काही दिवसांपूर्वी मी एक गोष्ट ऐकली होती की बागेत फिरायला आलेल्या दोन व्यक्तींची ओळख झाली आणि बोलता बोलता त्यांना समजले आपण शेजारी आहोत. म्हणजे बागेत भेटेपर्यंत त्यांना माहीतच नव्हते की ते शेजारी आहेत. यातला अतिशयोक्तीचा भाग सोडला तरी काही अंशी हे सत्य असू शकते.
खरं तर हे अशक्य अजिबात नाही कारण आपल्या सद्य काळात बाजूला कोण राहते याचे भान कुठे असते? मी बरा आणि माझं बरं ही आजची परिस्थिती.
किती प्रगत झाले हं ना जग?
त्या मानाने आमची पिढी फारच मागास म्हणावी लागेल. आम्ही कोणाच्याही घरी कधीही जात होतो; येऊ का? विचारण्याची गरज कधीच भासली नाही. घरातली भाजी आवडली नाही तर हक्काने शेजारी जाऊन जेवत होतो. आणि शेजारच्या काकू तुझ्यापेक्षा चांगली आमटी अथवा भाजी बनवतात असे बिनधास्त बिनदिक्कतपणे आईला सांगायचो. गंमत म्हणजे ती ही कधी हे मनाला लावून घ्यायची नाही. आपल्या घरात काय चालले आहे याची पूर्णपणे माहिती शेजाऱ्यांना असायची. लग्नाच्या मुलीला बघायला पाहुणे येणार असतील तर तिचा मेकअप वगैरे शेजारच्या घरात होत होता. आणि जास्त पाहुणे आले तर शेजारी त्यातील काही पाहुणे स्वतःच्या घरी नेत होते.आणि त्यांचा व्यवस्थित पाहुणचार करत होते.
आणि हो, हे फक्त वाडा किंवा चाळ संस्कृतीत होत होते असे अजिबात नाही. मुंबईच्या आमच्या फ्लॅट सिस्टीममध्ये देखील हाच शिरस्ता होता. वाटीभर साखर, चार लसूण पाकळ्या, दोन मिरच्या, दोन कोथिंबीरीच्या काड्या यांची हक्काने देवाण घेवाण चालायची आणि गरम पोहे, भाजी आपुलकीने घरात यायची. आंब्याच्या सीझन मध्ये एकत्र येऊन पॉट आईसक्रीम बनविणे हा लाडका कार्यक्रम असायचा. आम्ही सगळी मुले सगळी घरे आपलीच असल्याप्रमाणे वावरत असायचो. आणि शेजारी हक्काने प्रेम व शिक्षा दोन्ही करत होते. आणि त्यावर कोणाची काहीच हरकत नव्हती. ठराविक वेळेत घराचे दार उघडले नाही तर शेजारी चौकशी करत होते. जर उशिरा उठायचे असेल तर आदल्या दिवशी शेजारी सांगावे लागत होते.
आपले काम सोडून कोणी मूल इतरत्र दिसले तर शेजारी हक्काने कान पकडून घरी आणत होते. आणि घरातील व्यक्ती म्हणायच्या असेच लक्ष असू द्या. त्यामुळे मुले बिघडण्याचे प्रमाण खूप कमी होते. प्रत्येक घरात संध्यादीप लागले की शुभंकरोती म्हटले जात होते. सर्व मुले एकत्रित पाढे, कविता म्हणत होते. आणि एखाद्या मुलाला घरी यायला उशीर झाला तर सगळे शेजारी त्याला शोधायला बाहेर पडत होते.
अगदी लग्न ठरवताना वधू किंवा वर यांची चौकशी आजूबाजूच्या वाणी, न्हावी, शिंपी यांच्याकडे केली जात होती. कारण ती चर्चेची ठिकाणे होती. आणि त्यांनी वधू किंवा वर यांची वर्तणूक चांगली आहे असे सांगितले की, ते लग्न निश्चित ठरायचे. सांगू तेवढे थोडेच.
माझी एक आठवण अगदी मनावर कोरून ठेवली आहे. मी लहान असताना सोसायटीत खेळत असताना मी जोरात पडलो आणि कपाळावर मोठी खोक पडली आणि घळाघळा रक्त वाहू लागलं. माझ्या घरी त्यावेळी कोणीच नव्हते त्यामुळे शेजारच्या जहागीरदार काकूंकडे आपलेच घर असल्यासारखे भोकाड पसरले. काकूंनी मला प्रेमाने जवळ घेतले; जखमेवर हळद दाबली आणि लगोलग मला डॉक्टरकडे घेऊन गेल्या. पाच सहा टाके घालावे लागले. त्या जखमेचा व्रण अजून माझ्या कपाळावर आहे. त्याला हात लावला की जहागीरदार काकूंची हमखास आठवण होतेच. अतिशय हृद्य आठवणी आहेत त्या. आज मला खात्री आहे की त्यावेळी मी सोसायटीतील कोणाच्याही घरी शिरलो असतो तरी हेच घडले असते. ते एकेमकांवरील प्रेम आणि आस्था पुढे काळाच्या उदरात कशी गडप झाली ते कळलंच नाही. आमच्या सोसायटीत ३७ फ्लॅट्स, जे नंतर ३९ झाले; पण आज ओरिजनल असे फक्त ५-६ शिल्लक राहिले. काही समवयस्क देवाघरी गेले आणि त्यांची मुले परदेशी स्थाईक झाली. सगळ्यांशी संबंधच तुटला.
आठवतंय ते सगळं? एक चेंडू, लोखंडी शिग, ठिकऱ्या असल्या मामुली गोष्टी हेच या खेळाचे साहित्य असायचं. व्यापार किंवा ल्युडोसारखे खेळ सोडले तर बाकी खेळांना तर काही लागायचंच नाही. परंतु समाजाच्या विकासाच्या क्रांतीत हे सगळे भिडू कुठे तरी हरवूनच गेलेत. यापैकी कुठल्याही खेळाला अमूक एक जागा किंवा तमूक एक सेट अप अशा कुठल्याच नखऱ्यांची गरज नव्हती. आजही कुठल्याही सोसायटीच्या आवारातही यातले अनेक खेळ खेळता येतील इतकी जागा हमखास असते. लंगडी, ठिक्कर, लपाछपी.. आजही मुलं हे खेळ खेळू शकतात. पण कदाचित आपणच त्यांना त्या खेळांपर्यंत न्यायला कमी पडतोय.. हल्लीची मुले मोबाईल अथवा टीव्ही वर गेम्स खेळण्यात इतकी मश्गुल असतात की मैदानी अथवा घराबाहेर खेळले जाणारे खेळ हे कालौघात कुठेतरी कायमचे हरवले. आणि हो, क्रिकेट खेळण्याची कितीही इच्छा असली तरी तेवढी जागाच नसते.
पण आता माणसे प्रगत झाली. शेजारचे जवळचे नेबर झाले. शेजारचे काका अंकल झाले. शेजाऱ्यांच्या घरातील वावर कमी झाला. शेजारी फोन करून घरी आहात का? येऊ का? असे विचारू लागले. दोन घरात एकच भिंत असून मनात दुरावा वाढला. तुम्हाला काय करायचे आहे? किंवा आपल्याला काय करायचे? अशी भूमिका दोन शेजाऱ्यांच्या मनात निर्माण झाली. आणि सर्वांनाच अपेक्षित पण घातक असे स्वातंत्र्य मिळाले. सध्याच्या काही मुलांच्या बाबतीतल्या घटना वाचल्या की जास्त प्रकर्षानं जाणवतं आणि वाटतं की कुठेतरी हे ओढवून घेतलेले स्वातंत्र्य याला कारण असावे. आपुलकीचा शेजार असेल तर नकळत संस्कार होतात. मुलांना थोडा धाक असतो. हल्ली पालक वारेमाप पैसा मिळवतात. आणि मुलांना पुरवतात. कोणाचाच धाक नाही. आम्ही काहीही करु तुम्ही कोण विचारणारे? असे विचार वाढत आहेत. याला कोणते स्वातंत्र्य म्हणायचे हेच कळत नाही.
माझ्या सारख्या शेजाऱ्यांच्या प्रेमात व धाकात वाढलेल्या व्यक्तीला हे अती स्वातंत्र्य खुपते आणि चिंता वाटते. सगळे माझ्या मताशी सहमत असतील असे नाही.पण मला लुप्त होत असलेले शेजारी आठवतात. आणि ते आवश्यक देखील वाटतात.
कालाय तस्मै नमः !!