अमावास्येच्या काळ्या रात्री चांदण्यांनी खच्चून भरलेले आकाश म्हणजे स्वर्गीय सौन्दर्याचा खजिनाच परंतु मुंबईकरांच्या वाट्याला हे भाग्य येत नाही. त्यांना पडद्यावरच्याच चांदण्या बघून समाधान मिळवावे लागते.
या असंख्य चांदण्यांपैकी चंद्राच्या आकाशस्थ मार्गावरील तारका समूहांना नक्षत्रे म्हणतात; असे २७ तारका समूह किंवा नक्षत्रे आहेत. आकाशात ठळकपणे चमकणाऱ्या तारका या सौन्दर्याचे प्रतिक आहेत आणि म्हणूनच पडद्यावरील चमकणाऱ्या नट्यांना सिनेतारका म्हणत असावेत. नक्षत्रांच्या २७ नावांपैकी काही नक्षत्रांची नावे मुलींना ठेऊन आपण त्यांच्या सौन्दर्याची ग्वाही देत असतो.
भारतीय ज्योतिषशास्त्रात नक्षत्रांना खूप महत्व आहे. ज्योतिषशास्त्राच्या संदर्भात नक्षत्रांचा जेव्हा उल्लेख होतो तेव्हां तो चंद्राच्या नक्षत्राचा असतो. चंद्र २७.३ दिवसात पृथ्वी भोवतीची एक प्रदक्षिणा पूर्ण करतो म्हणजेच साधारणपणे प्रत्येक दिवशी चंद्र एका नवीन नक्षत्रात असतो म्हणून चंद्राला २७ बायका आहेत अशी कल्पना करून तो प्रत्येक दिवशी एका पत्नीच्या घरी जातो असे समजण्यात येते (च्यायला, काय मजा आहे चंद्राची!) परंतु चंद्र हुशार आहे. सर्व बायकांना एकाच घरी ठेवण्याची घोडचूक न करता सर्वांना स्वतंत्र घरे देऊन हा पाहुण्यासारखा रहातो. असो. ज्योतिषशास्त्राने नक्षत्रांची विभागणी वेगवेगळ्या ४ प्रकारात केली आहे.
पहिली विभागणी गणांनुसार केली आहे म्हणजे देवगण, मनुष्यगण आणि राक्षस गण.
१. देवगणी नक्षत्रे: अश्विनी, मृग, पुनर्वसू, पुष्य, हस्त, स्वाती, अनुराधा, श्रवण आणि रेवती
२. मनुष्यगणी नक्षत्रे: भरणी, रोहिणी, आर्द्रा, पूर्वा, उत्तरा, पूर्वाषाढा, उत्तराषाढा, पूर्वा भाद्रपदा आणि उत्तरा भाद्रपदा
३. राक्षसगणी नक्षत्रे: कृत्तिका, आश्लेषा, मघा, चित्रा, विशाखा, जेष्ठा, मूळ, धनिष्ठा आणि शततारका
हे जे गण आहेत ते माणसाच्या स्वभावानुसार आहेत; म्हणजे देवगण - सत्वगुणी, मनुष्यगण - रजोगुणी आणि राक्षसगण - तमोगुणी. प्रत्येक मनुष्य हा त्रिगुणात्मकच असतो परंतु या तीन गुणांपैकी एका गुणाचे त्यात प्राबल्य असते त्यावरून माणसाचे गण ठरविण्यात आले असावेत.
नक्षत्रांची दुसरी विभागणी मुखानुसार केली आहे.
ऊर्ध्वमुखी: रोहिणी, आर्द्रा, पुष्य, उत्तरा, उत्तराषाढा, श्रवण, धनिष्ठा आणि शततारका
घर बंधने, शुभ कार्याची सुरुवात करणे अशी जमिनीच्या वरती करावयाची कामे जेव्हां चंद्र ऊर्ध्वमुखी नक्षत्रात असेल त्या दिवशी करावीत असा मुहूर्तशास्त्राचा संकेत आहे.
अधोमुखी: भरणी, कृत्तिका, आश्लेषा, मघा, पूर्वा, विशाखा, मूळ, पूर्वाषाढा आणि पूर्वा भाद्रपदा
विहीर खणणे, खड्डा करून नवीन झाडे लावणे, पाया खणणे वगैरे जमिनीखाली करायची कामे चंद्र अधोमुखी नक्षत्रात असणाऱ्या दिवशी करावी असे मुहूर्तशास्त्र सांगते.
तिर्यंगमुखी: अश्विनी, मृग, पुनर्वसू, हस्त, चित्रा, स्वाती, अनुराधा, जेष्ठा आणि रेवती
प्रवास, वाहन खरेदी किंवा वस्तूंची खरेदी या कामांसाठी वरील नक्षत्रे योग्य असतात (सर्व पुरुषांनी या नक्षत्रांवर सावध रहावे हे सांगण्याची गरज नाही)
नक्षत्रांची तिसरी विभागणी लोचनांनुसार केलेली आहे. या विभागात सर्व नक्षत्रे येत नाहीत. काही विशिष्ट नक्षत्रेच या विभागात येतात.
नक्षत्रांची चौथी विभागणी स्थिर आणि चर (चल) अशी केलेली आहे. स्थिर नक्षत्रात रोहिणी, उत्तरा, उत्तराषाढा आणि उत्तरा भाद्रपदा येतात आणि वास्तुशांत, दुकानाचे उदघाटन, धंद्याची सुरुवात यांना ही नक्षत्रे योग्य. चल नक्षत्रात पुनर्वसू, स्वाती, श्रवण, धनिष्ठा, आणि शततारका येतात आणि ही नक्षत्रे वाहन खरेदी व प्रवास अशा चल कामांसाठी योग्य.
दैनंदिन जीवनात नक्षत्रांचा कसा उपयोग करून घ्यायचा याचे सुद्धा मार्गदर्शन आपले ज्योतिषशास्त्र करते. आपला जन्म ज्या नक्षत्रावर होतो ते जन्मनक्षत्र, ते ज्या दिवशी आहे तो दिवस आणि त्यानंतर येणाऱ्या आठ दिवसांना म्हणजे नक्षत्रांना (चंद्र प्रत्येक दिवशी एक नक्षत्र ओलांडतो म्हणून) आठ मार्गदर्शक संज्ञा आहेत की ज्यावरून कोणत्या दिवशी कोणते काम केल्यास यशस्वी होईल याचा अंदाज घेता येतो. त्याचे कोष्टक पुढीलप्रमाणे: दिवस मोजण्याची सुरुवात आपल्या जन्मनक्षत्राच्या दिवसापासून करायची असते. हा नऊ संज्ञांचा सेट (set) आहे आणि जो दर ९ दिवसांनी तो पुन्हा येतो (repeat होतो); असे २७ दिवसात तीन वेळा होते.
१. जन्मनक्षत्र: तुमच्यासाठी सर्वात उत्तम दिवस. नवीन कामांच्या प्रारंभासाठी योग्य दिवस
२. संपत योग: जन्मनक्षत्राच्या नंतरचे २ रे, ११ वे व २० वे - संपत्तीची कामे करण्यासाठी योग्य दिवस
३. विपत योग: जन्मनक्षत्राच्या नंतरचे ३ रे, १२ वे व २१ वे - संकटापासून सावध राहण्याचा दिवस, अशुभ
४. क्षेम योग: जन्मनक्षत्राच्या नंतरचे ४ थे, १३ वे व २२ वे - क्षेम योगाचा सर्वसाधारण दिवस
५. प्रत्यर योग: जन्मनक्षत्राच्या नंतरचे ५ वे, १४ वे व २३ वे - अत्यंत अशुभ दिवस
६. साधक योग: जन्मनक्षत्राच्या नंतरचे ६ वे, १५ वे व २४ वे - बोलणी, वाटाघाटी यासाठी चांगला दिवस
७. वध योग: जन्मनक्षत्राच्या नंतरचे ७ वे, १६ वे व २५ वे - प्रवास अथवा वाद टाळणे, अत्यंत अशुभ
८. मैत्र योग: जन्मनक्षत्राच्या नंतरचे ८ वे, १७ वे २६ वे - मित्रांच्या मदतीने कामे होतात, शुभकारक
९. परममैत्र योग: जन्मनक्षत्राच्या नंतरचे ९ वे, १८ वे व २७ वे - अत्यंत शुभकारक दिवस
या कोष्टकाचा प्रत्यक्ष उपयोग कसा करावयाचा ते बघू या - समजा तुमचे जन्म नक्षत्र रोहिणी आहे. आज पंचागात किंवा कॅलेंडर (कालनिर्णय) मध्ये नक्षत्राचा उल्लेख असतो. जर आज जेष्ठा नक्षत्र दाखवत असेल तर ते तुमच्या जन्मनक्षत्राच्या नंतरचे १५ वे नक्षत्र आहे. त्यामुळे तुमच्या लक्षात येईल की आज साधक योग आहे आणि त्यानुसार तुम्ही तुमच्या कामाची आखणी करू शकता. यासाठी अट एकच आणि ती म्हणजे तुम्हांला नक्षत्रांची नावे तोंडपाठ हवीत.
म्हणजे जर मोजले तर लक्षात येईल की साधारणपणे ४ दिवस शुभ, ३ दिवस अशुभ आणि २ दिवस साधारण पण याचा अर्थ या प्रत्येक दिवशी तसे घडत नसते. अशुभ म्हणजे मृत्यू किंवा अपघात असेच काही नाही. कटकटीचा दिवस असू शकतो. तसेच शुभ म्हणजे काही सगळं बेस्ट बेस्ट नाही.
वरील सर्व गोष्टींवर किती विश्वास ठेवायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. आजच्या वेळेने घट्ट आवळलेल्या जगात कामाची वरील योगाप्रमाणे आखणी करणे सुद्धा कठीण आहे. परंतु आपण सर्व भारतीय कोणताही प्रयोग न करता किंवा पडताळा न पाहता विश्वास तरी ठेवतो किंवा त्याला थोतांड मानतो. हे करण्यामागे कसलाही शास्त्रीय, अनुभवजन्य पुरावा अथवा आधार नसतो. हल्ली, आपल्याकडील जुन्या चालीरिती, जुने समज, आडाखे याविषयी सरसकट अविश्वास दाखविणे, तुच्छ लेखणे म्हणजेच शास्त्रीय दृष्टी असणे अथवा पुरोगामी असणे मानले जाते. वरती नक्षत्रांविषयी जी माहिती दिली आहे त्याचा उपयोग करून या माहितीचा सत्य असत्येचा आढावा घेणे बिनखर्चिक आणि सहज शक्य आहे. हा प्रयोग थोड्याफार प्रमाणात आम्ही करून पडताळून बघितला आहे. आज कोणता योग होता, आणि त्याप्रमाणे प्लॅनिंग न करता देखील आजचा दिवस कसा गेला ह्याची काही महिने नोंद ठेवून पडताळणे अशक्य नाही परंतु ते न करता आमचे पूर्वज कसे मूर्ख होते हे म्हणण्यात आम्हाला धन्यता वाटते. परंतु परकीय शास्त्रज्ञांनी प्रयोग करून एखाद्या गोष्टीत सत्यता आहे असे म्हटले की आम्ही आमच्या पूर्वजांची तोंड फाटेपर्यंत स्तुती करणार. आमचा प्रश्न असा आहे की आपण काय करणार? नुसतेच बोलणार का प्रयोग करणार? असो, मूळ विषयाकडे वळूया.
आपल्या पूर्वजांनी प्रत्येक नक्षत्रासाठी २७ वनस्पती किंवा वृक्ष यांची योजना केली आहे. त्यामागची संकल्पना अशी की आपले जे जन्म नक्षत्र असेल त्या नक्षत्राचा वृक्ष आपल्या घरी लावावा आणि आराध्य वृक्ष म्हणून त्याची पूजा करावी म्हणजे निगा राखावी. उदा. भरणी नक्षत्र - आवळा वृक्ष. याचा मुख्य हेतू असा असावा की घरात जेवढी माणसे असतील तेवढे वृक्ष लावले जातील आणि जगवले जातील. "झाडे लावा, झाडे जगवा" अशा पाट्या घेऊन आणि नुसतेच मोर्चे काढून काही होत नसते.
वनस्पतीशास्त्र आणि औषधनिर्माण शास्त्र (pharmacology) या विषयात डॉक्टरेट मिळवलेल्या प्रख्यात शास्त्रज्ञ शरदिनी डहाणूकर यांना जिज्ञासा निर्माण झाली की नक्षत्र वृक्ष कसे ठरवले गेले? याला काही शास्त्रीय आधार आहे का? त्याचा शोध घेताना त्यांना आढळून आले की ज्योतिषशास्त्राप्रमाणे अमुक एका नक्षत्रावर जन्मलेल्या व्यक्तीला काही ठराविक आजार होण्याची शक्यता असते. हे कळल्यावर त्यांनी नक्षत्रवृक्ष आणि हे आजार यांचा काही संबंध आहे का? असा शोध घेतला तेव्हां त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. त्यांना असे आढळून आले की ह्या आजारांवर त्या वृक्षाचा कोणता तरी भाग हा औषध म्हणून वापरता येतो. (अधिक माहितीसाठी जिज्ञासूंनी त्यांचे "नक्षत्रवृक्ष" हे पुस्तक वाचावे) म्हणजेच औषध तुमच्या दारी अशी अप्रतिम व्यवस्था आपल्या पूर्वजांनी करून होती.
प्रत्येक नक्षत्राचे चार चरण म्हणजे चार भाग असतात. पंचांगात एक अवकहडा चक्र दिलेले असते. त्या चक्रात नक्षत्राच्या प्रत्येक चरणासाठी एक अक्षर असते. उदा. मघा नक्षत्राच्या चार चरणांची चार अक्षरे आहेत - मं, शु, बु, आणि चं. पूर्वी आपल्याकडे अशीही प्रथा होती की नवीन जन्मलेल्या मुलाचे नाव ठेवण्याच्या वेळी नक्षत्रांवरून काय अक्षरे येतात हे गावातील जोशी / भटजी यांना विचारले जायचे. ही मंडळी जन्मवेळ पाहून, नक्षत्र काढून, अवकहडा चक्रावरून नावाची आद्याक्षरे सांगत आणि त्याला अनुसरून मुलाचे नाव ठेवले जायचे, पण असे का? या प्रश्नाचा विचार करताना एका अद्भूत व्यवस्थेचा शोध लागला.
पूर्वी आयुर्वेदाबरोबर वैद्याला ज्योतिष सुद्धा शिकवले जात असे त्यामुळे तुमचे नाव सांगितले की वैद्याला कळत असे की, तुमचे नक्षत्र कोणते, ते कळल्यावर मग संभाव्य आजारांचा अंदाज येतो. तसेच नक्षत्रावरून तुमचा गण पण लक्षात येणार; त्यावरून तुमचा सर्वसाधारण स्वभाव कसा असू शकतो याची कल्पना येऊ शकते. त्यामुळे मग वैद्याला तुम्हाला औषध देणे सुलभ होणार आणि नक्षत्राचा वृक्ष तुमच्या दारी असणारच. त्यामुळे तुम्ही नाव सांगितले की तुमची पूर्ण कुंडली (औषधाच्या संदर्भात) वैद्याच्या डोक्यात तयार. आता अशी घडी बसविणारे आपले पूर्वज शास्त्रीय नव्हते असे म्हणणे किती धाडसाचे होईल याचा विचार करा.
पुढील उदाहरण नक्षत्रांच्या संदर्भातील जरी नसले तरी आपल्या पूर्वजांच्या हुशारीचा दाखला म्हणून ते देण्याचा मोह न आवरल्याने देत आहोत.
शंकराचे देवस्थान आणि तळे यांचे अतूट नाते जोडून प्रत्येक गावात स्वच्छ पिण्याच्या पाण्याची कायमची व्यवस्था आपल्या पूर्वजांनी लावून दिली. तळे, शंकराला अभिषेक करण्याच्या पाण्याचे असल्याने कोणीही ते पाणी खराब करत नसे. कोणताही कायदा न करता अपप्रवृतींना पायबंद घालण्याचा किती छान उपाय. तीच गोष्ट देवाकरिता सोडलेल्या जंगलाची. त्यांना "देवराई" म्हणत. हे एका तऱ्हेचे संरक्षित जंगल. आज सुद्धा अशा अनेक देवराया फॉरेस्टर, वनरक्षक नसताना टिकून आहेत आणि जैवविविधता (biodiversity) राखून आहेत. आमच्या मते देवाचा इतका सुंदर उपयोग कोणी केला नसेल. आपण आपल्या चालीरिती मागील शास्त्रीय भाग समजून घेण्यास तयारच नाही. देव शब्द उच्चारला की, त्यावर आपण अंधश्रद्धेचा शिक्का मारण्यास उतावीळ असतो.
पावसाचा अंदाज, आरोग्य आणि दैनंदिन जीवनात यशस्वी होण्याचा मंत्र अशा अनेक अंगानी हे "नक्षत्रांचे देणे" आपण मिळवू शकतो पण आपण घेण्यास तयार आहोत का?
यशवंत मराठे
सुधीर दांडेकर
yeshwant.marathe@gmail.com
#nakshatra #ayurved #नक्षत्र #आयुर्वेद #ज्योतिष #शास्त्र