ्या मते ज्यांना पैशाचा प्रॉब्लेम नसेल त्यांनी माणसं ठेऊन स्वतःला सांभाळावे. आणि जेव्हा ते ही अशक्य होईल तेव्हा शांतपणे वृद्धाश्रमात जाऊन राहावं. निदान आपल्या समवयस्क व्यक्तींबरोबर राहण्याचे सुख मिळेल. आणि मुख्य म्हणजे मुलांना कसलेही emotional blackmail न करता शांतपणे डोळे मिटावे.

 

बघा विचार करा.

 

@ यशवंत मराठे

yeshwant.marathe@gmail.com

Leave a comment



सुधीर जोगळेकर

4 weeks ago

दोघांपैकी कुणा एकाचे बरेवाईट होण्याचानकारी सूर तुझ्या लेखनात कधीच पाहिला नव्हता.. पण तू म्हणतोस तेच खरं, तीन/ चार महिने राहून मग भारतात मित्रमंडळींबरोबर आणि मुलांव्यतिरिक्तच्या आप्तांच्या काढणं कधीही चांगलंच रे..

सुधीर जोगळेकर

4 weeks ago

दोघांपैकी कुणा एकाचे बरेवाईट होण्याचानकारी सूर तुझ्या लेखनात कधीच पाहिला नव्हता.. पण तू म्हणतोस तेच खरं, तीन/ चार महिने राहून मग भारतात मित्रमंडळींबरोबर आणि मुलांव्यतिरिक्तच्या आप्तांच्या सान्निध्यात काढणं कधीही चांगलंच रे..

Nitin Nadkarni

4 weeks ago

Absolutely agree. I would prefer that I die in my own bed in my own home. I don’t expect my son to be there while I am dying. After I die, it is really immaterial to me whether my son cremates me or some social worker does!

प्रकाश लवेकर

4 weeks ago

माझ्या ओळखीचे बडोद्या जवळचे म्हातारे पटेल ,अख्ख कुटुंब अमेरिकेत. कंटाळून परत बडोद्याला .
गावातील शेतकऱ्यांना एकत्र करून शेती सहकार पद्धतीने सुरू केली आणि चांगली प्रगती केली.
असे काही केले तर अधिक सकारात्मक जगता येईल.

Pushkaraj Chavan

4 weeks ago

गड्या आपुला गाव बरा हे वाक्य आपसुक सुचेल असा हा लेख आहे. म्हातारपणी परदेशाची स्वप्न पहाणाऱ्याना वास्तवात आणायचे काम या लेखाने व्हावे. तरुणपणी परदेशात राहून म्हातारपणासाठी डबोलं साठवून आपल्या देशात यावं आणि दोन नोकर ठेऊन निसर्गरम्य ठिकाणी उर्वरीत आयुष्य कंठावं हे योग्य वाटतं. लेख छान आहे.

Jitendra Chitre

2 weeks ago

सुंदर आणि स्पष्ट लिखाण !!❤️

Shriram Keshav Bapat

4 weeks ago

फारच छान लेख. अगदी मुले परदेशी असणाऱ्या समस्त पालकांचा representative म्हणता येईल असा. सर्व बाबींचा व्यवस्थित आढावा तौलनिक दृष्ट्या घेतला आहे. त्यातल्या त्यात खुसपट काढायचेच झाले तर असे म्हणता येईल की यात physical सुखसोयींची तुलना जास्त आहे.मुळात गरजा कमी असणार्या माणसांना मानसिक आधार-संवाद यांची सुध्दा मोठी गरज असते. तिचाही उहापोह थोडा आधिक हवा होता.

Prashant Naik

4 weeks ago

खूप दिवसांनी एक विचार करायला लावणारा लेख वाचायला मिळाला.
फार गहन विचार अतिशय सोप्या भाषेत मांडला आहेस.

Dhananjay Patwardhan

4 weeks ago

Well worded and eye opener

सुजाता देशपांडे

4 weeks ago

मला पूर्णपणे पटणारे विचार मांडले आहेत. पण कित्येक लोकांना जे जे भारतीय ते ते क्षुद्र आणि पाश्चिमात्य सगळं उत्तम असं वाटतं! किती चुकीचं आहे ते! शेकडो वर्षांच्या गुलाम मानसिकतेचा परिणाम आहे हा. बदलेल हळूहळू अशी आशा करूया.

Sucheta Kiran Kashikar

4 weeks ago

Really loved the realistic article written in a crisp manner.

संग्राम वसंतराव यादव सोळस्कर

4 weeks ago

गड्या आपला गाव बरा वर्षा मध्ये तिन ऋतू अनूभव पारावरच्या गप्पा आणि गप्पांमध्ये आपल्या भूतकाळातल्या आठवणी लहान पणीच्या आठवणी शिदोरी आपल्या गावच्या पारावर मिळतात यांसारखा स्वर्गीय आनंद तो कोणता गड्या आपला गाव बरा

साधना साठये

4 weeks ago

मी पण तुझ्या सारख्या मताची आहे. समवयस्क मित्र मैत्रिणींबरोबर राहणं सगळ्यात श्रेयस्कर. आपापले छंद जोपासता येणं ह्या सारखा आनंद नाही. प्रत्येक व्यक्ती आपापल्या विश्वात आनंदात राहू शकते. उगीच मुलांवरोबर राहण्यासाठी तगमग नको वाटते.

कमलाकांत ताम्हाणे

4 weeks ago

अतिशय परखड व वस्तुनिष्ठ विचार मांडले आहेत. पण परदेशस्थ मुलांना हे पटत नाही .व अट्टाहासाने आई वडिलांना ग्रीन कार्ड वा सिटिझनशिप घेण्यास प्रवृत्त करतात. त्यांच्या दृष्टिकोनातून हे योग्य असले तरी व्यावहारिक पातळीवर त्रासदायक ठरू शकते

Rajiv Dandekar

3 weeks ago

यशवंत फार छान लेख आहे. माझ्या नशिबाने? आम्ही दोघं., दोन मुलं, सुना आणि नातवंडे असं एकत्र कुटुंब आहे. त्याचे फायदे तोटे असू शकतात. पण आम्ही नक्की फायद्यात आहोत.

Contact Form

subscribe

Thank you for subscribing.

Something went wrong.

Contact Info

  • yeshwant.marathe@gmail.com

Follow Me

My Other Blogs: historycafe.in

Copyright © 2020 Sarmisal.

Made with ♡ by iTGS