ग्लोबल वॉर्मिंग, प्रदूषण ही नैसर्गिक म्हणजेच निसर्गाच्या आजाराची कारणे आहेत हे सांगायला कुठल्याही तज्ञांची गरज नाही; शाळेतील मुले सुद्धा ते सांगतील. त्यामुळे नुसतेच प्रॉब्लेम मांडणे अथवा प्रश्न उभे करणे खूप सोपे आहे पण त्याची कारणमीमांसा आणि उपाय योजना मांडणे त्याहून महत्वाचे आहे.
शेती
ट्रॅक्टर्स, रासायनिक खते, कीटकनाशके, तणनाशके इत्यादींमुळे अशक्त झालेली विषयुक्त शेती आहे. त्या विषांमुळे गांडूळे, वाळवी, मुंग्या, भुंगे, भुंगेरे, विविध प्रकारच्या आळंब्या व ईतर भू-बुरशी एवढेच नाही तर बॅक्टेरिया सुद्धा मरून जात आहेत. मातीत पिकांची आणि तणांची मुळे सुद्धा उरत नाही आहेत. यामुळे मातीची घनता वाढते. मातीचे कण एकमेकांत घट्ट बसून कडक थर तयार होतो. पण प्रत्यक्षात ते कण रचलेले चिकटलेले नसतात तर सुटेसुटे असतात. त्या मातीत हवेच्या पोकळ्या रहात नाहीत. आणि वनस्पतींच्या मुळ्यांची वाढ नीट होत नाही. असे मातीचे कण, वारा आणि पावसामुळे सहज सुटे होऊन धुपून जातात. आणि शेतांतून ओढ्यांत व तिथून नद्यांमधे जातात. हा शेतांचा त्वचेचा आणि उदराचा क्षय रोग. मग नद्या नांगराव्या लागतात.
डोंगर
आज काल डोंगरांवरही श्रीमंत मुंबई-पुणेकर, दिल्लीकर शहरी लोक फार्म हौस पूर्ण करण्यासाठी जमिनी विकत घेतात. त्यांपैकी बऱ्याच जणांना जमिनींमधून जास्तीत नगदी पिके काढण्याची अधिक हौस असते. 'शेतात' काम करायला सोपे जावे म्हणून तणनाशके फवारणीचे सल्ले दिले घेतले जातात. या शेतांपर्यंत पोहोचण्यासाठी पाऊलवाटा पुरत नाहीत.. 'रस्ते' लागतात.. रुंद मोठ्या गाड्या जातील असे. रस्त्यांसाठी डोंगर कापावा लागतो. दगडखाणी करून डबर, खडी बनवावी लागते. नदीतील वाळू काढायला बंदी असल्याने क्वारीतल्या धोंड्यांना रगडून रगडून आर्टिफिशियल क्वारी-सँड बनवावी लागते. त्याकरता डोंगरात सुरुंग लावावे लागतात. शहरी माणसे त्यांचे जेवण मऊसूत राहावे म्हणून जाहिरातीत दाखवतात तशी ॲल्युमिनियम फॉईल वापरतात. त्यासाठी बॉक्साईट काढावं लागतं; ते डोंगर फोडल्याशिवाय मिळत नाही. डोंगरांवर रिसॉर्ट्स बनतात तिकडे आणखीनच मोठे रुंद रस्ते लागतात.. आठल्यांच्या नव्या अंतुशेठ बर्व्यांच्या भाषेत, दारवा प्यायला लवकरात लवकर गोव्यात पोचण्यासाठी, हायवे बांधावे लागतात.. वळणं कमीतकमी रहावी म्हणून त्यांना दऱ्या किंवा सखलभाग असलेल्या ठिकाणी भर घालून उंच करावे लागते. भर घालण्यासाठी जवळचेच डोंगर तोडून दगडमाती आणली जाते. पूर्वी मधे आलेल्या डोंगरांवर चढून उतरून रस्ते जात असत. आता ते टाळण्यासाठी टेकड्यांवर जेसीबी पोकलेननी हल्ला केला जातो. मधेच कुठे राकट, कणखर, कठीण, पाषाण लागला तर मग.. काय करणार, नाईलाजाने सुरुंग लावावेच लागतात. या सगळ्यात डोंगरांना, हाडांचा आणि मांसाचा क्षय रोग होतो.
चकाकते ते सगळेच सोने नसते
डोंगरांवर हिरव्या पानांची झाडे दिसणे म्हणजे जंगल असणे नसते. गावठी आंब्याच्या झाडाची दाट आमराई अन् कलमी आंब्याची घन, सघन इत्यादी दाटी यांच्यातही फरक असतो. कुठल्याही कलमी बागा अगदी ऑरगॅनिक फार्मिंगच्या सुद्धा आणि नैसर्गिक बहुविधतेने नटलेले बहुस्तरीय वनस्पतींनी नटलेले वन-कानन-जंगल यातही जैविक, भूजैविक-रासायनिक फरक असतो. डोंगरांवरील कलमांच्या बागा हिरव्या दिसल्या तरी त्या म्हणजे काही जंगल नाही. कलमांचे पिक लवकरात लवकर मिळवण्यासाठी ती नर्सरीतून तीन चार वर्षांची विकत घेतली जातात. त्यांना सोटमूळ नसते. घन, सघन इत्यादी लागवडी करून त्याला ठिबक सिंचनानी पाणी दिले जाते. मुळे तेवढ्याच भागात राहतात. इतर भागातील मातीला ऊन पावसाचा मारा सहन करत रहावे लागते. अशी माती साध्या पावसात धुपते व ढगफुटीत डोंगर सोडून पटकन सपाटीचा आसरा घेते.
वणवे
आजाराचे दुसरे कारण म्हणजे वणवे. कोकणातील सर्व डोंगर उतारांवर जाणून बुजून आग लावून वणवे पेटवले जातात. हा रस्त्यांवरून येणाऱ्या जाणाऱ्यांचा निष्काळजीपणा आणि काही ठिकाणची एक जुनी परंपरा आहे. ज्या काळी कोकणामध्ये माणसांच्यापेक्षा जास्त गाईगुरे होती, त्याकाळी त्या गाई गुरांना चरण्यासाठी कुरण मोकळे रहावे म्हणून, आणि तिथे जंगल उभे राहू नये म्हणून प्रयत्नपूर्वक वणवे लावले जात होते. परंतु गेली जवळ-जवळ दोन-तीन दशके कोकणातील गाई गुरे कमी झाली आहेत. त्यामुळे चाऱ्याची तेवढी आवश्यकता नाही. तरीसुद्धा केवळ एक परंपरा म्हणून हजारो हेक्टर जमीन भाजून निघते. त्यामुळे डोंगरावरील वृक्षराजी कमी होते. हे होऊ नये यासाठी जनजागरण खूप आवश्यक आहे. तिसरे म्हणजे जंगल आणि कुरणांवरील तणनाशकांचा वापर; या तणनाशकांमुळे सुद्धा मोठ्या प्रमाणावर जंगल नाश होतो.
या बाबी अशाच राहिल्यास आणि कितीही वृक्षारोपण केले तरी त्यांचा काहीही उपयोग नाही आणि जर या बाबींवर उपयोग उपाय केला तर मानव आणि कृत्रिम वृक्षारोपण करण्याची आवश्यकता नाही. कारण अजूनही मुंबई, ठाणे, पनवेल तसेच शहापूरचे काही भाग वगळता कोकणातल्या जंगलांमध्ये रीजनरेटीव कपॅसिटी म्हणतात ती पुनर्निर्माणची क्षमता भरपूर आहे.
बकऱ्यांचे अतिरिक्त चरणे आणि व्यापारी दूध डेअरी साठी डोंगर उतारांवरील गवत कापून दूरच्या प्रदेशांमध्ये विकणे या क्रियाही सुदृढ जंगलांच्या निर्मितीतील भलेमोठे अडथळे आहेत.
डोंगर उतारांचे सपाटीकरण किंवा टेरेसिंग
हा उपाय कोकणात आपल्या पूर्वजांनी फार पूर्वीच केला आहे. त्यालाच भातशेती म्हणतात. त्यातही योग्य आणि अयोग्य अशा पद्धती आहेत. पूर्वजांनी उतारांना दगड आडवे लावून त्यांच्या योगे वरून धुपून वाहणारी माती अडवली; आणि भातखाचरे बनवली. नव्या उपायांमध्ये मात्र जेसीबी आणि ट्रॅक्टर यांनी खोदून खोदून आणि माती ढकलून, 'मजगी' या नावाने, जबरदस्तीने सपाट्या बनवल्या जात आहेत. हे जबरदस्तीचे सपाटीकरण मातीची धूप होण्याचे कोकणातील एक मुख्य कारण आहे.
कोकणात पावसाची तीव्रता आणि प्रमाण दोन्ही भरपूर असते. स्वाभाविकच येथे सतत पंचमहाभूतांशी झगडा मांडलेला असतो. त्यांच्याशी झगडून यशस्वी होणे केवळ अशक्य. हे आपले कोकणातील पूर्वज जाणत असत. त्यामुळे येथे वेगळ्या प्रकारची जलसंधारणाची कामे करावी लागतात. येथे पारंपारिक माथा ते पायथा उपाय चालत नाहीत. पठारी किंवा मैदानी किंवा कमी पावसाच्या फुटकळ डोंगरी भागात वर पाणी मुरवून खालच्या भागातील विहिरींचे पाणी वाढलेले दिसते. कोकणात विहिरींचे पाणी वाढवण्यासाठी (खरे तर वरच्या भागातील पाण्याचा निचरा कमी गतीने होण्यासाठी); खालच्या बाजूला पाणी अडवावे लागते.
हे झाले डोंगरांचे आजार
आणखीन एक दोघांचा कंम्बाइन्ड आजार आहे.. त्याला म्हणायचं यडचॅप इंजिनिअर आजार.. रस्त्यावर पाणी साठून राहू नये म्हणून स्टॉर्म वॉटर ड्रेन बनवतात.. मुंबई गोवा हायवेवरून जाताना काही ठिकाणी हा आजार दिसतो.. स्टॉर्म वॉटर ड्रेनची लेवल रस्त्यावरील लेवलच्या खाली असते.. पण अपस्ट्रीम शेतांच्या किंवा जमीन या स्टॉर्म वॉटर ड्रेनचा बांध बनतो.. मग वरची शेते बुडतात.. बुडली तर बुडली.. मागास कुठली असे काही हुशार शहरी म्हणून मोकळे होतात.
त्यामुळे सरसकट सगळीकडे एकच समान धोरण चालत नाही. भौगोलिक परिस्थितीनुसार त्यात बदल करावे लागतात याचा जेव्हा डोक्यात प्रकाश पडेल तो सुदिन.
@ यशवंत मराठे
yeshwant.marathe@gmail.com
Thanks to Dr Ajit Gokhale for his inputs.